অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅक्टिनोझोआ

सीलेंटेरेटा (आंतरगुही) संघातील चार वर्गांपैकी एक. या वर्गात मृदू प्रवाल (मऊ पोवळी), समुद्र-पुष्पे, अश्मप्रवाल (दगडी पोवळी), समुद्र-व्यजने (समुद्र-पंखे) इत्यादिकांचा समावेश केलेला आहे. या वर्गातील बहुसंख्य प्राणी खडकाला किंवा एखाद्या आधाराला कायमचे चिकटलेले असतात; काही वाळूत घट्ट रुतून बसलेले तर काही मुक्तजीवी (स्वतंत्र राहणारे) असतात. या वर्गाला अँथोझोआ असेही नाव आहे.

इतर सीलेंटरेट प्राण्यांप्रमाणेच यात अरीय सममिती (मध्यातून जाणार्‍या कोणत्याही उभ्या प्रतलाने प्राण्याचे दोन समान भाग होतील अशी अवस्था), मध्यवर्ती पचन तंत्र (पचन संस्था) आणि दंशकोशिका (दंश करणार्‍या पेशी) असतात. मेड्युसा अवस्था [जेलीफिश] मुळीच आढळत नाही. सगळे प्राणी पॉलिप (सीलेंटरेट प्राण्यांच्या वसाहतीतील एकेक व्यक्ती) असतात. प्राण्याचे मोकळे टोक मोठे, पसरट आणि एखाद्या चकतीप्रमाणे सपाट असते. या चकतीच्या मध्यावर मुख्य-छिद्र असते. मुखाभोवती संस्पर्शक असून त्यांवर मोठ्या दंशकोशिका असतात. बाह्यत्वचेच्या अंतर्वृद्धीने मुखापासून आत वळलेली एक नलिका (मुखपथ)तयार होते आणि मुख तिच्यात उघडते.

देहभित्तीपासून निघून मुखपथाकडे गेलेले किंवा त्याला चिकटलेले कित्येक उभे अरीय (त्रिज्येप्रमाणे मांडणी असलेले) पडदे अथवा आंत्रयोजनी (देहभित्तीपासून निघून आंत्रात गेलेले उभे स्‍नायुमय पडदे) असतात. आंत्राच्या (आतड्याच्या भित्तीमध्ये एक किंवा दोन खोल खाचा असून प्रत्येकीला ग्रसिका-खाच (घसा आणि जठर यांच्या मधील भागावर असणारी खाच, सायफनोग्‍लिफ) म्हणतात. ग्रसिका-खाचा दोन असल्या तर मुख एखाद्या चिरेसारखे लांबट होते व त्याच्या दोन्ही टोकांकडील बाजूंवर खाचा असतात. आंत्रर्योजनींच्या मोकळ्या कडांवर दंशकोशिका असतात. पाचक कोशिका आणि जननेंद्रिय आंत्रयोजनींवरच असतात.अ‍ॅक्टिनोझोआ वर्गातील काही प्राणी एकेकटे असतात, पण बाकीच्या बहुतेक प्राण्यांत अनुदैर्घ्य विखंडनाने (शरीराचे लांबीला अनुसरून तुकडे पडणे) नवीन प्राणी उत्पन्न होऊन त्यांचे लहानमोठे निवह (वसाहती) अथवा संघ तयार होतात. या वर्गात मुकुलन (कळ्या किंवा अंकुर फुटून त्यांच्यापासून नवीन प्राणी तयार होणे) आणि एक प्रकारचे अनुप्रस्थ (आडवे) विखंडनदेखील आढळते.

अ‍ॅक्टिनोझोआचे ऑक्टोकोरॅलिया आणि हेक्झॅकोरॅलिया असे दोन उपवर्ग केलेले आहेत.

ऑक्टोकोरॅलियाचे तीन गण पाडलेले आहेत. पहिल्या गणात अ‍ॅल्सिओनियम, लाल पोवळे, ट्युबिपोरा, निळे पोवळे इत्यादिकांचा समावेश होतो; दुसऱ्या गणात गॉर्गोनियासारख्या सगळ्या समुद्रव्यजनांचा अंतर्भाव होतो आणि तिसऱ्या गणात पेनॅट्युला व तत्सम जाती यांचा समावेश होतो.

हेक्झॅकोरॅलियाउपवर्गाचे पाच गण आहेत. पहिल्या गणात सगळी समुद्र-पुष्पे येतात; दुसऱ्यात बहुतेक सगळ्या अश्म-प्रवालांचा समावेश होतो; तिसऱ्यात झोअँथस आणि त्याच्यासारखे इतर प्राणी यांचा समावेश केला आहे; हे प्राणीएकेकटे किंवा संघवासी असतात; चौथ्यात काळ्या पोवळ्यांचा अंतर्भाव होतो आणि पाचव्यात पॅकिसेरिअँथस आणि तत्सम इतर एकेकट्या असणाऱ्या जाती येतात.

लेखक : ज. नी. कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate