অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पीकॉक पॅन्सी

पीकॉक पॅन्सी

हे पीकॉक पॅन्सी भारतात सहज आणि सर्वत्र सापडणारे एक अतिशय सुंदर फुलपाखरू निंफॅलीड जातीतील आहे. ही फुलपाखरे भडक आणि ऊजळ भगव्या रंगाची असतात. ही जलद उडणारी फुलपाखरे जशी फुलांवर मधाकरता आकर्षीत होतात त्याचप्रमाणे अतिपक फळे, झाडांचा गोंद, प्राण्याचे मल, मुत्र ह्यावर पण आकर्षीत होतात. ह्या पीकॉक पॅन्सी प्रमाणेच आपल्याकडे इतर पाच जातीची पॅन्सी फुलपाखरे आढळतात. ती म्हणजे ब्लू पॅन्सी, यलो पॅन्सी, ग्रे पॅन्सी, लेमन पॅन्सी आणि चॉकलेट पॅन्सी. हे पीकॉक पॅन्सी आणि बॅरोनेट जातीचे फुलपाखरू बरेचसे सारखे दिसतात.

ह्या फुलपाखराच्या वरच्या आणि खालच्या पंखांवर मोरपीशी डोळ्यांची नक्षी असते. ह्या शीतरक्ताच्या कीटकांना उडण्याकरता प्रचंड उर्जा लागते. ही उर्जा त्यांना सूर्यकीरणांपासून मिळते आणि याकरता बऱ्याच वेळा फुलपाखरे उन्हात आपले चारही पंख पसरून बसलेली आढळतात. अशाप्रकारे उन्हात बसल्यामुळे त्यांना त्या सूर्यकीरणांपासून २५ / ३० सेल्सी. एवढी उष्णता मिळते आणि त्यांचे उडण्याचे स्नायू सहज कार्यरत होतात. जेंव्हा ही पीकॉक पॅन्सी उन्हात पंख पसरवून बसलेली असतात तेंव्हा त्यांच्या पंखांवर असलेल्या डोळ्यांची नक्षी ही एखादा मोठा प्राणी अथवा पक्षीच डोळे वटारून बघतो आहे अशी दिसते. यामुळे भक्षक पक्षी त्यांच्यावर हल्ला करायचे सोडून त्यांना घाबरून लांब पळतात. या जातीचे नर हे त्या जातीचा दूसरा नर अथवा इतर कुठले फुलपाखरू त्याच्या आसपास आले तर त्याच्या पाठीमागे लागून त्याला पळवून लावते. घाणेरी, झेंडू या सारख्या बागेतील फुलांवर हे फुलपाखरू सहज आकर्षीत होते.

जेंव्हा नैसर्गीक समरूपता निसर्गात उपयोगी ठरत नाही तेंव्हा या कीटकांना इतर काही बचावाचे पवित्रे घ्यायलातात जेणेकरून त्यांचा जीव वाचू शकतो. फुलपाखरे आणि काही जातीचे पतंग या कामात एकदम तरबेज आहेत. बऱ्याच जातीची फुलपाखरे ही बाहेरून अगदी तंतोतंत सुकलेल्या पानासारखी दिसतात पण आतून त्यांना झळाळणारे रंग असतात. मोक्याच्या वेळी ते भक्षकाला हे आतले भडक रंग एखाद्या कॅमेराच्या फ्लॅशसारखे चमकवून दाखवतात आणि तेथून पळ काढतात, भक्षक मात्र तोच रंग डोक्यात ठेवून शोधत रहातात. काही वेळेला या पीकॉक पॅन्सी सारख्या फुलपाखरांना भडक आणि बटबटीत डोळ्यांची नक्षी असते. त्यामुळे एखादा घुबडासारखा मोठा पक्षी आपलआकडे डोळे वटारून बघतो आहे असे वाटून भक्षक हल्ला करायचे सोडून पळ काढतो.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत -  युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate