অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजबिंडा ब्लॅक राजा

राजबिंडा ब्लॅक राजा

एप्रिल, मे महिना आला की उन्हाची तलखी वाढायला लागते. आपल्या इकडच्या पानगळीच्या जंगलात जाताना दहावेळा विचार करावा लागतो कारण सर्वच मोठ्या झाडांची पाने गळून गेलेली असतात आणि लहानसहान खुरटी झुडपे, गवत पुर्ण वाळून गेलेले असते. पक्षिनिरिक्षणासाठी आणि फुलपाखरांसाठी मात्र हा उत्तम काळ असतो. वाळक्या बिनपानांच्या झाडांत रंगीबेरंगी पक्षी सहज दिसतात. अगदी त्यांच्या आवाज आला आला तरी पर्णहीन झाडांवर त्यांना शोधणे सोपे जाते. या पक्ष्यांबरोबरच फुलपाखरांकरतासुद्धा हा काळ योग्यच असतो. बऱ्याच ओढ्यांच्या जागा, धबधब्यांच्या ठिकाणे वाळायला लागलेली असतात.

पाण्याचे प्रमाण कमी असते आणि काही ठिकाणी चिखल सुकायला लागला असतो. हेच ठिकाण ह्या फुलपाखरांकरता योग्य असते. खुपशा फुलपाखरांच्या जातीतील नर अश्या ठिकाणी "चिखलपान" करायला एकत्र जमतात. एकत्र म्हणजे अक्षरश: ती शेकड्याने एकत्र, एकाच ठिकाणी जमलेली असतात. फुलपाखरांची वास घ्यायची क्षमता जबरदस्त असते आणि याच कारणामुळे ती जास्त मध असलेल्या फुलांवर लगेच आकर्षित होतात. याच मुळे ती या ओलसर चिखलावर पण आकर्षित होतात. ह्या चिखलात त्यांना पोषक अशी क्षारद्रव्ये मिळतात जी त्यांना फुलांतील मधापासून मिळत नाहीत. बऱ्याच वेळेला नेहेमी जलद उडणारी फुलपाखरे यावेळी चिखलपान करताना आपल्याला अगदी शांत बसलेली आढळतात. याचबरोबर इतर वेळी न आढळणारी पण याच वेळेस दिसणारी स्पॉटेड स्वोर्डटेल, ब्लॅक ऍंगल अशी फुलपाखरे दिसतात. या सगळ्या फुलपाखरांबरोबर माझी नजर कायम शोधत असते ती "राजा" फुलपाखरांना.

आपल्याकडे "टॉनी राजा" आणि "ब्लॅक राजा" असे दोन प्रकार दिसतात. दोघेही भन्नाट वेगाने उडणारे आणि बघता बघता होत्याचे नव्हते होणारे. ही फुलपाखरे तशी सहसा शहरात दिसत नाहीत. घनदाट जंगलांमधेच दिसली तर फार कमी वेळा दिसतात. या दोनही राजांना अतिपक्व फळे, मादक द्रव्ये, कुजलेली फळे / मांस यांची फार ओढ असते. त्यामुळे असे काही पदार्थ असतील तर त्यावर ती लगेच आकर्षित होतात आणि अश्या वेळेस त्यांचे छान छायाचित्रण होऊ शकते. हे ब्लॅक राजा फुलपाखरू खरोखरच राजा नावाला साजेसे असते. त्यांचे खालचे पंख चमकदार पांढऱ्या, राखी रंगाचे असतात आणि त्यावर निळसर झळाळी असते. ह्या पांढऱ्या रंगावर उठावदार पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. वरून मात्र हे फुलपाखरू काळसर रंगाचे असून त्यावर ठळक पिवळ्या रंगाच्या ठिपक्यांच्या रांगा असतात.

सर्वात आकर्षक आणि राजाला शोभणाऱ्या म्हणजे याच्या खालच्या पंखांवर दोन दिमाखदार शेपट्या असतात. ज्या त्याच्या राजबिंड्या रूपात कायम भर घालतात. त्याच्या भन्नाट उडण्याच्या वेगामुळे आणि निसर्गाशी समरूप होणाऱ्या रंगामुळे ते एरवी पटकन दिसून येत नाहीत. गेल्या वर्षी आम्ही नेलेल्या "फ्रुट बेट" वर एक ब्लॅक राजा आकर्षित झाले आणि आम्हाला त्याची बरीच छायाचित्रे मिळाली. मात्र या वर्षी माहिम निसर्ग उद्यानात माझ्या नेल्सन नावाच्या मित्राला एका झाडावर ७ ब्लॅक राजा एकाच ठिकाणी टिपता आले. त्याचे ते छायाचित्र अप्रतिम होते पण लगोलग आम्ही येऊरला गेलो असताना आम्हाला एक ब्लॅक राजा आकर्षित झालेले दिसले त्याचे छायाचित्रण करत असतानाच अजून दुसरे दोन ब्लॅक राजा आले आणि त्याच जागी बसले आणि मग मलासुद्धा एकाच वेळी तीन तीन ब्लॅक राजांची छायाचित्रे मिळाली. ती त्यांच्या रसपाना एवढी दंग होती की मी त्यातल्या एकाला हळूच बोटावर घेतले तरी त्याला त्याचे काही भान नव्हते.

इतरांनी त्याची माझ्या बोटावर अगदी जवळून छायाचित्रे घेतल्यावर मी त्याला माझ्या मित्राच्या बोटावर सरकावले तरीही ते तिथेच स्थीर होते. इतरवेळी सुसाट वेगाने जाणारे हेच ते फुलपाखरू ह्यावर विश्वास बसत नव्हता. या नंतर तर तो मित्र त्याच्या कॅमेरात त्या फुलपाखराचे छायाचित्रण करताना त्याच्या लेन्समधे त्या ब्लॅक राजाचे प्रतिबिंब आणि पुढे ते बोटावरचे फुलपाखरू असेही छायाचित्र मला मिळवता आले.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate