অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गिंकोएलीझ

गिंकोएलीझ

गिंकोएलीझ

बीजी वनस्पतींपैकी प्रकटबीज वनस्पती उपविभागातील हा एक लहान गण असून गिंकोएसी हे एकच कुल त्यामध्ये समाविष्ट आहे. एके काळी या कुलातील वनस्पतींचा प्रसार सर्व जगभर होता. पर्मियन कल्पातील (सु. २७·५ — २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) बऱ्याच वंशांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) सापडले आहेत व जुरासिक कल्पात (सु. १८·५ — १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) ते विपुल होते, यावरून ह्या काळात ते कुल भरभराटीत असून त्यातील वंशांचा प्रसार सर्वत्र होता असे दिसते. मध्यजीव महाकल्पात (सु. २३ — ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) या कुलातील कमीत कमी पंधरा वंश व त्यापेक्षा जास्त जाती होत्या, परंतु सध्या गिंको बायलोबा (इं. मेडन हेअर ट्री, क्यू ट्री ) व्यतिरिक्त इतर सर्वं जाती नामशेष झाल्या आहेत. या जातीची काही लक्षणे सायकॅडेलीझसारखी असली, तरी ती मध्यजीव महाकल्पाच्या उत्तर काळातील ⇨बीजी नेचे किंवा कदाचित ⇨कॉर्डायटेलीझमधील प्रारंभिक सदस्य यांच्यापासून विकास पावली असावी. चीन आणि जपानमध्ये बुद्धाच्या मंदिराभोवती पुजाऱ्यांनी गिंको बायलोबाची शेकडो वर्षे लागवड चालू ठेवली असल्यामुळेच ही जाती जिवंत राहिली, नाहीतर इतरांप्रमाणे तीही नामशेष झाली असती.

गिंको बायलोबा हा वृक्ष गिंकोएसी कुलातील एकमेव जिवंत प्रतिनिधी असून त्याच्या लक्षणांतील पुरातनत्व पाहून त्याला‘जिवंत जीवाश्म’ म्हणतात. चीनमध्ये १६९० साली डच ईस्ट इंडिया कंपनीतील केंपर यांनी तो वृक्ष प्रथम पाहिल्यावर १७३० मध्ये तो हॉलंडमध्ये व नंतर इंग्लंडमध्ये नेला गेला व यूरोपच्या इतर भागांत त्याचा प्रसार झाला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस तो अमेरिकेत नेला गेला. चीनच्या आग्नेय भागातील जंगलात तो रानटी अवस्थेत असावा असे म्हणतात. बहुतेक सर्व समशीतोष्ण भागांत त्याचा प्रसार आहे. गिंको हे नाव प्रथम केंपर यांनीच चिनी नावा (गिंक्यो ) वरून बनविले व कार्ल लिनीअस यांनी ते वनस्पतिविज्ञानात घेतले. अमेरिका व इतर देशांत गिंकोचा प्रसार आशियातील बागांमधून झाला आहे. त्याची लागवड मुख्यतः शोभेकरिता रस्त्याच्या दुतर्फा किंवा बंगल्यांच्या अथवा मोठ्या संस्थांच्या आवारात केली जाते. फळाला किळसवाणा वास येत असल्यामुळे बगीच्यात लागवड करणे कित्येकांना आवडत नाही, म्हणून फक्त नर-वृक्ष लावतात व नवीन लागवड कलमांपासून करतात.

गिंको बायलोबा हा पानझडी वृक्ष सु. ३० मी. उंच वाढतो व त्याच्या खोडाचा व्यास सु. एक मी. असतो. प्रथम त्याचा आकार त्रिकोनी शंकुमंताप्रमाणे (सूचीपर्णीप्रमाणे) असतो, परंतु पुढे अनियमित वाढ व पसरट फांद्या यांमुळे तो बराच रुंद होतो. यावर दोन प्रकारच्या फांद्या येतात : (१) अकुंठित (अमर्यादित ) वाढीच्या, लांब कांड्यांच्या मोठ्या फांद्या; यांवर अनेक पाने विखुरलेली असतात व (२) मर्यादित वाढीच्या, जवळजवळ पेरी असलेल्या लहान फांद्या; यांवर थोडी पाने झुबक्याने येतात. पानांचा आकार पंख्यासारखा व देठ लांब [मेडन हेअर नेचासारखी म्हणजे अ‍ॅडिअँटमसारखी, → नेचे]; त्यावरून ‘ मेडन हेअर ट्री ’ नाव

पडले. पानाच्या पात्याचे दोन खंड पडल्याने त्या अर्थाचे लॅटिन जातिवाचक नाव पडले. प्राचीन वंशातील आणि जातींतील झाडांच्या जीवाश्मांत पानाची विभागणी व देठ यांबाबतीत फरक आढळतात. तथापि द्विशाखाक्रमी शिरांची मांडणी मात्र सर्वांत आढळते; बहुतेक नेचांतही हीच असते. ⇨ सायकॅडेलीझ प्रमाणे गिंको वृक्ष विभक्तलिंगी (स्त्री आणि नर प्रजोत्पादक अवयव वेगवेगळ्या वृक्षांवर असणारा) आहे. नर-वृक्षांवर विरळ लोंबती कणिशे (लघुबीजुककोशधारी पुं-शंकू म्हणजे प्रजोत्पादक नर-कोशिका-पेशी निर्माण करणारे शंकूसारखे अवयव) असून त्यातील अक्षावर अनेक लघुबीजुकपर्णे (लघुबीजुके धारण करणारे पानासारखे अवयव) असतात (आकृती पहा); प्रत्येकावर टोकास दोन, क्वचित तीन किंवा चार लघु बीजुककोश (लघुबीजुके असलेल्या पिशव्या) असतात. त्यांचा विकास सर्वसाधारणपणे ⇨ सायकॅडेलीझप्रमाणे असतो. बीजुककोशाचे आवरण जाड (अनेक थरांचे) असून ते उभे तडकते व अनेक लघुबीजुके मुक्त होतात.

स्त्री-वृक्षावर लांब देठावर स्त्री-शंकू येतो; त्यात फक्त दोन किंवा तीन गुरुबीजुककोश (बीजके म्हणजे बीजाची पूर्वावस्था) असतात; त्यांतील फक्त एकाचीच सायकॅडेलीझप्रमाणे पूर्ण वाढ होते; त्याची संरचनाही ⇨ सायकसच्या बीजकाप्रमाणे असते. दोन वा अधिक अंदुककलश (अचल स्त्रीलिंगी जननकोशिका धारण करणारे कलशासारखे भाग) व लघुबीजुककोश असतात. लघुबीजुकांचा प्रसार वाऱ्यामुळे होतो; त्यांचे ⇨ अंकुरण व त्यातील नंतर बनणाऱ्या रेतुकांचे (चल पुल्लिंगी जननकोशिकांचे) अंदुकाशी मिलन (फलन) झाल्यावर बीजकाचा विकास व रूपांतर बीजात होते. तेथे लघुबीजुकाच्या अभावीही बीजकाची वाढ होते. बीजामध्ये पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश), दोन मांसल दलिका, लहान, आखूड अधराक्ष (दलिकांच्या खालचा भाग) आणि अप्याक्ष (दलिकांच्या वरचा भाग) असतात. इतर संरचना सायकसप्रमाणे असते. लेऑन यांनी पूर्वगर्भ (गर्भापूर्वीची एक अवस्था) व आलंबक (गर्भाला आधार देणारा तंतू) असतो असे दर्शविले आहे (१९०४). बीजाचे अंकुरण अवभौम (जमिनीखाली) असते. कोवळ्या खोडावर प्रथम शल्कपर्णे (खवल्यासारखी पाने) असतात. पुढे त्यांचे नेहमीच्या पानांत संक्रमण होते.

बीजाचे बाहेरचे आवरण मांसल बनल्याने बीज अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळाप्रमाणे दिसते. पुढे त्यात ब्युटिरिक अम्ल तयार झाले की, दुर्गंध येऊ लागतो. हे बी चिनी व जपानी लोक भाजून खातात; त्यातील गर मक्यासारखा लागतो व तो पौष्टिक असतो. खोल व ओलसर जमिनीत हा वृक्ष चांगला येतो. त्याला कीटकांचा व कवकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा) उपद्रव होत नाही. जपानी लोक हा वृक्ष पवित्र मानतात.

दोन्ही वृक्ष (नर व स्त्री) फुले येण्यापूर्वी ओळखणे कठीण असते, परंतु अलीकडे कोशिकाविज्ञानातील तंत्राने ते शक्य झाले आहे. स्त्री-वृक्षांना मॅलिक हायड्रॅझाइड हे रसायन लावून फळे धरणे अशक्य करता येते. त्यामुळे दुर्गंध टाळता येतो. खोडातील ऊतकांची (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या समूहांची) मांडणी सायकॅडेलीझप्रमाणे असते. परंतु ऊतककर (नवीन ऊतके निर्माण करणारा कोशिकांचा थर) व वार्षिक वलये शंकुमंताप्रमाणे [→ कॉनिफेरेलीझ; पाइन] असतात. पूर्ण वाढ झालेल्या मुळांमध्येही वार्षिक वलये व बाहेर ⇨ त्वक्षांचे (बुचासारख्या पदार्थाचे आवरण असलेल्या कोशिकांचे) थर असतात. पानांच्या देठांत दोन वाहिनीवृंद (पाणी व अन्नरसांची ने-आण करणाऱ्या घ टकांचे संच) असतात; श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव्यांच्या नलिका सर्व शरीरात असतात.

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate