অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुग्गूळ

गुग्गूळ

(हिं. गुगूळ; गु. गुग्गुळे, मुकुल; क. गुग्गुळा; सं. देवधूप, उदीप्ता, गुग्गुळ; इं. गम-गुगूल; लॅ. कॉमिफोरा मुकुल, बाल्समोडेंड्रॉन मुकुल कुल-बर्सेरेसी). हा सु. १·२ — १·८ मी. उंच, पानझडी वृक्ष बलुचिस्तान, सिंध, अरबस्तान व भारत (खानदेश, सौराष्ट्र, राजस्थान, बिहार, कर्नाटक इ.) या देशांत रुक्ष व खडकाळ जमिनीवर आढळतो. याची साल हिरवट पिवळी, राखी व खरबरीत असून तिचे तुकडे सोलून जातात. फांद्या गाठाळ, वेड्यावाकड्या व टोकाशी काटेरी असतात. कोवळ्या भागांवर प्रपिंडयुक्त (ग्रंथीयुक्त) केस असतात. पाने संयुक्त व एकाआड एक असून दले १ — ३, चकचकीत, दातेरी व लहान देठाची असतात. याची लहान, लालसर, बहुयुतिक फुले दोन-तीनच्या झुबक्यात मार्च ते एप्रिलमध्ये येतात. पुं-पुष्पात लहान, वंध्य किंजपुट व स्त्री-पुष्पात वंध्य केसर असतात. संदले ४-५, प्रपिंडयुक्त व केसाळ; प्रदले ४-५, पट्टाकृती व केसरदले ८-१०, निम्मी लहान व निम्मी मोठी; बिंब पेल्यासारखे व दातेरी [→ फुल]; फळ लहान, अश्मगर्भी (आठळीयुक्त). पिकल्यावर लाल व अंडाकृती. आठळ्या दोन व बिया दोन असतात [→ बर्सेरेसी].

सालीवर चिरा पाडून राळ-गोंद (गुग्गूळ) मिळतो, त्याला ‘इंडीयन डेलियम’ म्हणतात. तो पिंगट किंवा फिकट हिरवा, सुगंधी असून धुपासारखा वापरतात. तो स्तंभक (आकुंचन करणारा), जंतुनाशक, कफोत्सारी, वाजीकर (कामोत्तेजक), रक्तवर्धक, शामक, वायुनाशी, व्रणनाशक व सौम्य रेचक असतो; घसा व दंतविकारांवर उपयुक्त.

हिराबोळ

हा गुग्गुळासारखाच सुगंधी राळ-गोंद गुग्गुळाच्या वंशातील दुसऱ्या जातीपासून (इं. मिर; लॅ. कॉमिफोरा मिरा ) मिळतो. याची झाडे अरबस्तान व तांबड्या समुद्राच्या आफ्रिकी किनाऱ्यावर

आढळतात. गोंद अग्मिमांद्य, कष्टार्तव (मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना) इत्यादींवर गुणकारी आहे.

 

परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate