অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मनोगत निसर्गाचं...!

मनोगत निसर्गाचं...!

मनोगत निसर्गाचं...!

मी तुमचा सखा, बंधू.. 
माझं आणि तुमचं नातं जन्मोजन्मीचं. 
या पृथ्वीवरचा सगळ्यात बुद्धिवान, हुशार प्राणी म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं. मलाही तुमच्या बुद्धीचं, विद्वत्येचं आणि जाणतेपणाचं खूप कौतुक वाटतं. माझ्या सानिध्यात अनेक प्राणी, लहानमोठे वन्यजीव, पशुपक्षी, झाडे-झुडुपे, वनस्पती राहतात परंतू आता तुमचं राहणीमान इतरांपेक्षा उंचावलंय. तुम्ही तुमच्या बुद्धी-चातुर्यानं, कर्तबगारीनं तुमचं जीवन अधिकाधिक सुलभ आणि सुखकर बनवत आहात, यात मला आनंदच आहे. आपला मित्र, आपला सखा दिवसेंदिवस सुखी होतोय, आनंदी जीवन जगतोय, हे पाहून मीही सुखावतो. 
संत तुकारामांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे..."  या अभंगानंतर तर माझं तुमच्याशी एक वेगळंच नातं जोडलं गेलं. मी तर तुम्हा साऱ्यांच्या प्रेमातच पडलो. माझ्या संवर्धनाची जबाबदारी तुम्ही साऱ्यांनी घेतलीय. शेतामध्ये आहोरात्र राबून सोनं पिकवणारा शेतकरी, माझी काळजी करणारं शासकीय वन विभाग, मी अधिकाधिक हिरवा आणि सदृढ दिसावा यासाठी प्रयत्न करणारे आपण सारे माझ्यासाठी खूप प्रिय आहात. मला जेवढं "देणं" शक्य आहे तेवढं तुम्हाला मी देत राहतो, अगदी एखादया आईसारखं. आईला आपली सारी मुलं सारखेच. 

मित्रांनो काळ बदलत चाललाय, तुम्ही बदलताय. परिवर्तन हा माझा नियमच आहे. परंतू हा बदल, हे परिवर्तन विधायक असायला हवेत. मुक्त आकाशाखाली राहणारे माझे मित्र, माझ्या अंगाखांद्यावरून धावणारी माझी मुलं या आधुनिक युगात चांगल्या पक्क्या घरात राहायला गेले, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट. परंतू मित्रांनो, तुम्ही तुमच्या घराची कवाडं कायमची बंद केलीत. हे पाहून माझा जीव कासावीस होतो. हिरव्यागार जंगलांना बाजूला सारून सिमेंटची जंगलं तुम्ही उभी केलीत. पण मी मुकाट्यानं सहन केलं... 'आपलीच लेकरं आहेत... ' म्हणून.  

माझ्या औदार्याला सीमा नाही, असं तुमचं म्हणणं मी ऐकलं. तुम्ही केलेल्या माझ्या कौतुकानं मी आतून सुखावलो गेलो. मी आजपर्यंत माझ्या औदार्याला कुठल्याही प्रकारची सीमा आणू दिली नाही, याचा मला अभिमान आहे, परंतू माझ्याविषयी तुमच्यातल्या निष्काळजीपणालाही सीमा राहिली नाही, हेही तितकेच खरे.  तुमच्या दिवसागणिक वाढतच जाणाऱ्या निष्काळजीपणामुळे मी आतून तुटतोय, अक्षरशः ढासळतोय. 

माझ्या हिरव्यागार रूपानं तुमच्या डोळ्याची पारणे फिटावीत यासाठी तुम्ही नेहमीच माझ्या सानिध्यात यावं, छत्रपतींच्या शौर्यांचे पोवाडे गाणाऱ्या गड-किल्ल्यांवर भ्रमंती करावी, त्यांच्या साहसाची साक्ष देणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या कडाकपाऱ्यातून मनसोक्त दौडावं, ही माझी इच्छा.
मित्रांनो, राग नका मानू. निसर्गामध्ये ज्या-ज्या ठिकाणी तुम्ही पोचलात त्याठिकाणी कचऱ्याचे अक्षरशः ढीग साचल्याचे मला दिसून येते. कुठल्याही प्रकारचा विचार न करता, तुम्ही माझ्या अंगावर तुम्हाला नको असलेली प्रत्येक गोष्ट फेकून देता. प्लॅस्टिकच्या बाटल्या,पिशव्या,  खाद्यपदार्थांचे रॅपर्स... किती किती तो कचरा ! तरीसुद्धा मी गप्प राहिलो, कारण माझा समज होता, तुमच्याकडून हे नकळत होतंय.  आज नाही उद्या तुमच्या लक्षात येईल, वाट पाहत राहिलो. परंतू हा कचरा असाच वाढत गेला तर मी एक दिवस नाहीसा होईन.....संपून जाईन,   चालेल का तुम्हाला ?

दिवसामागून दिवस गेले, एकविसावं शतक समोर आलं. सर्वच थरांवर सुधारणा होत राहिल्या. तुम्ही जास्तीजास्त महत्वकांक्षी बनत गेलात. मोठमोठी स्वप्ने पाहत त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी धावत राहिलात. परंतू या सगळ्या धावपळीत माझ्यापासून तुम्ही दूर होत गेलात. कळत-नकळत माझ्याकडे दुर्लक्ष करत राहिलात. खरंतर तुमचं संपूर्ण जीवन माझ्यावर अवलंबून आहे, तरीसुद्धा तुमच्याकडे दिवसभरातून थोडासा वेळ माझ्यासाठी नाही, याचेच मला दुःख आहे. परंतू मित्रांनो, माझे हे दुःख कोणाकडे मांडणार ? माझ्या जिवाभावाचा मित्र, सखा..यानेच जर माझ्याकडे पाठ फिरवली तर मी कुठे जाणार ? एका आईला जसं आपलं बाळ नेहमीच प्रिय असतं, तसं तुम्ही सारेजण मला प्रियच आहात. पोटचं पोर दूर गेलेल्या आईसारखं माझी आज अवस्था झाली आहे, 

माझ्यासाठी थोडा वेळ काढताय ना ? तुमच्या सवयी बदलणार ना ?
लेखक - अरविंद म्हेत्रे,
अध्यक्ष, इको फ्रेंडली क्लब

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate