অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मुद्रामुळे मिळाला कुटुंबाला आधार

मुद्रामुळे मिळाला कुटुंबाला आधार

गोदावरीच्या किनाऱ्यावर रामवाडी परिसरात राहणारे ज्योती प्रकाश घुगे यांचे कुटुंब. पुराच्या तडाख्याने विवंचनेत अडकलेल्या ज्योती घुगेंना चहा स्टॉलचा व्यवसाय मदतीला आला. हा व्यवसाय वाढविण्यासाठी मुद्रा योजनेतून त्यांना कर्ज मिळाले. आपल्या या छोट्या व्यवसायात देखील दोन माणसांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मुलींना चांगले शिक्षण देण्याचे त्यांचे स्वप्न आहे, ज्योती घुगेंचे उदाहरण त्यांच्या सारख्या इतर महिलांना प्रेरणा देणारे आहे.

ज्योती यांच्या लग्नाला 15 वर्षं झाली असून 2002 पासून कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी आपल्या पतीच्या बरोबरीने चहा स्टॉल चालवण्यास मदत करू लागल्या. कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी पतीच्या मदतीला उभे राहण्याची गरज भासल्याने त्यांनी स्वत: चहा बनविणे, ग्राहकांना चहा देणे, येणाऱ्या पैशाचा हिशोब पाहण्यास मदत करू लागल्या. व्यवसायाची घडी चांगल्यारितीने बसत असतानाच गोदावरी नदीला ऑगस्ट 2017 मध्ये आलेल्या पूराने अनेक कुटुंबांना बेघर केले होते. हातावरचं पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांना जीवनामध्ये पुन्हा उभं राहण्यासाठी मदतीची गरज भासू लागली. अशा कुटुंबातील एक होत्या ज्योती घुगे. 

त्यांनी खचून न जाता मुद्रा बँक योजनेची माहिती मिळविली आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या माध्यमातून कर्ज मागणी केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुद्रा योजनेतून कर्ज देऊ शकतो, असे सांगितल्यावर आनंदी झालेल्या श्रीमती घुगे हिमतीने उभ्या राहिल्या. मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या कर्जाचा व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोग केला.

चहा विक्रीसारख्या कष्टाच्या व्यवसायात देखील हे कुटुंब आनंदाने राहत असून कोणताही व्यवसाय छोटा नसतो आपल्या पत्नीच्या मदतीमुळे आपण यामध्ये मोठी प्रगती करू शकतो, असे प्रकाश घुगे देखील अभिमानाने सांगतात. चांगला व्यवसाय चालला की कधी-कधी महिन्याला 25 ते 30 हजार रूपये देखील उत्पन्न होते. कुटुंबाला स्वत:च्या नवीन घरामध्ये जाण्यासाठी व्यवसायातील चढ उतारांमुळे थोडा वेळ लागतो आहे पण मुलींसाठी चांगले स्वत:चे घर देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, हे त्यांनी मोठ्या विश्वासाने सांगितले. 

‘मुद्रा’च्या माध्यमातून मिळालेल्या कर्जातून त्यांनी व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिसरातील दुकाने, कार्यालयांना नियमित चहा पुरवतानाच आता चहा बरोबरच नाश्तादेखील विक्रीला ठेवला आहे. आपल्या पदार्थांचा दर्जा चांगला राखतानाच, त्यांनी उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष पुरवले आहे. वाढलेल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी त्यांना काम करणाऱ्या माणसांच्या मदतीची गरज असल्याने त्यांनी अनिल उबाळे आणि गणेश रामचंद्र सोनकर या दोन जणांना कामासाठी ठेवले. त्यामुळे जास्त ग्राहकांना सेवा देता येते असे त्या म्हणाल्या. चहा, नाश्ता याबरोबर उत्पन्न वाढवण्यासाठी अजून पदार्थ ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे.

घुगे यांची मोठी मुलगी चारूशिला ही आठवीमध्ये शिकते आहे. दोन मुली असलेल्या ज्योतींनी मुलींना चांगले शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं करण्याचा विश्वास बोलून दाखवला. आर्थिक परिस्थितीमुळे महिलांनी निराश न होता. शासनाच्या योजनांचा उपयोग करून आपले जीवन चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचा आणि प्रगती करावी असे ज्योती घुगेंचे म्हणणे आहे.

कष्टाचे जीवन जगताना येणाऱ्या अडचणी दूर करतानाच इतरांना प्रेरणा देणारे काम करून इतरांनीही शासनाच्या योजनांचा उपयोग करून आपले जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करावे असा संदेशच श्रीमती ज्योती घुगे यांनी दिला आहे. त्यासाठी मुद्रा योजनेचा आधार नक्कीच महत्त्वाचा ठरला आहे.

लेखक - किरण वाघ

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/3/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate