Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 18:57:23.052822 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक संकल्पना व संज्ञा / सामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)
शेअर करा

T3 2019/10/17 18:57:23.070990 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 18:57:23.139669 GMT+0530

सामाजिक संकेत (सोशल कन्व्हेन्शन्स)

व्यक्तीच्या बहिर्गत वर्तनाबाबतची व कृतीबाबतची आचारसंहिता म्हणजे सामाजिक संकेत होत.

सोशल कन्व्हेन्शन्स

प्रस्थापित समाजाने सामूहिक रीत्या स्वीकारलेली आणि प्रत्यक्षात आचरणात आणलेली व्यक्तीच्या बहिर्गत वर्तनाबाबतची व कृतीबाबतची आचारसंहिता म्हणजे सामाजिक संकेत होत. ही आचारसंहिता नियंत्रणात्मक असून व्यक्तीच्या व समूहाच्या सामाजिक बहिर्गत आचारविचारांवर नियंत्रण ठेवण्याचा ती प्रयत्न करते. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सामाजिक संकेतांची गरज असते. सामाजिक संकेतांच्या उदयविस्ताराचा पूर्वेतिहास नेमकेपणाने अवगत नसला, तरी समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक मूल्यांतून ते उत्क्रांत होत आलेले असतात. त्यामुळे वेगवेगळ्या समाजांतील सामाजिक संकेतांचे स्वरूपही वेगवेगळे असते. सामाजिक व सांस्कृतिक वारसा टिकविणे, हे सामाजिक संकेतांचे उद्दिष्ट असते.

सामाजिक संघटन, स्वास्थ्य व सुरक्षितता टिकविण्याची जबाबदारी समाजाच्या सर्व थरांतील लोकांवर असते. रूढी, प्रथा व परंपरा यांचेही स्वरूप अलिखित सामाजिक नियमांवर आधारलेले असले, तरी त्यांचा संबंध जुन्या आचारविचारांशी असतो. बदलत्या काळानुसार व परिस्थिती प्रमाणे नव्या आचारविचारांना सामावून घेण्याचा प्रयत्न रूढी, प्रथा व परंपरा करीत नाहीत; त्यामुळे जुन्या व नव्या आचारविचारांत नेहमीच संघर्ष घडून येतो. अशा या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संकेतांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. सामाजिक संकेत बदलत्या काळानुसार व परिस्थितीप्रमाणे नव्या आचारविचारांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने जुन्या व नव्या आचारविचारांत होणारा संघर्ष टळू शकतो. सामाजिक संकेतांचे स्वरूप गतिशील व लवचीक असते. त्यामुळे सामाजिक ऐक्य, संघटन व सातत्य टिकविण्यात त्यांची अधिक मदत होते.

यंत्रणा

सामाजिक संकेत राबवून घेण्याच्या प्रक्रियेत विशिष्ट यंत्रणा अस्तित्वात नसली, तरी त्यांना सामाजिक शक्तीचे (फोर्स) पाठबळ प्राप्त झालेले असते. सामाजिक संकेतांचा आशयव्यक्ती, समूह व समाज यांच्यातील अन्योन्य संबंधांशी निगडित असतो. सामाजिक संतुलन व एकता प्रस्थापित करण्यामध्ये सामाजिक संकेतांचा संबंध असला, तरी या बाबतीतील यशापयश हे समाजाची जागरूकता, लोकसंख्येचे आकारमान, समुदाय-भावना तसेच व्यक्ती व समाज यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांवर अवलंबून असते.

सामान्यत: समाजाचे आकारमान जितके लहान असते, तितक्या अधिक प्रमाणात समाज प्रत्येक व्यक्तीकडून सामाजिक संकेतांचे पालन करवून घेण्यात यशस्वी ठरतो. सामाजिक संकेतपालन करण्याची प्रवृत्ती समाजाच्या दबावामुळेच निर्माण होते. आदिम तसेच ग्रामीण समाजांत संकेतपालन अधिक काटेकोरपणे करण्यात येते. आधुनिक काळातील दळणवळणाच्या साधनांमुळे, व्यक्तिवादी दृष्टिकोनामुळे तसेच व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रभावामुळे व्यक्ती व समाज यांच्यातील संबंध औपचारिक, जुजबी व दुय्यम प्रतीचे बनू लागले आहेत. त्यामुळे सामाजिक संकेतपालन करण्याची प्रवृत्तीही कमी झाल्याचे दिसते.

समाजजीवनाच्या आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, औदयोगिक, व्यावसायिक इ. अनेक क्षेत्रांत वेगवेगळ्या स्वरूपाचे संकेत आढळून येतात. विशिष्ट क्षेत्रात संकेतांना विशिष्ट आशय व संदर्भ प्राप्त झालेले असतात. सामाजिक संकेतांचे स्वरूप समाजविशिष्ट व कालविशिष्ट असल्याने, त्यांत सार्वत्रिक सारखेपणा क्वचितच आढळतो; तथापि सामाजिक ऐक्य व संरक्षण हे संकेतांचे उद्दिष्ट सार्वत्रिक व समान आहे.

आधुनिक काळात लोकशाही प्रधान समाजव्यवस्थेत सामाजिक व राजकीय संकेतांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. राजकीय अथवा कायदेशीर नियामकांना सामाजिक संकेतांचे अधिष्ठान प्राप्त करून दिल्यास, ती नियामके अधिक यशस्वी ठरतात.

लेखक: व्ही. एन्. गजेंद्रगड

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

3.07692307692
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 18:57:24.031383 GMT+0530

T24 2019/10/17 18:57:24.038939 GMT+0530
Back to top

T12019/10/17 18:57:22.898858 GMT+0530

T612019/10/17 18:57:22.926532 GMT+0530

T622019/10/17 18:57:23.007392 GMT+0530

T632019/10/17 18:57:23.008308 GMT+0530