Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:59:11.665645 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती / सामाजिक परिवर्तन
शेअर करा

T3 2019/10/14 06:59:11.670303 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:59:11.695340 GMT+0530

सामाजिक परिवर्तन

सामाजिक संरचनेत फेरबदल घडविणारी प्रक्रिया. मानवांचे रीतिरिवाज, आचार–विचार, संस्था, संघटना, जीवनपद्घती, भोवतालचा परिसर, व्यक्तिव्यक्तींमधील वर्तन यांमध्ये सतत बदल होत असतात.

सामाजिक परिवर्तन

( सोशल चेंज ). सामाजिक संरचनेत फेरबदल घडविणारी प्रक्रिया. मानवांचे रीतिरिवाज, आचार–विचार, संस्था, संघटना, जीवनपद्घती, भोवतालचा परिसर, व्यक्तिव्यक्तींमधील वर्तन यांमध्ये सतत बदल होत असतात. आदिम अवस्थेपासून ते सांप्रत काळापर्यंत मानवी समाजाच्या सर्व अवस्थांमध्ये सतत परिवर्तन झाल्याचे दिसते.

मॅकायव्हर यांच्या मते सामाजिक संबंधांतील परिवर्तनाला सामाजिक परिवर्तन म्हणता येईल.मूलभूत अर्थाने समाजरचनेतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ हॅरी जॉन्सन यांच्या मते हे परिवर्तन जैविक, सांस्कृतिक, आर्थिक, तांत्रिक आणि राजकीय क्षेत्रांतही घडून येते.

समाजातील कोणताही बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन नव्हे; तर सामाजिक कृतींचे व आंतरक्रियांचे आकृतिबंध, मूल्ये,सांस्कृतिक फलिते आणि प्रतीके या आविष्कारांसह होणाऱ्या बदलांना सामाजिक परिवर्तन असे म्हणतात. समाजाच्या, विविध भागांच्या परस्परसंबंधांच्या स्वरुपात बदल झाला की, समाजरचनेत परिवर्तन घडून येते. पर्यायाने सामाजिक परिवर्तन घडून येते.

संकलित (क्यूम्युलेटिव्ह) सामाजिक बदलांमुळे मानवी सामाजिक इतिहासाची घडण झाली आहे. जनसांख्यिकीय संक्रमण किंवा एखाद्या नवराज्याची निर्मिती यांसारखे महत्त्वाचे बदल, ही पायाभूत परिवर्तने होत. अन्य इतर तुलनात्मक बदल सामान्य होत. संकलित सामाजिक परिवर्तनवादी समाजशास्त्रज्ञ असा प्रश्न उपस्थित करतात की, व्युत्कांतिनिष्ठ स्पष्टीकरण सर्व महत्त्वाच्या संक्र मणांना देता येणार नाही. संकलित सामाजिक परिवर्तने सर्व सामाजिक जीवनातील वैश्विक, प्रक्रियात्मक गुणविशेषांहून वेगळी करावी लागतील. समाजशास्त्रज्ञ प्रामुख्याने प्रक्रियात्मक सामाजिक वर्तनाचा अभ्यास करतात. उदा., सर्व प्रकारचे आकृतिबंध सापेक्षतः स्थिर असूनही सामाजिक जीवनातील विशिष्ट अभिलक्षणे कशी बदलू शकतात, या गतिशील प्रक्रियांवर ते लक्ष केंद्रित करतात. सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनासाठी समाजातील व्यक्तींनी त्यांचे कौटुंबिक, सांस्कृतिक आणि दैनंदिन व्यवहार बदलले. नव्या मूल्यांचे शिक्षण देण्यास सुरू वात केली. कल्याणकारी योजनांतूनही तळागाळातील माणसांच्या उदयाचे लक्ष्य महत्त्वाचे मानले. जो कसेल त्याची जमीन झाली आणि औद्योगिक धोरण ठरविताना कामगार संघटनांना सहभागी करून घेण्यात आले. तसेच राज्यसंस्थेत एकाधिकारशाहीऐवजी लोकशाही प्रस्थापित झाली. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला समाजवादी लोकशाही वा साम्यवादी अर्थव्यवस्था हे पर्याय पुढे आले.परंपरागत अवजारांऐवजी यंत्रांचा वापर होऊ लागला. सतीची प्रथा, बहुपत्नीत्व रद्द होऊन एकऐपत्नीत्वाचा कायदा झाला. हे सर्व बदल समाजव्यवस्थेत दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्यास प्रेरक ठरले. सामाजिक परिवर्तन हे पुरोगामी किंवा प्रतिगामी, वर्धमान किंवा ऱ्हासमान, स्थायी किंवा अस्थायी, कायमचे किंवा हंगामी, योजनापूर्वक किंवा योजनाविरहित,एकदिशावर्ती किंवा बहुदिशावर्ती, उपकारक किंवा अपकारक, हितकारक किंवा हानीकारक अशा कोणत्याही प्रकारचे असू शकते.

सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांचे दोन गट आहेत. एका गटाच्या मते सामाजिक परिवर्तनाचा उगम प्रसारात आहे, तर दुसऱ्या गटाच्या मते सामाजिक परिवर्तनाचा उगम शोधात किंवा आविष्कारात सापडतो. सामाजिक परिवर्तनाचा उगम प्रसारात आहे असे म्हणणाऱ्यांच्या मते फॅशन्स, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, दळणवळणाची साधने, औषधे यांतील शोध, बदल प्रसारमाध्यमांद्वारे जगभर प्राप्त होतात. हे बदल प्राचीन काळापासून समाजातील लोकांनी इतर समाजातील लोकांपासून स्वीकारलेले असतात. या परिवर्तनामुळेच कित्येक आदिवासींनी आपली विशेष प्रगती करून घेतली आहे. उदा., न्यूझीलंड देशातील माओरी जमातीच्या लोकांनी या मार्गाचा अवलंब करून एका दशकात सुसंस्कृत लोकांमध्ये स्थान मिळविले आहे.प्राचीन गीक संस्कृतीचा पगडा सर्व जगभर पडला आहे. सामाजिक परिवर्तनाचा उगम शोधात किंवा आविष्कारात आहे, असे म्हणणाऱ्यांच्या मते सांस्कृतिक प्रगती ही अन्य लोकांचे अनुकरण करून घडली, हे संभवनीय नाही. विविध समाजांत दृग्गोचर होणारे सांस्कृतिक गुणविशेष त्या त्या समाजातील लोकांनी स्वतंत्रपणे लावलेल्या शोधांतून निर्माण झालेले असतात.

प्रत्येक तंत्र वा कल्पना अगर आचार एका समाजातून दुसऱ्या समाजाकडे जाताना त्याच स्थितीत राहत नाही. इतर समाजांकडून घेतलेल्या गोष्टींचा आपल्या समाजाच्या विशिष्ट वातावरणात योग्य उपयोग करता यावा, म्हणून त्या गोष्टींत बदल केले जातात. म्हणजे प्रसार आणि शोध या दोन्ही गोष्टी एकमेकांत अगदी बेमालूमपणे मिसळलेल्या आढळतात. म्हणून सामाजिक परिवर्तनाचा उगम प्रसार व शोध या दोन्ही गोष्टींत आहे.

यांत्रिक आणि तांत्रिक क्षेत्रांतील नव्या शोधांमुळे उत्पादनवाढीला आणि बाजारपेठांमधील खरेदी–विकी व्यवहारांना वेग येऊन देशाची आर्थिक स्थिती सुधारते; परंतु असे सर्वत्र घडत नाही; कारण काही देश आर्थिक मागासलेपणामुळे नव्या तांत्रिक–यांत्रिक गोष्टींचा स्वीकार करू शकत नाहीत. येथे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, नव्याला विरोध करण्याची वृत्ती अशा गोष्टींचा प्रभाव असतो. त्यामुळे सामाजिक परिवर्तन कोणत्याही समाजात सारख्याच गतीने होते, असे आढळत नाही.

बदलणाऱ्या परिस्थितीला अनुसरून मनुष्य आपल्या सामाजिक संबंधांत जाणीवपूर्वक बदल करत असल्याने सामाजिक परिवर्तन घडते. मानवाची जगण्यासाठी जी सतत धडपड चालू असते, त्यासाठी तो प्रयत्नपूर्वक पर्यावरणाशी जुळवून घेऊन फेरबदल करत असतो. या पर्यावरणाशी येणाऱ्या संबंधांतच परिवर्तनाची बीजे आढळतात. यंत्रांचा उपयोग सुरू झाल्यावर शेकडो माणसे एकत्र येऊन कारखान्यात काम करू लागली. अठराव्या–एकोणिसाव्या शतकांतील ग्रेट ब्रिटनमधील औद्योगिक कांतीने उत्पादनात आमूलाग बदल घडला. तिचा जागतिक उत्पादननिर्मितीवर परिणाम झाला. त्याचे वैकासिक स्वरू प सर्वत्र आढळते. औद्योगिक कांतीने आधुनिक सामाजिक बदलात मूलभूत परिवर्तन घडविले. म्हणजेच पर्यावरणाशी येणाऱ्या संबंधातील बदलांमुळे सामाजिक परिवर्तन घडून येते.

समाजाच्या सांस्कृतिक व्यवस्थेत सारखा बदल होत असल्याने सामाजिक परिवर्तन चालू राहते. एका पिढीतील मूल्ये पुढच्या पिढीतील लोकांना मान्य होत नाहीत. मातापित्यांना ज्या गोष्टी आवडतात, त्या मुलांना आवडतीलच असे नाही. कुटुंबपद्घती,विविध सण–उत्सव साजरे करण्याच्या पद्घती यांत बदल होतात. मानवाच्या प्राथमिक अवस्थेत नर–मादी एवढेच संबंध होते.त्यातून स्वैराचार घडत असे. त्यानंतर विवाहसंस्था आली. कुटुंबात संस्कृतीची निर्मिती झाली. ज्वालामुखीचा उद्रेक, रोगराई,प्रचंड पूर अगर वादळ, उष्णतामान, पर्जन्यमान, हिमयुगाची सुरू वात किंवा अस्त, नदीप्रवाह बदलणे या नैसर्गिक घडामोडींमुळेही सामाजिक परिवर्तन होते. या आकस्मिक बदलांना अनुरूप असे बदल मानवाला आपल्या सामाजिक जीवनात करावे लागतात. जैविक परिस्थितीतील आनुवंशिकतेच्या व संकराच्या तत्त्वांमुळे सामाजिक परिवर्तन होते. जननप्रमाण आणि मृत्यूप्रमाण या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवता आल्याने समाजाच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल होत जातो आणि याचा प्रभाव सामाजिक परिवर्तनावर पडतो.

मानव स्वतःच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करत असताना नवीन तंत्राचा उपयोग करतो. बाष्पयंत्राच्या शोधामुळे प्रचंड सामाजिक परिवर्तन झाले. समाजाच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल झाले.

सामाजिक परिवर्तनाला साहाय्यभूत गोष्टी जशा समाजात असतात, तशा सामाजिक परिवर्तनाला काही मारक गोष्टीही असतात. परंपरावादी, सनातनी धर्माचे अनुयायी, अशिक्षित समाज नव्या संशोधनाला विरोध करताना आढळतो. त्यामुळे नवनवीन उपकम करणे शक्य होत नाही व प्रगती थांबते आणि परिवर्तन घडून येत नाही. जेव्हा परिवर्तनानुकूल शक्ती समाजात जास्त प्रभावी ठरतात, तेव्हा परिवर्तनाला गती मिळते. भारतात राज्यशासन, व्यापार, शिक्षण, दळणवळण या गोष्टींत स्वातंत्र्योत्तर काळात झालेली प्रगती ही भारतीय सामाजिक परिवर्तनाची गती आहे. परिवर्तनाचा वेग असमान असतो. कधी सामाजिक हस्तक्षेपामुळे व कधी राजकीय उदासिनतेमुळे गती कमी पडलेली दिसते.

समाजाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन परिवर्तनाची दिशा ठरविली जाते. उदा., आधुनिक समाजात उत्पादनवृद्घी हे एक उद्दिष्ट आहे.हे उद्दिष्ट साध्य करून घेण्याच्या हेतूने तंत्रविद्येचा उपयोग केला जातो, तेव्हा उत्पादनवृद्घीच्या दिशेने परिवर्तन होते. जर उत्पादनात वृद्घी न होता घट होऊ लागली, तर परिवर्तन चालू असते; पण ते परिवर्तन उलट दिशेने होत आहे असे म्हटले जाते.

सामाजिक परिवर्तनाच्या स्वरुपासंबंधी दोन सिद्घांत सांगितलेले आहेत. एक, सामाजिक परिवर्तन चकाकार स्वरुपाचे असते आणि दुसरे, रेषाकार स्वरुपाचे असते. कोणत्याही घटनांची जेव्हा अगदी पूर्वीची पुनःपुन्हा आवृत्ती होते, तेव्हा चकाकार स्वरुपाचे परिवर्तन घडते. उदा., ऋतुचक, कुंभमेळ्यासारखे उत्सव, उद्‌गम, विकास, ऱ्हास व नाश हा चकाकार कम सामाजिक घटनांतदेखील दिसून येतो. जेव्हा कोणत्याही घटनांचे एखाद्या विशिष्ट दिशेनेच निरंतर परिवर्तन होत असते, त्या कमामध्ये कधीही फरक पडत नाही आणि घटना केव्हाही त्याच स्वरू पात आवृत्त होत नाहीत, तेव्हा रेषाकार किंवा रेखात्मक परिवर्तन असते. प्रगतीच्या दिशेने सरळ रेषेत चालू असणारे ते एकरेषात्मक परिवर्तन होय. ते कधी थांबत नाही वा बंद पडत नाही. आजही सुधारित रबरी चाकांची बैलगाडी चालू आहे.

ऊर्ध्वगामी आणि अधोगामी चढउतार परिवर्तनात असतात. व्यापारातील तेजी–मंदी, चलनी नाण्याच्या मूल्यामधील वाढ–घट हे ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी पद्घतीने होतात. कित्येकदा परिवर्तन तरंगांच्या स्वरुपाचे असते. लोकांच्या आवडी–निवडी,फॅशन्स, क्रिकेटच्या खेळाडूंबद्दलचे प्रेम कमी–अधिक होते, नटनट्यांबद्दलची मते बदलतात. प्रसारमाध्यमे, जाहिरातींमुळे माणसे भारावून जातात आणि परिवर्तनास अनुकूल होतात. काही वेळा चुकीचे आणि भयानक परिणाम करणाऱ्या बाबीही स्वीकारल्या जातात.

परिवर्तन हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. मानव रानटी–पाषाणयुगीन अवस्थेतून विद्यमान प्रगत संस्कृतीपर्यंतवाटचाल करीत आला. निरनिराळ्या टप्प्याने विकासित होणे, हा मानवी समाजाचा एक गुणधर्मच आहे. हा विकासउत्कांतिवादाने आणि कार्यात्मक उपपत्तीतून होत असतो. तसेच मार्क्सवादी, गांधीवादी, जे. पी. वादी, आंबेडकरवादी,लोकशाही समाजवादी आणि इतर अनेक प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या संघटनांमुळे समाजपरिवर्तन होत असते.

संदर्भ : 1. Boudon, R. Theories of Social Change, Cambridge, 1986.

2. Durkheim, Emile, The Division of Labour in Society, New York, 1933.

3. Habermas, J. Communication and the Evolution of Society, Boston, 1978.

४. भागवत, कमल, समाजवाद म्हणजे आहे तरी काय ? पुणे, १९८६.

५. संगवे, विलास, समाजशास्त्र, मुंबई, १९७२.

 

काळदाते, सुधा

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

2.96341463415
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:59:11.979144 GMT+0530

T24 2019/10/14 06:59:11.985535 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:59:11.562057 GMT+0530

T612019/10/14 06:59:11.581229 GMT+0530

T622019/10/14 06:59:11.655111 GMT+0530

T632019/10/14 06:59:11.656026 GMT+0530