Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 23:55:54.342140 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 23:55:54.346739 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 23:55:54.372186 GMT+0530

जलजीवालय

ज्या काचेच्या भांड्यात अथवा हौदात हौसेखातर, प्रदर्शनाकरिता अथवा अभ्यासाकरिता जिवंत मासे, इतर जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवतात त्याला जलजीवालय म्हणतात.

जीवालय

ज्या काचेच्या भांड्यात अथवा हौदात हौसेखातर, प्रदर्शनाकरिता अथवा अभ्यासाकरिता जिवंत मासे, इतर जलचर प्राणी व जलीय वनस्पती ठेवतात त्याला जलजीवालय म्हणतात. हल्ली बऱ्याच घरी अशी छोटी जलजीवालये केलेली आढळतात. त्यांना घरगुती जलजीवालये असे म्हणतात. घरगुती जलजीवालयांमुळे करमणूक होते आणि जलजीवांचा अभ्यास करता येतो. काचेचे हौद तयार करणे जास्त खर्चाचे वाटत असल्यास काचेच्या लहान गोलाकार भांड्यातही मासे पाळता येतात. घरगुती जलजीवालयांशिवाय मोठी सार्वजनिक जलजीवालयेही असतात. समुद्रकिनाऱ्यावरील बहुतेक महत्त्वाच्या शहरांत जलजीवालये आहेत. नेपल्स, मोनॅको, प्लिमथ वगैरे ठिकाणची जलजीवालये जगप्रसिद्ध आहेत. भारतात मुंबई व मद्रास येथे जलजीवालये आहेत.

इतिहास

जलजीवालयांची सुरुवात व्यापारात माशांना असलेल्या महत्त्वामुळे झाली. ज्या माशांचा उपयोग खाण्यासाठी करतात ते मासे पाळून, त्यांची अंडी व पिले यांची जोपासना करून खाण्याच्या माशांचे उत्पादन वाढविता येते हे लक्षात आल्यावर लोकांचे लक्ष या उद्योगाकडे वळले. काही हौशी लोकांनी सुंदर व आकर्षक रंगांचे मासे छोट्या काचेच्या भांड्यात ठेवण्यात सुरुवात केली. ही घरगुती जलजीवालयांची सुरुवात होय.

मासे पाळण्याची प्रथा निदान ४,००० वर्षांइतकी जुनी आहे. सुमेरियन लोक खाण्याकरिता लागणारे मासे लहान तळ्यात अथवा हौदात पाळीत असत. भारतात मासे पाळण्याची चाल केव्हापासून अस्तित्वात आली, हे सांगणे कठीण आहे. परंतु आशिया खंडात चीनमध्ये सोनेरी मासे हौसेखातर बाळगण्याला इ. स. ९६० च्या सुमारास सुरुवात झाली. चिनी हौशी लोकांनी लहान भांड्यात ठेवता येण्यासारख्या माशांच्या उत्तम जाती तयार करण्यात यश मिळविले. काचेच्या भांड्यात अथवा काचा बसविलेल्या हौदात मासे पाळण्याची पद्धत सु. २०० वर्षांइतकी जुनी आहे.

प्राचीन काळी रोमन लोकांनी जलजीवालये बांधण्याचे प्रयत्न केले. मोठेमोठे हौद बांधून ते समुद्राला जोडलेले असत; त्यामुळे समुद्रातील पाणी हौदात येऊ शकत असे. या ठिकाणी दुर्मिळ व किमती जलचर ठेवीत असत. आजकाल घरगुती किंवा मोठी सार्वजनिक जलजीवालये म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काचेचे हौद येतात; पण ज्या वेळी जलजीवालयांची सुरुवात झाली त्या वेळी काचेसंबंधी शोध पूर्णत्वाला गेले नव्हते. त्यामुळे दगड, माती, विटा, चुना वगैरे वापरून जलजीवालय बांधीत असत. घरगुती जलजीवालयासाठी मातीची छोटी गोलाकार भांडी वापरीत असत. अठराव्या शतकात पौर्वात्य देशांतील आकर्षक सोनेरी मासे फ्रान्समध्ये नेण्यात आले. हौशी लोक हे सोनेरी मासे मातीच्या भांड्यात पाळू लागले. मातीच्या भांड्यात ठेवल्यामुळे ते बाहेरून दिसत नसत. गोड्या किंवा खाऱ्या पाण्यात ठेवलेले मासे पाण्याची रासायनिक घटना बदलल्यामुळे किंवा योग्य तापमान नसल्यामुळे मरतात. असे होऊ नये म्हणून हल्लीची जलजीवालये या सर्व गोष्टींचा विचार करून बांधलेली असतात. याचबरोबर जलजीवालय सुस्थितीत ठेवण्यासाठी जलचरांचे अन्न, रोग, परजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणारे) प्राणी या सर्व प्रश्नांचा विचार करावा लागतो. जलजीवालयात योग्य अशी प्रकाशयोजना करणे आवश्यक असते.

जलजीवालयातीलपाणीवत्याचेपरिसंचरण

ज्या शहरांत पाणी शुद्ध करून पुरविले जाते त्या पाण्यात क्लोरिनाचे प्रमाण जास्त असते. अशा पाण्यात मासे ठेवले तर ते मरतात.

खाऱ्या पाण्यातील मासे खाऱ्या पाण्याच्या हौदात ठेवावे लागतात व त्यात समुद्राचे पाणी खेळवावे लागते. समुद्राचे खारे पाणी पंपाच्या साहाय्याने हौदात खेचून घेतले जाते. समुद्रात कित्येकदा वादळे होतात व त्यामुळे पाण्याचे रासायनिक संघटन बदलते. नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणच्या पाण्याचेही रासायनिक संघटन वेगळे असते. त्यामुळे असे पाणी जर माशांच्या हौदात खेळविले, तर मासे मरतात. अशा प्रकारच्या पाण्याच्या परिसंचरणाला (फिरण्याला) विवृत (उघडे) परिसंचरण असे म्हणतात. ज्या वेळी विवृत परिसंचरण निरुपयोगी ठरते त्या वेळी संवृत (बंदिस्त) परिसंचरणाचा अवलंब केला जातो. जलजीवालयातील पाणी गाळून, शुद्ध आणि स्वच्छ करून परत तेच पाणी जेव्हा जलजीवालयाला पुरविले जाते तेव्हा त्याला संवृत परिसंचरण म्हणतात.

मासे श्वसनक्रियेत ऑक्सिजन घेतात व कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात त्यामुळे जलजीवालयातील पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढते.

संवृत परिसंचरणामध्ये जलजीवालयातील पाणी गुरुत्वामुळे एका गाळणीमधून गाळले जाऊन एका हौदात येते. येथे तापमानात आवश्यक तो बदल करून येथून ते पाणी पंपाच्या साहाय्याने उंच जागी असलेल्या हौदात खेचले जाते. पाण्यात काही रासायनिक बदल करणे आवश्यक असेल, तर तेही येथे केले जातात. कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढल्यामुळे येथे वायुमिश्रण केले जाते व परत हे पाणी नळ्यांच्या साहाय्याने जलजीवालयात पुरविले जाते.

ज्या ठिकाणी खाऱ्या व गोड्या पाण्याची जलजीवालये आहेत त्या ठिकाणी उष्ण, समशीतोष्ण व थंड अशा तीन प्रकारच्या तापमानाचे नियंत्रण करावे लागते. गोड्या पाण्याची अम्लता व क्षारता (अल्कलाइनीटी) जशी असेल त्याप्रमाणे यांचे विभाग पाडावे लागतात.

पाण्याच्या परिसंचरणासाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्या काचेच्या, सिमेंटच्या, टणक रबराच्या किंवा एक प्रकारच्या प्लॅस्टिकच्या केलेल्या असतात. धातूंच्या नळ्यांमुळे काही विषारी द्रव्ये उत्पन्न होतात म्हणून धातूच्या नळ्यांचा शक्य तो उपयोग करीत नाहीत.

कृत्रिम रीत्या समुद्रातील पाण्यासारखे पाणी तयार करण्याचे प्रयत्न केले गेले आहेत; परंतु हे पाणी सर्व दृष्टींनी समुद्रातील पाण्यासारखे होऊ शकत नाही. समुद्राच्या पाण्यातील जैव घटक व सूक्ष्म प्राणी हे कृत्रिम रीत्या तयार करणे जवळजवळ अशक्य आहे.

परजीवी प्राण्यांचा व रोगजंतूंचा उपद्रव

माशांना परजीवी प्राण्यांची व रोगजंतूंची सतत भीती असते. माशांना काही रोग झाला, तर त्यांना काही रसायनांत बुडवितात. या रसायनांचा परिणाम रोगजंतूंवर होतो, पण माशांवर होत नाही. अशी रसायने सुलभ रीत्या तयार करता येत नाहीत म्हणून माशांना आदर्श परिस्थितीत ठेवून रोग न होऊ देण्याची खबरदारी घेणे इष्ट होय.

पकडलेल्या जलचरांची पाठवणी

जलचरांना उत्तम स्थितीत पकडून योग्य त्या ठिकाणी पाठविणे हा जलजीवालयशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. लहान व मोठे जलचर एकत्र ठेवता कामा नये कारण मोठे जलचर लहान जलचरांना खाऊन टाकतात. ज्या पाण्यात जलचर ठेवावयाचे ते व ज्या पाण्यात ते आधी होते ते, असे दोन्ही प्रकारचे पाणी सर्व दृष्टींनी सारखे असले पाहिजे. माशांना ज्या ठिकाणी न्यावयाचे तेथे शक्य तितक्या लवकर नेणे आवश्यक असते, नाही तर मासे व इतर जलचर मरतात.

घरगुती जलजीवालयातील पाण्याची काळजी

घरगुती जलजीवालय लहान असल्यामुळे त्यामध्ये कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढते व यासाठी वायुमिश्रण करणे आवश्यक असते. जलचरांच्या उच्छ्‌वासावाटे फक्त कार्बन डाय-ऑक्साइडच बाहेर टाकला जातो असे नाही, तर इतरही काही अपशिष्ट (टाकाऊ) द्रव्ये बाहेर टाकली जातात. यामुळे पाण्याचे रासायनिक संघटन बदलते आणि हे पाणी काही जलजीवांना घातक व काहींना हितकारक ठरते. घरगुती जलजीवालयातील पाणी एकदम बदलू नये. पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी कमी होऊ नये म्हणून जलजीवालयावर झाकण ठेवावे लागते.

घरगुती जलजीवालयात काही जलवनस्पती ठेवणे आवश्यक असते. जलवनस्पतींमुळे जलजीवालयांचे सौंदर्य तर वाढतेच, पण याशिवाय त्यांचे आणखीही महत्त्वाचे उपयोग आहेत. काही वेळा जलजीवालयातील पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण जास्त झालेले आढळून येते. ज्या वेळी जलवनस्पतींमध्ये ⇨ प्रकाशसंश्लेषण चालू नसते त्या वेळी वनस्पती इतर प्राण्यांप्रमाणे ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. अशा वेळी कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढते, ज्या वेळी वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण चालू असते त्या वेळी वनस्पती कार्बन डाय-ऑक्साइड घेतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. त्यामुळे ऑक्सिजनाचे व कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण सारखे राहते. अशा रीतीने ज्या जलजीवालयात प्राणी व वनस्पतींमुळे ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांचे प्रमाण जवळजवळ सारखे राखले जाते, अशा जलजीवालयाला संतुलित जलजीवालय म्हणतात.

काही वेळा असे दिसून येते की, माशांची उत्सर्जित (बाहेर टाकलेली) द्रव्ये ही जलजीवालयातील वनस्पतींना खत म्हणून उपयोगी पडतात. वरील सर्व वर्णनावरून असे दिसून येईल की, हौशी लोकांना घरगुती गोड्या पाण्याचे जलजीवालय ठेवणे अधिक सोपे आहे.

जलजीवालयातील माशांचे प्रकार

जलजीवालयातील मासे हे बहुधा सायप्रिनोडोंटिस, पर्कोमॉर्फी, लेबरिंथिसी, ऑस्टेरोफायसी या मत्स्य गणांतील असतात. काही अपवाद सोडले, तर या गणांतील मासे आकर्षक असतात. ते संथ पाण्यात, थोड्या जागेत व कृत्रिम अन्नावर जगू शकतात.

अभ्यास व निरीक्षण

जलजीवालयातील माशांचा निरनिराळ्या तऱ्हांनी अभ्यास करता येतो. त्यांच्या सवयींचे निरीक्षण करणे मनोरंजक असते. प्रजोत्पादनाच्या काळातील सवयींचा अभ्यास केला असता असे दिसून येईल की, काही सायक्लिड माशांमध्ये समागमानंतर लगेच घरट्यासाठी योग्य जागा शोधून घरटे तयार करून त्यात अंडी घातली जातात. अंड्यांतून पिले बाहेर येऊन आपले भक्ष्य मिळवीपर्यंत नर व मादी पिलांना मदत करतात. काही मासे अंडी तोंडामध्ये ठेवतात आणि त्यांतून पिले बाहेर येईपर्यंत त्यांना आपल्या बरोबर बाळगतात. अर्थातच पिले बाहेर पडेपर्यंत या माशांना उपाशी रहावे लागते. काही मासे मिळेल ते साहित्य गोळा करून त्याचे घरटे बांधतात; काही तोंडातील श्लेष्मल (बुळबुळीत) स्त्रावाने बुडबुडे एकमेकांना जोडून त्याचे घरटे तयार करतात. मादीने अंडी घातल्याबरोबर नर ती अंडी बुडबुड्यांच्या घरट्यात ठेवतो व पिले मोठी होईपर्यंत त्यांच्या रक्षणाचे व त्यांना अन्न पुरविण्याचे काम करतो. स्टिकल्‌बॅक मासा एक प्रकारचा श्लेष्मल पदार्थ स्रवतो. हा पदार्थ वाळल्यावर रेशमाच्या धाग्यासारखा दिसतो आणि कडक होतो. असे धागे एखाद्या जलवनस्पतीच्या फांदीला गुंडाळून तो घरटे तयार करतो. काही वेळा एकावर एक अशी तीन चार घरटी आढळून येतात. मादी या घरट्यांत अंडी घालते व अंड्यांची आणि अंड्यांतून बाहेर येणाऱ्या पिलांची सर्व काळजी नरावर सोपवून निघून जाते. सोअर्डटेल (असिपुच्छ), गपी वगैरे मासे जरायुज (पिलांना जन्म देणारे) आहेत. एका वेळी जवळजवळ २०० पिले जन्माला येतात. ही पिले लहान असल्यापासून आपली काळजी घेण्यास समर्थ असतात.

आर्चर (तिरंदाज) मासा भक्ष्य दिसल्यावर तोंडातून पाण्याचा जोरदार फवारा भक्ष्याच्या अंगावर सोडतो व त्यामुळे भक्ष्य अर्धमेले होते. हा मासा जवळजवळ तीन मी. पर्यंतचा वेध घेऊ शकतो.

पेरिऑफ्थॅल्‌मस हा मासा समुद्राजवळील चिखलात राहतो. दिवसातील बराचसा वेळ हा मासा पाण्याबाहेर काढू शकतो. पाण्याबाहेर असलेल्या वनस्पतींची मुळे तो कुरतडून खातो.

जिम्नोटिडी कुलातील विद्युत् ईल हा मासा इतर माशांप्रमाणे पोहू शकतो व तितक्याच सहजतेने मागे मागे पण पोहू शकतो. हा मासा पाण्याच्या तळातील वाळूखाली झोपतो. याच्या या विचित्र सवयीमुळे घरगुती जलजीवालय ठेवणाऱ्या लोकांचा हा आवडता आहे.

सयामी लढाऊ मासे, ॲमेझॉनमधील एंजल मासे हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहेत.

उष्ण कटिबंधातील मासे

उष्ण कटिबंधातील माशांचे मुख्य खाद्य म्हणजे अगदी लहान लहान कीटक किंवा कीटकांचे डिंभ (अळ्या) हे होय. माशांचा आहार अगदी कमी असतो. हे मासे कृत्रिम खाद्य खाऊ शकतात. जर जास्त खाद्य जलजीवालयात टाकले गेले, तर ते खाद्यकण सडतात व पाणी खराब होते. पाण्याचे तापमान ठराविक मर्यादेच्या खाली गेले व पाणी थंड झाले, तर माशांमध्ये रोगांचा उद्‌भव होतो. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देऊन रोग हटविता येतात, पण त्यापेक्षा रोगांचा उद्‌भवच होऊ न देणे हे महत्त्वाचे आहे.

उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील सागरी माशांचे रंग सुंदर व आकर्षक असतात, पण हे मासे घरगुती जलजीवालयात ठेवणे अवघड काम असते. वरचेवर समुद्रातील पाणी मिळू शकले, तरच हे मासे जगू शकतात. त्यांना हिंडण्यासाठी मोठी जागा लागते; लहान जागेत रहावे लागले तर हे मासे मरतात. पाण्याच्या रासायनिक संघटनेत थोडा बदल झाला, तरी तो सहन न होऊन हे मासे मरतात.

भारतातील जलजीवालये

भारतात मुंबई येथील तारापोरवाला जलजीवालय व मद्रास येथील जलजीवालय ही महत्त्वाची आणि मोठी जलजीवालये आहेत. दररोज शेकडो लोक ही जलजीवालये पहातात. यांत मासे व इतर वैशिष्ट्यपूर्ण जलचरही आहेत. या जलजीवालयांमुळे मनोरंजन व संशोधन हे दोन्ही हेतू साध्य होतात. (चित्रपत्र).

g

जलजीवालयातील विविध दृश्ये व मांडण्या

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

2.98684210526
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 23:55:54.577884 GMT+0530

T24 2019/10/14 23:55:54.584690 GMT+0530
Back to top

T12019/10/14 23:55:54.279923 GMT+0530

T612019/10/14 23:55:54.300337 GMT+0530

T622019/10/14 23:55:54.331951 GMT+0530

T632019/10/14 23:55:54.332749 GMT+0530