অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोशवाङ्‍मय

कोशवाङ्‍मय

कोश हा वाङ्‍मयाचा एक प्रकार आहे. कोश म्हणजे शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानांचा केलेला व्यवस्थित संग्रह. या वाङ्‍मयप्रकारास संस्कृतमध्ये कोश वा कोष असे म्हणतात. ‘संग्रह करणे’ या अर्थी असलेल्या कुश् वा कुष् या धातूपासून कोश वा कोष शब्द झाला असून संग्रह वा संचय असा, किंवा संग्रहाचे स्थान वा आधार असा त्याचा मूळ अर्थ आहे. व्यक्तीच्या वा राज्याच्या धनसंचयास कोश असा शब्द संस्कृतमध्ये रूढ आहे. तसेच तलवार, सुरा इ. वस्तू सुरक्षित ठेवण्याचे म्यान वगैरे साधन, असाही संस्कृतमध्ये कोश शब्दाचा अर्थ आहे. पदार्थांचा, वस्तूंचा, धनाचा, शब्दांचा, ज्ञानाचा वा कशाचाही संग्रह किंवा संग्रहाचे स्थान म्हणजे कोश होय. साहित्याच्या संदर्भात शब्दसंग्रह वा ज्ञानसंग्रह ज्यात केलेला असतो, असा ग्रंथ म्हणजे कोश होय. लिखित भाषेचा व ज्ञानाचा वाङ्‍मय वा साहित्य या स्वरूपात विशेष विस्तार होऊ लागला, म्हणजे कोशवाङ्‍मय साहित्याच्या अध्ययनाचे साधन म्हणून आवश्यक ठरते. साहित्यातील शब्दसंख्या मोठी झालेली असते किंवा सारखी वाढत असते, म्हणून त्या त्या भाषेतील शब्दांचा एकत्र व्यवस्थित संग्रह केलेला असतो; शब्दाचे अर्थ नीट रीतीने समजतील अशा पद्धतीने आणि त्या त्या भाषेतील वा अन्य भाषेतील शब्दांचे अर्थ समजावे, अशी त्यांची मांडणी केलेली असते. ज्ञानाच्या भिन्न भिन्न शाखांची निर्मिती होऊ लागली वा विविध प्रकारची माहिती वाढली, म्हणजे थोडक्यात विविध माहितीचा वा ज्ञानांचा संग्रह करण्याची आवश्यकता निर्माण होते; ज्ञानकोश तयार होऊ लागतात. त्यांस विश्वकोशही म्हणतात.

वाङ्‍मयाचा विस्तार होऊ लागल्यावर शब्दांच्या संग्रहाचे, त्यांच्या अर्थविशदीकरणाचे कार्य प्रथम होणे स्वाभाविक होते. यात शब्दांची व्युत्पत्ती, थोडक्यात व्याकरण, अनेक अर्थ, शब्दार्थाचे विवरण, विविध अर्थांचे आधार व त्यांचे संदर्भही देतात. शब्दार्थ म्हणजे पदार्थ यांच्या नुसत्या विवरणाने काम भागत नाही; म्हणून चित्रे वा तक्तेही दिलेले असतात. बहुतेक सर्व देशांत, सर्व भाषांत शब्दकोश प्रथम निर्माण झालेले दिसतात. त्यानंतर जसजशी ज्ञानवृद्धी होते, जिज्ञासा वाढते, तसतशी विश्वकोश रचण्याची प्रवृत्ती निर्माण होते. अलीकडे रॅन्डम हाउस डिक्शनरी  अथवा सेंच्युरी डिक्शनरी  यांसारख्या कोशांत शब्दकोश आणि विश्वकोश यांचे संयुक्त स्वरूप आढळून येते.

विविध ज्ञानांची विशिष्ट पद्धतीने केलेली संघटना म्हणजे विश्वकोश. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय, हे त्याचे उद्दिष्ट होय. अशा कोशवाङ्‍मयाचे कार्य दोन प्रकारचे असते : एक म्हणजे, सामान्य नागरिकापर्यंत ज्ञान पोहोचविणे, त्याला अधिक सुबुद्ध करणे, त्याची ज्ञानजिज्ञासा प्रज्वलित करणे आणि दुसरे म्हणजे, पूर्वज्ञानाचा संग्रह संशोधकांना परिचित करून देऊन पुढील संशोधनाला बैठक पुरवणे. ज्ञान या संकल्पनेत ज्या ज्या विषयांचा समावेश होतो, तेवढी कोशाची व्याप्ती. कोशवाङ्‍मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक वा सांस्कृतिक गरज ज्या प्रकारची असेल, त्या प्रकारच्या कोशवाङ्‍मयाची निर्मिती त्या त्या समाजात होते.

अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बंदिस्तपणा व अद्ययावतता हे कोशीय माहितीचे आवश्यक गुणविशेष होत. यासाठी दरवर्षी किंवा दर पाचदहा वर्षांनी किंवा अन्य प्रकारे, घटनांची समग्र परंतु संक्षिप्त माहिती पुरविणारी नियतकालिके, नियतकालीन पुरवण्या किंवा मूळ कोशाच्या नवीन सुधारून वाढविलेल्या आवृत्त्या काढाव्या लागतात. मुद्रणाच्या किंवा बांधणीच्या प्रगत तंत्रांचा उपयोग करून घेणेही आवश्यक असते. कधी पृष्ठांची बांधणी पक्की न करता ती पृष्ठे विलग करता येतील व ठराविक काळानंतर पाठविण्यात येणाऱ्या पुरवण्या त्यांत योग्य जागी अंतर्भूत करता येतील, अशीही बांधणी केली जाते. कोशाचा बाह्य आकार आटोपशीर रहावा म्हणून अत्यंत बारीक टंकांत त्याचे मुद्रण करण्याचा व कोशाबरोबर तो वाचण्यासाठी सूक्ष्मदर्शक भिंग पुरविण्याचा उपक्रमही करण्यात आला आहे.

कोशरचनेच्या पद्धती : ज्ञानाचा संचय करणे आणि ते सुलभतेने उपलब्ध करून देणे, हे कोशाचे साध्य आहे. त्यासाठी एखादा विषय त्यात सहजपणे सापडला पाहिजे. म्हणूनच कोशरचनेत (१) अकारविल्हे, (२) विषयवार आणि (३) विषयवार पण तदंतर्गत अकारविल्हे अशा पद्धतींनी संकलन केलेले असते. यांपैकी प्रत्येक पद्धतीचे फायदेतोटे आहेत. वाचकांची सोय व माहितीची सुलभ उपलब्धता हे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यात तारतम्य व लवचिकपणा ठेवावा लागतो. वाचकाची ग्रहणशक्ती, त्याचे सामान्य ज्ञान यांचा विवेक करावा लागतो. अकारविल्हे रचना ही सामान्यत: सार्वत्रिक आहे. अधिक सोयीसाठी एकाच कोशाची भिन्न प्रकारांनी किंवा परिशिष्टे वगैरे जोडून मांडणी करण्याच्या पद्धतीचाही अवलंब केला जातो. शंकर गणेश दाते यांच्या मराठी-ग्रंथ-सूचीमध्ये (खंड  १ व २, १९४३ व १९६१) सूचीची मांडणी ग्रंथालयशास्त्रीय वर्गीकरणाप्रमाणे करून पुढे ग्रंथ-ग्रंथकारांचा सामग्र्याने अकारविल्हे संदर्भकोश दिल्याने त्याची उपयुक्तता वाढली आहे. विश्वकोशात ज्ञानविषयांची सरमिसळ झाली, तरी त्याची मांडणी सहेतुकच अकारविल्हे केलेली असते. त्यामुळे वाचकाला अभिप्रेत असलेल्या विषयाबरोबर इतर विषयांकडेही त्याचे लक्ष वेधले जाते. विषयवार किंवा प्रकरणश: रचलेल्या कोशात वाचकाचा इतर विषयांशी असा सहजपणे संबंध येत नाही.

कधीकधी कोशाचे काम एक व्यक्ती एकहाती करते; परंतु दिवसेंदिवस कोशकार्याच्या वाढत्या व्याप्तीमुळे ते कार्य एकट्यादुकट्याच्या आवाक्यातले राहिलेले नाही. तथापि आपल्या व्यासंगाचा विषय घेऊन त्याच विषयाची कोशरचना एकट्याला करणे शक्य आहे. बहुधा अनेकांच्या सहकार्याने हे काम केले जाते. कधी काही नियमित असा संपादकवर्ग नियुक्त करून त्याच्या द्वारे हे काम केले जाते. कधी बाहेरच्या त्या विषयातील तज्ञाचे साहाय्य घेऊन कोशनिर्मिती केली जाते. कोशकार्य हा आता एक प्रकारचा सामूहिक ज्ञानयज्ञ झाला आहे. जुन्या काळामध्ये असे कार्य बहुधा राजाश्रयाने होत असे. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कार्य मर्यादित कंपनी काढून लोकांच्या आश्रयाने पूर्ण केले. ज्या कोणाच्या आश्रयाद्वारे हे कार्य होते, त्याचाही परिणाम त्याच्या स्वरूपावर होत असतो. आता शासनाच्या द्वारे व अनुदानाने बरेच कोशकार्य होत आहे.

कोशवाङ्‍मयाचे प्रकार : कोशवाङ्‍मयाचे चार वर्ग करता येतात : (१) शब्दकोश, (२) विश्वकोश, (३) कोशसदृश वाङ्‍मय, (४) सूचिवाङ्‍मय. वाचकाला विविध प्रकारचे संदर्भसाह्य करणे, हा या चार प्रकारांचा उद्देश असतो. माहितीचे संकलन हे या सर्व वर्गांतील समान सूत्र असते. संकलनाच्या आणि मांडणीच्या पद्धतींत तेवढा फरक असतो.

(१) शब्दकोश : शब्दांचा संग्रह शब्दांचा अर्थ समजावा वा जिज्ञासूची शब्दसंपत्ती वाढावी या उद्देशाने केलेला असतो. काही शब्दकोशांत शब्दाला निव्वळ प्रतिशब्द किंवा पर्याय दिलेले असतात; तर काही शब्दकोशांत व्युत्पत्ती, विविध अर्थ व व्याख्या देऊन अर्थाचे विशदीकरण केलेले असते. शब्दकोशाचे अनेक प्रकार संभवतात : (अ) सर्वसंग्राहक शब्दकोश : यामध्ये संबंधित भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह केलेला असतो. याचे एकभाषी, द्विभाषी आणि बहुभाषी असे प्रकार होतात. उदा., महाराष्ट्र शब्दकोश (विभाग १ ते ७, १९३२–३८, पुरवणी विभाग १९५०), मोनिअर-विल्यम्सची संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी (१८९९, १९५६); तसेच  संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी (१९५६, १९६४) व आपटे यांची संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी (खंड १-२, १९५७ व खंड ३, १९५९), बंगाली-मराठी कोश, शारदाकोश, भाषापंडित  किंवा सोळा भाषांचा कोश  इत्यादी. एकभाषी शब्दकोशांत एका भाषेतील शब्दांचे अर्थ त्याच भाषेत दिलेले असतात. द्विभाषी शब्दकोशांमध्ये एका भाषेतील शब्दांचे अर्थ दुसऱ्या  भाषेत दिलेले असतात. बहुभाषी शब्दकोशांमध्ये एका भाषेतील शब्दांचे अर्थ दोनपेक्षा अधिक भाषांत दिलेले असतात. (आ) विशिष्ट शब्दकोश : यात नागरी, ग्रामीण, प्रादेशिक, धंदेविशिष्ट किंवा अशिष्ट भाषा (स्लँग) यांसारख्या विशिष्ट प्रकारांतील शब्दार्थांचा संग्रह असतो. उदा., अपभ्रष्टचंद्रिका (१८७८), कुटुंबकोश (भाग - १, १८९४), नामकरण (१९३६) इत्यादी. विशिष्ट शब्दकोशांचा दुसराही एक प्रकार अस्तित्वात आला आहे. विश्वबंधुशास्त्री, होशियारपूर यांच्या संस्थेने सर्व वेद व वेदांगे यांतील सर्व शब्दांचे सर्व पत्ते देऊन अकारानुक्रमाने प्रचंड शब्दकोश अनेक खंडात प्रसिद्ध केला आहे. मॅक्‌डॉनल व कीथ यांच्या वेदिकइंडेक्समध्ये वेदांतील महत्त्वाचे शब्द अकारानुक्रमे देऊन त्यांवर टिप्पणवजा, निबंधवजा संक्षिप्त वा विस्तृत विवरण दिले आहे. बायबलवरही असेच अनेक कोश यूरोपीय भाषांमध्ये झाले आहेत. (इ) परिभाषाकोश : यात वैज्ञानिक, तांत्रिक किंवा वाङ्‍मयीन अशा विशिष्ट शाखांतील पारिभाषिक शब्दांचा संग्रह केलेला असतो. उदा., स्थापत्यशिल्प-कोश, भारतीय मानशास्त्रीय परिभाषा, भाषाशास्त्र का पारिभाषिक शब्दकोश  इत्यादी. (ई) व्युत्पत्तिकोश : यात संबंधित भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती स्पष्ट केलेली असते. विशिष्ट शब्दांचा अर्थ इतिहासक्रमात उत्क्रांत होत त्याला सांप्रतचा अर्थ कसा प्राप्त झाला, याचेही दिग्दर्शन त्यामध्ये असते. उदा., मराठी –संस्कृत धातुकोश (१९३६), नामादिशब्दव्युत्पत्तिकोश (१९४२), मराठी व्युप्तत्तिकोश (१९४६) इत्यादी. (उ) एकेका ग्रंथातील शब्दांचा अर्थासह संग्रह केलेले शब्दकोश : यांमध्ये प्राचीन ग्रंथांना जोडलेले शब्दसंग्रह, प्रादेशिक साहित्यकृतींना जोडलेले शब्दसंग्रह यांचा समावेश हातो. उदा., महाभारत-कोश, ज्ञानेश्वरी टिपण  इत्यादी. (ऊ) समानार्थक किंवा विरुद्धार्थक शब्दांचेही कोश असतात. (ए) म्हणी, वाक्प्रचार यांच्या  कोशांचाही अंतर्भाव भाषेच्या व्यवहाराशी संबंधित अशा या वर्गात करावयाला पाहिजे. उदा., महाराष्ट्र वाक्यसंप्रदाय कोश (भाग १,२—१९४२, १९४७), मराठी म्हणींचा कोश (१९००), उखाणे व म्हणी (१९१२) इत्यादी.

(२) विश्वकोश : हा कोशाचा दुसरा वर्ग. ज्ञानाचा संग्रह हे याचे मूळ स्वरूप. त्याचेही विविध प्रकार संभवतात. अभ्यासाच्या जितक्या पद्धती आहेत, तितक्या पद्धतींनी तयार केलेले कोश संभवतात. दिग्दर्शनार्थ त्यांपैकी काही सांगता येतील :(अ) सर्वसंग्राहक असे सर्वसाधारण विश्वकोश : उदा., एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका (१७६७-७१), महाराष्ट्रीय ज्ञानकोश, अभिनव मराठी ज्ञानकोश (भाग १-३, १९६३-६७ अपूर्ण), सुलभ विश्वकोश (१९७१) इत्यादी. (आ) विशिष्ट विषयपर कोश : हे एखाद्या खास विषयापुरते मर्यादित असतात. पण त्या विषयाच्या सर्व अंगोपांगांचा त्यात संपूर्ण समावेश असतो. यात विज्ञान, तंत्रविद्या, तत्त्वज्ञान, संस्कृती, वाङ्‍मय, कला इ. क्षेत्रांतील कोश येतील. उदा., भारतीय संस्कृति कोश (खंड १–८, १९६२–७४ अपूर्ण), व्यायाम ज्ञानकोश (खंड १–१०, १९३६–४९), सुगमविज्ञानकोश  इत्यादी. वाङ्‌मयकोशामध्येही जागतिक वाङ्‌मयकोश, एखाद्या भाषेपुरता वाङ्‍मयकोश, एखाद्या वाङ्‍मयप्रकारापुरता कोश, ग्रंथ किंवा ग्रंथकार यांच्याविषयीचा कोश, वाङ्‌मयीन संज्ञांचा कोश, वाङ्‌मयीन व्यक्तिरेखांचा कोश, असे प्रकार दिसतात. उदा., हिंदी साहित्य कोश (खंड १–२, १९५८–६३), कॅसल्स एन्सायक्लोपीडिया ऑफ लिटरेचर (खंड १–२, १९५३), हिंदी विश्वकोश (खंड १–१२, १९६०–७०) इत्यादी. (इ) चरित्रकोश : यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्रांचे थोडक्यात वर्णन केलेले असते. यातही सर्वसाधारण चरित्रकोश, वाङ्‍मयासारख्या एखाद्या शाखेतील व्यक्तींचे चरित्रकोश, पौराणिक, ऐतिहासिक वा वर्तमान काळातील व्यक्तींचे चरित्रकोश, राजकारण, उद्योगधंदे आदी क्षेत्रांतील व्यक्तींचे चरित्रकोश, असे अनेकविध प्रकार आढळतात. उदा., भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (१९३२; परिवर्धित संस्करणे, भाग१, १९६८), भारतवषीर्य मध्ययुगीन चरित्रकोश (१९६७), भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश, वेब्स्टर्स बायोग्राफिकल डिक्शनरी (१९४६) इत्यादी. यांच्याव्यतिरिक्त धर्मकोश, दैवतकोश, देवीकोश, श्रीगणेशकोश, भारतीय संस्कृतिकोश, ग्रामकोश, प्राचीन भारतीय स्थलकोश, वेब्स्टर्स न्यू जीऑग्राफिकल डिक्शनरी (१९६९) असे विविध स्वरूपांचे कोश असतात. सर्वसाधारण विश्वकोश आणि असे विशिष्ट शास्त्रीय कोश हे परस्परांना पूरक असतात.

(३) कोशसदृश वाङ्‍मय : हे प्रत्यक्षत: कोशपद्धतीने रचलेले नसते; परंतु त्याचा उद्देश एखाद्या विषयासंबंधी बहुविध माहिती संकलित करून वाचकांना बहुश्रुत करणे हाच असतो. महाराष्ट्र जीवन (खंड १-२, १९६०) यासारख्या ग्रंथात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाच्या विविध अंगांचा परामर्श घेणाऱ्या अधिकारी लेखकांच्या लेखांचे संकलन केलेले आहे. अस्मिता महाराष्ट्राची (१९७२) या ग्रंथाचे स्वरूपही असेच आहे. अशा ग्रंथांची मांडणी कोशपद्धतीने केलेली नसते. प्रत्येक वर्षातील घडामोडींची माहिती संकलित करणारी सांवत्सरिके (इयरबुक), दर्शनिका (गॅझेटिअर), सारसंग्रह यांचा या वर्गात अंतर्भाव होतो. प्रतिवर्षी घडणाऱ्या  विविध घडामोडींचा विशिष्ट पद्धतीने ज्यात परामर्श घेतलेला असतो, ते सांवत्सरिक. मतप्रदर्शन, टीका किंवा भाष्य न करता जगातील किंवा एखाद्या राष्ट्रातील सर्व व्यवहारक्षेत्रांतील माहिती साधार संपादून देणे, हे अशा सांवत्सरिकाचे साध्य असते. उदा., महाराष्ट्र सांवत्सरिक (१९३३), महाराष्ट्र परिचय (१९५४), द स्टेट्समन्स इयरबुक, द टाइम्स ऑफ इंडिया : डिरेक्टरी अँड इयरबुक  इत्यादी.

(४) सूचिवाङ्‍मय : कोणत्याही ज्ञानशाखेचा पद्धतशीरपणे अभ्यास होऊ लागला म्हणजे संग्रह, सूचीकरण इ. प्रक्रिया आवश्यक ठरतात. सूची ही अभ्यासाची सुरुवात आहे. सूची हा शब्दही मराठीत सैलपणाने वापरला जातो. एखाद्या ग्रंथाच्या अखेर येणारी त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय व ग्रंथ यांची यादी, शब्दसूची, काव्यसंग्रहातील प्रथमचरणांची यादी, संदर्भपुस्तकांची यादी या सर्वांना सूचीच म्हटले जाते; परंतु अशा प्रत्येक स्थळी सूचीचा अर्थ व प्रयोजन ही विशिष्ट स्वरूपाची असतात. त्या त्या ग्रंथाच्या वाचनाला मदत करणारी अशी ती माहिती असते. मराठी ग्रंथ-सूचि  (२ खंड, १९४३, १९६१), मराठी नियतकालिकांची सूचि (१९६९), ज्ञानदेव-वाङ्‍मयसूचि (१९६८). अशा ठिकाणी ‘सूची’चा अर्थ वेगळा असतो. हे सूचिकार्य कोशकार्यासारखेच असते. काही विशिष्ट प्रकारच्या माहितीचे नियोजनपूर्वक केलेले ते संकलन असते. संदर्भोपयोगिता हे कोशवाङ्‍मयाचे प्रमुख गमक सूचिवाङ्‍मयातही आढळते. उदा., महाराष्ट्रीय संत-कविकाव्य सूचि (१९१५), महाराष्ट्रीय वाङ्‍मय सूचि (१९१९), महानुभाव महाराष्ट्र ग्रंथावलि (१९२४), ग्रामसूचि  इत्यादी.

कोशरचनेच्या विकासाचे स्थूल दिग्दर्शन : पश्चिमी देशांत ख्रिस्तोत्तर पहिल्या व दुसऱ्या शतकांत कोशरचनेस सुरुवात झाल्याचे दिसते. नॅचरल हिस्टरी (इ.स.पू. सु. ७९–२३) हा प्लिनीचा सर्वांत जुना असा कोशरचनेचा प्रयत्न होता. ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर सेंट ऑगस्टीन व सेंट जेरोम यांनी ख्रिस्ती ज्ञानाच्या पुनर्घटनेचा पाया घातला. आठव्या-नवव्या शतकांत आणि नंतर अरबी भाषेत धर्म, नीती, तत्त्वज्ञान इ. विषयांवर कोशसदृश रचना होऊ लागली. पश्चिमी प्रबोधनकाळापासून सगळ्याच ज्ञानव्यवहाराला नवी प्रेरणा व दिशा लाभली. ज्ञानाचे संघटन व विशिष्ट विषयपर आणि सर्वविषयसंग्राहक कोशरचना यांबद्दलच्या संकल्पना याच काळात अधिक स्पष्ट होत गेल्या. सोळाव्या शतकापासून फ्रान्स, इंग्लंड इ. देशांत कोशरचनेस नव्याने चालना मिळाली. अठराव्या शतकातील दिदरोचा फ्रेंच विश्वकोश (१७५१–७२) एक फार मोठी क्रांतिकारक घटना मानली जाते. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका (१७६७–७१) हासुद्धा विश्वकोशरचनेतील एक महत्त्वाचा टप्पा सूचित करणारा आणखी एक प्रयत्न होय. गेल्या दोन शतकांत पश्चिमी कोशरचनेत झपाट्याने प्रगती घडून आली. ज्ञानक्षेत्रांतील संदर्भसेवेच्या विविध गरजा विविध प्रकारे पुरविणारे अनेकविध प्रकारचे कोश तयार होऊ लागले.

चीनमध्येही दहाव्या शतकापासून महत्त्वाची कोशरचना झाल्याचे आढळते. भारतात संस्कृत भाषेतील कोशरचना समृद्ध आहे. इ.स.पू. सु. सातव्या शतकापासून निघंटु, धातुपाठ, गणपाठ  इ. शब्दकोश, विशिष्ट विषयावरील कोश, दर्शनसंग्रह, तत्त्वसंग्रह, अमरकोशासारखी रचना, विशिष्ट देवदेवतांपर पुराणे यांसारख्या विविध प्रकारच्या कोशरचना संस्कृतमध्ये आढळतात.

मराठी भाषेत कोशरचनेला खरी चालना इंग्रजी राजवटीत मिळाली. महानुभावपंथीयांची कोशरचना आणि छत्रपती शिवाजीच्या आज्ञेवरून तयार करण्यात आलेला राज्यव्यवहारकोश  यांसारखे तुरळक कोशरचनेचे प्रयत्न मराठीत पूर्वी झालेले होते. इंग्रजी राजवटीत सर्वच आधुनिक भारतीय भाषांत शब्दकोश व इतर प्रकारची संकलने तयार होऊ लागली. डॉ. श्री. व्यं. केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशासारखे प्रयत्न आधुनिक भारतातील सर्वविषयसंग्राहक कोशरचनेच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा होय. स्वातंत्र्योत्तर काळात प्रांतिक भाषांना राजभाषेचे स्थान मिळाल्याने, त्याचप्रमाणे शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेचा स्वीकार करण्यात आल्याने, मराठीसकट सर्व आधुनिक भारतीय भाषांत शासकीय पातळीवर आणि स्वतंत्रपणेही विविध प्रकारची कोशरचना होऊ लागली आहे.

कोशवाङ्‍मयाच्या मर्यादा व महत्त्व : कोशामध्ये मुख्यतः वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन असते; परंतु ही वस्तुनिष्ठता प्रत्यक्षात पूर्णत्वाने सांभाळली जातेच, असे नाही. प्रत्येक राष्ट्रातील विश्वकोश वेगवेगळे होतात, त्याची दोन कारणे आहेत : एक म्हणजे, स्वराष्ट्रांच्या माहितीला अग्रस्थान देणे आवश्यक असते व दुसरे म्हणजे, स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श इत्यादींचा कोशातील मूल्यविषयक निर्णयावर प्रभाव पडतो. साम्यवादी राष्ट्रांच्या विश्वकोशांवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परिणाम होतो. भांडवलशाही राष्ट्रांच्या विश्वकोशांवर त्यांच्या वैचारिक दृष्टीचा प्रभाव पडू शकतो. आपल्या राष्ट्राचे व संस्कृतीचे तत्त्वज्ञान अन्य राष्ट्रे व त्यांच्या संस्कृती यांहून कसे वेगळे व श्रेष्ठ आहे ते सांगणे, ही प्रतिज्ञाच कधीकधी स्पष्टपणाने उच्चारली जाते. राष्ट्राच्या तत्त्वज्ञानाचा व परंपरेचा परिणाम त्याच्या विश्वकोशावर होणे, यात गैर किंवा अस्वाभाविक असे काही नाही. याच कोशरचनेच्या मर्यादा म्हणतात येतील किंवा तिची स्वाभाविक वैशिष्ट्ये मानता येतील. राष्ट्राची अस्मिता जागी करणे, ही प्रेरणाही कोशनिर्मितीमागे असू शकते. दिदरोचा फ्रेंच विश्वकोश जेव्हा तयार झाला, तेव्हा त्याने फ्रान्समध्ये तत्त्वज्ञानात आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रांत प्रचंड खळबळ उडवून दिली.

प्रत्येक समाजात इतर अनेक प्रकारच्या वाङ्‍मयांबरोबर कोशवाङ्‍मयाचीही निर्मिती होत असते. ह्या निर्मितीचे ज्ञानक्षेत्रातील महत्त्व निर्विवाद असले, तरी केवळ ज्ञानासाठी ज्ञान एवढीच भूमिका कोशरचनेमागे नसते; उलट सर्व क्षेत्रांतील ज्ञान व्यक्तीच्या आणि समाजाच्या विकासासाठी सुलभपणे उपलब्ध करून देणे, हीच त्यामागील भूमिका असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यांस एक जीवनश्रद्धा मानून त्यांसाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणूनच कोणत्याही समाजाचे एक मानचिन्ह म्हणून कोशरचनेकडे पाहिले जाते. त्या समाजाची प्रज्ञा व प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेत पहावयास मिळतो.

लेखक: सु. रा. चुनेकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/22/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate