অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य- प्रवासवर्णने

अर्वाचीन मराठी साहित्यातील आरंभीची प्रवासवर्णने माहितीपर आणि वृत्तान्तवजा आहेत.  शामराव मोरोजी यांचे काशिप्रकाश म्हणजे महायात्रावर्णन (१८५२) हे अर्वाचीन मराठीतील पहिले प्रवासवर्णन होय.  जगन्नाथ विठोबा क्षत्री यांचे गोकर्ण महाबळेश्वराचे यात्रेप्रकरणी वृत्तांत (१८६३) हे संवादात्मक म्हणून आणि हरि गणेश पटवर्धन यांचे काशीयात्रा (१८७२) हे पत्ररूप म्हणून लक्षणीय आहे. कलाकृती म्हणून साहित्यनिर्मितीसंबंधी कसल्याच जाणिवा नसूनही लिहिले गेलेले विष्णुभट गोडसे (१८२७-१९०६) यांचे माझा प्रवास अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकीगत हे १८८३ साली लिहिलेले आणि १९०७ साली प्रथम प्रकाशित झालेले प्रवासवर्णन अनेक दृष्टींनी अप्रतिम आहे.

आत्मपरता, प्रांजळ व प्रत्ययकारी निवेदन, अर्थवाही बोलीभाषेचा जिवंतपणा, नाट्यमयता, अदभुतता, जीवनभाष्य ह्या सर्वांमुळे ह्या प्रवासवर्णनाचे वाङमयीन महत्व आजही कमी नाही.  समकालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक स्थितीच्या चित्रणामुळे त्याला ऐतिहासिक महत्वही आहेच.  शिवाय मनुष्य आणि नियती ह्यांच्या संघर्षाचे, मानवी प्रयत्नांच्या अपूर्णतेचे सुंदर दर्शन गोडसे भटजींनी घडविले आहे.  तथापि हे प्रवासवर्णन अपवादात्मकच.  त्यांच्या नंतरच्या बहुतेक प्रवासवर्णनांतून माहितीचा रटाळ तपशील, रुक्ष, निरस वर्णने व बालिश विचार यांचाच आढळ होतो.  त्या पार्श्वभूमीवर पंडिता रमाबाई या मराठीतील आरंभीच्या उल्लेखनीय प्रवासवर्णनलेखित असून

इंग्लडचा प्रवास (१८८३) व युनाइटेड स्टेट्सची लोकस्थिति आणि प्रवासवृत्त (१८८९) या दोहोंत त्यांच्या मनस्वीपणाचे, सौंदऱ्यासक्ततेचे व चिंतनशीलतेचे दर्शन घडते.  गोविंद बाबाजी जोशी यांच्या गेल्या तीस वर्षापूर्वीचे लोक व त्यांच्या समजुती अथवा माझे प्रवासाची हकिकत (रोजनिशी) (१८९६) या प्रवासवर्णनात प्रथमच रोजनिशी पद्धतीचा वापर केलेला आहे. गजानन पांडुरंग नाटेकर (‘हंस’ स्वामी) यांचे कैलासमानससरोवरदर्शन (१९१०) साहित्यगुणांनी संपन्न आहे. वैराग्यप्रवण ‘हंस’ स्वामींनी आपल्या अनुभवांचे कथन तटस्थपणे व निरागस प्रांजळपणे केले आहे.  रावजी भवनाराव पावगी यांनी लिहिलेले विलायतचा प्रवास (भाग १, २-१८८९, १८९२) हे प्रवासवर्णन त्या काळात बरेच लोकप्रिय होते.  सर्व जग हिंडून येणाऱ्या पहिल्या स्त्रीचे प्रवासवर्णन म्हणून पार्वतीबाई चिटनविसांच्या आमचा जगाचा प्रवास (१९१५) ह्याचा व पांडित्याचा प्रत्यय देणारे पत्ररूप प्रवासवर्णन म्हणून पां. दा. गुणे यांच्या माझा युरोपातील प्रवास (१९१५) ह्याचा निर्देश करता येईल.

गोविंद चिमणाजी भाटे यांनी देशी-विदेशी प्रवासवृत्तमालाच लिहिली.

  1. माझा अटकेपार प्रवास (१९१८),
  2. माझा उत्तर हिंदुस्थानचा प्रवास (१९१८)
  3. माझे दूरदूरचे प्रवास (१९१९),
  4. हिंदुस्थानचे नंदनवन (१९१९),
  5. आमची युरोपची यात्रा (१९३४),
  6. माझी विलायतची यात्रा (१९३४),
  7. आमची पायगाडीची चक्करे (१९३५)
  8. केरलाचे वर्णन व वृत्तांत (१९३५)

इत्यादी. प्रवासवर्णनांची ही निर्मिती हेतुत: झालेली दिसते.  भाड्याचे दर, प्रवासात राहण्याच्या सोयी-गैरसोयी इत्यादींची कंटाळवाणी जंत्री, स्थूल व रुक्ष वृत्तांत, पाल्हाळा, तोचतोचपणा ह्यांमुळे कलात्मकतेचा स्पर्श राहोच, काही ठिकाणी हास्यास्पदता निर्माण झाली आहे.  पण एकाच प्रकारचे इतके विपुल लेखन करणारा भाटे यांच्याएवढा दुसरा मराठी लेखक नाही हेही मान्य करावे लागेल.प्रवासवर्णनात्मक लेखनामध्ये ज्यांनी जिवंतपणा आणला, अशा लेखकांत न.चि. केळकर ह्यांचा समावेश करावा लागेल.  विलायतची बातमीपत्रे (१९२२), दिल्ली जुनी व नवी (१९२७), माझा सरहद्दीकडील दौरा व पूर्व बंगालची सफर (दोन्ही १९२९) ही सर्व प्रामुख्याने राजकीय बातमीपत्रांप्रमाणे असली, वाचकांना बहुश्रुत करण्याची दृष्टी त्यामागे असली, तरीही त्यांत केळकरांच्या रसिक, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा प्रत्यय ठायी ठायी येतो.

वर्णनात्मकता, कल्पनाविलास, पांडित्याचा वास न येणारी बहुश्रुतता, मिष्कील विनोदी वृत्ती ह्यांमुळे केळकरांची प्रवासवर्णने रुक्ष झाली नाहीत.  कुतूहलाने व चिकाटीने गोळा केलेल्या माहितीने रंजक ठरलेली गोविंद हरि फडकेकृत माझी तीर्थयात्रा (खंड १ ते ४, १९२३-१९३१) उल्लेखनीय आहे. काव्यात्मतेचे अस्तर असलेल्या पांडित्याचा प्रत्यय देणारे पत्ररूप यूरोपचा प्रवास (१९३८) हे पां.वा. काणे यांचे प्रवासवर्णनही लक्षणीय आहे.  श्री. रा. टिकेकर यांची मुसलमानी मुलुखांतली मुशाफरी (१९३१) सारखी बातमीपत्रे त्यांच्या डोळस निरीक्षणाची व देशाभिमानाची साक्ष देणारी असून त्यांनी प्रवासवर्णनाच राजकीय आशयाला स्थान प्राप्त करून दिले.

अनंत काणेकरांनी धुक्यातून लाल ताऱ्याशकडे (१९४०) लिहून या वाङमयप्रकाराला वेगळे वळण दिले.  काव्यात्मकता, प्रसंगातील नाट्य हेरण्याची वृत्ती, बोलक्या व्यक्तिरेखा, चित्रमयता, मार्मिक विनोद या गुणांनी ललितरम्य झालेल्या आमची माती, आमचे आकाश (१९५०); निळे डोंगर, तांबडी माती (१९५७); खडक कोरतात आकाश (१९६४), गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या (१९६९) या प्रवासवर्णनांत निसर्ग आणि माणूस ह्यांत रंगलेल्या लेखकाच्या रसिक, जिज्ञासू, संपन्न व्यक्तिमत्वावर घडलेल्या संस्कारांची ताजी, टवटवीत चित्रे अनौपचारिक शैलीने रेखाटलेली आहेत.

पूर्वीच्या स्थलवाचक प्रवासवर्णनांना काणेकरांनी व्यक्तिवाचक बनविले.

  1. गो.नी.दांडेकर यांची नर्मदेच्या तटाकी (१९४९),
  2. दुर्गदर्शन (१९६९);
  3. महादेवशास्त्री जोशी यांची तीर्थरूप महाराष्ट्र (१९५०),
  4. महाराष्ट्राची धारातीर्थे (१९६१)

ही प्रवासवर्णने उभयतांच्या भावभक्तीचा, रसडोळस जिज्ञासूपणाचा आणि ओघवत्या संस्कृतप्रचुर भाषेचा सुखद अनुभव देतात.  आमच्या देशाचे दर्शन (१९४३), भक्तिकुसुमे (१९४४), लाटांचे तांडव (१९४५; तिन्हींचे अनुवादक वामन चोरघडे, माधव सावंत) – लोकमाता (१९३८) या पौराणिक संदर्भ, वेधक शब्दचित्रे आणि गतिमान भाषाशैली यांनी नटलेल्या द.बा. ऊर्फ काका कालेलकरांच्या प्रवासवर्णनांतून एका निसर्गप्रेमी प्रतिभावंताचा परिचय होतो.  त्यांनी प्रवासवर्णनांना उत्कृष्ट चिंतनिकांचा दर्जा प्राप्त करून दिला.  प्रवासवर्णनांना कलात्मक साज चढविणाऱ्यान मोजक्या लेखकांत रा.भि. जोशी ह्यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे.  सूक्ष्म निरीक्षण, सौंदऱ्याचे अचूक टिपण, वाङमयीन संदर्भ, पौराणिक प्रसंगांची माहिती, संस्कृत अवतरणे यांमुळे त्या त्या स्थळांचा इतिहास जिवंत करून जोशी ह्यांनी स्थलप्रत्यय तर साधलाच; पण प्रवासवर्णनांना ललित निबंधाच्या पातळीवर नेऊन पोहोचविले.  वाटचाल (१९५३) व मजल दरमजल (१९६१) ही त्यांची प्रवासवर्णने.

प्रवास करणे हा जोशी ह्यांचा छंद असून आपल्या व्यक्तिमत्वाच्या आविष्काराचे साधन म्हणून प्रवासवर्णन हा वाङमयप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळला आहे.गंगाधर गाडगीळांनी गोपुरांच्या प्रदेशात (१९५२) मध्ये दक्षिण भारताचे मनोज्ञ दर्शन घडविले आहे.  गाडगीळांना नावीन्याची हौस असून त्यांची वृत्ती प्रयोगशील आहे.  ह्याचा प्रत्यय त्यांच्या साता समुद्रापलिकडे (१९५९) मध्ये येतो.  ह्या प्रवासवर्णनात गाडगीळांना कालानुक्रमाच्या नोंदीला किंवा माहितीला महत्व दिलेले नाही.  एखाद्या कथाबीजाने लेखकाच्या मनाची पकड घ्यावी, त्याप्रमाणे परदेशप्रवासातील ज्या अनुभवांनी त्यांच्या मनाची पकड घेतली, त्या अनुभवांना कलावंताच्या शुद्ध भूमिकेतून प्राप्त झालेले तरल, व्यापक व संमिश्र स्वरूप साकार करण्यावर गाडगीळांच्या विशेष भर आहे.  हे प्रवासवर्णन म्हणजे या वाङमयप्रकाराच्या विकासपरंपरेतील एक महत्वाचा टप्पा आहे.

पु.ल. देशपांडे ह्यांनी आपल्या अभिजात विनोदी लेखनपद्धतीने प्रवासवर्णनांत वेगळेपण आणले.  अपूर्वाई (१९६०), पूर्वरंग (१९६५), वंगचित्रे आणि जावे त्यांच्या देशा (दोन्ही १९७४) ह्या सर्वात देश-परदेशच्या विविध व्यक्ती-प्रसंगांचे चटकदार दर्शन घडवीत असतानाच अंतर्मुख होऊन स्वतःच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचेही दर्शन त्यांनी घडविले. जीवनातील नानाविध सुसंगतींचे व विसंगतीचे त्यांनी मिष्कीलपणे वर्णन केले आहे.  प्रवासाची पूर्वतयारी, प्रवासाला निघताना येणाऱ्याण अडचणी, परदेशासंबंधी लिहिताना स्वदेशाशी केलेली तुलना इ. गोष्टी देशपांडे ह्यांनी अशा खुमारीने लिहिल्या आहेत, की बर्याीचशा प्रवासवर्णनकरांनी त्यांचेच अनुकरण केले.  पु.ल. देशपांडे यांच्या प्रवासवर्णनांतील अपूर्वाई भूप्रदेशाची नाही, विनोदाचीही नाही, तर ती शैलीची व दृष्टीची आहे.  वाचकांना अंतर्मुख करून चिंतनशील बनविण्याचे सामर्थ्य त्यांच्या प्रवासवर्णनांत आहे.  अगस्तीच्या अंगणात (१९५७), उडता गालीचा (१९५९), तोकोनामा (१९६१), हिरवी उन्हे (१९६४) ह्या प्रवासवर्णनांना प्रभाकर पाध्ये ह्यांच्या विवेचक सौंदर्यदृष्टीमुळे वेगळा साज चढला आहे.  राजकीय दृष्टी, पत्रकारिता, तत्वजिज्ञासा, कलाभिरुची, काव्यात्मकता व निसर्गप्रेम यांचा सुंदर एकमेळ त्यांत साधला आहे. अनौपचारिकपणामुळे ह्या प्रवासवर्णनांची प्रकृती लघुनिबंधात्मक वाटते.

  1. प्र.के. अत्रे ह्यांची साहित्ययात्रा (१९५६)
  2. भ्रमंती (१९५६), केल्याने देशाटन (१९६१)
  3. चिं.वि. जोशी ह्यांचे संचार (१९४५)
  4. ना.सी. फडके ह्यांची कमलपत्रे (दुसरी आवृ. १९४९)
  5. शशिकांत पुनर्वसूंचे ऊब आणि गारठा (१९५७)
  6. जयवंत दळवींचे लोक व लौकिक (१९५८)
  7. न.वि. गाडगीळांचे मुठा ते मेन (१९६५) व इतर स्फुट प्रवासवर्णने
  8. ज्ञानेश्वर नाडकर्णी ह्यांचे विलायती वारी (१९५९)
  9. अरविंद गोखले ह्यांचे अमेरिकेस पाहावे जाऊन (१९५९)
  10. रमेश मंत्री ह्यांचे थंडीचे दिवस (१९६३)
  11. क्षणाचा प्रवासी (१९७०)
  12. सुखाचे दिवस (१९७५)
  13. वसंत बापटांचे बारा गावचं पाणी (१९६७)
  14. मधुकर केचे ह्यांचे एक भटकंती (१९६८)
  15. माधव गडकरी ह्यांचे मुंबई ते मॉस्को ... (१९६९)
  16. इंदू साक्रीकरांचे पूर्वेच्या परिसरात (१९७०)
  17. रवींद्र केळेकरांचे जपान असा दिसला
  18. श्रीपाद जोशी ह्यांचे चिनारच्या छायेत (१९५८)
  19. जा जरा पूर्वेकडे (१९७३)
  20. पूर्वाचलाची मुशाफिरी; दि.बा. मोकाशी ह्यांचे पालखी (१९६४)आणि अठरा लक्ष पावले (१९७१)
  21. रवींद्र पिंगे ह्यांचे आनंदाच्या दाही दिशा (१९७४)
  22. मीना देशपांडे ह्यांचे पश्चिमगंधा (१९७५)

इ. सर्व प्रवासवर्णने त्या त्या लेखक-लेखिकेच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविणारी, सांकेतिक पद्धतीचे अनुकरण न करता स्वत:चे वेगळेपण दाखविणारी, म्हणून निर्देशावी लागतील.  दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांचे शीबा राणीच्या शोधात (१९७०) हे पुस्तक आत्मवृत्तात्मक-प्रवासवर्णनाचा एक प्रभावी नमुना होय.प्रारंभीच्या काळात प्रवासवर्णनांचे स्वरूप माहितीवजा टिपणांचे होते.  लेखकाचे व्यक्तिमत्व आणि प्रवासस्थळाचे वैशिष्ट्य ह्यांच्या परस्परांवर होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रियांमधून वस्तुनिष्ठेकडून आत्मनिष्ठेकडे या वाङमयप्रकाराचा प्रवास होत राहिला.  आत्मचरित्राप्रमाणेच प्रवासवर्णन हीदेखील नवनिर्मिती मानली जाऊ लागली असून प्रवासवर्णनाला ललितलेखनातील महत्वाचा वाङमयप्रकार म्हणून मान्यता प्राप्त होऊ लागली आहे.

लेखक: वि.पु. गोखले

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate