অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी साहित्य- शास्त्रीय साहित्य

पेशवाईच्या अस्तानंतर इंग्रजी राज्य महाराष्ट्रात सुरू झाले. त्यानंतर इंग्रजांनी स्वत:बरोबर आणलेल्या विज्ञानाचा प्रभावही महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र दिसू लागला. तेव्हा भारतातील इंग्रजी अधिसत्ता आणि सर्वत्र विज्ञानाचा प्रभाव हे दोन्ही एकदमच सुरू झाले, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे साहजिकच विज्ञानवाङ्‌मय हे केवळ इंग्रजीतूनच लिहिले जावे, असा जणू संकेत मानला गेला. त्यातच इंग्रजांनी भारतावर मिळविलेल्या वर्चस्वामुळे इंग्रजांचे गुण व वैज्ञानिक नैपुण्य हे पाहून मराठी माणसाच्या मनात एक तर्‍हेची न्यूनगंडाची भावना घर करून बसली आणि साहजिकच मराठीतून विज्ञानवाङ्‌मयाची निर्मिती करणे जणू शक्यच नाही असे लोकांना वाटू लागले.

याचा परिणाम असा झाला, की पेशवाई गेल्यानंतर पहिल्या सु. ५० वर्षात वैज्ञानिक विषयावर फारच कमी पुस्तके मराठीतून लिहिली गेली. ह्यात काही अनुवादही होते. ज्या लेखकांनी असे मराठी लेखन वा भाषांतर त्या काळात केले, त्यांच्या स्वभाषाप्रेमाचे कौतुकच केले पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचा नामनिर्देशही केला पाहिजे.

वैज्ञानिक पुस्तकांत हरि केशव पाठारे यांचे सिद्धपदार्थविज्ञानशास्त्र – विषयक संवाद (१८३३) गोविंद गंगाधर फडके यांचे यंत्रशास्त्राची मूळे (१८५३), केरो लक्ष्मण छत्रे यांचे पदार्थविज्ञानज्ञास्त्रांतील किती एक विषयांवर व्याख्याने ९ १८५२), भाऊशास्त्री थेऊरकर यांनी टॉमस डिककृत अटमॉस्फीअर अँड इट्‌स फिनॉमेनाच्या आधारे लिहिलेलेवाय्यावरण आणि त्यांतील चमत्कार (१८५७), सखाराम रामचंद्र दीक्षित यांचे शास्त्रीय ज्ञानदर्शन (डॉ. ब्रूअरकृत गाइड टू सायंटिफिक नॉलेजचे भाषांतर, १८५६),कृष्णशास्त्री भाटवडेकर यांचे वर्तमानवाहक विद्युद्यंत्र याचे संक्षिप्त वर्णन (१८५९), आकाशसौंदर्य ( चार्ल्स एफ्‌. ब्‍लंटकृत ब्यूटी ऑफ द हेवन्सचे भाषांतर, १८६१), कृष्णशास्त्री गोडबोले यांचे ज्योति:शास्त्र (१८६२) आणि बाळाजी नारायण फडके ह्यांनी तयार केलेल्या ‘क्रोनॉमीटरची’ माहिती देणारे कालमापकयंत्रपरिभाषा (१८७१) इ. मोजक्या पुस्तकांचा समावेश होतो.

१८७० – १९००

पेशवाईच्या अस्तानंतरच्या सु. ५० वर्षाच्या कालावधीत आंग्‍लशिक्षित मराठी माणसे तयार होत गेली आणि इंग्रजीतून लिहिलेल्या उत्तमोत्तम वैज्ञानिक ग्रंथांशी त्यांची जवळीकही वाढली. अशा वैज्ञानिक इंग्रजी ग्रंथांचा मराठीत अनुवाद करायचे आकर्षणही निर्माण झाले. त्यामुळे १८७५ नंतरच्या पाव शतकात अनुवादित वैज्ञानिक पुस्तकांची भर मराठीच्या ग्रंथभांडारात पडत गेली. अशा  अनुवादकांत बाळाजी प्रभाकर मोडक (१८४७ – १९०६), हे प्रमुख होत. ग्‍यानोकृत पदार्थविज्ञानशास्त्राची मूलतत्वे (१८९६), बालबोध यंत्रस्थितिशास्त्र (१८९७), ऊष्णताशास्त्राची मूलतत्वे (१८९१) ही त्यांची काही उल्लेखनीय आधारित- अनुदानित पुस्तके होत. त्याचप्रमाणे गो. रा. तांबे यांचा मेणबत्तीचा रासायनिक वृत्तांत (१८९४) हादेखील फॅराडेच्या केमिकल हिस्टरी ऑफ अ कँडल या पुस्तकाचा अनुवाद होय.

शंकर बाळकृष्ण दीक्षित (१८५३ – १८९८) यांचा ज्योतिविलास आणि भारतीय ज्योति:शास्त्र (१८९६) हे ज्योतिर्विज्ञानातील दोन बहुमोल ग्रंथ ह्या काळात लिहिले गेले, तसेच वैद्यकशास्त्रात, अनेक भागांचा मिळून शं. दा. पदे (मृ. १९०९) यांनी लिहिलेला वनौषधि – गुणादर्श (६ भाग), हाही याच कालखंडात प्रसिद्ध झाला. ह्या कालखंडातील बरेचसे शास्त्रीय लेखन अनुवादित असले. तरी विषयांची मौलिकता, विविधता या दृष्टीने विज्ञानवाङ्‌मयाचा हा कालखंड महत्तवपूर्ण ठरतो. सिद्धपदार्थशास्त्र (१८७८) ह्या नावाचे एक त्रैमासिकही ह्या कालखंडात नारायण व्यंकाजी खोत हे संपादित असत. भौतिकी, ज्योतिषशास्त्र, भूविज्ञान, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, ह्यांवरील लेखन त्यात येई. शास्त्र व कला (१८९९) हे शिवराम गोविंद फाळकेसंपादित मासिकही उल्लेखनीय आहे.

१९०१ – १९५०

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने वैज्ञानिक परिभाषेचे छोटे कोश ह्या कालखंडात तयार केले. यशवंत रामकृष्ण दाते ह्यांनी चिं. ग. कर्वे ह्यांच्या साहाय्याने शास्त्रीय – परिभाषा कोश (१९४८) तयार केला. गणेश रंगो भिडे ह्यांनी तयार केलेल्या बालकोशाच्या पहिल्या भागात (१९४२) जगाच्या उत्पत्तीपासून मनुष्याच्या उत्पत्तीपर्यतच्या शास्त्रीय विषयांचा परामर्श घेण्यात आला होता.

  1. गो. रा. परांजपे ह्यांनी भौतिकीचा पारिभाषिक शब्दसंग्रह तयार केला (१९३९),
  2. तर शं. आ. परांडेकर ह्यांनी वनस्पतिशास्त्राचा (१९४२). विविध वैज्ञानिक विषयांवरील ग्रंथही लिहिले गेले.
  3. शंकर दाजी पदे ( त्रिदोषाविचार – २ भाग, १९०२ ; १९०३);
  4. माधव मैराळ सुरतकर (प्राचीन यंत्रकलासाहित्य , १९०८ );
  5. ग. पां. काळोखे (अग्‍निमांद्य – १९११, रोगजंतू, १९१२ , फिरंगरोग व पूयप्रमेह, १९१४, स्त्रियांचे आरोग्य व शिशुपालन, १९२२ ),
  6. वेंकटेश बापूजी केतकर ( ग्रहगणित १९१४),
  7. शिकंदरलाल आतार ( नव्य – विज्ञान अथवा आधुनिक शास्त्रीय जगत्‌- १९१९ ),
  8. कृष्णशास्त्री फडके (सार्थ सुश्रुतसंहिता – २ भाग, १९२१; १९२४);
  9. बाळकृष्ण श्रीधर कोलटकर [सृष्टीशास्त्र (भूगोल – खगोल); १९२५],
  10. गोविंद सदाशिव आपटे (सर्वानंदलाघव करणग्रंथ – १९३६ ),
  11. भारद्वाज (आइन्स्टाइनप्रणीत सापेक्षदर्शन – १९३६),
  12. भास्कर धोंडो कर्वे (आनुवंशिकता – १९४४),
  13. य. व. पटवर्धन [चंद्र (शास्त्रीय) १९४५ ],
  14. अमरप्रकाश गोखले (परमाणूंच्या युगात – १९४६),
  15. ना. वा. कोगेकर ( सूर्यावरील डाग – १९४८ )
  16. आणि क. वा. केळकर (दगडी कोळसा – १९४८)

हे असे ग्रंथ लिहिणाऱ्यांपैकी काही होत.

परंतु या कालखंडातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मराठीतील वज्ञानिक नियतकालिकांच्या लक्षणीय प्रमाणावर प्रारंभ ही होय. या नियतकालिकांत शेतकी आणि शेतकरी हे नियतकालिक १९१० मध्ये पुण्यात सुरू झाले आणि ते कृषिविज्ञानाला वाहिलेले आहे. त्यानंतर १९१९ मध्ये मराठीत दुसरे नियतकालिक उद्यम याचा प्रारंभ नागपूरमध्ये झाला. हे नियतकालिक मुख्येत्वेकरून विविध उद्योगधंद्यांची हिती सामान्य मराठी वाचकांना देण्यासाठी निघालेले असले, तरी त्यात रसायनशास्त्र, अभियांत्रिकी ह्यांसारख्या विषयांवरही लेख दिले जाऊ लागले. त्यानंतर सष्टिज्ञानाचा उल्लेख आवश्यक आहे. त्यांचा प्रारंभ १९२८ मध्ये झाला. या मासिकातील लेख वैज्ञानिक संशोधनाची माहिती सामान्य जनांना पोहोचावी अशा पद्धतीने लिहिलेले असतात. विशेष म्हणजे या तीनही नियतकालिकांनी आजतागायत आपले कार्य चालू ठेविलेले आहे. ह्या कालखंडातील अन्य नियतकालिकांत नाविन्य (१९३१ , व्यापार, उद्योगधंदे ह्यांप्रमाणेच रसायनशास्त्र अभियांत्रिकी इ. भौतिक शास्त्रांना वाहिलेले). शास्त्रीय जगत्‌( १९३९, उद्योगधंदे, व्यापार, शेतकी व आधुनिक शास्त्रे ह्यांच्यासाठी), आयुर्वेदपत्रिका (१९४७) ह्यांसारख्या नियतकालिकांचा समावेश होतो.

१९५० नंतर

अमेरिकेने उडविलेले अणुबाँब आणि रशियाने सोडलेला स्पुटनिक यांमुळे सर्वत्र अणुयुग आणि अंतराळयुग यांचा प्रारंभ झाला आणि सर्वच पाश्चात्य भाषांतून वैज्ञानिक लेखन विपुल लिहिले जाऊ लागले. त्याचे पडसाद मराठीतही उठले. अणुबाँबच्या अणुऊर्जेचे रहस्य व अंतराळयुगातील चंद्रावरील स्वारीचे शास्त्रीय गुपित जाणून घेण्याची जिज्ञासा सामान्य वाचकांच्या मनात जागृत झाली. या जिज्ञासेची तृप्ती करण्यासाठी झालेल्या वैज्ञानिक लेखनामुळे मराठीतील वैज्ञानिक वाङ्‌मय हळुहळु समृद्ध होऊ लागले. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात शालान्त परीक्षेपर्यत मराठीतून विज्ञान शिकविण्यास उत्तेजन मिळू लागले. त्याचा परिणाम म्हणजे केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने विज्ञान परिभाषेचा कोश तयार करण्याचे कार्य हाती घेतले. शिवाय पुणे विद्यापीठानेही असाच परिभाषेचा कोश तयार केला. १९६० साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाची स्थापना झाली आणि त्या मंडळानेही या कार्याला हातभार लावला...

विश्वकोशाच्या प्रारंभ हे या साहित्य संस्कृति मंडळाचे सर्वात बहुमोल कार्य होय. डॉ. केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशानंतर नवीन, अद्ययावत ज्ञानकोशाची आवश्यकता होती, ती या श्वकोशातून पुरी होण्याची संधी प्राप्त झाली. साहित्य संस्कृति मंडळाने काही वैज्ञानिक विषयांवर उत्तम पुस्तकेही प्रकाशित केली. उदा., रेडिओ दुरूस्ती (१९६६) – श्री. वि. सोवनी; अणुयुग (१९६९) – संपा. डॉ. वि. त्र्यं. आठवले; वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा (१९६९) – गो. रा. परांजपे. १९६९ मध्ये महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळाची स्थापना झाली आणि त्या मंडळाने महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांचे मराठीतून लेखन करवून घेतले. त्यामुळे पदवी परीक्षेपर्यतच्या अभ्यासक्रमाची वैज्ञानिक विषयांवरील पाठ्यपुस्तके मराठीतून उपलब्ध होऊ लागली. उदा., इंधने, भट्ट्या व उतपमापके (१९७३) – य. वि. देशमुख; स्फटिकविज्ञान (१९७६) मालती वर्तक; स्थुणा : शास्त्र व तंत्र (१९८०) – माधव पाटणकर.

या सर्व प्रयत्‍नांतून या कालखंडातील वैज्ञानिक वाङ्‌मयाची निर्मिती विविध विषयांत होत गेली. अशा विषयांत भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, स्थापत्यशास्त्र, गणितशास्त्र, कृषिशास्त्र, आहार आणि आरोग्यशास्त्र, वनस्पतिशास्त्र, गृहविज्ञान, अभियांत्रिकी आणि इतर अनेक शास्त्रांचा अंतर्भाव होतो. या वाढीला हातभार लावण्याचे कार्य मुंबई येथील (युसीस) या अमेरिकन संस्थेने फारच चांगल्या तर्‍हेने केले. उत्तम अमेरिकन वैज्ञानिक ग्रंथांचे अनुवाद मराठीतून करण्यासाठी त्यांनी प्रकाशकांना व चांगल्या लेखकांना प्रोत्साहन दिले. या उत्तेजनामुळे सामान्यपणे मराठीतून एरव्ही प्रसिद्ध झाली नसती, अशी तांत्रिक विषयांवरील पुस्तके मराठीतून निघू शकली. युसिससाठी अमेरिकन वैज्ञानिक ग्रंथांचे अनुवाद करणाऱ्यांत चिं. श्री. कर्वे, ना. वा. कोगेकर, प. म. बर्वे ह्यांचा समावेश होतो.

त्यांनी अनुवादिलेली काही पुस्तके अशी

  1. चिं. श्री. कर्वे (मानवाचे भवितव्य, १९५८;
  2. तारका,मानव आणि अणू, १९६४;
  3. सूर्य : जन्म आणि मृत्यू, १९६६;
  4. विराट विश्वाची निर्मिती, १९६६);
  5. ना. वा. कोगेकर (आपल्या ग्रहमालेतील नवग्रह, १९६६;
  6. सर्व विज्ञान परिचय, दोन भाग, १९६८);
  7. प. म. बर्वे (अवकाशयात्रा, १९६४;
  8. एक ग्रह, नाव त्याचे पृथ्वी, १९६६).

त्याचप्रमाणे या कालखंडात मराठी वृत्तपत्रे व नियतकालिके यांनी वैज्ञानिक लेखांना विशेष, प्रसिद्धी देऊन जनतेत एक प्रकारची विज्ञानजागृती सुरू केली. त्यांच्या सहकार्यामुळे सामान्य माणसांच्या दैनंदिन वाचनात विज्ञानलेखांना प्रवेश मिळाला. प्रारंभी हे कार्य रविवाराचा केसरी, सह्याद्रि आणि किर्लोस्कर मासिकाने सुरू केले. त्यामुळे काही चांगली लेखक मंडळी वैज्ञानिक लेखन वारंवार करू लागली आणि तीच पुढे प्रथितयश वैज्ञानिक लेखक म्हणून प्रसिद्ध झाली. याच लेखकांनी पुढे बहुसंख्येने मराठीतील वैज्ञानिक ग्रंथनिर्मिती करून मराठी वाङ्‌मयात बहुमोल भर घातली.

महाराष्ट्र शासनानेही नामवंत मराठी ग्रंथांना वार्षिक राज्यपुरस्कार देण्याची पद्धत सुरू करून उत्तम लेखकांचा गौरव करण्याची प्रथा सुरू केली. त्यात वैज्ञानिक लेखनाचाही अंतर्भाव असल्यामुळे ही प्रथा मराठीतील वैज्ञानिक लेखनाला प्रोत्साहक ठरली. नागपूर विद्यापीठाने डॉ. रघुवीर ह्यांच्या पारिभाषिक संज्ञांचा उपयोग करून भौतिकी, गणित इ. विषयांतील पाठ्यपुस्तके प्रसिद्ध केली. उदा., माध्यमिक – यामरैखिकी (१९५१) हा एन्‌. एस. क्षीरसागरकृत इंग्रजी ग्रंथाचा य. वि. ठोसरकृत अनुवाद.

अशा सर्व प्रयत्‍नांतून आतापर्यत मराठी विज्ञान वाड्‌मय १९५० पूर्वीच्या मानाने चांगले समृद्ध झाले. त्यातच आता विज्ञानकथांचा प्रारंभ झाला आहे. विज्ञान व वैज्ञानिक साहित्य ह्यांबद्दलचे आकर्षण ह्या कथांतून वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इयूल्स व्हेर्न यांच्या वैज्ञानिक कादंबऱ्यांचे रूपांतर व अनुवाद करून भा. रा. भागवत यांनी ह्या संदर्भात मोलाची भर घातली आहे. त्याशिवाय त्यांच्या जोडीला इतरही लेखक मंडळींनी मर्यादित परंतु चांगले रंजक विज्ञान वाङ्‌मय लिहिले आहे. किर्लोस्कर मासिकाने डॉ. जयंत नारळीकरांसारख्या उत्तम संशोधकाच्या विज्ञानकथा छापून या वाड्‍मयाला प्रोत्साहन दिले. याच कथा आता यक्षाचे देणे या पुस्तकात एतत्रित प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत.

विज्ञान-वाङ्‌मयाची विविधता आता निरनिराळ्या दिशेने वाढू लागली आहे. विविध तांत्रिक विषयांवरील पुस्तके आता प्रसिद्ध होत आहेत. या उपक्रमाला पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशनानेही काही हातभार लावला आहे. तेव्हा आताचे मराठी विज्ञान वाङ्‌मय तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही वाढत आहे. आजतागायत दोन ते अडीच हजार छोटी पुस्तके उपलब्ध असावीत, असा अंदाज आहे. परंतु याच काळात इंग्रजीतून प्रसिद्ध होणाऱ्या वैज्ञानिक ग्रंथाचा आकडा लक्षांत घेतला, तर मराठीतील विज्ञान-वाङ्‌मय अजून बाल्यावस्थेतच आहे, असे म्हणावे लागते.

आधुनिक विज्ञाने आणि तंत्रविद्या ह्यांतील शाखोपशाखांतील अनेक विषयांवरील नोंदी मराठी विश्वकोशात अकारविल्हे अंतर्भूत केलेल्या आहेत. वैज्ञानिक भाषा आणि परिभाषा ह्या दृष्टीने मराठी विज्ञानवेत्त्यांनी केलेले हे विश्वकोशीय लेखन मराठीतील शास्त्रीय वाङ्‌मयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानवा लागेल. मराठी विश्वकोशाचा अठरावा खंड हा परिभाषासंग्रह असून त्यात अनेक वैज्ञानिक संज्ञांचे मराठी पर्याय दिलेले आहेत.शेतकरी (१९६५), मराठी विज्ञान परिषद पत्रिका (१९६८), विज्ञानयुग (१९६८), बळिराजा (१९७०) ह्यांसारख्या नियतकालिकांनीही महत्त्वाचे कार्य केले आहे.

लेखक: चिं. श्री. कर्वे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 12/30/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate