অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिव्हरपूल

लिव्हरपूल

लिव्हरपूल बंदराचे दृश्य लिव्हरपूल इंग्लंडमधील एक प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र आणि सागरी बंदर.

लोकसंख्या ५,१०,३०६ (१९८१). पश्चिम मध्य इंग्लंपडमधील मर्सीसाइड या महानगरीय परगण्याचे हे मुख्य ठिकाण आहे.

हे शहर मर्सी नदीमुखखाडीच्या पूर्ण तीरावर वसलेले असून आयरिश समुद्रापासून पूर्वेस केवळ ५ किमी. अंतरावर आहे. नदी मुखखाडीवरील ६५० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेल्या या नगरसमूहाची १९७४ मध्ये मर्सीसाइड परगणा या नावाने स्थापना झाली असून त्यामध्ये लिव्हरपूलशिवाय बूटल, बर्कनहेड व वॉलसे या औद्योगिक शहरांचा समावेश होतो.

इ.स. नवव्या-दहाव्या शतकांत येथील नदीमुख खाडीच्या दोन्ही काठांवर नॉर्मनांनी वसाहती केल्या असल्या, तरी तेव्हापासून पुढे ५०० वर्षांपर्यंत लिव्हरपूल हे एक छोटेसे मासेमारी खेडे म्हणूनच राहीले.

१२०७ मध्ये इंग्लंयडच्या जॉन राजाला आयर्लंडकडे प्रवासी व माल पाठविण्यासाठी एका बंदराची आवश्यकता होती; तेव्हा नियोजनबद्ध अशा नवीन नगराच्या स्थापनेसाठी त्याला करारावर लिव्हरपूल देण्यात आले. त्याने तेथे एक किल्ला बांधला. मध्ययुगीन काळात या नगराचा विकास मंदगतीने झाला.

लिव्हरपूल येथील गोदी बांधण्यापूर्वी जवळपासच्या लहान खाडीत जहाजे नांगरली जात. त्यामुळे भरती-ओहोटीनुसार मोठ्या जहाजांची वाहतूक करावी लागे. १७१५ मध्ये लिव्हरपूलची पहिली गोदी बांधण्यात आली. अठराव्या शतकात गुलामांच्या लाभकारक व्यापारात लिव्हरपूलने भाग घेतला. पश्चिम आफ्रिकन गुलाम अमेरिका व वेस्ट इंडीजकडे विक्रीसाठी येथून नेले जात व परत लिव्हरपूलला येताना रम, कापूस व साखर आणली जाई. तसेच निर्मिति-वस्तू पश्चिम आफ्रिकेकडे नेल्या जात असत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकन गुलामांच्या एकूण व्यापारापैकी सु. ८०% व्यापार एकट्या लिव्हरपूलकडून होत होता. त्यामुळे या काळात शहराची झपाट्याने वाढ झाली.

गुलामांचा व्यापार १८०७ मध्ये संपुष्टात आला; परंतु औद्योगिक क्रांतीनंतर पुन्हा लिव्हरपूरलच्या विकासास सुरुवात झाली. लिव्हरपूल मँचेस्टर हा देशातील पहिला लोहमार्ग १८३० मध्ये सुरू झाला. शहरातील कापड उद्योगाचे आगमन, आगबोटींचा व लोहमार्गांचा विकास, अमेरिकी बाजारपेठेचे सान्निध्य, इंग्लंडच्या पश्चिम किनाऱ्यावर अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेले लिव्हरपूलचे स्थान आणि मँचेस्टर या प्रसिद्ध कापड उद्योगाकेंद्राशी मँचेस्टर शिप कॅनॉलने जोडल्यामुळे लिव्हरपूलच्या औद्योगिक व व्यापारी विकासास खूपच चालना मिळाली. १८४५-४८ मधील आयर्लंडमध्ये पडलेल्या दुष्काळात इकडे आलेल्या लोकांमुळे लिव्हरपूलच्या लोकसंख्येत बरीच वाढ झाली.

१८८० मध्ये लिव्हरपूलला शहराचा दर्जा मिळाला. समोरच मर्सी नदीच्या पूर्व तीरावर असलेल्या बर्कनहेडशी लिव्हरपूल हे मर्सी  नदीच्या खालून काढलेल्या बोगद्याने जोडले आहे. १८८६ मध्ये मर्सी नदीमुखखाडीखालून काढलेला लोहमार्ग-बोगदा बांधून पूर्ण झाला. १९३५ मध्ये क्वीन्सवे हा ३.५ किमी. लांबीचा गाड्यांसाठी पाण्याखालून काढलेला महामार्ग-बोगदा पूर्ण झाला. या प्रकारचा जगातील हा एक लांब बोगदा आहे.

१९७१ मध्ये क्वीन्सवेला समांतर असे पहिले दोन जोडबोगदे सुरु झाले. १९७७ मध्ये भुयारी मार्ग तयार झाला. लोहमार्ग व हवाई वाहतुकीचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९-४५) जर्मनांच्या हवाई हल्ल्यांमुळे शहराची खूप नासधूस झाली.

लिव्हरपूल हे कारखानदारीसाठी प्रसिद्ध आहे. रसायने, औषधे, लाकड सामान, अन्नप्रक्रिया, पीठगिरण्या, डीझेल व जेट एंजिने, इलेक्ट्रॉनिकीय साहित्य, चर्मशोधन, तेल व साखर परिष्करण, साबण, वनस्पती तेले. रबर व तंबाखू प्रक्रिया इ. उद्योगधंदे लिव्हरपूल शहरात व मर्सीसाइड महानगरीय भागात आढळतात. जहाजबांधणी वा दुरुस्ती, अभियांत्रिकी, मोटारनिर्मीती, खोदकाम साहित्यनिर्मिती यांसाठी मर्सीसाइड महत्त्वाचे आहे.

लँकाशरमधील कापडगिरण्यांना लिव्हरपूलकडून कापडाचा पुरवठा होतो. परंतु दुसऱ्या महायुद्धापासून विदेशी स्पर्धा व इतर तंतुमय पदार्थांचा शोध यांमुळे लिव्हरपूलच्या अर्थव्यवस्थेतील कापूस या कच्च्या मालपुरवठ्याचे महत्त्व कमी झाले. ग्रेट ब्रिटनमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे सागरी बंदर आहे. कच्चा माल व विक्रेय वस्तूंच्या आयातीसाठी इंग्लंडमधील अग्रेसर प्रवेशद्वारांपैकी लिव्हरपूल हे एक आहे. तसेच लोखंड व पोलाद यंत्रे व सर्व प्रकारच्या निर्मिति-वस्तूंच्या निर्यांतीसाठी हे महत्त्वाचे आहे.

पीअर हेड लिव्हरपूलचे किनाऱ्यापवरील केंद्रीय स्थान होय. येथेच नदीमुखखाडीची रुंदी सर्वांत कमी (०.८ किमी) आहे. येथे अनेक आधुनिक इमारती आढळतात. कुनार्ड बिल्डिंग, दोन मनोऱ्यांची रॉयल लिव्हर बिल्डिंग या येथील उल्लेखनीय वास्तू आहेत. त्यांशिवाय बंदर-कार्यालयाच्या इमारती येथेच आढळतात.

रॉयल लिव्हर इमारतीवरील मनोऱ्यांच्या माथ्यांवर काल्पनिक लिव्हर पक्षाचे नक्षीकाम केलेले आहे. त्यावरूनच शहराचे लिव्हरपूल हे नाव पडले असावे, असे मानले जाते. उत्तरेस हॉर्नबायपासून दक्षिणेस हर्क्यूलेनियमपर्यंत लिव्हरपूल गोदी क्षेत्राचा किनाऱ्यारवरील विस्तार ११ किमी. पर्यंत आहे. अंतर्गत भागात शहराच्या मध्यभागी बाजारपेठ व व्यापारी क्षेत्रे आहे. येथेच टाउन हॉल (१७५४) व सेंट जॉर्जेस हॉल (१८५४) आहे. ट्यूडर काळापासूनच्या अत्युत्तम अशा इंग्लिश, इटालियन व फ्लेमिश कलाकृतींच्या संग्रहासाठी येथील वॉकर कलावीथी देशात प्रसिद्ध आहे.

व्यापारी क्षेत्राच्या बाहेरच्या बाजूस शहराचा अंतर्गत भाग व त्याच्या पलीकडे उपनगरे आहेत. अंतर्गत भागात १९०४ ते १९७८ या काळात बांधलेले निओ-गॉथिक अँग्लिकन कॅथीड्रल, रोमन कॅथलिक मेट्रपॉलिटन कॅथीड्रल (१९६७) इ. वास्तू आहेत. लिव्हरपूल विद्यापीठ (१९०३) उष्ण प्रदेशीय औषध विद्यालय, गायनसंस्था, वाद्यवृंद, अनेक रंगमंदिरे दोन व्यावसायिक सॉकर संघ, सार्वजनिक उद्याने, बागा, विलासी घरे, लिव्हरपूल परगणा संग्रहालय व ग्रंथालय, पिक्टन ग्रंथालय इ. सांस्कृतिक संस्था येथे आहेत. अलीकडच्या काळात प्रसिद्ध संगीत केंद्र म्हणून लिव्हरपूलने नावलौकीक मिळविला आहे.

 

सावंत, प्र. रा.; चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate