অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हेनिस

व्हेनिस

सांता मारिआ दे ला सॅल्यूत चर्चचा परिसर, व्हेनिस.

व्हेनिस

इटलीमधील एक इतिहासप्रसिद्ध शहर, सागरी बंदर आणि व्हेनटो-व्हेनेत्सीआ प्रांताची राजधानी. व्हेनिस हे कालवे, कला, वास्तुशिल्प व निसर्गरम्य परिसर यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. लोकसंख्या २,९१,५३१ (१९९८). एड्रिअॅटिक समुद्राच्या उत्तर टोकाशी असलेल्या व्हेनिसच्या आखातातील चंद्रकोरीसारख्या खारकच्छ भागातील द्वीपसमूहावर हे वसले आहे. किनाऱ्यापासून चार किमी.वर सागरी भागात एखाद्या जादूनगरीप्रमाणे व्हेनिसचे स्थान आहे.

इतिहासकाळात या नगरीने खारकच्छचा ५१ किमी. लांबीचा भाग व्यापला होता. विद्यमान व्हेनिस शहर मात्र खारकच्छच्या संपूर्ण १४५ किमी. लांबीच्या प्रदेशात असणाऱ्या ११८ जलोढीय बेटांवर विस्तारलेले आहे. मूख्य भूमीवरील मेस्त्रे व मारघेरा या दोन औद्योगिक विभागांचाही यात समावेश होतो.

इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरीस उत्तर युरोपकडून इटलीकडे आलेल्या रानटी टोळ्यांपासून बचाव करण्यासाठी या भागातील रहिवाशांनी सुरक्षित वाटलेल्या या बेटांकडे पळ काढला. व्हेनिसचे हेच पहिले वसाहतकार होत. इ. स. ६९७ मध्ये हे वसाहतकार संघटित झाले. व्हेनिसची तत्कालीन अर्थव्यवस्था मासेमारी व व्यापारावर आधारीत होती. नवीन बाजारपेठांच्या शोधार्थ व्हेनिशियन लोकांनी एड्रिअॅटिक समुद्राच्या किनाऱ्याने प्रवास केला.

नवव्या शतकात ‍त्यांनी व्हेनिस शहराची स्थापना केली. एड्रिअॅटिक किनाऱ्यावरील स्थानांमुळे ते एक महत्त्वाचे व्यापारी व सागरी सत्ताकेंद्र बनले. हळूहळू व्हेनिसच्या वसाहती सत्तेचा विस्तार भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील प्रदेशापर्यंत झाला. त्या वेळी व्हेनिसचा व्यापार कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल), इटलीच्या मुख्य भूमीवरील शहरे व आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील शहरे यांच्याशी चालत असे. पुढे व्हेनिसला स्वतंत्र नगरराज्याचा दर्जाही मिळाला.

चौथ्या धर्मयुद्धाच्या वेळी (इ. स. १२०२ – ०४) व्हेनिसच्या जहाजांनी धर्मयोद्ध्यांना वाहतूक–सुविधा पुरविल्या होत्या. १३८० मध्ये व्हेनिसने जेनोआचा पराभव केला. त्यामुळे भूमध्य सागरी प्रदेशाच्या पूर्व भागापर्यंतच्या व्यापारावर व्हेनिसने वर्चस्व मिळविले. यूरोपातील सर्वांत मोठ्या शहरांत त्याची गणना होऊ लागली. तसेच युरोप, आशिया यांदरम्यानचे ते एक समृद्ध व्यापारी केंद्र बनले. पंधराव्या शतकात व्हेनिस वैभवाच्या शिखरावर पोहोचले होते. त्याला ‘एड्रिअॅटिक सागराची राणी’ (क्वीन ऑफ दि एड्रिअॅटिक) असे संबोधले जाई. त्या वेळी या शहराच्या सत्तेखाली क्रीट, डाल्मेशियन किनारा (सांप्रत क्रोएशियाचा भाग) व इटलीच्या ईशान्येकहील काही भागाचा समावेश होता. ११०४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या येथील शस्त्रागाराची पंधराव्या व सोळाव्या शतकांत पुनर्बांधणी करण्यात आली. त्यात जहाजेही बांधली जात.

कॉन्स्टँटिनोपलचा ताबा तुर्कांनी घेतला (१४५३), तसेच कोलंबसने अमेरिकेचा आणि वास्को द गामाने केप ऑफ गुड होपमार्गे हिंदुस्थानकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध लावल्यामुळे यूरोपातील व्यापारक्षेत्र फ्रान्स व इटलीच्या पश्चिमेकडील इतर देशांकडे सरकले. परिणामतः व्हेनिसच्या वैभवाला उतरती कळा लागली. पुढे सायप्रस (१५७१), क्रीट (१६६९) व पेलोपनीसस (१७१५) इ. पूर्वेकडील वसाहतीही हळूहळू तुर्कांकडे गेल्या. त्यामुळे व्हेनिसचे भूमध्य सागरी प्रदेशांच्या पूर्व भागावरील प्रभुत्व कमी झाले. १७९७ मध्ये नेपोलियनच्या नेतृत्वाखालील फ्रेंच फौजांनी व्हेनिसचा ताबा घेतला. १९६६ मध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे शहराची फार मोठी हानी झाली.

र्यटन हा व्हेनिसमधील प्रमुख व्यवसाय आहे. प्रति वर्षी सु. तीस लक्ष पर्यटक येथे येतात. त्यामुळे स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. काचेच्या सुबक वस्तू व भरतकाम यांच्या निर्मितीसाठी मूरानो व बुरानो बेटे अग्रेसर आहेत. औद्येगिक व व्यापारी व्यवहार मुख्य भूमीवरील मारघेरा व मेस्त्रे येथे चालतात. अॅल्युमिनियम, रसायने, कोक, खते, रंग, खनिज तेल – उत्पादने, पोलाद व इतर उत्पादने येथे होतात. मुख्य भूमीवरील अशा औद्योगिक विकासामुळे व्हेनिसमधील हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

खारकच्छामुळे व्हेनिस बेटे मुख्य भूमीपासून अलग झाली आहेत. खारकच्छावर ४ किमी. लांबीचा लोहमार्ग-पूल व रस्ता आहे. व्हेनिसमधील वेगवेगळ्या बेटांदरम्यान सु. दीडशेहून अधिक कालवे आहेत. त्यांवर सु. चारशेपेक्षा जास्त पूल उभारण्यात आले असून सर्व बेटे एकमेकांना जोडली गेली आहेत. बेटांवरील इमारतींच्या दरम्यान असलेल्या अरुंद जलमार्गांना कॅली असे म्हणतात. शहरात रस्त्यांऐवजी कालव्यांतून वाहतूक अधिक केली जाते. प्रवासी वाहतुकीसाठी शहरात मोटारबोट – सेवा उपलब्ध आहे.

व्हेनिसच्या साधारण मध्यातून ग्रँड कालवा जातो. या कालव्याची रुंदी ३७ ते ६९ मी. व सरासरी खोली २.७ मी. असून आकार इंग्रजी ‘एस’ अक्षरासारखा आहे. हाच येथील प्रमुख वाहतूकमार्ग आहे. या कालव्यावरील रिआल्तो हा मुख्य पूल शहराच्या बरोबर मध्यावर आहे. एकोणिसाव्या शतकापर्यंत हा एकच पूल होता. रीआल्तो पूल व सेंट मार्क्स चौक यांदरम्यानचा मर्सेरिआ हा अरुंद रस्ता म्हणजे व्हेनिसमधील सर्वांत प्रमुख व्यापारी पेठ आहे. सेंट मार्क्स चौक हा वेगवेगळ्या व्यवसायांचे प्रमुख केंद्र आहे. मोटारगाड्या शहराच्या मध्यवर्ती भागात आणण्यास परवानगी नाही. मारघेरा हे व्हेनिसचे प्रमुख बंदर (स्था. १९२०), तर मार्को पोलो हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

काळाच्या ओघात व्हेनिसचे आर्थिक व राजकीय प्रभुत्व कमी झाले असले, तरी अत्यंत दुर्मीळ कलाकृतींमुळे जगातील एक प्रसिद्ध सांस्कृतिक केंद्र व कलानगर म्हणून त्याचे महत्त्व टिकून आहे. चर्च, राजप्रासाद, वस्तुसंग्रहालये अशा ऐतिहासिक व कलात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सु. ४५० वास्तू शहरात आढळतात.

सर्व वास्तूंवर अप्रतिम असे शिल्पांकन आहे. येथे इटालियन, अरबी, बायझंटिन, गॉथिक, प्रबोधनकालीन, रीतिलाघववादी (मॅनरिस्ट) व बरोक अशा विविध वास्तुशैलींतील नमुनेदार इमारती आहेत.

व्हेनिसमधील अनेक इमारती खारकच्छातील पाण्यात खोलवर रोवलेल्या खांबांवर उभारलेल्या आहेत. ग्रँड कालव्याच्या दोन्ही काठांवर संगमरवरी तसेच इतर दगडी बांधकाम असलेल्या अनेक हवेल्या व चर्चे आढळतात. येथील ‘सेंट मार्क्स चौक’ जगप्रसिद्ध आहे. या चौकाच्या पूर्वेस असलेला सेंट मार्क बॅसिलिका हा राजवाडा म्हणजे बायझंटिन वास्तुशिल्पाचा एक अद्वितीय नमुना असून चौकाच्या इतर बाजूंना प्रबोधनकालीन वास्तुशिल्पातील इमारती आहेत.

या इमारतींच्या दर्शनी भागात अनेक उपाहारगृहे आहेत. या चौकाच्या बाजूलाच इतिहासप्रसिद्ध डोजेस राजवाडा आहे. येथील ललितकला अकादमीमध्ये नामवंत कलाकारांनी साकारलेल्या अप्रतिम व प्रसिद्ध चित्रांचा संग्रह जतन केलेला असून फेनिस हे येथील सर्वांत मोठे रंगमंदिर आहे. काही संगीतिका गृहेही आहेत. शहरात विविध कलाविद्यालये व व्हेनिस विद्यापीठ आहे. बेटांच्या पूर्व भागातील ‘लिंडो’ ही यूरोपातील प्रसिद्ध पुळण असून काही उद्याने व बागाही येथे आहेत.

व्हेनिसच्या वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक स्थानाचे काही फायदे व काही तोटेही आहेत. हिवाळी वादळांमुळे येणाऱ्या परांनी येथील रस्ते व इमारतींचे नुकसान होत असते. पाण्यामुळे येथील इमारतींचा पायाही कमकुवत बनत आहे. त्याशिवाय हवेच्या प्रदूषणामुळे इमारती व त्यांच्या दर्शनी भागावरील शिल्पकलेचे फार मोठे नुकसान होत आहे.

१९७०च्या दशकाच्या मध्यापर्यंत व्हेनिसमधील बेटे वर्षाला साधारणपणे ५ मिमी.पर्यंत खाली खचत होती. कारखान्यांसाठी केला जाणारा भूमिगत पाण्याचा वापर हे काही अंशी या खचण्याचे कारण असावे, म्हणून इटालियन शासनाने शहर भागातील विहिरींद्वारा केल्या जाणाऱ्या भूमिगत पाण्याच्या वापरावर निर्बंध घातले व त्यामुळे खचण्याची क्रिया थांबल्याचे आढळले. व्हेनिसचे पुरातन कलात्मक वैभव टिकविण्यासाठी जगभरातील अनेकांनी वेगवेगळ्या मोहिमा व उपक्रम सुरू केले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेने (यूनेस्को) व्हेनिसचे वैभव जतन करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

व्हेनिसमधील बहुतांश लोक रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. मूळ व्हेनिसमध्ये नव्याने बांधकामास वाव नाही. १९५० पासून हजारो व्हेनिशियन लोकांनी मुख्य भूमीवरील मारघेरा व मेस्त्रे येथे स्थलांतर केले. या ठिकाणी असणाऱ्या रोजगाराच्या संधी, राहणीमानाचा कमी खर्च व आधुनिक इमारतींमध्ये उपलब्ध होणाऱ्या सदनिका यांमुळे हे स्थलांतर झालेले आहे.


चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 12/7/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate