অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सँतुस

सँतुस

सँतुस

दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशामधील एक प्रमुख शहर, सागरी बंदर व साऊँ पाउलू राज्याची राजधानी. लोकसंख्या ५, २९, ५४२ (२०१० अंदाज). ब्राझीलच्या आग्नेय भागात अटलांटिक किनाऱ्यालगत, साऊँ व्हिसेंते बेटावर त्येते नदीकाठी हे वसले असून साऊँ पाउलू या महानगराच्या आग्नेयीस ४८ किमी. वर आहे. साऊँ पाउलू व सँतुस यांदरम्यान मुख्यभूमीच्या किनाऱ्यावर, किनाऱ्याला समांतर अशी सेरा दू मार (उंची ९०० मी.) पर्वतश्रेणी आहे. बेटाची सस. पासूनची उंची फारशी नसल्यामुळे येथे वारंवार दलदल निर्माण होते; परंतु त्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी जागोजागी खोलवर काँक्री टचे नळ टाकले आहेत किंवा कालवे काढले आहेत. शहराचे हवामान सामान्यपणे उबदार व आर्द्र असून सरासरी तापमान २२° से. व वार्षिक सरासरी पर्जन्यमान २०० सेंमी. असते.

पोर्तुगीजांनी प्रथम १५४३ मध्ये येथे वसाहत केली आणि लिस्बनमधील हॉस्पितल दोस सँतुस यावरून या वसाहतीस सँतुस हे नाव दिले. एका खाजगी इंग्लिश जहाजाचाकप्तान टॉमस कॅव्हेंडिश याने १५९१ मध्ये सँतुस लुटले होते. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १८६० च्या दशकात किंवा सुमारास सँतुस आणिसाऊँ पाउलू यांदरम्यान लोहमार्ग वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे सँतुसच्या औद्योगिक व व्यापारी विकासास विशेषतः कॉफीच्या वाहतुकीस चांगलीच मदत झाली.

शहरात वस्त्रोद्योग, वाहतुकीची साधने, विद्युत् यंत्रसामग्री, लोह व पोलाद, खनिज तेलशुद्घीकरण, सिमेंट, सौम्यपेये, साबण, गव्हाचेपीठ, साखर, खडीसाखर, मीठ,मत्स्योत्पादने, लाकूड चिरकाम, लाकडाचे पृष्ठावरण निर्मिती इ. उद्योग चालतात. अठराव्या शतकाच्या मध्यापासूनच कॉफी निर्यात करणारे हे जगातील सर्वांत मोठे बंदरआहे. कॉफी निर्यातीमुळे संपूर्ण शहरभर सतत कॉफीचा वास दरवळत असतो. सँतुस बंदराची लांबी सहा किमी. असून येथील गोदी दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठी वआधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. एका वेळी या बंदरात पन्नास बोटी नांगरता येतात.

माल साठवणीसाठी पुरेशा वखारी बांधलेल्या आहेत. कॉफीशिवाय कापूस, साखर, केळी,एरंडेल तेल, वाळवलेले गोमांस (झाकी), सागरी मासे, संत्री, चामडी इत्यादींची निर्यात या बंदरातून केली जाते. निर्यातीत अंतर्गत प्रदेशातील कृषी उत्पादने व साऊँ पाउलूशहरातील औद्योगिक उत्पादनांचा विशेष समावेश असतो.

ब्राझीलच्या एकूण आयात-निर्यात उलाढालींपैकी चाळीस टक्क्यांहून अधिक आयात-निर्यात या बंदरातून होते.देशांतर्गत किनारी वाहतुकीच्या दृष्टीनेही हे बंदर महत्त्वाचे आहे. साऊँ पाउलू व सँतुस ही शहरे लोहमार्ग व महामार्गांनी परस्परांशी जोडली आहेत. येथे दोन विमानतळहीआहेत.

दुसऱ्या महायुद्घकाळापासून निर्माण झालेल्या अनेक नवीन कार्यालयीन व निवासी वास्तूंबरोबरच सोळाव्या आणि सतराव्या शतकांतील अनेक वसाहतकालीन वास्तू, स्मारकेव जुने अवशेष शहरात आढळतात. प्रतिकूल हवामान व सर्वत्र दलदलयुक्त भूमी यांमुळे एकेकाळी निवासाच्या दृष्टीने येथे प्रतिकूल वातावरण होते; परंतु जलनिःसारण कालवेव नळ, रस्त्यांचे फरसबंदीकरण, निवासाच्या उत्तम सुविधा, स्वच्छता, बंदराचा उत्तम विकास इ. सुधारणा; तसेच किनाऱ्यावरील आकर्षक साऊँ व्हिसेंते, ग्वारझा यांसारख्यापुळण्यांमुळे एक पर्यटनस्थळ व आरोग्यधाम म्हणून सँतुसचा लौकिक वाढला आहे. ग्वारझा हे किनाऱ्यावरील हवेशीर उपनगर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. शहरातीलबहुसंख्य लोक वाहतूक, साठवण व बंदराशी निगडित व्यवसायांत गुंतले आहेत. साऊँ पाउलू शहरात काम करणारे अनेक लोक सँतुसमध्ये राहतात.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate