অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जावा

जावा

जावा

इंडोनेशियातील सर्वांत महत्त्वाचे बेट. क्षेत्रफळ १,३४,७०३ चौ. किमी.; लोकसंख्या ७,६१,०३,००० (१९७१). ह्या बेटाच्या मध्यभागी एक पूर्वपश्चिम डोंगरांची रांग पसरलेली असून त्यात कित्येक ज्वालामुखीही आहेत. त्यांपैकी समेरू सर्वांत उंच ३,६७६ मी. आहे. पूर्वेकडील राऊंग ३,३२२ मी. उंच आहे. जावाच्या उत्तरवाहिनी नद्यांमध्ये सोलो, लीवुंग व ब्रांटास या मुख्य आहेत. उत्तर किनारी मैदानी प्रदेश गाळाचा आणि दक्षिणेचा वाळूच्या टेकड्यांचा असून दोहोंवरही दलदली आहेत.

जावाचे हवामान विविध प्रकारचे आहे. समुद्रसपाटीवरील जाकार्ता राजधानीचे वार्षिक सरासरी तपमान २७·४ से. आणि टोसारी ह्या १,७३५ मी. उंचीवर असलेल्या ठिकाणी ते फक्त १५·४से. आहे. ६०० मी. उंचीपलीकडे प्रत्यक्ष किमान तापमान ०

से.च्या खालीही आढळते. पश्चिम भागात सरासरी १८३ सेंमी. पाऊस पडतो; तर पूर्व भागात तो १२२ सेंमी. आहे. डोंगराळ भागात तो २५४ सेंमी असतो. डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांत सर्वाधिक पाऊस पडतो. सखल भागात हवेची आर्द्रता ७५% ते ९०% असते. तिसऱ्या प्रहारी गडगडाटी वादळे पुष्कळदा होतात.

डोंगराळ भागांत अजूनही काही ठिकाणी दाट वर्षावने व बांबूची विपुल वने आहेत. काही भागात सागाची लागवड होते. बोगोर येथे जगप्रसिद्ध वनस्पति-उद्यान आहे. केळी, आंबे, फणस व दुरियन ही प्रमुख फळे आहेत. ज्वालामुखींच्या सान्निध्याने येथील जमीन खूपच सुपीक झाली आहे. पाटबंधाऱ्यांची सोय जसजशी वाढत गेली; तसतसे शेती उत्पादनही वाढू लागले.

तांदूळ, मका, तवकील, सोयाबीन, वाटाणे, भुईमूग, तीळ, बटाटे ही प्रमुख पिके आहेत. रबर, चहा, कॉफी, तंबाखू, सिंकोना ह्या नगदी पिकांचेही उत्पादन महत्त्वाचे आहे. नामशेष होऊ लागलेला एकशिंगी गेंडा, वाघ, गवा, चित्ता, रानडुक्कर, हरिण, माकडे, साळिंदर वगैरे प्राणी; अनेक प्रकारचे पक्षी, सर्प, सुसरी, मासे व जलचर जावात आढळतात.

खनिज तेल व कोळसा यांप्रमाणे मॅँगॅनीज, गंधक, मीठ इ. खनिजे अल्प प्रमाणात सापडतात.

स्वातंत्र्योत्तर काळात जावात उद्योगधंदे वाढत आहेत. चहा, रबर, कोयनेल यांवरील प्रक्रियेचे कारखाने पूर्वी होतेच. त्यांत कापड, शेती अवजारे, पादत्राणे, कातडी कमावणे, मोटारींचे भाग जुळविणे, मद्ये, कागद, साबण, सिमेंट इ. कारखान्यांची भर पडली आहे. जावात २७,५५० किमी. सडका; सु. ८,५०० किमी. लोहमार्ग आणि अंतर्गत व परदेशी हवाई मार्ग आहेत.

चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंतच्या हिंदू आणि बौद्ध प्रभावाच्या काळात सुमात्रा येथील श्रीविजय साम्राज्यात जावा होते. सोळाव्या व सतराव्या शतकांत इस्लामचा प्रसार व यूरोपीयांचे आगमन झाले. जावानीज लोक इस्लाम धर्माचे असले तरी, त्यांच्यात पुष्कळ हिंदू चालीरीती आढळतात. डचांच्या वसाहतीच्या काळात जावाचा विकास होऊन ते कारभाराचे केंद्र झाले. इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यलढ्यातील मार्गदर्शन व बहुतेक सर्व हालचाली जावातच झाल्या आणि स्वातंत्र्योत्तर राजकीय व इतर घडामोडींचे केंद्रही जावाच आहे.

लिमये, दि. ह.

जावानीज भाषा मलायो–पॉलिनीशियन कुटुंबातील सून ती मध्य व पूर्व जावात आणि जावाबाहेर सुमात्रातील पालेंबांग या प्राचीन राज्यातही बोलली जाते. तिच्या समुद्रकिनाऱ्याजवळील बोलींवर आक्रमकांच्या भाषांचा बराच परिणाम झालेला आहे; पण मध्यभागातील बोली मात्र बऱ्याच शुद्ध असून त्यांच्यावर संस्कृतचा प्रभाव दिसून येतो.

देशातील या भाषिकांची संख्या चार कोटींहून अधिक असावी. सामाजिक स्तरांनुसार भाषेचा शब्दसंग्रह व व्याकरण यांत बरेच मोठे अंतर आढळते. जावानीजच्या दोन लेखनपद्धती आहेत : एक शिलालेखातील अक्षरांच्या वळणाची आणि दुसरी गोलाकार अक्षरांची. जावाची प्राचीन भाषा व मध्यकालीन जावानीज याच पद्धतींचा उपयोग करतात. ही अक्षरे दक्षिण भारतीय लिपीवरून बनविलेली आहेत. त्यांत चार स्वरचिन्हे असून बावीस व्यंजनचिन्हे आहेत.

जावानीजचे प्राचीन साहित्य प्रथम स्थानिक लिपीत होते. या साहित्याची बरीचशी प्रेरणा परकीय होती. तेराव्या शतकात अस्त पावलेल्या ‘कवि’ या भाषेचे व्याकरण इंडोनेशियन असले, तरी तिचा शब्दसंग्रह जवळजवळ पूर्णपणे संस्कृत होता. तेराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत प्रचारात असलेली मध्यकालीन जावानीज आणि नंतरची जावानीज यांच्यावर भारतीय साहित्याचा खोल ठसा उमटला आहे. त्यात रामायण व महाभारत यांतील कथांचा वाटा मोठा आहे.

अशा प्रकारे स्वीकृत केलेल्या भारतीय साहित्याची जावानीजमधील अभिव्यक्ती काव्यबद्ध आहे; गद्य स्वरूपाची नाही. याउलट ‘पांनजी’ हा साहित्यप्रकार वीररसात्मक असून त्याची प्रेरणा स्थानिक आहे. जावा हे या भागाचे बौद्धिक केंद्र असल्यामुळे मलायातील लोकांच्या भाषेतही रामकथेचा प्रवेश झाला. मुसलमानांच्या संपर्कामुळे अलेक्झांडरचे चरित्र व शौर्यकथा त्यांच्या ऐतिहासिक लेखनात आल्या. जावानीज साहित्य प्रामुख्याने वृत्तबद्ध आहे. त्यांच्या ‘पांतुन’ या कामशास्त्रीय साहित्यप्रकारात शृंगारात्मक लेखन व प्रेमकाव्यही बरीच आहेत.

 

कालेलकर, ना. गो.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate