অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोलकाझ बेटे

मोलकाझ बेटे

मोलकाझ बेटे

मोलूकू. इंडोनेशियातील एक द्वीपसमूह व प्रांत. क्षेत्रफळ ८३,६७५ चौ. किमी. लोकसंख्या १४,११,००६ (१९८०). देशाच्या पूर्व भागात सेलेबीझ व न्यू गीनी यांदरम्यान २° ३८ उ. ते ८° १२ द. अक्षांश व  १२४° २० ते १३४° ५० पू. रेखांशांदरम्यान हा द्वीपसमूह विस्तारला आहे. याचे उत्तर मोलकाझ व दक्षिण मोलकाझ असे दोन भाग पडतात.

उत्तर मोलकाझ बेटे उत्तर-दक्षिण पसरलेली असून त्यांत मोरोताई, हॅल्महिरा (द्वीपसमूहातील सर्वांत मोठे बेट), तेर्नाते, तिडॉर, माकियान, बाचान, ओबी, सूला इ. बेटांचा समावेश होतो; तर पूर्व-पश्चिम अर्धवर्तुळाकार पसरलेल्या द. मोलकाझ बेटात बुरू, सेराम, अँबोइना, बांदा, काई, आरू, तानिंमबार, बाबार, कीसार, वेतार इ. बेटांचा समावेश होतो. अँबोइना (लोकसंख्या २,०८,८९८१९८०) हे या प्रांताचे राजधानीचे ठिकाण आहे.

राफूरा, बांदा, सेराम, मोलका या समुद्रांत विस्तारलेल्या द्वीपसमूहांपैकी बहुतेक मोठी बेटे ज्वालामुखीजन्य व डोंगराळ असून बाकीची प्रवाळांची बनलेली, कमी उंचीची आहेत. तेर्नाते बेटावर अद्यापही जागृत ज्वालामुखी आहेत. या बेटांवर वारंवार भूकंप होतात. सस.पासून कमी उंचीच्या आरूसारख्या बेटांवर दलदली बऱ्याच आहेत, तर बाबार, वेतार बेटे डोंगराळ व तीव्र उतारांचे किनारे असलेली आहेत.

येथील हवामान उष्ण व दमट असून, पाऊस मॉन्सून वाऱ्यांपासून पडतो. ही बेटे विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत. येथील डच व स्पॅनिश वसाहतकारांच्या वर्णनांत त्याचे उल्लेख दिसून येतात. येथे वनस्पतींबरोबर विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे, पक्षी पहावयास मिळतात. किरमिजी रंगाचे व लांब पंखांचे पक्षी तसेच पाणकावळे भरपूर दिसून येतात. ऑपॉस्सम, रानडुकरे, बाबिरूसा इ. प्राणीही बरेच आहेत.

पूर्वीपासून ‘मसाल्याची बेटे’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या बेटांवर बाराव्या शतकात तेर्नाते हे पहिले मोल्युकन राज्य स्थापन झाले. पंधराव्या शतकात या प्रदेशात इस्लामचा प्रसार झाला. याच काळात आलेल्या चिनी व अरब प्रवाशांमुळे येथील मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारास चालना मिळाली.

१५११–१२ या काळात मॅगेलनच्या सफरीमुळे पाश्चात्त्यांना ही बेटे ज्ञात झाली. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांचे येथे आगमन झाले. या काळात तेर्नाते व तिडॉर येथील सुलतानांत सत्तास्पर्धा सुरू झाली होती. स्पॅनिशांच्या आगमनामुळे पोर्तुगीज व स्पॅनिश यांच्यात स्पर्धा निर्माण झाली. परंतु १५८० मध्ये स्पेनने पोर्तुगाल घेतल्याने ही स्पर्धा संपली. सोळाव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीजांचा येथील प्रभाव संपुष्टात आला. १५९९ मध्ये डचांनी या भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या.

१६२३ मध्ये त्यांनी अँबोइना बेटावरील ब्रिटिश व्यापाऱ्यांची अमानुष कत्तल केली. १६६७ मध्ये तिडॉर येथील सुलतानाने डचांची सत्ता मान्य केल्याने, हळूहळू डचांनी सर्वच बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले व अँबोइना बेट पूर्वेकडील बेटांचे एक प्रमुख व्यापारी केंद्र बनले. सतराव्या शतकात मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारास उतरती कळा लागल्याने या प्रदेशाचे आर्थिक महत्त्व बरेच कमी झाले.

पुढे १७९६ ते १८०२ व १८१० ते १८२७ च्या काळात या बेटांवर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. दुसऱ्या महायुद्धकाळात १९४२ मध्ये जपानने ही बेटे जिंकली होती.

महायुद्धानंतर मोलकाझ बेटांचा समावेश इंडोनेशियाचे तात्पुरते स्वायत्त राज्य म्हणून करण्यात आला. १९४९ नंतर एक प्रांत म्हणून मोलकाझ बेटांचा इंडोनेशियात समावेश झाला.

निर्यातीच्या दृष्टीने साबुदाणा तसेच लवंगा, जायफळ व इतर मसाल्याचे पदार्थ ही येथील मूळची प्रमुख शेती उत्पन्ने होत. यांशिवाय नारळ, सुके खोबरे व जंगलउत्पादनेही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. साबुदाणा हे येथील प्रमुख अन्न आहे. बेटांवर तेर्नाते, अँबोइना, वेदा, जाइलोलो, साउम्लाकी इ. शहरे महत्त्वाची आहेत.

 

पहा : इंडोनेशिया.

चौंडे. मा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate