অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाशिकची उत्सव संस्कृती (पूर्वार्ध)

नाशिकची उत्सव संस्कृती (पूर्वार्ध)

नाशिकची उत्सव संस्कृती हा विषय महत्वाचा आहे. नाशिकची खास अशी उत्सव संस्कृती आहे. पण नाशिक म्हणजे केवळ नाशिक शहर नव्हे तर नाशिक व परिसर आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील उत्सव संस्कृती हे स्पष्ट केल्याने विषयाची व्याप्ती वाढते. अशा वाढलेल्या व्याप्तीमुळे ग्रामीण भागातील अद्याप उजेडात न आलेल्या प्रथा परंपरांची थोडक्यात नोंद घेता येईल व या परंपरा काय आहेत हे महाराष्ट्रभर कळू शकेल. विषय नाशिक जिल्ह्यापुरता असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. मात्र शब्दसंखेच्या अटीमुळे विषय आटोपता घ्यावा लागेल म्हणून त्याला आढाव्याचे स्वरूप प्राप्त होऊ शकते. खरं तर विशिष्ट परंपरा या केवळ आमच्या गावाच्या आहेत वा जिल्ह्याच्या आहेत, असा दावा करणे थोडे धाडसाचे ठरू शकते. कारण परंपरा या लोकप्रिय असतात, प्रवाही असतात आणि म्हणून त्या प्रचंड वेगाने सर्वदूर पसरत जातात.

उत्सव

 

उत्सव या संज्ञेत सण, यात्रा, लोकपरंपरा, लोकोत्सव, विधी, विधीनाट्य, रीती, रूढी, देव-देवता, खेळ, लोकजीवन आदींचा समावेश होतो. महाराष्ट्राचा माणूस उत्सवप्रिय आहे. महाराष्ट्रात सर्वत्र विविध उत्सव साजरे केले जातात. पण आपल्याला अभिप्रेत आहे नाशिक उत्सव. म्हणून नाशिक जिल्ह्यापुरत्याच ओळखल्या जाणाऱ्या काही सांस्कृतिक उत्सवांचा गोषवारा देणे इथे अपेक्षित आहे.

नाशिक जिल्ह्यातील ठळकपणे उल्लेख करता येतील अशा काही उत्सवांची वर्गवारी करता येईल. नाशिक शहरातून गोदावरी नदी वाहते. नाशिक पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतातून गोदावरी उगम पावते. प्रत्येक बारा वर्षांतून नाशिक आणि ‍त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभ मेळा, सिंहस्थ पर्वण्या हा प्रचंड मोठा उत्सव असून तो महाराष्ट्रात फक्‍त नाशिकलाच होतो. या कुंभमेळ्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन हा धार्मिक वा अध्यात्मिक नसून ही ऋषिमुनींची एक लोकपरंपराच आहे असे वाटते. या मेळाव्याकडे एक लोकोत्सव, लोकप्रथा, लोकसांस्कृतिक लोकपरंपरा म्हणूनच पहावे लागेल.

कुंभमेळा आणि सिंहस्थ पर्वण्या

फक्‍त नाशिकच्या म्हणता येतील अशा ज्या काही प्रथा सांगता येण्यासारख्या आहेत त्यात कुंभमेळा आणि सिंहस्थ पर्वण्यांचा समावेश होऊ शकतो. गोदावरी ही दक्षिणेतील गंगा समजली जाते. म्हणून कुंभमेळ्याच्या सिंहस्थ पर्वणीला स्नानासाठी देशभरातून येणाऱ्या साधूंचे आखाडे, या आखाड्यांना असलेली विविध नावे, आखाड्यांतील विविध धार्मिक पदव्या मिळवलेले मुखिया, त्यांच्याजवळ असलेली विविध हत्यारे, वाद्य, विविध वेषभूषेतील साधू, साधूंचा ठेवणीतला विक्षिप्तपणा, शैव- वैष्णव वाद, स्नानासाठी देशभरातून येणारे भाविक, श्रावण महिन्यातही दूरवरून स्नानासाठी गोदावरीवर होणारी गर्दी. कुंभ उत्सवात नाशिक जिल्ह्यातील रहिवासीही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतो.

कालिकादेवी यात्रा, चैत्र पौर्णिमेला (एप्रिल) सप्तश्रृंग गडावरील लोकजत्रा, नाशिक पंचवटीला रामायणातील उपयोजनाची असलेली पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीमुळे धार्मिक भावनेतून यात्रोत्सव होत असतो. (खरं तर व्यापक अर्थाने या जागा लोकश्रद्धेच्या या अर्थाने लोकपरंपराच आहेत.) बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथे कोजागिरी पौर्णिमेला होणारी रासक्रिडा, मांगीतुंगी येथे जैन मुनींसह स्थानिक लोकांची भरणारी यात्रा आदी उत्सव फक्‍त नाशिक जिल्ह्यात पहायला मिळतात. अशा उत्सवांतून दिसणाऱ्या प्रथा- परंपरा- लोकोत्सव अन्यत्र महाराष्ट्रात कुठेही पहायला मिळत नाहीत.

लेखन- डॉ. सुधीर रा. देवरे

मोबाईल : 7588618857

Email:drsudhirdeore29@gmail.com

ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate