অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाषिक संपन्नता

भाषिक संपन्नता

भाषिक संपन्नता

आज अमेरिकेत कोणतीही एक भारतीय भाषा शिकणे तेथील विद्यार्थ्यांना सक्तीचे करण्यात आले आहे. उद्याच्या भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेचे द्वार या भाषेच्या माध्यमातून अमेरिकन सरकार तरुणांसाठी खुले करीत आहे. जपानने इंग्रजीला विरोध केला होता. तेही आता जागतिक टिकाव धरण्यासाठी इंग्रजी स्वीकारत आहेत. पण म्हणून जपानीचे महत्त्व त्यांना कमी होऊ दिले नाही. जागतिक स्तरावर भारतीय भाषांचा गौरव होत असताना आपण जग मुठीत घेण्यासाठी आपल्या भाषांकडे नीटपणे पहायला हवे. इंग्रजी, हिन्दी आत्मसात करताना मराठीचा अव्हेर करण्याची गरज नाही. त्यासाठी खूप छोटे छोटे प्रयोग आपणाला करता येतील. 

म्हणजे हे जे मी म्हणतोय ते घरातल्या घरात आणि घरबसल्या करण्याचे प्रयोग आहेत. उदाहरणार्थ मुलांशी गप्पा मारता मारता एखाद्या वस्तूला मराठी, हिन्दी, इंग्रजी आणि बोलीत कोणते पर्याय आहेत ते गंमत म्हणूनही मुलाला सांगायला हरकत नाही. म्हणजे समजा पातेले, भगुले, Pot , पतेला असे शब्द समजावून सांगता येतील. त्यातही पुन्हा Pot चे भाषांतर भांडे असे आहे आणि ते भगुले नाही. यातून मुलांची भाषिक समज तर वाढेलच पण भाषा समृद्धीही होऊ शकेल. पण हा प्रयोग आता (बोलींच्या संदर्भात) छोट्या-मोठ्या गावांत आणि खेड्यातच शक्य आहे. पण हे करायला हरकत नसावी. बघा ना! आपल्याकडे पूर्वी शिजवलेल्या भाजीला आमटी, कोरड्यास, कालवण असे शब्द होते. आता 'भाजी' हा एकच शब्द राहिला आहे, हे बरे नाही. म्हणजे भाषा समृद्धीला ते मारक आहे. किंवा तेलची, पोळी, चपाती, रोट, भाकरी अशा शब्दांना आपण आता पोळी आणि भाकरी हेच पर्याय वापरू लागलो. म्हणजे आपण भाषेला कोते करीत चाललो आहोत. याची खूप उदाहरणे देता येतील. आणि प्रदेशानुसार त्यांची विविधता लक्षात येईल. त्यांना आपण संपवून आपली बहुसांस्कृतिक ओळख पुसून टाकायला निघालो आहोत. 

हे सगळं सांगण्याचं कारण असं की, एखाद्या परंपरेतल्या गोष्टीला मध्यमवर्गीयांनी किंवा माध्यमांनी पाठिंबा दिला की त्याचे महत्त्व लक्षात येते. पूर्वी लावणी फक्त तमाशात गायली जायची आणि ती अश्लीलही समजली जायची. परंतु मागच्या दहाएक वर्षात लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आमूलाग्र बदलला आहे. खास स्त्रियांसाठी लावणीचे कार्यक्रम सुरेखा पुणेकर यांनी घेतले आहेत. याचाच अर्थ असा की काही गोष्टी ठरवून केल्या तर त्यामध्ये बदल निश्चित होतो. आणि त्या बदलात गणेश देवी, जयदीप साहनी यांच्यासारखा आपलाही हात लागला तर कसलीच हरकत राहणार नाही. 

या संदर्भात आणखी काही उदाहरणे पाहता येतील. मराठी सिनेमामध्ये मकरंद अनासपुरे या अभिनेत्याने आपली जी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे ती त्याच्या मराठवाडी बोलींची ओळख आहे. मला वाटते आपल्या मातृबोलीच्या अंगाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी ही घटना बोलीचे महत्त्व अधोरेखित करते. असेच उदाहरण कोकणी बोलीतून व्यक्त झालेल्या मच्छिंद्र कांबळीचे देता येईल. त्यानेही कोकणी बोलीतून स्वत:ची ओळख निर्माण केली. 

साहित्याच्या प्रांतामध्ये उद्धव शेळके, आनंद यादव, भास्कर चंदनशीव अशी कितीतरी नावे सांगता येतील. डॉ.एस.एस.भोसले यांनी तर समीक्षा लेखनात शेती-भातीतले शब्द वापरून समीक्षेच्या भाषेलाही समृद्ध केले आहे. एखाद्या महानगरीय कथा-कवितेतील इंग्रजी शब्दांना आपण नाकडोळे मोडत नाही. पण दया पवारांच्या 'बलुतं' मध्ये आलेल्या कैकाडी शब्दांना आपण नाकारतो. म्हणून त्यांना पुस्तकाच्या शेवटी शब्दार्थांची टीप द्यावी लागली. विठ्ठल वाघ यांच्या 'काया मातीत मातीत' या कवितासंग्रहाच्या शेवटीही अशी टीप आहे. अशा टिपा असायला हरकत नाही. त्या निमित्ताने बोलीतले शब्द वापरात तरी येतील; आणि मराठी अधिक समृद्ध होईल. 

राजकीय भाषेतही अशा प्रकारची समृद्धी आपणास अनुभवता येते. विशेषत: क्रांतिसिंह नाना पाटलांची भाषणे जर आपण वाचली -ऐकली तर भाषेच्या समृद्धीचा प्रत्यय आपणाला येईल. अनेक राजकीय नेते मिश्कीलपणासाठी प्रादेशिक शब्दांचा वापर करीत असतात. त्याचाही विचार व्हायला हरकत नाही. 

म्हणजेच घरात-दारात, अनौपचारिक बोलण्यात आपली बोली, मराठी वापरायला काहीच हरकत नाही. आपल्याजवळ असलेला हा सोन्याचा हंडा आपण खरं तर पुढच्या पिढीला फुकटात देत असतो. तो स्वीकारण्याचं आणि भाषिकदृष्ट्या समृद्ध होण्याचं आपण का नाकारतो आहोत कळत नाही. फुकट मिळणारी, त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या क्लासेसची गरज नसलेली ही भाषिक संपत्ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित व्हायला हवी. या संक्रमणाचा झाला तर फायदाच आहे. तोटा मात्र नाही. या फायद्यासकट आपण बहुभाषिक व्हायला हरकत नाही. बोली, मराठी, हिन्दी, इंग्रजी असे आपण चतुरस्त्र झालो तर संपन्नता आल्याशिवाय राहणार नाही. असा संपन्न अनुभव देणारी वि.ज.बोरकर यांची 'मेड इन इंडिया' ही कादंबरी प्रत्येकाने वाचायला हवी. 

लेखक -

प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदम
विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी, जि.सोलापूर

 

 

स्त्रोत : महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=aRWRFdMHdP8=

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate