অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठीचे लेखन भाग-1

मराठीचे लेखन भाग-1



संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत अनेक भाषांचे प्रभाव पचवून आपले 'मराठीपण' जपून ठेवणारी मराठी आजही जगातील आठव्या क्रमांकाची भाषा आहे. अशा या समृद्ध परंपरा व स्वतंत्र चेहरा असलेल्या प्रमाण मराठीची जी लेखनविषयक नियमावली तयार करण्यात आली तीच मुळी संस्कृतच्या प्रभावातून. त्यामुळे प्रस्तुत नियमावलीमध्ये जितके नियम आहेत तितकेच लेखन सुलभ होण्याऐवजी गुंतागुंतीचे बनले आहे. पंचेचाळीस वर्षांनंतर या नियमावलीचा पुनर्विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रमाणभाषेच्या लेखनाच्या नियमावलीत सुसूत्रता, सर्वसमावेशकता आणि सुलभता असणे शास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टीने सोयीचे असते. 1962 साली केलेल्या नियमावलीमध्ये अशी सुसूत्रता दिसून येत नाही. त्याबाबतची काही निरीक्षणे नोंदवून माझी भूमिका मी येथे मांडणार आहे.

नियमांचा पुनर्विचार करणे म्हणजे सरसकट सोपेपणा आणणे नव्हे. त्यासाठी नियमच बदलायला नकोत हा आग्रह धरणे चुकीचे आहे. किमान याबाबत स्वागतशील वृत्तीची गरज आहे. भाषा ही नित्य परिवर्तनशील असूनही संस्कृतचा प्रभाव आपण कितीकाळ सहन करीत राहणार आहोत ? आपण भूमिका बदलली तर निश्चितच नियमावलीमध्ये सुसूत्रता आणता येईल. कारण 'राज्यव्यवहारासारखे' उपक्रम करून श्री शिवछत्रपतींनी फार्सीचे आक्रमण मोडून काढले. शिवरायांच्या जन्मापूर्वी राजकीय पत्रव्यवहारात दर शंभर शब्दांमध्ये शहाऐंशी फार्सी शब्द असत तर अवघे चौदा शब्द मराठी असत. हे प्रमाण इ.स. 1628 चे आहे. शिवराज्याभिषेकानंतर म्हणजे इ.स. 1677 मध्ये हे प्रमाण दर शंभर शब्दांमध्ये अडतीस फार्सी आणि बासष्ट मराठी शब्द असे झाले. 1728 मध्ये शंभर शब्दांत सात फार्सी आणि त्र्याण्णव मराठी शब्द असे प्रमाण दिसते. यावरून शिवरायांचे यश लक्षात येते. पन्नास वर्षांत एवढे यश शिवराय मिळवीत असतील तर आपण पंचेचाळीस वर्षांत नियमांचा पुनर्विचार करण्यात काहीच गैर नाही. 

मराठी संस्कृतोद्भव भाषा आहे ही विचारसरणीच चुकीची आहे. मराठीवर इतर भाषांप्रमाणे संस्कृतचा परिणाम झाला आहे. हे गृहीतक मान्य केले की, मग आग्रही भूमिका आपोआप मागे पडते. तसेच 'शुद्धलेखन' यातील 'शुद्ध' हा शब्द चुकीचा आहे. त्याला श्रेष्ठत्वाचा दर्प आहे. कोणतीही भाषा शुद्ध/अशुद्ध नसते. तेव्हा 'प्रमाण मराठींचे लेखनविषयक नियम' असे म्हणणे अधिक रास्त आहे. मराठीच्या संदर्भात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे; तो म्हणजे तिने केवळ इतर भाषांचे प्रभाव पचवले असे नाही तर त्यांचे मराठीकरणही केले आहे. मराठी भाषेची व मराठी माणसाची ही लवचिकता व अंगभूत सर्वसमावेशकता लक्षात घेतल्यास व इतिहासाची पुनरावृत्ती केल्यास; नवीन नियमही अंगवळणी पडतील व त्यांची अंमलबजावणी होईल. त्यासाठी मूठभर लोकांची दूराग्रही भूमिका बाजूला ठेवण्याची गरज आहे. 

सर्वप्रथम मराठीची स्वनिमव्यवस्था दुरूस्त करणे गरजेचे आहे. स्वर जेव्हा व्यंजनांना जोडून येतात तेव्हा त्यांचे वेलांटी, उकार आणि मात्रेमध्ये रूपांतर होते. स्वतंत्रपणे ते मूळ व्यवस्थेप्रमाणे लिहिले जातात. त्यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे. इ, उ, ए हे स्वर कमी केल्यास काही समस्या सुटतील. इश्वर की ईश्वर, उस की ऊस, ई-मेल की इ-मेल, इमारत की ईमारत, गायी की गाई, गाऊ की गावू, जावूया की जाऊया असे जे संभ्रम निर्माण होतात ते दूर होतील. त्यांचे लेखन अश्विर/अीश्वर, वूस, अी-मेल, अीमारत, गावू, वुजाळा असे करता येईल. असे प्रयत्न पूर्वी झाले आहेत. तेव्हा 'अ' हा स्तर निश्चित करून अ, आ, िअ, अी, अु, अू, अे, अै, ओ, औ, ॲ, ऑ या पद्धतीने लेखन करता येईल. आजही प्राथमिक स्तरावर ॲ, ऑ या ध्वनींचा समावेश झालेला नाही; तो करून स्वनिमव्यवस्था अधिक निर्दोष करणे गरजेचे आहे. 

व्यंजनांच्या बाबतीतही नव्याने विचार करणे आवश्यक आहे. लृ हा ध्वनी फक्त क्लृप्ती या शब्दातच उपयोजिला जातो. तेव्हा त्याचे लेखन 'क्लुप्ती' असे केल्यास ते सोयीचे होईल. दंग, मंच, गंगा, रंग, संच, झांज या सारखे शब्द जर आपण अनुस्वार देऊन लिहीत असू; तर मग ङ् आणि ञ या नासिक्य व्यजनांचा लिपीमध्ये समावेश कशासाठी ? ते काढून टाकले तरी चालतील. मग वाङ्मय , वाङ् निश्चय यांसारखे शब्द वांमय, वांनिश्चय असे लिहिले तरी चालू शकतील. श, ष या ध्वनींच्या उच्चारांतील सीमारेषा अत्यंत धूसर झाल्या आहेत. तेव्हा त्यांपैकी केवळ 'श' ठेवला तरी चालेल. रूढ शब्द कस्ट, महारास्ट्र, आस्टी, स्पस्ट असे लिहिले तरी चालतील. नाही तरी 'ष' ऐवजी सर्रास लोक श, स च वापरताना दिसतात. रु, रू हा ऱ्हस्व - दीर्घाचा फरक काढून टाकला तरी चालेल. न-ण च्या बाबतही नवीन धोरण स्वीकारावे लागेल. पुणे, उणे, रण, व्रण या शब्दांमधील 'ण' सरळ-सरळ 'न' सारखा उच्चारला जातो. तेव्हा त्याबाबतही नव्याने विचार करायला हरकत नाही. 

लेखक - प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदम
विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभूर्णी
ता.माढा, जि.सोलापूर

 

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate