অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

न्यूझीलंड

न्यूझीलंड

ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत ऑस्ट्रेलिया खंडातील एक स्वतंत्र देश. दक्षिण गोलार्धात, दक्षिण पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलियाच्या आग्नेयीस सु. १,९२० किमी.वर ३४° द. ते ४७° द. अक्षांश व १६६° पू. ते १७९° पू. रेखांश यांदरम्यान पसरला आहे. क्षेत्रफळ २,६८,७७६ चौ. किमी.; लोकसंख्या ३१,२९,३८३ (१९७६ अंदाज). याची दक्षिणोत्तर लांबी १,६२० किमी. असून पूर्व-पश्चिम रुंदी ४५४ किमी. आहे. चोहोबाजूंच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी ६,९४६ किमी. आहे. न्यूझीलंड हा अनेक बेटांचा एक समूह असून त्यांपैकी नॉर्थ (उत्तर) बेटे, साउथ (दक्षिण) बेटे व स्ट्यूअर्ट हे तीन बेटसमूह प्रमुख आहेत. यांशिवाय चॅतम, कँबेल, कर्‌मॅडेक, थ्री किंग्ज, स्नेअर्झ, अँटिपडीझ, सोलँडर, बाउन्टी, ऑक्लंड ही इतर बेटे यात समाविष्ट होतात. मात्र यांपैकी काही बेटे वरील तीन प्रमुख बेटसमूहांपासून शेकडो किमी. दूरवर आहेत व सहा बेटांवर फक्त वनस्पतीच उगवते, अद्याप म्हणावी तशी वस्ती झालेली नाही. या बेटांच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागराचा टास्मन या नावाने परिचित असलेला समुद्र असून उत्तर, पूर्व आणि दक्षिण या दिशांस पॅसिफिक महासागर आहे. वेलिंग्टन हे राजधानीचे शहर आहे.

भूवर्णन

या देशाची भूशास्त्रीय दृष्ट्या जडणघडण कशी झाली, याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि पुराजीव महाकल्पात (सु. ५७ कोटी वर्षांपूर्वी) येथे जमीन असावी, असा भूशास्त्रज्ञांचा कयास असून त्यांपैकी काही जमीन तृतीयक कालखंडात समुद्रसपाटीपासून उंचावर असावी. यानंतर मात्र जमिनीच्या जडणघडणीत झपाट्याने उलथापालथ झाली आणि पुरानूतन युगात ज्वालामुखीच्या क्रियेस सुरुवात झाली व ती क्रिया पुढे कित्येक वर्षे चालू आहे. अद्याप ही क्रिया उत्तर बेटात चालू असल्याचे दिसते. या बेटावर ज्वालामुखीचे एक पठार असून तेथील सर्व प्रमुख पर्वतांचा उगम ज्वालामुखीद्वारे झालेला आहे. शिवाय न्यूझीलंडची एकूण भूमी पॅसिफिकसभोवतालच्या बदलत्या पट्ट्यात येत असल्यामुळे तेथे वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. वर्षाकाठी सरासरी किमान शंभर धक्के तरी अनुभवावयास मिळतात आणि येथील भूकंपांची तीव्रता जपान अथवा चिली या देशांतील भूकंपांहून अधिक असते.

नॉर्थ (उत्तर) बेट

न्यूझीलंडच्या या बेटात देशातील निम्म्याहून अधिक लोक राहतात. त्याचे क्षेत्रफळ १,१४,६८८ चौ. किमी. असून या बेटाचा ६३% भाग लहानमोठ्या डोंगरांनी आणि पर्वतश्रेणींनी व्यापलेला आहे. या बेटाचे मुख्य नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे ईशान्येस कुक सामुद्रधुनीपासून ईस्ट केपपर्यंत असणाऱ्या अखंड पर्वतश्रेणी हे होय. बेटाच्या दक्षिणेकडील भागात सुपीक मैदाने आहेत. याच्या मध्यवर्ती व ताउपो सरोवराच्या सभोवती ज्वालामुखीपासून तयार झालेले मोठे पठार आहे. या पठारावर ज्वालामुखी शंकू असून रूअपेहू (उंची २,७९६·५ मी.) ज्वालामुखी कधीकधी जागृत असतो, तर नाउरहॉई (२,२९०·६ मी.) ज्वालामुखीमधून नेहमी धूर व वाफ निघते. ताँगरीरू (१,९६८ मी.) या ज्वालामुखीचा अद्याप अधूनमधून उद्रेक होतो. फक्त एग्‌माँट शिखरावरील ज्वालामुखी शांत झाला असून प्रेक्षणीय आहे.

हॉट लेक जिल्ह्यातील टॅरावीरा ज्वालामुखी शिखरातून १८८६ मध्ये ज्वालामुखीचा एकदम उद्रेक झाला. त्यामुळे प्रसिद्ध अशा तपकिरी-माळवद जमिनीची धूप झाली. या प्रदेशात अनेक थोटीमोठी सरोवरे, धबधबे, थंड, समशीतोष्ण व उकळणाऱ्या पाण्याची डबकी, गरम पाण्याचे झरे (गायझर) व चिखलाचे ज्वालामुखी पर्वत आहेत. पश्चिमेला मानावाटूचे मैदान असून वाइकॅटो या सर्वांत मोठ्या नदीने तयार केलेले सखल खोरे व टेम्सच्या मुखाजवळ हाउराकीचे मैदान हे मुख्यतः सुपीक भाग आहेत. टास्मन समुद्राचा पश्चिमेकडील किनारा पांढऱ्या वाळूचा आहे, तर कोरोमंडल द्वीपकल्पाचा किनारा उंच उभ्या कड्यांचा निर्माण झाला आहे. ऑक्लंड व वेलिंग्टन ही या प्रदेशातील प्रसिद्ध शहरे व बंदरे होत.

साउथ (दक्षिण) बेट

हे बेट उत्तर बेटापासून पंचवीस किमी. रुंदीच्या कुक सामुद्रधुनीने अलग केले असून, यात न्यूझीलंडच्या लोकसंख्येपैकी १/३ लोकसंख्या केंद्रित झाली आहे. या बेटाचे क्षेत्रफळ १,५०,४६१ चौ.किमी. असून देशाच्या मानाने त्याची रुंदी कमी आहे. दक्षिण बेटात दक्षिण आल्प्स पर्वताची रांग सर्वत्र विखुरलेली असून अनेक लहानमोठी पर्वतशिखरे आहेत. त्यांपैकी १७ शिखरे सु. ३,००० मी. पेक्षा उंच असून, कुक (३,७६४ मी.) हे सर्वांत उंच शिखर याच बेटावर आहे. याच्याजवळच टास्मन हिमनदी असून तिची लांबी ३० किमी. आहे. काइकुरा, सेंट आर्नो, स्पेन्सर या दक्षिण आल्प्स पर्वतातील हिमाच्छादित व हिमनद्यांनी व्यापलेल्या महत्त्वाच्या व प्रमुख रांगा होत.

यांशिवाय या बेटाचा नैर्ऋत्य भाग हिमनद्यांनी व्यापलेल्या पठारांचा व सरोवरांचा असून शीघ्र उतार, खोल व अरुंद मुखाच्या फ्योर्ड किनाऱ्याने व्यापला आहे. फ्योर्ड किनाऱ्याला ‘साउंड’ म्हणतात. दक्षिण आल्प्सच्या पूर्वेला न्यूझीलंडचे सर्वांत मोठे कँटरबरी मैदान आहे. हे मैदान समुद्रसपाटीपर्यंत क्रमाक्रमाने उतरते होत जाते. या मैदानाशिवाय राकाइया आणि वाइमॅकरीरी या नद्यांच्या गाळाने तयार झालेला मैदानी प्रदेश असून पश्चिमेस आणि दक्षिणेस वेस्टलँड व साउथलँड ही दोन स्वतंत्र मैदाने आहेत. दक्षिण बेटात बरीच सरोवरे आहेत. त्यांपैकी टी अ‍ॅनाऊ हे सर्वांत मोठे आहे. या प्रदेशातील बहुतेक ज्वालामुखी निद्रिस्त असून अल्पाइन चेन व हानमर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत.

स्ट्यूअर्ट बेट

या बेटावर तुरळक वस्ती असून त्याचे क्षेत्रफळ ६७० चौ.किमी. आहे. फोव्हो या ३२ किमी. रुंदीच्या सामुद्रधुनीमुळे ते दक्षिण बेटापासून अलग झाले असून येथील डोंगराळ भागात जंगले व वनस्पती आढळतात.

इतर बेटे

चॅतम बेटसमूहात एक मोठे व तीन लहान बेटे असून ती उत्तर बेटाच्या आग्नेयीस सु. ६८० किमी. अंतरावर आहेत. यांपैकी दोन बेटांवर मेंढपाळीचा धंदा जोरात चालतो. उरलेल्यांत तोकेलाऊ, कुक व कर्‌मॅडेक ही महत्त्वाची असून त्यांपैकी तोकेलाऊ हे बेट १९२६ पासून न्यूझीलंडच्या अखत्यारीखाली आले. सुके खोबरे हे येथील प्रमुख उत्पादन. कर्‌मॅडेक हा पाच पर्वतमय बेटांचा समूह असून प्रमुख बेटांच्या उत्तरेस सु. ९६० किमी.वर वसला आहे. येथील संडे बेटावर न्यूझीलंडची वेधशाळा आहे.

नद्या व सरोवरे

न्यूझीलंडमध्ये असंख्य लहानमोठ्या नद्या आहेत. बहुतेक उथळ व शीध्र प्रवाहाच्या नद्यांचे उगम पर्वतरांगांत असून त्यांपैकी बहुतेक नद्या समुद्रास मिळतात. एकूण नद्यांपैकी फारच थोड्या नाव्य आहेत. प्रमुख नद्यांपैकी वाइकॅटो, वाँगनूई, रँगिटीकी आणि वाइरोआ या नद्या उत्तर बेटातून वाहतात, तर क्यूथा, वाइटॅकी, टाइरी, मॅताउरा, वाइमॅकरीरी आणि वाइआऊ या दक्षिण बेटातून वाहतात. यांपैकी वाँगनूई (२४५ किमी. लांब) आणि रँगिटीकी (१६२ किमी. लांब) या मोठ्या असून कुक सामुद्राधुनीजवळ पॅसिफिक महासागरास मिळतात. वाइकॅटो (३६५ किमी.)

ही सर्वांत लांब असून ती टास्मन समुद्राला मिळते. ही सु. १३० किमी. जलवाहतुकीस उपयुक्त आहे. वाइकॅटोच्या मुखाजवळील केप टेराव्हिटीपर्यंतचा सु. ४० ते ७० किमी.चा पश्चिमेकडील पट्टा चराऊ कुरणांकरिता, तसेच दूधदुभत्याच्या धंद्याकरिता प्रसिद्ध आहे. दक्षिण बेटात क्लूथा (३४० किमी.) ही सर्वांत लांब नदी असून बहुतेक सर्व नद्या समुद्रास मिळतात. यांतील बहुतेक नद्या जलवाहतुकीस निरुपयोगी असल्या, तरी पाटबंधाऱ्यांसाठी, तसेच विद्युत्‌निर्मितीसाठी त्यांचा चांगला उपयोग होत आहे. टास्मन व मर्चिसन या हिमनद्या प्रसिद्ध आहेत.

दोन्ही बेटसमूहांत अनेक सरोवरे आहेत. त्यांपैकी बहुतेक समुद्रसपाटीपासून उंचीवर आढळतात. उत्तर बेटातील सरोवरे ज्वालामुखीपासून तयार झालेल्या पठारी प्रदेशात असून, त्यांच्या सभोवतालच्या औष्णिक प्रदेशात गरम पाण्याचे झरे, उकळणाऱ्या पाण्याची डबकी, चिखलाचे ज्वालामुखी इ. आढळतात. ताउपो हे उत्तरेकडील ६२२ चौ.किमी. क्षेत्रफळ असणारे सर्वांत मोठे सरोवर असून त्याची कमाल खोली १६१ मी. आहे; तर दक्षिण बेटात टी अ‍ॅनाऊ व वाकटिप ही दोन मोठी सरोवरे असून वाकटिप सरोवराची कमाल खोली ३७७ मी. आहे. दक्षिण बेटाच्या पश्चिमेकडील डोंगरात सदर्लंड हा सु. ५८० मी. उंचीचा धबधबा मिलफर्ड साउंडजवळ असून तो जगातील चौथा उंच धबधबा आहे.

खनिज संपत्ती

न्यूझीलंड खनिज संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असूनही व्यापारी दृष्ट्या त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. डोंगराळ भागात तसेच पठारी प्रदेशात काही ठिकाणी सोने, दगडी कोळसा, शिसे, कथिल, चुनखडी ही खनिजे मिळतात; तर रुपे, मँगॅनीज, क्रोम, जस्त, तांबे व टंगस्टन हे धातूही अल्प प्रमाणात आढळतात. दोन्ही बेटांत मिळून २५ ठिकाणी दगडी कोळसा मिळतो. यांपैकी बूलर व वाइकॅटो येथील खाणी महत्त्वाच्या आहेत.

लोखंड प्रामुख्याने पश्चिम किनाऱ्यावर ऑक्लंडजवळ मिळते. उत्तर बेटात खनिज तेल व वायू मिळतो. १९६१ मध्ये उत्तर बेटाच्या तॅरनॅकी विभागात नैसर्गिक वायूचा शोध लागला असून, याच विभागातील कापुनी येथील उपलब्ध गॅस नळाने ऑक्लंड आणि वेलिंग्टन या शहरांस पुरविला जातो. एकंदरीत खनिजांच्या बाबतीत न्यूझीलंडला अनेक धातूंची आयात करावी लागते.

हवामान

समुद्रसपाटीपासून उंची, प्राकृतिक घटक व समुद्रसान्निध्य यांनी न्यूझीलंडचे हवामान निर्धारित केले असून, त्याचे स्वरूप काहीसे संयुक्त संस्थानांतील वॉशिंग्टन राज्यासारखे सौम्य व आल्हाददायक आहे. हवामान मुख्यतः सागरी असून उन्हाळ्यात समुद्रावरून येणारे गार वारे हवेतील उष्मा कमी करतात, तर हिवाळ्यात ते उबदार असतात. समुद्रसपाटीच्या अगदी उत्तरेकडील प्रदेशाता सरासरी तपमान १५° से. असते, तर दक्षिणेकडे ते हळूहळू कमी होत जाते व कुक समुद्राधुनीत ते सरासरी १२° से. असते. क्वचित काही ठिकाणीच कमाल व किमान तपमानांत तीव्रतर फरक आढळतो. वेलिंग्टनचे उन्हाळ्यातील सरासरी तपमान २०° से. असते, तर हिवाळ्यात ते ५·६° से. असते. डोंगराळ प्रदेशात हिवाळ्यात नियमित बर्फ पडते, पण खोऱ्यांत दाट धुके पडते.

डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण अधिक असून ओटागो येथे कमीत कमी सरासरी पाऊस ३३ सेंमी. पडतो, तर जास्तीत जास्त सरासरी पाऊस ७६० सेंमी. दक्षिण आल्प्समध्ये पडतो. इतरत्र पावसाचे सरासरी प्रमाण समशीतोष्ण हवामानास अनुकूल असेच (६४ ते १५३ सेंमी.) आहे. हा पाऊस वर्षभर कमीअधिक प्रमाणात पडत असतो. डोंगरपठार व पर्वतांचा उंच प्रदेश वगळता पर्वत्र पुरेसा पाऊस, सौम्य हिवाळे व आल्हाददायक उन्हाळे अनुभवास येतात.

न्यूझीलंडमध्ये लहानंमोठ्या भूकंपांचे प्रमाण अधिक आहे. दरवर्षी सरासरी १०० भूकंपांचे धक्के बसतात. त्यांपैकी बहुतेक कुक सामुद्रधुनीजवळील प्रदेशास बसतात. १९३१ मधील भूकंपाचा धक्का आतापर्यंतच्या भूकंपांत मोठा होता. त्यात २५५ माणसे मृत्यू पावली.

वनस्पती व प्राणी

न्यूझीलंडचा २०% प्रदेश निरनिराळ्या वनस्पतींनी व्यापला आहे. बीच, पाइन व फर या प्रमुख जंगली वनस्पती असून येथील बरीच झाडी सदाहरित असते. कमी पावसाच्या पूर्वेकडील प्रदेशात मात्र वनस्पतींऐवजी गवताचे प्रमाण अधिक आढळते. दक्षिण आल्प्सवर पर्जन्यवृष्टी सतत असल्याने तेथे बीचची सदाहरित अरण्ये आहेत. फ्लोर्डलँड आणि आल्प्सच्या वायव्य भागातील अरण्ये ठळकपणे दृष्टोत्पत्तीस येतात. उत्तर बेटातील ऑक्लंड द्वीपकल्प काउरी पाइन वृक्षांनी व्यापले आहे. कित्येक ठिकाणी त्यांची उंची ३२–३३ मी. आहे. इतर ठिकाणी रीमू, मटाई, कोनार हे स्थानिक वृक्ष आढळतात.

प्राण्यांच्या विविधतेच्या बाबतींत न्यूझीलंड तसा दरिद्रीच म्हणावा लागेल. येथे पशुपक्षिजीवन फारसे समृद्ध नाही. पक्ष्यांत दोन प्रकारची वटवाघळे महत्त्वाची असून आखूड शेपटीच्या वटवाघळाची जात मूळची न्यूझीलंडमधील आहे, तर लांब शेपटीचे वटवाघूळ ऑस्ट्रेलिया आणि इथिओपिया येथील जातींशी साम्य दर्शविते. यांशिवाय काकॅपो, पोपट, टकाहे, वेका आणि राष्ट्रीय पक्षी कीवी आढळतो. कीवी पक्ष्यास पंख असतात, पण तो उडत नाही.

इतर पक्ष्यांत टूई व की हे लक्षणीय असून कॉर्मोरंट, पारवा, गल, टर्न वगैरे समुद्रसान्निध्यात असणारे अनेक लहानमोठे पक्षी आढळतात. ट्यूटारा हा खास सर्पप्रकार न्यूझीलंडचाच असून त्याचा आकार काहीसा सरड्यासारखा असतो. येथे सरड्यांच्या सु. २० भिन्न जाती असून बेडकांच्या फक्त दोन जाती आढळतात. पक्ष्यांप्रमाणेच न्यूझीलंडमध्ये इतर प्राण्यांचे प्रमाण कमी असून सध्या अस्तित्वात असणारे बहुतेक प्राणी या देशात आलेल्या आप्रवाशांनी आणले आहेत. त्यांत कुत्री, उंदीर, पांढऱ्या लोकरीचा प्राणी, वीझल, ससे, हरिण यांसारखे प्राणी असून उंदीर, वीझल, पांढऱ्या लोकरीचा प्राणी यांचा आता उपद्रव फार वाढला आहे.

न्यूझीलंडच्या सभोवती समुद्र असून त्यात सु. ३१० निरनिराळ्या जातींचे मासे आहेत. खाऱ्या पाण्यात मच्छीमारीचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो. माशांत किंगफिश, हॅमरहेड, शार्क, थ्रेशर, माको, मार्लिन, सोअर्डफिश वगैरे मोठे मासे आढळतात. स्नॅपर, ग्रोपर, कॉड, तराहिकी, हापुकू वगैरे माशांचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यांशिवाय समुद्रात सागरी सिंह, सागरी हत्ती आणि चित्ता हे प्राणी आढळतात.

इतिहास

न्यूझीलंडमध्ये मानववसाहत केव्हा झाली, हे निश्चितपणे ज्ञात नाही. चौदाव्या शतकात पॉलिनीशियन खलाशी याच्या उत्तर किनाऱ्यावर अनेकदा आले. सतराव्या शतकात हे लोक दक्षिण बेटातही पसरले होते. काही तज्ञांच्या मते पॉलिनीशियन माओरी हे मुख्यतः उत्तर बेटाच्या किनारपट्टीतच स्थायिक झाले असावेत. आबेल यानसन टास्मान या डच प्रवाशाने १६४२ मध्ये न्यूझीलंड प्रथम पाश्चात्त्यांच्या नजरेस आणले. परंतु हे सत्य डच ईस्ट इंडिया कंपनीने अनेक वर्षे गुप्त ठेवले; कारण तिला इतर व्यापारी कंपन्या तेथे चंचुप्रवेश करतील अशी भीती वाटत होती. डचांनी यास नेदर्लंड्समधील झीलंड या प्रांताच्या नावावरून ‘नवीन झीलंड’ म्हणून ‘न्यूझीलंड’ असे नाव दिले.

पुढे कॅप्टन जेम्स कुक याने १७६९ मध्ये या देशाची बरीच माहिती मिळविली. यानंतर फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, अमेरिकन नाविक, ताग व सागवान तसेच इतर पदार्थ यांचा शोध करणारे व्यापारी तेथे आले. त्यानंतर १८१४ मध्ये ब्रिटिश मिशनरी तेथे आले. एडवर्ड वेकफील्ड या ब्रिटिश मुत्सद्यास तेथे ब्रिटिशांची वसाहत करावी असे वाटले आणि त्यानुसार वसाहती करण्यासाठी त्याने न्यूझीलंड कंपनी काढली. या कंपनी १८३९ मध्ये तेथे स्थायिक होण्यासाठी एक तुकडी धाडली. तत्पूर्वी मिशनऱ्यांच्या धर्मप्रसार कार्यास प्रारंभ झाला होता, त्यामुळे ब्रिटिश सरकारला तेथील वसाहतवाल्यांचे संरक्षण करणे क्रमप्राप्त झाले. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स या वसाहतीचा एक भाग म्हणूव त्यास मान्यता दिली आणि त्यावर विल्यम हॉब्सन याची लेफ्टेनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली (१८४०). त्याने तेथील स्थानिक माओरींबरोबर वाइटांगीचा तह केला. माओरींनी ब्रिटिश राजास सत्ताधीश म्हणून मान्यता दिली. ब्रिटिशांनी माओरींचे संपत्तिहक्क मान्य करून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली व १८४१ मध्ये न्यूझीलंड ही स्वतंत्र वसाहत झाली.

तत्पूर्वी गोरे आणि एतद्देशीय यांमध्ये जमिनींच्या मालकी हक्कांबद्दल संघर्ष झाले. हॉब्सनने न्यूझीलंड कंपनी व माओरींकडून अनेक जमिनी घेतल्या. माओरींत व वसाहतवाल्यांत १८४५ मध्ये पुन्हा संघर्ष निर्माण झाला. माओरींना गोरे बेकायदेशीरपणे जमिनी खरीदतात असे वाटले, तेव्हा ब्रिटिशांनी जॉर्ज ग्रे याला गव्हर्नर म्हणून नेमले. ग्रेन एतद्देशीयांत समझोता घडवून आणून दक्षिण बेट व इतर अनेक जमिनी विकत घेतल्या (१८४८).

ब्रिटिशांनी १८५२ मध्ये न्यूझीलंडला संविधान व स्थानिक स्वराज्य दिले आणि त्यानंतर १८५६ मध्ये संसदीय राज्यपद्धती व मंत्रिमंडळ यांस अनुमती दिली. यानंतरच्या वीस वर्षांच्या इतिहासात दोन प्रमुख गोष्टी घडल्या; एक केंद्रीय सरकार व प्रांतिक सरकार यांमधील लढे व दोन जातिविषयक दंगली. माओरींनी पुन्हा १८६० मध्ये जमिनींच्या प्रश्नावरून बंड केले. १८७० पर्यंत किरकोळ चकमकी होत राहिल्या. १८६१ मध्ये सोन्याचा शोध लागला. इंग्‍लंडमधून आप्रवासी झपाट्याने येऊ लागले. त्यामुळे लोकसंख्या वाढली. साहजिकच सर्व लोकांना सोन्याच्या खाणींत प्रवेश मिळेना, तेव्हा त्यांनी इतर धंद्यांकडे लक्ष केंद्रित केले. त्यांमधून मेंढपाळीस व दूधदुभत्याच्या धंद्यास उत्तेजन मिळाले. न्यूझीलंडमधून १८८२ मध्ये इंग्‍लंडला डबाबंद मांस, लोणी आणि चीज निर्यात होऊ लागले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस शासनाने म्हाताऱ्यांना वार्धक्य-निवृत्तिवेतन, तरुणांना नोकऱ्या, मोठ्या जमीनजुमल्यांचे अनेक शेतकऱ्यांत विभाजन, कामगारांच्या प्रश्नांत लवाद इ. सुधारणा केल्या. यामुळे जनमानसात शासनाबद्दल विश्वास निर्माण झाला. न्यूझीलंड संसदेने १८९३ मध्ये प्रथमच स्त्रियांना मतदानाचा हक्क देऊन प्रगतीचे आणखी एक पाऊल टाकले.

ब्रिटिशांनी १९०७ मध्ये न्यूझीलंडला त्याच्या विनंतीवरून वसाहतीचे स्वराज्य दिले. न्यूझीलंडने पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या मदतीस फौजा देऊन मदत केली. तथापि युद्धानंतरची मंदीची लाट न्यूझीलंडला भोगावी लागली. निर्यातीच्या वस्तूंचे भाव उतरले व त्यामुळे अनेकांना नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. देशातील उद्योगधंद्यांवर परिणाम झाला, तसाच राजकीय उलाढालींस जोर आला. मायकेल सॅव्हिजच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाने १९३५ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. मजूर पक्षाने सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक नवीन कायदे केले, त्यांत विधवा, अनाथ मुले, वृद्ध यांच्या सुखसोयींचा समावेश होता; एवढेच नव्हे, तर निर्यात-आयातींवर या शासनाने अनेक निर्बंध घातले, तसेच त्यांची हमी घेतली व स्थानिक लघुउद्योगांना उत्तेजन दिले. पीटर फ्रेझर हा सॅव्हिजच्या जागी १९४० मध्ये मजूर पक्षाचा पंतप्रधान म्हणून निवडून आला. या सुमारास दुसरे महायुद्ध सुरू झाले. न्यूझीलंडने पुन्हा दोस्त राष्ट्रांना जर्मनी, इटली, जपान या देशांविरुद्ध मदत केली. १९४५ मध्ये न्यूझीलंड संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेचा चार्टर सभासद झाला.

युद्धानंतरच्या १९४९ च्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळून सिडनी हॉलंड पंतप्रधान झाला. तथापि राष्ट्रीय पक्षाने मजूर पक्षाचाच समाजकल्याण कार्यक्रम राबविला. १९५१ पर्यंत न्यूझीलंडमध्ये द्विसदनी संसद होती. याच वर्षी शासनाने वरिष्ठ सभागृह बरखास्त केले. कोरियन युद्धात न्यूझीलंडच्या नौदलाने आणि लष्कराने संयुक्त राष्ट्रांच्या फौजांबरोबर युद्धात भाग घेतला. स्वसंरक्षणासाठी याच वेळी न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया व अमेरिकेची संयुक्त संस्थाने मिळून एक करार केला. तो ‘अ‍ॅन्झूस करार’ या नावाने प्रसिद्ध आहे. १९५४ मध्ये न्यूझीलंड सीटो करारात सामील झाले. १९५५ मध्ये मलायामधील कम्युनिस्टांविरुद्ध लढण्यासाठी न्यूझीलंडने लष्कर धाडले.

हॉलंडने १९५७ मध्ये राजीनामा दिला आणि त्याच्या जागी कीथ होलिओक आला; पण त्यानंतर झालेल्या निवडणुकांत राष्ट्रीय पक्षाचा पराभव होऊन मजूर पक्ष सत्तेवर आला आणि वॉल्टर नॅश पंतप्रधान झाला (डिसेंबर १९५७); पण १९६० मध्ये मजूर पक्षाचा पुन्हा पराभव होऊन राष्ट्रीय पक्षाचा होलिओक पुन्हा पंतप्रधान झाला. यानंतर १२ वर्षे न्यूझीलंडवर राष्ट्रीय पक्षाचा पगडा होता. दरम्यान होलिओकने १९७२ मध्ये राजीनामा दिला आणि उपपंतप्रधान जॉन मार्शल पंतप्रधान झाला. त्यानंतर पुन्हा मजूर पक्षाचे वर्चस्व निर्माण झाले आणि १९७४ मध्ये वेल्झ रोलिंग पंतप्रधान झाला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळापासून न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय संबंधांत आमूलाग्र बदल झाले. दोन्ही पक्षांत राष्ट्रीय धोरणात उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले पाहिजे आणि कल्याणकारी राज्य निर्माण करून आर्थिक बाबतींत काटकसर व नियंत्रण व्यवहार केले पाहिजेत यांवर एकमत झाले.

त्याबरोबरच न्यूझीलंडची इंग्‍लंडऐवजी अमेरिकेशी जवळीक वाढली आणि न्यूझीलंड परराष्ट्रीय धोरण स्वतंत्र रीत्या ठरवू लागले. याला दुसरेही एक कारण आहे, ते म्हणजे न्यूझीलंडचे भौगोलिक स्थान व त्यामुळे निर्माण होणारा एकाकीपणा. नोव्हेंबर १९७५ मध्ये मजूर पक्षाचा पराभव करून पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या हातात सत्ता आली आणि रॉबर्ट मूल्डून पंतप्रधान झाला. या सार्वत्रिक निवडणुकीत सोशल क्रेडिट लीग व व्हॅल्यूज हे दोन पक्ष नव्यानेच निवडणुकीत उतरले आणि त्यांनी काही मते मिळविली; पण त्यांना एकही जागा मिळाली नाही.

१९६२ मध्ये न्यूझीलंडच्या प्रशासकीय व्यवस्थेखाली असलेल्या पश्चिम सॅमोआने स्वातंत्र्य मिळविले असून कुक बेटसमूहाने तसेच नीऊए बेटाने स्थानिक शासनाचा अधिकार अनुक्रमे १९६५ व १९७४ मध्ये मिळविल. तथापि नागरिकत्व व इतर बाबतींत त्याचे न्यूझीलंडशी घनिष्ठ संबंध आहेत.

राजकीय स्थिती

ब्रिटिश वसाहतवादातून वसाहतीची स्वराज्याकडे संविधानात्मक वाटचाल करताना न्यूझीलंडमध्ये प्रादेशिक आणि राजकीय एकत्रीकरणाचे सतत विचारमंथन चालू होते. न्यूझीलंडची वसाहत प्रथमपासून एका मध्यवर्ती सत्तेच्या ताब्यात नव्हती. ऑक्लंड, वेलिंग्टन, नेल्सन, न्यू प्लिमथ, कँटरबरी आणि ओटागो अशा निरनिराळ्या सहा वसाहती होत्या. ग्रेट ब्रिटनच्या अनेक संसदीय कायद्यांनी न्यूझीलंडला स्वयंशासन मिळाले. तरीसुद्धा संविधानात्मक पद्धतीचा पाया १८५२ साली घातला गेला आणि प्रत्येक प्रांतावर विधिपरिषद व अधीक्षक नेमण्यात आला आणि सर्वांसाठी एकच वसाहती कायदा अंमलात आला.

संसदीय राज्यपद्धती आणि मंत्रीमंडळ १८५६ मध्येत अस्तित्वात आले. तथापि १८७६ पर्यंत शासनात एकसूत्रता नव्हती. याच वर्षी सहा प्रांतांची कौन्सिले (मंडळे) रद्द करण्यात येऊन द्विसदनी संसद स्थापन झाली. ग्रेट ब्रिटनची राणी ही न्यूझीलंडची राज्यप्रमुख असून ती आपला प्रतिनिधी म्हणून न्यूझीलंडच्या शासनाच्या विचाराने, गव्हर्नर जनरलची पाच वर्षांकरिता नियुक्ती करते, परंतु त्याचा पगार मात्र न्यूझीलंडला द्यावा लागतो. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नर जनरल आपली कार्ये पार पाडतो. १९५१ पर्यंत न्यूझीलंडमध्ये वरिष्ठ सभागृह होते. त्यानंतर मात्र न्यूझीलंडने एकसदनी (हाउस ऑफ रेप्रिझेंटेटिव्ह्‌ज) संसदपद्धती अवलंबिली आहे. या संसदेत एकूण ८७ सभासद असून त्यांपैकी चार माओरी सभासद असतात.

ते माओरी लोकांनी निवडलेले माओरीच असले पाहिजेत, असा दंडक आहे. दर तीन वर्षांनी संसदेच्या सभासदांची निवडणूक होते. १८ वर्षांवरील स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क असून येथे द्विपक्षीय पद्धती कार्यवाहीत आहे. बहुमताच्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान होतो आणि तो आपले मंत्रिमंडळ बनवितो. कोणतेही विधेयक संमत झाल्यानंतर राणीच्या संमतीसाठी गव्हर्नर जनरलकडे पाठविण्यात येते आणि नंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होते. तथापि गव्हर्नर जनरल एखादे विधेयक विशिष्ट परिस्थितीत तांत्रिक दृष्ट्या नाकारू शकतो. लिखित संविधान, एकसदनी संसदीय शासनपद्धती, मंत्रिमंडळात्मक कार्यकारिणी, उच्चतम अपूल कोर्ट ही न्यूझीलंडच्या संविधानाची काही ठळक वैशिष्ट्ये होत.

न्यूझीलंडमधील पक्षपद्धती बव्हंशी ग्रेट ब्रिटनसारखी आहे. वसाहतीच्या स्वराज्यानंतर स्थापन झालेला मजूर पक्ष हा तेथील प्रमुख पक्ष असून नंतर राष्ट्रीय पक्ष अस्तित्वात आला. दोन्ही पक्षांत धोरणाविषयक काही मतभेद असले, तरी त्यांमध्ये मूलभूत तात्त्विक विरोध नाही. जगातील समाजवादी विचारसरणीतून येथेही इतर काही पक्ष निर्माण झाले आहेत. उदा., न्यू डेमॉक्रॅटिक, कम्युनिस्ट, सोशल क्रेडिट लीग, सोशॅलिस्ट युनिटी, व्हॅल्यूज इत्यादी; पण या पक्षांना अद्याप फारसे अनुयायी लाभलेले नाहीत. नोव्हेंबर १९७५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हाउस ऑफ रेप्रिझेंटेटिव्ह्‌जमध्ये पुढील पक्षबल होते : मजूर पक्ष ३२, राष्ट्रीय पक्ष ५५.

प्रशासकीय सोयीसाठी न्यूझीलंडचे ४० शासकीय विभाग पाडण्यात आले आहेत व त्या प्रत्येकावर एक स्वतंत्र स्थायी अधिकारी नेमलेला आहे. हा अधिकारी प्रत्यक्ष त्या संबंधित मंत्र्याला जबाबदार असतो.

न्यूझीलंडमध्ये स्थानिक स्वराज्याच्या सोयीसाठी तीन प्रमुख उपविभाग पाडलेले आहेत. या तीन उपविभागांत १२० काउंटी, १४० बरो आणि २५ लहान शहरे यांचा समावेश होतो. लोक या उपविभागांची मंडळे प्रौढ मतदानाद्वारे निवडतात आणि ही मंडळे सर्व प्रशासनव्यवस्था पाहतात. मंडळाची मुदत तीन वर्षांची असते. पाणीपुरवठा, भुयारी गटारपद्धती, रस्ते, आरोग्य खाते इत्यादींच्या स्वतंत्र समित्याही मतदारच निवडतात. यामुळे स्थानिक कारभार लोकनियुक्त संस्था पाहतात. त्यांना कर बसविण्याचा अधिकार असतो.

न्यूझीलंडचे बहुतेक सर्व कायदे इंग्‍लंडमधील प्रचलित कायद्यांवर (कॉमन लॉ) आधारलेले असून, त्यांत ग्रेट ब्रिटनच्या संसदेत तसेच न्यूझीलंडच्या हाउस ऑफ रेप्रिझेंटेटिव्ह्‌ज या विधिमंडळात संमत झालेल्या कायद्यांची प्रसंगोपात्त भर पडली आहे. येथे उच्च न्यायालय असले, तरी अपील कोर्ट हे सर्वश्रेष्ठ न्यायालय मानण्यात येते. येथील कनिष्ठ न्यायालयांना मॅजिस्ट्रेट्स कोर्ट म्हणतात. याशिवाय औद्योगिक आणि काँपेन्सेशन अशी दोन न्यायालये आहेत. गव्हर्नर जनरल सर्व न्यायाधीशांची स्थायी नियुक्ती करतो. १९६२ मध्ये येथे लोकपाल नेमण्याची पद्धतही सुरू झाली. अखेरचे अपील इंग्‍लंडमधील प्रिव्ही कौन्सिलकडेही करण्यात येते.

न्यूझीलंडची संरक्षणव्यवस्था राष्ट्राचे संरक्षण मंत्रालय आपल्या स्वतंत्र विभागातर्फे पाहते. संरक्षण मंत्री, सैन्यदल प्रमुख व उपप्रमुख तसेच त्या विभागाच्या स्थायी अधिकारी यांचे मंडळ संरक्षणाबाबतचे सर्व धोरण ठरवितात. न्यूझीलंडच्या एकूण लष्कराची आकडेवारी १९७५ मध्ये पुढीलप्रमाणे होती : लष्कर १२,६८५; हवाईदल ४,३१०; नौदल २,८५०. १९७५–७६ च्या आर्थिक वर्षात सु. १८० दशलक्ष न्यूझीलंड पौंड एवढा संकल्पित खर्च धरण्यात आला होता. अत्याधुनिक शस्त्रसामग्रीने सज्‍ज अशी विविध पथके न्यूझीलंडमध्ये असून, संयुक्त राष्ट्रांसाठी वा कोणत्याही शांतता कार्यासाठी उपयुक्त ठरावे, असे एक वेगळे पथक आहे. देशातील शांतता व सुव्यवस्था यांचे काम पोलीस खाते पाहते. त्याची शासकीय व्यवस्था संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीखाली असून त्याचा स्वतंत्र विभाग आहे.

आर्थिक स्थिती

न्यूझीलंड हा मुख्यतः प्रगत कृषिप्रधान देश आहे. योग्य समशीतोष्ण हवामानामुळे देशाची कृषिउत्पादकता वाढली आहे. पहिल्या महायुद्धानंतर येथे इतर उद्योगधंद्यांची जरी वाढ झाली असली, तरी कृषिउद्योग आणि त्यावर अवलंबून असणारे मेंढपाळ व पशुपालन या धंद्यासच अग्रक्रम राहिला आहे. न्यूझीलंडचा जवळजवळ निम्मा भूप्रदेश शेतीसाठी उपयुक्त असून सर्वसाधारण एका शेतकऱ्याच्या मालकीची ४० ते ८० हे.

जमीन असते आणि तो शेती अत्यंत आधुनिक पद्धतीने करतो. जमिनीच्या ९/१० भागात पशुपालन व मेंढपाळीचा धंदा असून गवत हे एक प्रकारचे प्रमुख उत्पन्नाचे पीक झाले आहे. याशिवाय गहू, बार्ली, ओट, क्लोव्हर सीड ही प्रमुख पिके होतात; तथापि फारच थोडा गहू परदेशी निर्यात होतो. स्थानिक गरजा भागविण्यासाठी मका, कांदा, बटाटा, गळिताची धान्ये तसेच ताग ही पिके घेण्यात येतात. सफरचंदाच्या बागा काही भागांत विपुल आहेत आणि त्यांची निर्यातही होते. कृषिधंद्याशी संलग्‍न असणारे पशुपालन, मेंढपाळी व दुग्धालये हे न्यूझीलंडचे सर्वांत मोठे धंदे असून मेंढ्यांच्या उत्पत्तीविषयी तसेच त्यांच्या जातींविषयी फार काळजी घेतली जाते.

न्यूझीलंडचा जगातील जास्तीत जास्त मेंढ्या असणाऱ्या देशांत पाचवा, लोकरीच्या उत्पादनात तिसरा आणि लोकरीची निर्यात करण्यात दुसरा क्रमांक आहे. देशातील एकूण जमिनीपैकी सु. १·२ कोटी हे. जमीन मेंढपाळीसाठी वापरली जाते. मेंढपाळीखालोखाल पशुपालन हा दुसरा मोठा जोडधंदा आहे. पशुपालनापासून सहकारी तत्त्वावर दुग्धव्यवसाय व मासांचा मोठा व्यापार चालतो, शिवाय दुधापासून लोणी व चीज या वस्तू तयार करण्यात येतात. त्यामुळे लोकरीबरोबर डबाबंद लोणी, चीज व गोठविलेले मांस निर्यात केले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रक्रिया केलेले दूध व केसीन हे पदार्थही निर्यात होऊ लागले आहेत.

प्रक्रिया व निर्मितिउद्योग या दृष्टींनी वेलिंग्टन, आँक्लंड आणि क्राइस्टचर्च ही प्रमुख शहरे असून तेथे कापड, बीर, यंत्रसामग्री, मोटारी, पितळेची भांडी, फर्निचर, पादत्राणे वगैरेंचे उद्योगसमूह आहेत. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या दुग्धशाळांतून प्रक्रिया केलेले लोणी व चीज मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येते.

देशातील औद्योगिक उत्पादन वाढत असून स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये व एकूण निर्यात व्यापारात त्याचा वाटा अनुक्रमे २५% व १२% आहे. विपुल अरण्यांमुळे देशातील वाढत्या कागद व लगदा उद्योगाला लाकडाचा सतत पुरवठा होत असतो. स्थानिक गरजेपुरते कोळसा उत्पादन होत असून आयात अशुद्ध तेलाचे शुद्धीकरण देशातच होत असल्याने, देशाच्या खनिज तेल आणि तज्‍जन्य पदार्थांच्या गरजा बहुतेककरून भागविल्या जातात. ग्राहकोपयोगी वस्तु-उद्योगही विस्तार पावत आहेत. त्यांपैकी प्रमुख उद्योग म्हणजे अन्नप्रक्रिया व डबाबंदीकरण उद्योग, मोटारगाड्यांची जुळणी, वाहतूकसाधने, लाकडी व बुचाचे पदार्थ, कापडवस्त्रे व पादत्राणे, वेशभूषा व तयार कपडे हे होत.

उत्तर बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरील उपलब्ध लोह खनिजापासून पोलाद उद्योग शासनाच्या सहकार्याने सुरू करण्यात आला असून, ब्लफ येथे उभारण्यात आलेल्या मोठ्या अ‍ॅल्युमिनियम विद्रावक भट्टीमधून प्रतिवर्षी सु. ८०,००० टन अ‍ॅल्युमिनियमचे उत्पादन होऊ लागले आहे. फँगरे प्रांतातील मार्झडन पॉइंट येथे एक तेलशुद्धीकरण कारखाना असून उत्तर बेटातील कापुनी येथे नैसर्गिक वायू निर्मितिकेंद्र आहे. टॅरमॅकी किनाऱ्यावर माउई येथे तेल व नैसर्गिक वायूचे फार मोठ्या प्रमाणावर साठे आढळले आहेत. देशात १९७४ च्या अखेरीस ३०४ कामगार संघटना व ४,३६,६२३ कामगार सदस्य होते. श्रमबल विभाजन पुढीलप्रमाणे होते. (ऑक्टो. १९७५) : प्राथमिक उद्योग (कृषी, जंगलउद्योग आणि मासेमारी) १,४४,२००; खाणकाम ४,५००; निर्मितिउद्योग २,८२,१००; वीज, वायू व जल १५,६००; बांधकाम ९४,०००; घाऊक व किरकोळ व्यापार १,९१,०००; वाहतूक, साठवण व संदेशवहन १,१०,९००; वित्त, विमा, स्थावर संपदा इ. ७६,५००; सेवा २,६४,६००; एकूण ११,८३,४००.

न्यूझीलंडच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७२ टक्के क्षेत्र जंगलांनी व्यापले होते; पण त्यांपैकी निम्मे क्षेत्र जंगले तोडून पिकाऊ जमिनीत रूपांतरित केले आहे. त्यामुळे देशीय जंगल फक्त ५६ लाख हे. उरले आहे. यात आढळणाऱ्या लाकडाच्या ११२ जातींपैकी फक्त ६ जातींचाच इमारती लाकूड म्हणून इमारतींसाठी उपयोग होतो. पूर्वी रीमू व काउरी या प्रकारच्या लाकडांची निर्यात होत असे. तथापि १९५२ पासून कागद तयार करण्याचे कारखाने निघाले आहेत. कैंगोरोआ स्टेट फॉरेस्टमध्ये अशा प्रकारचा प्रयत्न यशस्वी झाला आणि त्यातून वृत्तपत्री कागद बाहेर पडत आहे.

हा देश समुद्राने वेढला असूनही मच्छीमारीच्या बाबतीत फारसा संपन्न नाही; कारण खाण्यास योग्य असे फारच थोड्या प्रकारचे मासे उथळ समुद्रात सापडतात. मच्छीमारीसाठी ऑक्लंड, वेलिंग्टन व चामर्झ ही प्रमुख बंदरे प्रसिद्ध असून दुसऱ्या महायुद्धानंतर शार्कतेल उत्पादन वाढले आहे.

न्यूझीलंडची बहुतेक वीज पाण्यापासून तयार होते. डोंगरावरून शीघ्रगतीने खाली उतरणाऱ्या नद्यांच्या प्रवाहांवर जलविद्युत् प्रकल्पांचे जाळे सर्व देशभर पसरले आहे. ते प्रतिवर्षी सु. चार अब्ज किवॉ. ता. वीज पुरवतात आणि जवळजवळ ९३% घरांमधून विजेचा वापर केला जातो. वाइकॅटोवरील जलविद्युत् प्रकल्प हा सर्वांत मोठा आहे. जलविद्युत् उत्पादन आणखी वाढविले जात आहे.

निर्यातीच्या पदार्थांत लोकर, लोणी, चीज आणि गोठविलेले मांस हे पदार्थ प्रमुख असून, एकूण निर्यातीपैकी ८०% निर्यात यांची होते व हे बहुतेक पदार्थ राष्ट्रकुलातील देशांत जातात व देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात त्यांचा वाटा १४% आहे; पण सध्या अमेरिका, जपान या देशांतही यांपैकी अनेक पदार्थ निर्यात होऊ लागले आहेत. गोठविलेले मांस, लोणी व चीज यांपैकी २०% पदार्थ १९७४–७५ मध्ये ग्रेट ब्रिटनने खरीदले व ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान व लॅटिन अमेरिकेमध्ये उरलेल्या पदार्थांची निर्यात करण्यात आली. १९६५ मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये खुल्या व्यापाराचा करार झाला, त्यामुळे काही निवडक पदार्थांवरील कर कमी करण्यात आले. सध्या औद्योगिक उत्पादन वाढत असून त्याची निर्यात होत आहे. १९७५–७६ मध्ये एकूण निर्यातीत १२% अशा पदार्थांची निर्यात झाली.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्यूझीलंडला आंतरराष्ट्रीय व्यापारात बरेच महत्त्व प्राप्त झाले असून, दुसऱ्या महायुद्धानंतर लोकरीच्या निर्यात व्यापारमूल्यामध्ये त्याचा तिसरा क्रमांक आहे. कित्येक वर्षे चीज, लोणी व गोठविलेले मांस यांना निर्यातसूचीमध्ये अग्रक्रम मिळाला होता; लाकडाच्या फळ्या, भुसा व वृत्तपत्री कागद तसेच कमावलेले कातडे व पादत्राणे यांचाही निर्यातीच्या वस्तूंत अंतर्भाव होऊ लागला आहे. खनिज साधनांपैकी खनिज तेलाव्यतिरिक्त कोणतेच खनिज पदार्थ निर्यात होत नाहीत. न्यूझीलंड तलम वस्त्रे, यंत्रे व यंत्रसामग्री, मोटारी आणि उत्तम प्रतीचा कागद यांची आयात करतो.

न्यूझीलंडचे अधिकृत चलन दशमान पद्धतीचे – न्यूझीलंड डॉलर आणि सेंट – असून, विदेशविनियम दर एक स्टर्लिंग पौंड = १·९३६ न्यूझी. डॉलर; एक अमेरिकन डॉलर = ९५·८ न्यूझी. सेंट असा आहे. न्यूझीलंडमध्ये बँक व्यवसायाला वसाहतीच्या स्थापनेनंतर सुरुवात झाली. तेथे दोन ब्रिटिश, दोन ऑस्ट्रेलियन व एक जपानी बँक असून त्यांच्या शाखा देशभर विखुरलेल्या आहेत. रिझर्व्ह बँक व बँक ऑफ न्यूझीलंड ह्या सर्वांत मोठ्या शासकीय बँका आहेत. सर्व व्यापारी बँकशाखा संगणकीय धनादेश समाशोधन व्यवस्थेने जोडलेल्या असून, ही व्यवस्था अन्य द्रव्यहस्तांतरण पद्धतींनाही लागू करण्यात येणार आहे. यांशिवाय २१ आयुर्विमा कंपन्या, दोन विश्वस्त कंपन्या, सहकारी पतसंस्था, निवृत्तिवेतन कंपन्या इ. खाजगी वित्तप्रबंधक कंपन्याही देशात कार्य करतात.

वाहतूक व संदेशवहन

न्यूझीलंडची नैसर्गिक परिस्थिती रेल्वे व रस्ते यांस सुखकर नसल्यामुळे येथे रेल्वेची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. लिटल्टन ते क्राइस्टचर्च असा पहिला रेल्वेमार्ग १८६३ मध्ये झाला. त्यानंतर १८७० पर्यंत त्यात काहीच प्रगती झाली नाही. १९०८ मध्ये ऑक्लंड ते वेलिंग्टन हा प्रमुख रेल्वेमार्ग झाला आणि पहिल्या महायुद्धानंतर रेल्वेचे जाळे जवळजवळ देशभर पसरले. दक्षिण बेटात १९४५ मध्ये दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत म्हणजे कुकु सामुद्रधुनीपर्यंत रेल्वेचे जाळे पसरले. १९७६ मध्ये न्यूझीलंडमध्ये सु. ५,००० किमी. लांबीचे लोहमार्ग होते; त्यांची मालकी सर्वस्वी केंद्र सरकारकडे असून रेल्वेची एंजिनसह निर्मिती देशातच होते. तसेच १९२० नंतर न्यूझीलंडमध्ये मोटार वाहतुकीस प्रारंभ झाला. १९७६ अखेरीस ९२,६०४ किमी. लांबीचे रस्ते देशभर पसरले होते.

रेल्वे व रस्ते होण्यापूर्वी देशांतील बहुतेक मालाची देवघेव जलमार्गाद्वारे होत असे. देशात एकूण महत्त्वाची अशी ४० बंदरे आहेत; त्यांपैकी ऑक्लंड, वेलिंग्टन, लिटल्टन, डनीडन ही प्रमुख असून, उत्तर आणि दक्षिण बेटांतील बराच प्रवास हवाईमार्गे होतो. यांशिवाय वेलिंग्टन, पिक्टन व लिटल्टन यांमध्ये फेरी बोटींची सतत ये-जा असते. ऑक्लंड, क्राइस्टचर्च व वेलिंग्टन हे जगप्रसिद्ध विमानतळ असून येथून जगातील महत्त्वाच्या राजधान्यांशी तसेच शहरांशी विविध आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्यांद्वारे विमान वाहतूक चालते. न्यूझीलंडमधील तसेच विविध देशांशी असलेली विमान वाहतूक पुढील कंपन्यांच्या अखत्यारीखाली आहे : न्यूझीलंड नॅशनल एअरवेज कॉर्पोरेशन, टास्मन एम्पायर सर्विस, ब्रिटिश कॉमनवेल्थ पॅसिफिक एअरलाइन्स व पॅन अमेरिकन एअरवेज. यांपैकी पहिल्या तीन कंपन्यांत न्यूझीलंड सरकारचे भाग भांडवल असून ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि इतर देशही भागधारक आहेत; तर चौथी कंपनी अमेरिकन असून ती सॅन फ्रॅन्सिस्को ते न्यूझीलंड अशी विमान वाहतूक करते.

देशातील वाहतूक सुविधांप्रमाणेच संदेशवहनाच्या साधनांतही न्यूझीलंडने प्रगती केली आहे. १९७१ मध्ये ऑक्लंडजवळच्या वर्कवर्थ येथील उपग्रह केंद्राचे उद्‍घाटन झाले. त्यामुळे पॅसिफिकसभोवतालच्या तिसऱ्या INTELSAT शी संदेशवहनाची सुरुवात झाली. रेडिओ, दूरचित्रवाणी, दूरध्वनी आणि टपाल व तारखाते ही साधने न्यूझीलंड सरकारच्या मालकीची आहेत. १९७३ मध्ये देशात २७,००,००० रेडिओसंच होते. ऑक्टोबर १९७१ पासून रेडिओपरवाना शुल्क रद्द करण्यात आले. आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी ही दोन पद्धतींनी चालतात. त्यांपैकी नॅशनल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस नेहमीचे कार्यक्रम सादर करते, तर नॅशनल कमर्शिअल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस जाहिराती देते.

येथे बिनतारी संदेशवहनाची चांगली व्यवस्था आहे. हे खाते आकाशवाणी व दूरचित्रवाणी केंद्र चालविते. देशात एकूण ५४० दूरध्वनी कार्यालये आणि १४·४४ लक्ष दूरध्वनियंत्रे वापराता होती (१९७३). दूरध्वनींचा जास्त उपयोग करणारे न्यूझीलंड हे जगातील चौथे राष्ट्र आहे. दर १०० व्यक्तींमध्ये ४९ माणसे दूरध्वनी वापरतात. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, इतर यूरोपीय देश तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्याबरोबर रेडिओ-दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. यांशिवाय केबल व बिनतारी संदेशवहनाचीही व्यवस्था आहे.

लोक व समाजजीवन : माओरी हे येथील मूळ रहिवासी असून मध्यंतरी त्यांची लोकसंख्या घटली होती; पण ती झपाट्याने वाढत आहे. हळूहळू हे लोक गोऱ्या लोकांत मिसळत आहेत; तथापि त्यांचे प्रमाण दर १०० व्यक्तींत ६ असे आहे. गोऱ्या लोकांतील ९० टक्के लोक इंग्‍लंडमधून, विशेषतः स्कॉटलंड, वेल्स व आयर्लंडमधून, आलेल्या लोकांचे वंशज आहेत.उरलेल्यांत डच, भारतीय, चिनी इ. लोकांचा समावेश होतो. माओरी लोक इतर लोकांचा उल्लेख यूरोपियन या नावाने करतात. यूरोपियनाला ते ‘पाकेहा’ म्हणतात. माओरींची लोकसंख्या २,५२,७०० होती (१९७५). ब्रिटिशांची संख्या सर्वांत जास्त आहे. दरवर्षी सु. ४०,००० लोक या प्रदेशात बाहेरून येतात. एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक (जवळजवळ ७०%) उत्तर बेटात आहेत. एकूण लोकसंख्येपैकी २/३ लोकसंख्या शहरांतून असून १/३ लोक शेतवाडीत राहतात. १९७६ च्या लोकसंख्येच्या अंदाजानुसार ऑक्लंड (७,९७,४०६), वेलिंग्टन (३,४९,६२८), क्राइस्टचर्च (३,२५,७१०), हॅमिल्टन (१,५४,६०६) व डनीडन (१,२०,४२६) या पाच शहरांतून निम्मी लोकसंख्या आढळते.

माओरी हे पॉलिनीशियन असून पॅसिफिक महासागरातील इतर बेटांतील लोकांशी त्यांचे पूर्वी संबंध होते. न्यूझीलंडमधील सर्वसाधारण राहणीमान उच्च प्रतीचे असून तेथील नागरिक अ. सं. सं. मधील नागरिकाइतकी कमाई करतो; परंतु खाणेपिणे तसेच कपडे व घरे यांसाठी त्यास कमी पैसे मोजावे लागतात, शिवाय करांचा बोजाही येथे कमी आहे. फक्त मोटारींसाठी त्यास जास्त खर्च येतो. देशात बहुतेक घरे एक किंवा क्वचित दुमजली असतात. मात्र प्रत्येक घराला बाग असते. आहारात अमेरिकनांप्रमाणे सर्व पदार्थ असून चीज व लोणी यांचे प्रमाण अधिक असते. चहा हे त्यांचे नित्याचे पेय आहे.

न्यूझीलंडमधील बहुतेक लोक ख्रिस्ती धर्मीय असून ते इंग्लंडमधील चर्चला मानतात. याशिवाय रोमन कॅथलिक, मेथडिस्ट व प्रेसबिटेरियन चर्चचेही अनुयायी आढळतात. माओरींची अनेक स्वतंत्र चर्च असून त्यांचे सु. ३०,००० सभासद आहेत. प्रमुख माओरी चर्चमध्ये युनायटेड माओरी मिशन, रिंगाटून, रतन वगैरेंचा समावेश होतो.

बहुतेक यूरोपीय इंग्रजी भाषा बोलतात, तर माओरी लोक माओरी भाषा बोलतात. ती मलायो-पॉलिनीशियन भाषासमूहातील भाषा असून रोमन लिपीत लिहिण्याची पद्धत आहे.

आर्थिक समृद्धीबरोबरच न्यूझीलंडमध्ये एकोणिसाव्या शतकापासून साहित्य आणि संस्कृती यांचाही विकास होऊ लागला आहे. न्यूझीलंडच्या साहित्येतिहासास सॅम्युएल मार्झडेन (१७६५–१८३८) या मिशनऱ्यापासून सुरुवाती झाली. त्यात पत्रे व नियतकालिके यांद्वारे जे काही लिहिले ते संकलित स्वरूपात १८३२ मध्ये प्रसिद्ध झाले; त्याला न्यूझीलंडचे गद्य महाकाव्य म्हणतात. यानंतरचे समकालीन दोन लेखक म्हणजे ऑगस्टस अर्ल आणि जे. एस्. पोलाक यांनी नॅरेटिव्ह ऑफ ए नाइन मंथ्‌‌स रेझिडेन्स इन न्यूझीलंड (१८३२) आणि न्यूझीलंड (१८३८) हे अनुक्रमे दोन ग्रंथ लिहिले. त्यानंतर काही वर्षांनी ई. जे. वेकफील्ड याने अ‍ॅड्व्हेंचर इन न्यूझीलंड (१८४५) हे सुरेख पुस्तक लिहिले. अर्नेस्ट डीफेनबाख आणि जी. एफ्. अँगस यांनी न्यूझीलंडचा इतिहास आणखी विस्तृतपणे मांडला. त्यानंतर मायथॉलॉजी अँड ट्रॅडिशन्स ऑफ द न्यूझीलंडर्स (१८५४) हे सर जॉर्ज ग्रेचे पुस्तक अधिक लोकप्रिय झाले.

जॉन गॉर्स्टने प्रथमच माओरी किंग (१८६४) हे पुस्तक लिहून माओरींसंबंधी ऐतिहासिक माहिती सांगितली. सॅम्युएल बटलरची फर्स्ट यिअर इन द कँटरबरी सेटल्‌मेंट (१८६३) आणि मेरी अ‍ॅन बार्करची स्टेशन लाइफ इन न्यूझीलंड (१८७०) या दोन कादंबऱ्यांत मेंढपाळ जीवनासंबंधी वर्णन असून, पहिल्या कादंबरीची दुसरी ही एक गोड पुरवणी आहे. तथापि ए ख्रिसमस केक इन फोर क्‍वॉटर्स (१८७२) हिला न्यूझीलंडच्या साहित्यातील पहिली कांदबरी म्हणून मान्यता मिळाली. यानंतर फिलॉसॉफर्स डिक (१८९१) किंवा सोन्याचा शोध लागल्यानंतर लिहिल्या गेलेल्या काही रोमांचकारी कथा यांनी न्यूझीलंडच्या साहित्याला थोडी झलक आली. तथापि सामाजिक क्षेत्रात एडिथ ग्रॉसमन (नी सर्ल) यांसारख्या स्त्रियांनी लिहिलेल्या कादंबऱ्या अधिक गाजल्या व लोकप्रिय झाल्या. आंतरराष्ट्रीय इंग्रजी साहित्यिकांत कॅथरिन मॅन्सफील्ड व नाइओ मार्श (१८९९ – ) यांना संवेदनाक्षम लघुकथा लेखक म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली.

विसाव्या शतकात न्यूझीलंजने एकामागून एक अशा क्रांतिकारक सामाजिक सुधारणा केल्या. त्यांचा परिणाम साहित्यावर झाल्याशिवाय राहिला नाही. व्ही. पी. रीव्ह्झ (१८५७–१९२२), कॅथरिन मॅन्सफील्ड (मरी बीचम) (१८८८–१९२३) या लेखक-लेखिकांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी रीव्ह्झचे द लाँग व्हाइट क्‍लाउड व मॅन्सफील्डची प्रेल्यूड, द गार्डन पार्टी, अ‍ॅट द बे हे कथासंग्रह फार लोकप्रिय झाले. तसेच जेन मांडरची स्टोरी ऑफ न्यूझीलंड रिव्हर (१९२०) ही कादंबरी विक्रीच्या दृष्टीने आकर्षक ठरली. याचबरोबर विल्यम सॅचेलच्या द लँड ऑफ द लॉस्ट (१९०४) व द ग्रीन स्टोन डोअर (१९१४) या ऐतिहासिक कादंबऱ्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली.

या काळात व्हिक्टोरियन पद्य वाङ्‍मयप्रकाराची बरीच देवाण-घेवाण इंग्‍लंडमधून येथे झाली आणि पोएम्स अँड साँग्झ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. टॉमस ब्रॅकेन (१८४३–९८) हा अत्यंत लोकप्रिय कवी; परंतु जेसी माकाय (१८६४–१९३८) या कवयित्रीच्या पोवाड्यांत देशभक्ती व काव्य तसेच लालित्य अधिक आढळते. तिचे लँड ऑफ मॉर्निंग आणि बेरिअल ऑफ सर जॉन मॅकेंझी (१९०९) हे काव्यसंग्रह उल्लेखनीय आहेत. अमेरिकन प्रकाशक मिळविणारी आयलीन डगन ही न्यूझीलंडची पहिली कवयित्री होय.

दुसऱ्या महायुद्धानंतर न्यूझीलंडमध्ये स्वतंत्र रीत्या फार थोडे लेखन झाले. त्यावर आर्थिक मंदीचा मोठा परिणाम झाला आणि कथा-कादंबऱ्यांऐवजी तांत्रिक विषय व अर्थकारण यांवर पुस्तके लिहिली गेली. काही महत्त्वाच्या पुस्तकांत पासपोर्ट टू हिल (१९३६), नॉर द यिअर्स कंडेम (१९३८), द गॉड्‍‍‍विट्स फ्लाय (१९३८) या पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यानंतरची ऑलिव्हर डफचे न्यूझीलंड नाऊ (१९४१), एम्.एच्. होलक्राफ्टचे द डीपनिंग स्ट्रीम (१९४०) व दे वेटिंग हिल (१९४३) हे न्यूझीलंडच्या स्वतंत्र सांस्कृतिक स्थितीचे वर्णन करणारे ग्रंथ असून त्यांत तेथील लोकांची स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्मिता जागृत झालेली दिसते.

कला व क्रीडा : न्यूझीलंडमध्ये प्रथम आलेल्या यूरोपीय लोकांत बहुतेक नकाशे काढणारे होते. त्यानंतर काही फ्रेंच कलाकारांनी न्यूझीलंडला भेट दिली आणि चित्रे रेखाटली. ती सुरेख आहेत. वसाहतपूर्वकाळात ऑगस्टस अर्ल हा प्रसिद्ध चित्रकाल झाला. त्याने माओरींची काही वैशिष्ट्येपूर्ण चित्रे चितारली (१८२७). पुढे माओरी व त्यांचे वैविध्यपूर्ण जीवन हा चित्रकारांचा अनेक वर्षे आवडता विषय होता. जॉन अलेक्झांडर गिलफिल्‌न (१७९३–१८६३), जी. एफ्. अँगस (१८२२–१८८६), वॉल्टर राइट (१८६६–१९३३), गॉटफ्रीट लिंडाउर (१८३९–१९२३), चार्ल्स फ्रेडरिक गोल्डी हे काही चित्रकार प्रसिद्ध आहेत. नंतरच्या काळातील फ्रान्सिस हॉज्‌किनचे माओरी वुमन अँड चाइल्ड (१९००) हे चित्र फार लोकप्रिय झाले. ते सध्या नॅशनल गॅलरीमध्ये ठेवले आहे. पुढे चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी क्राइस्टचर्च, ऑक्लंड, डनीडन येथे कलानिकेतने स्थापन झाली. एक डच कलाकार, व्हेल्डेन (१८३४–१९१३) क्राइस्टचर्च येथे स्थायिक झाला. त्यानंतर विसाव्या शतकात न्यूझीलंडच्या कलांचा विकास होत गेला. न्यूझीलंडमध्ये सांस्कतिक कार्याच्या विकासासाठी नवीन विद्यालये स्थापन झाली. न्यूझीलंडच्या कलात्मक जीवनावर ब्रिटिशांप्रमाणेच फ्रेंच, डच व अमेरिकन कलाकारांची छाप दिसते.

तेथील मूर्तिकला, वास्तुकला व इतर कलाकुसरीची कामे चित्रकलेच्या मानाने कमी महत्त्वाची आहेत. माओरींच्या काही मूलभूत कला सोडल्या, तर उर्वरित कलाविष्कारात यूरोपीय कलांची छटा प्रामुख्याने आढळते. न्यूझीलंडच्या अनेक कलाकारांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादिली आहे. त्यांपैकी डेव्हिड लो (१८९१ – १९६३) हा व्यंग्यचित्रकार व फ्रान्सिस व्हॉज्‌किन (१८६९–१९४७) यांची अनेक देशांत अद्यापि चित्र आढळतात. माओरींनी काष्ठशिल्पांत प्रावीण्य मिळविलेले असून त्यांची ही कला जगप्रसिद्ध आहे. ह्या कलेचे प्रदर्शन त्यांच्या लहान होड्यांवर तसेच चर्च व घरे येथे पहावयास मिळते. माओरी विणकामातही तरबेज असून ते ताहाच्या दोऱ्याने विणकाम करतात व कपड्यांवर विविध भौमितिक आकृत्या व मोहक आकृतिबंध भरतात.

न्यूझीलंडमध्ये सांस्कृतिक क्षेत्रा अभिनव कार्य करणाऱ्या तसेच कलेची उपासना करणाऱ्या अनेक मान्यवर संस्था आहेत. त्यांपैकी क्वीन एलिझाबेथ सेकंड आर्ट्‍‍स कौन्सिल, म्यूझिक फेडरेशन ऑफ न्यूझीलंड, न्यूझीलंड बॅले अँड ऑपेरा ट्रस्ट, न्यूझीलंड सिंफनी ऑर्केस्ट्रा या संस्था महत्त्वाच्या असून त्या स्थापत्य, चित्रकला, संगीत, नृत्य इ. ललित कलांची जोपासना करतात.

विविध देशांतून न्यूझीलंडमध्ये येणारे लोक, विशेषतः यूरोपीय लोक, त्यांची राहणी, देशाचे हवामान या सर्वांच्या प्रभावामुळे न्यूझीलंडमध्ये विविध खेळ आढळतात. यूरोपीय देशांत खेळले जाणारे बहुतेक सर्व खेळ न्यूझीलंडमध्ये खेळले जातात; तथापि न्यूझीलंडचे म्हणून जे खेळ आज परिचित आहेत, त्यांत मासे मारणे व हिंस्र प्राण्यांची शिकार हे महत्त्वाचे आहेत. रग्बी हा ‌अत्यंत लोकप्रिय खेळ असून तो हिवाळ्यात खेळला जातो. त्याखालोखाल क्रिकेट हा महत्त्वाचा आहे. यांशिवाय घोड्यांच्या शर्यती, गोल्फ, टेनिस, मुष्टियुद्ध, बर्फावरून स्केटिंग, बास्केटबॉल, बेसबॉल हे इतर खेळ आहेत. ऋतुमानाप्रमाणे यांतील अनेक खेळ खेळले जातात. उन्हाळी खेळांत बेसबॉल, गोल्फ तसेच विविध शर्यतींचे व मैदानी खेळ न्यूझीलंडमध्ये लोकप्रिय आहेत. हॉकी फार लोकप्रिय होऊ लागला आहे. १९७६ च्या माँट्रिऑल ऑलिंपिकमध्ये न्यूझीलंडने हॉकीचे सुवर्णपदक मिळविले. मच्छीमारी हा मनोरंजनाचा विषय असून तो सर्वत्र, विशेषतः किनाऱ्यावर, फार लोकप्रिय आहे. यांशिवाय मोटारशर्यती, नौकाशर्यती, गिर्यारोहण इत्यादींनाही महत्त्व आहे.

शिक्षण

न्यूझीलंडमध्ये शिक्षण धर्मनिरपेक्ष व मोफक असून ६ ते १४ वर्षे वयापर्यंतच्या सर्व मुलांना सक्तीचे आहे. तथापि अनेक मुले वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बालोद्यानात प्रवेश घेतात. १९६८ मध्ये शासनाने दरडोई ६३·२२ न्यूझीलंड डॉलर एवढा खर्च विद्यार्थ्यांवर केला. प्राथमिक व माध्यमिक विद्यालये जिल्हा शिक्षण मंडळांतर्फे तसेच विद्यालयीन समित्यांद्वारे चालविली जातात. या सर्वांवर शिक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. बालोद्याने खाजगी व्यक्ती अथवा स्वेच्छा संघटनांद्वारे चालविली जातात व सरकार त्यांना काही प्रमाणात मदत देते. प्राथमिक शिक्षण प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतून दिले जाते, तर माध्यमिक शिक्षण माध्यमिक वा तंत्रशाळांतून दिले जाते. प्रौढ शिक्षणाचे तसेच उच्च शिक्षणाचे सर्व अध्यापन विद्यापीठांतून होते. न्यूझीलंडमध्ये एकूण सहा विद्यापीठे आहेत (१९७६). त्यांपैकी ऑक्लंड विद्यापीठ, व्हिक्टोरिया विद्यापीठ, कँटरबरी विद्यापीठ, ओटागो विद्यापीठ, मॅसी विद्यापीठ व वाइकॅटो विद्यापीठ ही पूर्णार्थाने विद्यापीठे असून, लिंकन कृषिमहाविद्यालयास विद्यापीठीय दर्जा देण्यात आला आहे. या विद्यापीठांतून १९७६ मध्ये ४४, ७४२ विद्यार्थी शिकत होते.

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शासनाकडून संपूर्ण साहाय्य मिळते. काही भागांत माओरी विद्यार्थ्यांकरिता विशेष प्राथमिक व माध्यमिक विद्यालये आहेत. तथापि इतर विद्यालयांतूनही त्यांना प्रवेश बंदी नाही. प्रत्यक्षात जवळजवळ ६०% माओरी मुली इतर शाळांतून शिकतात. अपंगांसाठी स्वतंत्र विद्यालये असून, दूरवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पत्रद्वारा शिक्षण घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी पत्रद्वारा शिक्षण देणारी स्वतंत्र विद्यालये आहेत. बहुतेक विद्यालये व महाविद्यालये सहशिक्षणाचा पुरस्कार करतात. मात्र काही विद्यालये रोमन कॅथलिक चर्चने चालविली आहेत. १९६७ मध्ये २,१२० प्राथमिक विद्यालये, ३८० माध्यमिक विद्यालये, ६ तांत्रिक शिक्षण संस्था, ९ अध्यापक प्रशिक्षण विद्यालये होती. यांशिवाय माओरींसाठी ११४ विद्यालये होती. दुसऱ्या महायुद्धानंतर शिक्षणप्रसाराचे काम झपाट्याने झाले असून जवळजवळ ९५% विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेतात. १९७४ मध्ये प्राथमिक विद्यालयांत ४,४१,४६२ विद्यार्थी शिकत होते, तर माध्यमिक विद्यालयांत २,०८,५९६ विद्यार्थी होते.

न्यूझीलंडमध्ये एकूण ३६५ ग्रंथालये होती (१९६७). त्यांपैकी १५२ सार्वजनिक असून त्यांचा खर्च सार्वजनिक देणग्यांमधून तसेच सरकारच्या मदतीवर चालतो. ऑक्लंड, वेलिंग्टन, क्राइस्टचर्च, डनीडन येथील ग्रंथालये मोठी आणि आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज अशी आहेत. इतर ग्रंथालयांत संसद ग्रंथालय व अलेक्झांडर टर्नबुल ग्रंथालय ही प्रसिद्ध आहेत. ग्रंथालयांशिवाय देशात एकूण ३८ कलावीथी व २७ वस्तुसंग्रहालये असून, त्यांपैकी ऑक्लंड येथील कलावीथी, कँटरबरी संग्रहालय व क्राइस्टचर्च येथील पुरातत्त्वीय व मानसशास्त्रीय संग्रहालय ही प्रसिद्ध आहेत. ऑक्लंड येथील कलावीथीत यूरोपीय चित्रकलेचे उत्तम नमुने व भिन्न कालखंडांतील निरनिराळ्या कलाकृती पहावयास सापडतात.

न्यूझीलंडमध्ये वृत्तपत्रांना पूर्ण स्वातंत्र्य असून अनेक लहानमोठी दैनिके प्रसिद्ध होतात. परंतु त्यांपैकी विविध शहरांतून प्रसिद्ध होणाऱ्या अठरा दैनिकांचा खप (९,८९,२७२) भरपूर असून लहान शहरांतूनही ३३ वृत्तपत्रे (१९७६) निघतात. यांशिवाय रविवारी प्रसिद्ध होणारी साप्ताहिके तसेच पाक्षिक आणि द्विपाक्षिक नियतकालिके निघतात. न्यूझीलंड हेरल्ड, ऑक्लंड स्टार, ईव्हनिंग पोस्ट, द डोमिनियन, द प्रेस, ओटागो डेली टाइम्स, ईव्हनिंग स्टार ही काही प्रमुख वृत्तपत्रे होत. देशातील तसेच परदेशांतील वार्ता संकलित करणाऱ्या अनेक वृत्त-अभिकरण संस्था आहेत. त्यांपैकी न्यूझीलंड प्रेस असोसिएशन, साउथ पॅसिफिक न्यूज सर्व्हिस, रॉयटर्स या प्रमुख होत. न्यूझीलंड प्रेस कौन्सिल, न्यूजपेपर पब्लिशर्स असोसिएशन ऑफ न्यूझीलंज व कॉमनवेल्थ प्रेस युनियन या वृत्तपत्रांच्या इतर काही संस्था आहेत.

महत्त्वाची स्थळे

प्रतिवर्षी न्यूझीलंडमध्ये हजारो प्रवासी पर्यटनासाठी येतात. न्यूझीलंडचे नैसर्गिक सौंदर्य आणि विविध खेळ यांचे आकर्षण असंख्य प्रवाशांना आहे. देशातील पर्वत, हिमनद्या, सरोवरे, शीघ्र प्रवाही नद्या, गरम पाण्याचे झरे, ज्वालामुखी पर्वत या मनोरंजनाच्या सौंदर्यस्थळी प्रवाशांना सहज जाता येत असून त्यांचे सौंदर्य जवळून पाहता येते. मच्छीमारीसाठी न्यूझीलंड जगात प्रख्यात आहे. सुंदर सरोवरे, धबधबे, थंड, समशीतोष्ण आणि उकळणाऱ्या पाण्याची डबकी, गरम पाण्याचे झरे (गायझर), चिखलाचे ज्वालामुखी पर्वत इ. पाहण्यासाठी पुष्कळ प्रवासी येतात. रोटोरूआ सरोवराकाठी सरकारी आरोग्यधाम आहे, तर ताउपो सरोवराजवळ आणि इतर ठिकाणी खाजगी स्नानगृहे आहेत.

दक्षिण बेटात उष्णोदकाची सरोवरे आहेत व हॅमर मैदानात सरकारी आरोग्यधाम आहे. संधिवात, त्वचारोग यांसारख्या रोगांवर उष्णोदकाने गुण येतो, असा अनेकांचा अनुभव आहे. टास्मन व मर्चिसन या मोठ्या हिमनद्या, सदर्लंड धबधबा व ओटिरा नावाचा सुंदर बोगदा ही आणखी काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. स्ट्यूअर्ट बेटावरील निसर्गसौंदर्यही पाहण्यासारखे आहे. ऑक्लंडजवळ वाइटोमो येथे अनेक गुहा आहेत. त्यांत असंख्य कोनकिडे (काजवे) असतात. त्यांचा चमकणारा प्रकाश तेथील खडकांवर परावर्तित होतो, त्यामुळे गुहांमध्ये मोहित करणारा पऱ्यांच्या दुनियेचा अभ्यास निर्माण होतो. १९७४–७५ मध्ये न्यूझीलंडला ३,६१,१९४ प्रवाशांनी भेट दिली.

 

संदर्भ : 1. Jackson, Keith; Harre, John, New Zealand, New York, 1969.

2. Mclintock, A. H., Ed. An Encyclopaedia of New Zealand, 3 Vols., 1966

3. Oliver, W. H. The Strory of New Zealand, London, 1963.

4. Rowe, J. W.; Rowe, M. A. New Zealand, London, 1967.

5. Sinclair, K. A. History of New Zealand, New York, 1970.

सु. पुं पाठक / सु. र. देशपांडे

न्यूझीलंड ऑक्लंड : न्यूझीलंडची जुनी राजधानी.नवी राजधानी वेलिंग्टन येथील संसदभवन

भू-औष्णिक शक्ती-संयंत्र, वाइराकेई.

 

 

1

यांत्रिक पद्धतीने लोणी निर्मिती

किवी : न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी
तापेका माओरींची गणचिन्ह वास्तू, वाइही. कॅटरबरी परिसरातील आधुनिक मेंढपाळी पॅपकुरा गायझर, उत्तर न्यूझीलंड.

माओरींच्या काष्ठशिल्पाचा नमुना

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate