অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलयुक्‍त शिवार अभियानात अहमदनगर अव्‍वल

जलयुक्‍त शिवार अभियानात अहमदनगर अव्‍वल

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान या पथदर्शी कार्यक्रमास अहमदनगर जिल्ह्यात मिळालेला प्रतिसाद खऱ्या अर्थाने अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल. कर्जत-जामखेड या तालुक्यांची टंचाईग्रस्‍त तालुकेही पुसली गेलेली ओळख, जिल्हाभर भूजल पातळीत झालेली वाढ ही या अभियानाची मुख्य फलनिष्पत्ती मानावी लागेल. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी दिलेली सकारात्मक साथ, विविध यंत्रणातील समन्वय, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांची अभियानाच्या कामांवर असलेली नजर आणि तत्कालिन जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि आताचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी अभियान अंमलबजावणीला दिलेली गती आणि अभियान गावपातळीपर्यंत पोहोचण्यात प्रसारमाध्यमांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हे या अभियानाचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्याचा परिणाम आपला जिल्हा नाशिक विभागात अव्वल ठरला आहे.

अहमदनगर जिल्‍ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून 537 गावांची जलस्‍वंयपूर्ण गावाकडे तर हे यश पाहून 2017-18 या वर्षात 241 गावांनी जलयुक्‍त शिवार अभियानात सहभाग घेतला आहे. गावाशिवारात कामे पूर्ण केल्‍याने टंचाईशी सामना करणाऱ्‍या गावातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्‍या आहेत. 2015-16 या वर्षात 1 लाख 18 हजार 667 हेक्‍टर तर 2016- 17 या वर्षात 96 हजार 344 हेक्‍टर एवढी संरक्षित सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. 537 गावांत झालेल्‍या कामामुळे 1 लाख 7 हजार 505 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत पावसाचे पाणी गावांच्या शिवारातच अडविल्‍याने भूगर्भातील पाणीपातळीत एक ते तीन मीटरपर्यंत वाढ झाली आहे.

जानेवारी 2015 मध्‍ये थेट शिवारात कामाला सुरुवात झाली. दोन वर्षात या अभियानाने गती घेतली असून जलयुक्‍त शिवार अंतर्गत मिळालेल्‍या निधीतून टंचाईस्थितीत केलेल्या कामांमुळे 537 गावे जलस्‍वंयपूर्णतेच्‍या वाटेवर आहेत.

राज्यात सतत उद्भवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत 'जलयुक्त शिवार' अभियान राज्य शासनाने हाती घेतले आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री प्रा.राम शिंदे, जिल्‍हाधिकारी अभय महाजन यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्‍या जलयुक्‍त शिवार अभियानाला नगर जिल्ह्यात लोकचळवळीचे स्‍वरूप आले आहे.

प्रथम गावनिहाय भौगोलिक अभ्यास करण्‍यात आला, त्‍यानंतर गावांची निवड करण्‍यात आली. जिल्‍हा कृषी अधिक्षक पंडीत लोणारे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाचे सर्व अधिकारी टिम कामाला लागली. गावातील लोकसहभाग वाढावा यासाठी सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्‍थ-शेतकरी यांचा सहभाग घेत कामाला सुरवात झाली. गावात असणारे जुन्‍या बंधारांच्‍या दुरुस्तीपासून थेट नव्याने नाला खोलीकरणाची कामे हाती घेण्‍यात आली. गावातील शेतकऱ्‍यांचा सहभाग महत्‍वाचा ठरला. कामे करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली साइड देण्‍यासाठी ग्रामस्‍थ, शेतकरी पुढे आले.

ठळक कामे

गावांमध्ये नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण व गरज असलेल्या गावात नव्याने बंधारा खोलीकरणाचे काम हाती घेतले. 537 गावांचा सहभाग घेत कामे पूर्ण केली. ज्‍या गावात नाल्यांत गाळ साचला होता. त्‍या गावात गाळ काढून नाला खोलीकरण करण्यात आले. उत्तम साइड असलेल्या गावात नव्याने नाला खोलीकरण पूर्ण करण्यात आले. कामे झालेल्‍या गावातील प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. तांत्रिकदृष्‍ट्या पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावीत, असे नियोजन करण्‍यात आले होते. यासंदर्भात समन्वयाची जबाबदारी पाहणारे सबंधित गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी व ग्रामस्‍थ यांनी कामे वेळेत व दीर्घकालीन व्हावीत, यावर भर दिला.

शेतकरी आनंदला

पाणीटंचाई असलेली तसेच गेल्‍या तीन वर्षात टँकर सुरू असलेल्‍या व पन्‍नास टक्‍केच्‍यावर पाणलोटाची कामे न झालेल्‍या गावात जलयुक्‍त शिवार अभियान राबविण्‍याचा आराखडा समोर ठेऊन कृषी विभागाने 537 गावात थेट कामाला सुरूवात केली. निवडलेल्‍या गावातील पर्जन्‍यमान कमी होते. टंचाईची परिस्थिती अनुभवलेली ही गावे पूर्णपणे बदलली असा दावा नसला तरी गावशिवारातील वि‍हिरी पाण्‍याने डबडबल्‍यात. शेतीतील पिकपद्धती बदलू लागली. ‘जलयुक्‍त शिवार'च्या यशस्वी कामांमुळे बहुतांश गावांमध्ये पीकपद्धतीत बदल झाला आहे. बाजरी, भुईमुग आणि कांदा एवढीच पिके घेणारी गावे सोयाबीन, बटाटा, प्लॉवर, टोमॅटो व वाटाणा या भाजीपाला पिकाकडे वळू लागली आहेत. पाणी दिसून लागल्‍यामुळे आज या शेतकरी,ग्रामस्‍थ आणि महिलांच्‍या यांच्‍या चेहऱ्‍यावर एक समाधान असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसले.

21 हजार 558 कामे पूर्ण

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यातील 537 गावांत 23 हजार 834 कामांचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी 21 हजार 558 कामे पूर्ण झाली तर 2 हजार 276 कामे प्रगतीपथावर असल्‍याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

गावशिवारात हिरवाई

2015-16 वर्षात 279 गावे व 2016-17 या वर्षात 268 गावांत साकारलेल्या जलयुक्‍त शिवारमुळे सुमारे 2 लाख 15 हजार 11 हेक्‍टर एवढी संरक्षित सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी गावच्या शिवारातच अडविल्‍याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली, गावे जलस्वयंपूर्ण होण्यास मदत झाली. शेतीसाठी संरक्षित पाणी व गावातील विहिरींच्‍या पाणीपातळीत वाढ झाली. भाजीपाला पिके घेण्‍याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढू लागला. खरिपासोबतच रब्बी पिकांचे यशस्वी उत्पादन घेणे शक्‍य होईल व उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होईल. शेतकरी, ग्रामस्‍थ आता स्वतःहून पुढाकार घेत आहेत, गावशिवारातील पाणीपातळी वाढल्‍यामुळे नगारिकांचा उत्साह वाढला. जलयुक्‍तच्‍या कामापूर्वी तासभर चालणारा मोटरपंप आता दिवसभर चालविणे शक्‍य झाले आहे.

- गणेश फुंदे

माहिती स्रोत: महान्युज© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate