Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/13 19:49:14.186729 GMT+0530
शेअर करा

T3 2020/08/13 19:49:14.191522 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/13 19:49:14.216671 GMT+0530

मृदा संधारण

मृदा संधारण : मृदा संधारण म्हणजेच शेतजमिनीचे धुपीपासून संरक्षण करणे. शेतजमिनीचे प्रमख कार्य म्हणजे विविध पिके निर्माण करणे. त्यासाठी शेतजमिनींचा योग्य वापर करून तिचा कस कायम राखणे अगत्याचे ठरते.

मृदा संधारण म्हणजेच शेतजमिनीचे धुपीपासून संरक्षण करणे. शेतजमिनीचे प्रमख कार्य म्हणजे विविध पिके निर्माण करणे. त्यासाठी शेतजमिनींचा योग्य वापर करून तिचा कस कायम राखणे अगत्याचे ठरते; परंतु अनेक कारणांमुळे जमिनीची उत्पादनक्षमता घटते आणि ती राखण्यासाठी जे जे उपाय योजिले जातात, त्या सर्वांचा समावेश मृदा संधारणाखाली होतो. शेतजमिनीची सुपीकता तिच्या वरच्या थरांतील मातीच्या सूक्ष्म कणांवर अवलंबून असते म्हणून त्यांचे संवर्धन करणे ही महत्त्वाची बाब ठरते.

जमिनीतील अशा सूक्ष्म क्रियाशील कणांचा व्यय अनेक कारणांनी होतो. त्यास जमिनीची धूप असे म्हणतात. पावसाच्या माऱ्याने, तसेच वाऱ्याच्या झोताने आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहगतीमुळे हे सूक्ष्म कण, तसेच माती वाहून नेली जाते. सर्वसाधारणपणे २·५ सेंमी.जाडीचा मातीचा थर तयार होण्यास सु. ४०० ते १,००० वर्षांचा काळ लागतो. जमिनी नैसर्गिक आवरणाखाली राखल्यास माती वाहून जाण्याची क्रिया मंद होते आणि त्यामुळे नैसर्गिक समतोल राखला जातो; परंतु मानवाच्या गरजा सतत वाढत्या असल्यामुळे नवीन नवीन जमिनी लागवडीखाली आणण्यात आल्या व त्यासाठी जमिनीवरील नैसर्गिक आवरणे दूर करण्यात आली. जंगलतोड झाली, गवती राने नांगरली गेली आणि पर्यायाने जमिनीची धूप होऊ लागली व तिचा कस कमी कमी होऊन उत्पादनक्षमता घटू लागली.

अमेरिकेत व भारतात झालेल्या संशोधनावरून असे आढळून आले की, धुपीमुळे दरसाल दर हे. सु. १२५ टन माती वाहून जाते. कधीकधी तर हे प्रमाण ३०० टनांपर्यंत गेल्याचे आढळून आले. अशा रीतीने निसर्गाने केलेल्या शेकडो वर्षांच्या कार्याचा नाश अल्पकाळातच होतो. अशी अमर्यादित धूप होत राहिल्यास वाढत्या लोकसंख्येच्या पोषणाच्या बाबत फार गंभीर समस्या निर्माण होतील. अशा धुपीमुळे अवर्षणग्रस्त भागांत अवर्षणाचे प्रमाण वाढू लागले आहे. नद्यानाल्यांची पात्रे गाळाने भरल्यामुळे व मोठमोठ्या पुरांमुळे आर्थिक व जीवित हानीचे प्रमाण वाढू लागले आहे.

अमेरिकेत ओहायओ राज्यात पुरामुळे पुष्कळ जीवित व वित्त हानी झाली. त्यामुळे जनतेचे व शासनाचे लक्ष या राष्ट्रीय समस्येकडे वेधले गेले. १९१४ मध्ये मिआमी मृदा संधारण (पूर नियंत्रण) कायदा तयार करण्यात आला व त्याची लगेच अंमलबजावणी सुरू झाली. कदाचित हाच मृदा संधारणशास्त्राचा पाया म्हणावा लागेल. १९२० पासून एच्. एच्. बेनेट या अमेरिकन शास्त्रज्ञांनी या विषयावरील संशोधनास गती दिली व या शास्त्राचा विकास केला. त्यांच्याच प्रयत्नामुळे जमिनीची धूप ही एक राष्ट्रीय समस्या मानण्यात आली व अमेरिकन संसदेने १९३५ चा मृदा संधारण कायदा संमत करून राष्ट्रीय स्तरावर मृदा संधारण सेवा सुरू केली.

भारतात या कामाची सुरुवात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाली व प्रत्येक टप्प्यासाठी सुधारणा करावयाचे क्षेत्राचे लक्ष्य ठरविण्यात आले आणि त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात झाला व ६० लाख हे. क्षेत्राचे लक्ष्य ठरविण्यात आले.

महाराष्ट्रात मृदा संधारणाचा कायदा १९४२ मध्ये तयार करण्यात आला व पुढे १९४८ च्या पुरवणी कायद्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी भूसुधारणा मंडळे कायम करण्यात आली. मृदा संधारणाच्या कामाची सुरुवात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर सर्वप्रथम झाली आणि त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसादेखील चांगला मिळाला. तत्पूर्वीदेखील काही शेतकऱ्यांनी आपल्या मर्यादित क्षेत्रावर स्वतःच्या अनुभवाच्या आधारे काही ताली घातल्या, तसेच काही भात खाचरे तयार केली; पंरतु या कामासाठी लागणारी शास्त्रीय बैठक आखण्यासाठी धुपीसंबंधीचे संशोधन कार्य सुरू केले गेले व मृदा संधारण्याच्या परिस्थितीनुसार विविध तंत्रे विकसित केली गेली.

मृदा संधारणाच्या कार्याचे स्वरूप धुपीच्या प्रकारावर व प्रमाणावर अवलंबून असल्याकारणाने, धुपीबद्दलची माहिती व त्या बाबत झालेल्या संशोधनाचा आढावा खाली दिला आहे.

जमिनीची धूप

पावसाच्या पाण्याच्या माराने, पाण्याच्या वेगवान प्रवाहाने तसेच वाऱ्याच्या झोताने जमिनीतील क्रियाशील सूक्ष्म कण, तसेच माती वाहून नेली जाते व या क्रियेस शेतजमिनीची धूप म्हणतात. धुपीमुळे होणारी मातीची घट थांबविणे अत्यंत जरूरीचे आहे. ह्याबाबत जर दुर्लक्ष झाले, तर मानवी संस्कृती धोक्यात येण्याची शक्यता असते. इतिहासात अशी पुष्कळ उदाहरणे दाखविता येतील.

मेसोपोटेमियामधील सु. ५,००० वर्षांपूर्वी अत्यंत भरभराटीत असलेले किश हे शहर वाळूच्या ढिगाखाली गडप झाले. तसेच बॅबिलोनियामधील शेतीस पाणी देण्याकरिता काढलेले पाट गाळांनी भरून गेले व बागायती जमिनी वाया गेल्या व शेवटी ते राज्य नष्ट झाले. अशा रीतीने जमिनीची प्रचंड धूप झाल्याने त्या नापिक झाल्या आणि परिणामी शहरे, राज्ये व संस्कृती लोप पावल्या. भारतात मोहें-जो-दडो व हडप्पा या ठिकाणीही अशी परिस्थिती निर्माण होऊन त्या संस्कृती लोप पावल्या.

नैसर्गिक परिस्थितीत जमिनीवरील वनस्पतींच्या आवरणामुळे माती वाहून जाण्याची क्रिया फार मंद असते. अशा परिस्थितीत जमिनीची जी झीज होते तीस नैसर्गिक झीज अथवा धूप म्हणतात आणि ती मानवी हस्तक्षेपाविरहित होणारी धूप असते. अशा रीतीने होणाऱ्या धुपीचा वेग जर नवीन माती तयार होण्याच्या वेगापेक्षा कमी असेल अगर सारखाच असेल, तर नैसर्गिक समतोल राखला जातो. नैसर्गिक झीज क्रियेमुळे एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणी जाऊन साठते व त्यामुळे गाळाच्या जमिनी बनतात.

मानवाने शेती करण्यास सु. ७,००० वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि त्यासाठी जमिनीवरील नैसर्गिक आवरण हलके हलके दूर करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस मानवाची गरज फार थोडी असल्याने त्याच्या हस्तक्षेपाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला नाही; परंतु लोकसंख्या जसजशी वाढत गेली आणि मानवी गरजांचे प्रमाण वाढू लागले, तसतशी नवीन जमीन लागवडीखाली आणण्यात आली. त्यासाठी वनक्षेत्रावर आक्रमण करून जंगलतोड झाली, गवती रानातील गवत काढून नंतर त्यांची नांगरट करण्यात आली. अशा रीतीने जसजसे नैसर्गिक आवरण कमी होत गेले व मानवी हस्तक्षेप वाढत गेला तसतशी जमिनीची धूप मोठा प्रमाणात होऊ लागली आणि त्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या. या मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या धुपीस ‘गतिवर्धनशील धूप’ असे म्हणतात. या वेगवर्धक धुपीचा इतका प्रचंड वेग असतो की, निसर्गाने जमीन बनविण्याचे केलेले हजारो वर्षांचे कार्य काही दिवसांतच नष्ट होते. अशा बेलगाम धुपीमुळे निसर्गाचा समतोल बिघडतो आणि त्यांचे दुष्परिणाम वर विशद केल्याप्रमाणे दिसून येत आहेत. जमिनीच्या धुपीच्या समस्येस यशस्वीपणे तोंड देण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी तिच्या विविध कारणांविषयी व त्यांमुळे होणाऱ्या धुपीच्या प्रमाणाबाबत संशोधन केले आणि त्याचे गांभीर्य शेतकऱ्यांस पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच ही हानी टाळण्यासाठी अगर तिचे प्रमाण कमी करण्यासाठी काही उपाय शोधून काढले व त्यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला.

महाराष्ट्र राज्यातील जमिनीच्या धुपीच्या प्रमाणाविषयी अगदी काटेकोरपणे पहाणी झालेली नसली, तरी लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या सु. दोन तृतीयांश धूप कमीअधिक प्रमाणात झालेली आहे. धूपमापनाचा अभ्यास काही निवडक पाणलोट क्षेत्रांवर केला गेलेला असून त्याची माहिती कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

धुपीचे परिणाम फार हानिकारक होतात. महत्‌प्रयासाने बांधलेली धरणे गाळाने भरून जातात आणि त्याची ओलिताची क्षमता कमीकमी होत जाते. पृष्ठभागावरील सुपीक माती वाहून गेल्यामुळे जमिनी नापीक बनतात. जमिनीच्या गुणधर्मांवर धुपीचे दुष्परिणाम होतात व त्यांची कल्पना कोष्टक क्र. २ मध्ये महाराष्ट्र व कर्नाटक येथील जमिनींसंबंधी दिलेल्या माहितीवरून येईल. धुपलेल्या जमिनीत चिकणमातीचे प्रमाण कमी होते, तसेच अधिशोषित (मातीच्या कणांच्या पृष्ठभागांवर धरून ठेवलेल्या व विनिमय होऊ शकणाऱ्या) कॅल्शियमाचे प्रमाण खूप घटलेले दिसते. जमिनीची सर्वोच्च जलधारणक्षमता कमी झालेली दिसते. अशा रीतीने जमिनीची स्वाभाविक सुपीकता कमी होते. असंरक्षित जमिनीतून दरसाल दर हे. सु. १२५–३०० टन माती वाहून जाते. तसेच सर्वसाधारण जमिनीतून दर हेक्टरी दर वर्षी सु. १२५ किग्रॅ. नायट्रोजन, सु. १३० किग्रॅ. फॉस्फेट व सु. १,१००किग्रॅ. पोटॅश एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक-पोषक द्रव्यांचा व्यय होतो.

धुपीचे प्रकार

पाणी, वारा, बर्फ आदि नैसर्गिक शक्तींच्या अखंड आघातामुळे जमिनीची धूप होते; परंतु वाहत्या पाण्यामुळे ही धूप अधिक होते. धुपीचे प्रमुख तीन प्रकार पडतात. ते येणेप्रमाणे (१) सालकाढी धूप; (२) ओघळपाडी धूप व (३) प्रवाहकाठपाडी धूप.

 • सालकाढी धूप : एकतर्फी व कमी उताराच्या जमिनीची अशी धूप होते. पावसाच्या माऱ्याने मातीचे कण विलग होतात आणि पृष्ठभागावरून पाणी वाहू लागताच त्याबरोबर हे मातीचे कण वाहून नेले जातात. असे जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी गढूळ असते. अशा प्रकारच्या धुपीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक मातीचा पातळ थर दरसाल वाहून जातो व त्यामुळे जमीन निकस बनते. वर्षानुवर्षे अशी माती वाहून गेल्यामुळे मातीचा मूळ रंग बदलून तो भुरकट होतो व कालांतराने जागोजागी मुरूम उघडा पडतो.

कोष्टक क्र.१ महाराष्ट्रातील काही निवडक पाणलोट क्षेत्रांतील धुपीचे प्रमाण

विभाग

अभ्यास केंद्राची संख्या

पहाणी केलेले

एकूण क्षेत्र

(हेक्टर)

धुपलेल्या क्षेत्राचे एकूण क्षेत्राशी शेकडा प्रमाण

थोड्या

प्रमाणात

धूप क्षेत्र

साधारण

धूप

झालेले

क्षेत्र

जास्त

धूप झालेले

क्षेत्र

माती

साच-लेले

क्षेत्र

झीज

झालेले एकूण

क्षेत्र

सीना नदीच्या खोऱ्यातील प्रदेश

११

७,२७०

२७

४५

१९

७२

भीमा नदीच्या खोऱ्यातील प्रदेश

५,६३८

४२

३७

१४

७९

कृष्णा, ढोण आणि घटप्रभा नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश

५,२८३

३५

३५

२३

५८

मलप्रभा नदीच्या खोऱ्यातील प्रदेश

१०

७,४९३

१५

१५

२२

८०

कोष्टक क्र. २ धुपीमुळे जमिनीच्या गुणधर्मांवर होणारे दुष्परिणाम

जमिनीचे गुणधर्म

धूप न झालेली जमीन

थोड्या प्रमाणात धूप

झालेली जमीन

जास्त प्रमाणात धूप

झालेली जमीन

कर्नाटक

महाराष्ट्र

कर्नाटक

महाराष्ट्र

कर्नाटक

महाराष्ट्र

चिकण मातीचे प्रमाण%

६२

४३

५२

४३

४४

२७

अधिशोषित कॅल्शि-यमाचे प्रमाण %

५०

५९

४३

४९

४४

२५

सर्वोच्च जलधारणा क्षमता प्रमाण%

७०

७१

६६

७१

५६

५५

मोठ्या वाऱ्याच्या झोतामुळे अगर वादळामुळे आच्छादनाविरहित जमिनीच्या पृष्ठभागावरील मातीचे सूक्ष्म कण उडून इतरत्र नेले जातात. वाळवंटी प्रदेशांत अशी धूप मोठ्या प्रमाणावर होते.

 • ओघळपाडी धूप : पावसाचे साचलेले पाणी जास्त झाले म्हणजे ते प्रवाहाच्या रूपाने जमिनीवरून वाहू लागते व प्रथम लहान लहान ओघळी तयार होतात. पुढे त्यांच्यामधून वर्षानुवर्षे पाण्याबरोबर माती वाहून जाते आणि ह्या ओघळी आकारमानाने मोठ्या होतात व त्यांचे रूपांतर मोठ्या घळीत होते. अशा रीतीने शेतात घळीओघळींचे एक मोठे जाळेच पसरते व त्यामुळे मशागत करणे दुरापास्त होते आणि जमिनी पडीत राहतात.
 • प्रवाहकाठपाडी धूप : घळीमधूनच पुढे नाल्यांची उत्पत्ती होते. त्यांच्याद्वारे व जमिनीतून जादा पाणी काढून देण्यासाठी काढलेल्या चरांमुळेदखील जमिनीची धूप होते. नाल्यांच्या व चरांच्या बाजू ढासळून ती माती प्रवाहाबरोबर वाहून जाते, तसेच त्यांचे तळदेखील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे खरडून जातात. अशा रीतीने नदीनाल्याकाठच्या जमिनी प्रवाहाच्या वेगामुळे धुपून जातात व यास प्रवाहकाठाची धूप म्हणतात.

धुपीचे कारक

धुपीचे प्रमाण आणि तिची व्याप्ती जमिनीच्या उतारावर, पावसाच्या प्रमाणावर व तीव्रतेवर, तसेच जमिनीच्या गुणधर्मांवर आणि मशागतीच्या पद्धतींवर अवलंबून असते.

पावसाच्या थेंबांच्या माऱ्यामुळे मातीचे कण विलग होतात आणि हे विलग झालेले सूक्ष्म कण वाहत्या पाण्याबरोबर वाहून नेले जातात, धुपीचा वेग हा वार्षिक पर्जन्यमान, पावसाच्या वर्षावाचा वेग, जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग, पाणलोट क्षेत्र आदी प्रमुख बाबींवर अवलंबून असतो. पर्जन्यवर्षावाच्या प्रमाणात धूप होत असते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी आणि मातीची धूप यांबाबत महाराष्ट्र व कर्नाटक यांमधील एकूण चार संशोधन केंद्रांत केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष कोष्टक क्र. ३मध्ये दिले आहेत.

कोष्टक क्र. ३ पर्जन्यवर्षाव व त्याचा धुपीवर होणारा परिणाम

संशोधन केंद्र

वार्षिक पर्जन्यमान (सेंमी.)

जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून गेलेले पाणी (सेंमी.)

वाहून गेलेली माती

टन / हेक्टर

मांजरी

(पुणे जिल्हा)

६७·६६

१६·४७

५५·१८

सोलापूर

(सोलापूर जिल्हा)

६१·८५

११·९४

४४·५६

विजापूर

(विजापूर जिल्हा)

४७·७५

१०·६९

२२·४३

हगेरी

(बेल्लारी जिल्हा)

४७·३२

८·८६

११·७६

या कोष्टकावरून असे दिसते की, पावसाच्या प्रमाणावर धुपीचे प्रमाण अवलंबून असते; परंतु पाऊस किती पडला यापेक्षा किती तीव्रतेने पडला हेच धुपीच्या बाबतीत महत्त्वाचे आहे. सोलापूर केंद्रावर१९३७–३८ मध्ये एकूण पाऊस ६६·३२ सेंमी. पडला; परंतु १०३८–३९ मध्ये मात्र त्यापेक्षा २७·९४ सेंमी.ने कमी पाऊस पडलेला असतानादेखील ६३·४० टन माती जास्त वाहून गेली कारण पावसाची तीव्रता अधिक होती. सोलापूर केंद्रावर याबाबत सखोल संशोधन केले गेले आणि त्यावरून असे निदर्शनास आले की, जेव्हा एकाच दिवसात १·२७ सेंमी. पेक्षा कमी पाऊस पडतो तेव्हा धुपीचे प्रमाण ५·८% असते, तर जेव्हा पाऊस २·५४ ते ५·०८सेंमी. पडतो तेव्हा हे प्रमाण ८८% पर्यंत गेले. थोड्या वेळात जास्त पाऊस पडल्यामुळे पावसाचे पाणी शेताबाहेर वाहून जाते आणि या वाहून जाणाऱ्या पाण्याबरोबर ८० ते ९०% पृष्ठभागावरील माती फक्त एक किंवा दोन जोरदार सरींमुळे वाहून गेल्याचे आढळले. वाहून गेलेली माती व पाणी यांचे प्रमाण १ : ७ ते १ : १८ आढळले. पाऊस पडण्याचा वेग वाढला, तर धुपीचा वेग वाढतो. वाहणाऱ्या पाण्याची गती जर दुप्पट झाली, तर माती नेण्याची त्याची क्षमता ६४ पटींनी वाढते. पाणलोट क्षेत्र मोठे असल्यास पाणी जास्त साचते व वाहताना त्यास वेग येतो व पर्यायाने धूप अधिक प्रमाणात होते.

जमीन व जमिनीचा उतार यांवर धूप अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जास्त उतार असलेल्या जमिनीची धूप जास्त होते,कारण उतारावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग जास्त वाढतो. ज्या जमिनीमध्ये पाणी शोषण्याची क्षमता व धारण करण्याची क्षमता कमी असते अशा जमिनीत धुपीचे प्रमाण अधिक असते. जमिनीचा उतार व त्यावर घेतलेले पीक व मातीची धूप यांबाबत अमेरिकेत झालेल्या पाहणीचे निष्कर्ष कोष्टक क्र. ४ मध्ये दिले आहेत.

सोलापूर येथे अशाच प्रकारच्या केलेल्या प्रयोगान्ती असे आढळून आले की, २% उतारापेक्षा ४% उताराच्या जमिनीची धूप अधिक झाली व तेथे वाहून गेलेल्या पाण्याची घनतादेखील जास्त होती. भारी

पोताच्या व क्षारीय विक्रिया असलेल्या जमिनी धूप होऊ शकणाऱ्या असतात. कार्बनी पदार्थ भरपूर असलेल्या जमिनीची धूप त्यामानाने कमी होते.

कोष्टक क्र. ४ जमिनीचा उतार, तीवर घेतलेले पीक व मातीची धूप यांसंबंधी अमेरिकेत झालेल्या पाहणीचे निष्कर्ष.

जमिनीचा पोत

वार्षिक पर्जन्यमान (सेंमी.)

जमिनीचा उतार (%)

जमिनीत घेतलेले पीक

मातीची धूप (टन/हेक्टर)

संमिश्र कणांची चिकण माती (टेक्सस)

५२·७०

०·०

१·०

२·०

कपाशी

कपाशी

कपाशी

५·४३

१२·८४

१७·२९

संमिश्र कणांची पोयट्याची माती (ओहायओ)

९२·६१

८·०

१२·०

मका

मका

 

१४८·२०

१८०·८०

चिकण माती (टेक्सस)

८८·६५

२·०

४·०

मका

मका

२६·१८

८५·०८

वाळुसरा पोयटा (टेक्सस)

१०३·६८

१०९·२२

८·७

१६·५

कपाशी

कपाशी

६८·९१

१७७·८४

संमिश्र कणांची

मिसूरी)

१०२·५४

८८·३७

३·७

८·०

मका

मका

४८·६५

१६९·९४

जमिनीवरील आच्छादनाचा व मशागतीच्या पद्धतीचा मातीच्या धुपीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास मांजरी व सोलापूर येथे करण्यात आला व त्यांचे निष्कर्ष कोष्टक क्र. ५ मध्ये दिले आहेत. मशागतीचे विविध प्रकार व त्यांचा धूपीवर हो णाऱ्या परिणामांचा आढावा घेता असे दिसून येते की, जमिनीची कोणतीही मशागत न करता ती नैसर्गिक आच्छादनाखाली राखल्यास तेथे पावसाच्या पाण्याचा व्यय व धूप अत्यल्प प्रमाणात होते.

त्यांच्या खालोखाल बाजरीचे पिक घेतल्यास कमी प्रमाणात धूप होते. इतर मशागतीच्या पद्धतीत प्रचंड प्रमाणात माती वाहून गेल्याचे दिसते. थोडक्यात, उघड्या जमिनीपेक्षा पिकाखालील अगर गवताखालील जमिनीतून मातीची धूप थोडी होते म्हणून पडीत जमिनीचे धुपीपासून संरक्षण करण्यासाठी गवत वाढीचा उपयोग फार होतो.

मृदा संधारण तंत्र : मृदा संधारणाचा मूळ उद्देश जरी जमिनीचे धूपीपासून संरक्षण करण्याचा असला, तरी आधुनिक विचारसरणीप्रमाणे तिची उत्पादनक्षमता वाढविणे आणि टिकविणे हादेखील उद्देश मानला जातो. जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी जे जे उपाय योजले जातात त्या सर्वांचा अंतर्भाव मृदा संधारणाखाली होतो. मृदा संरक्षणाची जरूरी प्रायः सर्व प्रकारच्या जमिनींसाठी आहे मग त्या पिकाखाली राखलेल्या असोत अगर गवती रानाखाली असोत अथवा वनसंपत्तीकरिता राखलेल्या असोत.

मृदा संधारणाचा कार्यक्रम राबविण्यापूर्वी जमिनीची कार्यक्षमता अजमाविण्यासाठी भूमि-उपयोगिता वर्गवारी करणे जरूरीचे असते. ही वर्गवारी प्रदेशाचे कृषी जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान), जमीनीचा उतार, उंचसखलपणा, खोली,धुपीचे प्रकार व तीव्रता या बाबींवरून केली जाते. (‘मृदा’ या नोंदीतील ‘भूमि-उपयोगिता वर्गवारी’ या उपशीर्षकाखालील माहिती पहावी). जमिनीची कार्यक्षमता आदी बाबींचा साकल्याने विचार करून जमिनीचा योग्य वापर व त्यासाठी योजावयाचे मृदा संधारणाचे उपाय यांची आखणी करणे उपयुक्त ठरते. कृषी जलवायुमान विभाग व जमिनीचे प्रकार लक्षात घेऊनच विविध प्रकारच्या मृदा संधारण कामांची आखणी महाराष्ट्र राज्यात केली आहे; परंतु प्रथम प्राधान्य अनिश्चित पावसाळी प्रदेशासाठी दिलेले आहे. मृदा संधारणाची कामे मुख्यतः तीन प्रकारांखाली येतात : (१) सुधारित कृषी पद्धतीने संधारण करणे; (२) बांधबंदिस्ती करून मृदा संधारण करणे; (३) जंगलवाढ व गवतवाढ करून मृदा संधारण करणे.

कोष्टक क्र. ५ मशागतीचे विविध प्रकार व त्यांचा धुपीवर होणारा परिणाम : मांजरी व सोलापूर येथील निष्कर्ष

मशागतीच्या पद्धती

वार्षिक पर्जन्यमान (सेंमी.)

एकूण वाहून गेलेले पाणी (सेंमी.)

एकूण वाहून गेलेली माती (टन/ हेक्टर)

जमीन पडीत ठेवून तिच्यावर उगवणारी नैसर्गिक वनस्पती राखणे

६१·८५

३·६३

१·६०

जमीन पडीत ठेवून तिच्यावर उगवणारी नैसर्गिक वनस्पती काढून टाकणे

६७·६७

१७·२७

५५·१८

जमीन १० सेंमी. पर्यंत कुळवणे

६७·६७

१९·८१

८१·१४

जमीन खोल नांगरून चार वेळा वखरणे

६७·६७

१७·७३

८८·३३

फावड्यासारख्या अवजाराने जमिनीत छोटे खळगे पाडणे

६१·८५

५·५४

४०·५३

जमीन खोल नांगरणे व उतारास आडवी मशागत करणे

६७.६७

११.६८

५९·७०

जमीन १० सेंमी. खोलीपर्यंत वखरून खरीप बाजारी पेरणे

६७·६७

९·५०

११·७६

सुधारित कृषी पद्धतीने मृदा संधारण

सर्वसाधारणपणे ज्या जमिनीचा उतार ०·५% पेक्षा कमी आणि एकसारखा आहे व ज्या जमिनीची सालकाढी धूप होत आहे अगर धूप होण्याची शक्यता आहे अशा जमिनीचे संधारण या सुधारित कृषी पद्धतीने करतात.

 1. समपातळीवरील मशागत : नांगरणी, कोळपणी, पेरणी वगैरे मशागत उतारास आडवी परंतु समपातळीत करतात. असे केल्याने नांगराचा अगर कुळवाचा प्रत्येक तास वाहणाऱ्या पाण्यास अडथळा निर्माण करतो, त्यामुळे पाण्यास माती वाहून नेण्याइतका वेग येत नाही.
 2. पट्टा पेरणी : ज्वारी, बाजरी, कापूस वगैरेंसारखी पिके धूप प्रतिबंधक नाहीत; परंतु मूग, मटकी, भुईमूग, हुलगा आदी पिके जमिनीवर पसरणारी व चांगले आच्छादन देणारी आहेत. त्यामुळे अशा पिकांचे पट्टे समपातळीत काही अंतराने राखल्यास जमिनीच्या धुपीस प्रतिबंध करता येतो. त्यासाठी जमिनीचा उतार लक्षात घेऊन धुपीस प्रतिबंध पिकांच्या ओळी १ : ३ अगर १ :५ या प्रमाणात राखतात म्हणजेच तृणधान्याच्या ३ ते ५ पट्‌ट्यांस कडधान्याचा अगर गळीत धान्याचा एक पट्टा ठेवतात. पुढे दरवर्षी हे पट्टे सरकवत नेले, तर पिकांच्या फेरपालटीमुळे होणारे फायदेही मिळू शकतात.
 3. पिकांची फेरपालट : जमिनीत एकाच प्रकारचे पीक सतत घेतल्याने त्या जमिनीतील विशिष्ट थरातील पीक-पोषक द्रव्ये कमी होऊन पिकाचे उत्पादन घटते; परंतु पिकांच्या फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश होत असल्याने जमिनीची सुपीकता राखण्यास चांगला उपयोग होतो.
 4. वाऱ्याच्या दिशेस पिकांच्या आडव्या ओळी लावणे : वाऱ्यामुळे होणाऱ्या धुपीस प्रतिबंध करण्यासाठी वाऱ्याच्या दिशेस आडवी; परंतु समपातळीची पेरणी केल्यास अशा पिकांच्या ओळी वाऱ्यास अडथळा निर्माण करतात व त्यामुळे वाऱ्याचा वेग कमी होऊन माती वाहून नेण्याची क्षमता कमी होते. काही वेळेस अशा ठिकाणी जलद वाढणाऱ्या झाडांच्या तीन ओळी योग्य अंतरावर लावून संरक्षक पट्टे तयार करतात. त्यामुळे देखील वाऱ्यापासून होणाऱ्या धुपीचा बंदोबस्त करता येतो.
 5. स्थायी पट्टे राखणे : जमिनीत योग्य अंतरावर उतारास आडवे असे नैसर्गिक आवरणाखाली अगर गवती पट्टे सोडल्यास वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी होऊन धुपीस प्रतिबंध करता येतो. कायम स्वरूपाच्या गवती पट्‌ट्यांपासून भरपूर चाराही मिळू शकतो.

कोरडवाहू (दुर्जल) शेती पद्धतीत पिकांचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास जमिनीच्या धुपीस प्रतिबंध होऊन तिचा पोत सुधारण्यास व उत्पादन वाढीस मदत होते. या पद्धतीत हुलगा, मटकी, मारवेल गवत या पिकांना प्राधान्य दिले जाते. तूर,रब्बी ज्वारी (संकरित) ही पिके भारी जमिनीत घेतली जातात.

बांधबंदिस्ती आदी यांत्रिक पद्धतीने मृदा संधारण

 1. उतारास आडव्या सऱ्या पाडणे : पावसामुळे अगर वाऱ्यामुळे होणाऱ्या धुपीस प्रतिबंध करण्यासाठी यंत्राच्या अगर औताच्या साहाय्याने समपातळीवर सऱ्या पाडतात. अशी प्रत्येक सरी पाणी व माती अडवून ठेवते. सरीस आडवे लहान लहान बांध टाकतात व त्यामुळे सरीची लांबी व खोली जमिनीच्या गुणधर्माप्रमाणे आणि उताराप्रमाणे नियोजित केली जाते. सऱ्या पाडलेल्या जमिनीतून माती वाहून जाण्याचे प्रमाण ९०% नी कमी झाल्याचे आढळून आले आहे.
 2. जमिनीचा खालील घट्ट थर मोडणे : वर्षानुवर्षे जमिनीची मशागत एका विशिष्ट खोलीपर्यंत करीत राहिल्याने तिच्या खालील थर घट्ट बनतो व त्यामुळे पाणी मुरण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो म्हणून जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढते व जमिनीची धूप होते. त्याकरिता नेहमीपेक्षा खोल नांगरट अधूनमधून केल्यास हा घट्ट थर मोकळा होतो व पाण्याचे शोषण जास्त प्रमाणात होते. त्यासाठी ‘सबसॉयलर’ ह्या अवजाराचा चांगला उपयोग होतो. सऱ्या पाडल्यावर सरीत नांगरी घालून ती मोकळी केल्यासदेखील हेच काम साधता येते.
 3. समपातळीतील बांध: हे बांध अनिश्चित व कमी पावसाळी भागात घातले जातात. तसेच हे बांध हलक्या पोताच्या व उथळ जमिनीवर घालतात. सुमारे १ ते ५% उतार असलेल्या जमिनीवर असे बांध घातले जातात. त्यामुळे जमिनीवर पडणारे पाणी चांगले मुरते आणि ते काही मर्यादेपर्यंत थोपविले जाते. त्यामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग मर्यादित राहतो व त्याबरोबर माती वाहून नेण्याची शक्ती मर्यादित राहते. जमिनीच्या उताराप्रमाणे शेत बांधांतील अंतर निश्चित केले जाते. हे अंतर३५ ते १०० मी.पर्यंत असते व बांधाची उंची ७५ सेंमी. ते ९० सेंमी. असते. पावसाचे जादा झालेले पाणी बाहेर काढून देण्यासाठी ह्या बांधांना सांडव्याची योजना केली जाते. अशा बांधावर काही धूप प्रतिबंधक पिके लावता येतात आणि नांगरटीशिवाय इतर मशागत करता येते.
 4. ढाळाचे बांध : निश्चित पावसाळी प्रदेशातील भारी पोताच्या जमिनीची समस्या थोडी वेगळी असते. जमिनी भारी पोताच्या असल्याने त्यांतून निचरा योग्य प्रमाणात होत नाही. जमिनीस उतार फार नसला, तरी पावसाची तीव्रता जास्त झाल्यास त्यांची धूप होते म्हणून अशा ठिकाणी समपातळीतील बांध न टाकता किंचित उतार अगर ढाळ दिलेले बांध टाकतात. अशा बांधांमुळे माती वाहून न जाता फक्त जादा पाणी बाहेर काढले जाते. बांधाच्या बाजूने आडवा उतार ०·२% ठेवला जातो व दोन बांधांतील अंतर जमिनीच्या उतारानुसार ५० ते १०० मी.पर्यंत ठेवले जाते. बांधाचे आकारमान जमिनीचा पोत व खोली यांवरून ठरविले जाते. सर्वसाधारण हलक्या पोताच्या जमिनीवर बांधाचा छेद ०·९३ चौ.मी. ठेवला जातो, तर मध्यम पोताच्या जमिनीवर हा छेद१·१२ चौ.मी. राखतात व भारी पोताच्या जमिनीवर हा छेद १·३ चौ.मी. ठेवला जातो. या बांधावर नांगरटीशिवाय इतर मशागत करून पिके घेता येतात. प्रत्येक बांधातील अनावश्यक पाणी विशिष्ट रीतीने बांधलेल्या सांडव्यातून चरात सोडले जाते. पूर्वीचे चर नसल्यास नवीन चर उताराच्या दिशेने खोलगट भागातून काढले जातात.
 5. भात खाचरासाठी पायऱ्यापायऱ्यांची शेतरचना (मजगी) : ज्या भागात पाऊसमान जास्त आहे अशा भात पिकांच्या विभागात आणि डोंगराळ भागातील ८% पेक्षा कमी उताराच्या भागात पायऱ्यापायऱ्यांनी भात खाचरे काढली जातात; परंतु या ठिकाणी जमिनीची खोली किमान ४५ ते ६० सेंमी. असावयास पाहिजे; तसेच भात खाचरासाठी लागणाऱ्या पाण्याची सोयदेखील जवळपास हवी. महाराष्ट्रातील कोकण व घाट विभागात ही कामे विस्तृत प्रमाणावर केली गेली आहेत. ह्या खाचराच्या बांधावर काजूची रोपेदेखील लावता येतात.
 6. चोपण खारवट व पाणबोदाड जमिनी सुधारण्यासाठी चर योजना : ज्या जमिनीतून निचरा नीट होत नाही आणि पाणी साठून राहते अशा जमिनी सुधारण्याकरिता जमिनीत बाहेरून येणारे पाणी योग्य आकारमानाच्या चरावाटे परस्पर बाहेर काढण्याची योजना केली जाते. जमिनीतील पाण्याची पातळी वर आल्यामुळे त्या खारवट व नंतर चिबड आणि चोपण बनतात. अशा जमिनी सुधारण्यासाठी जमिनीचा पोत, उतार आदी बाबी लक्षात घेऊन योग्य अंतरावर १ ते २ मी. खोलीचे उघडे अगर भूमिगत चर काढून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करता येते व त्यामुळे जमिनी लवकर सुधारण्यास मदत होते.
 7. नाला बांधबंदिस्ती : अनिश्चित पावसाळी प्रदेशात असंख्य नाले असतात व ते फक्त पावसाळ्यातच वाहतात आणि हे पाणी वाहून जाते. तसेच नाल्याचे काठ धुपून जातात. तेव्हा या पाण्याचा शेतीस उपयोग व्हावा, तसेच नाल्याच्या कडेच्या जमिनी शेतीखाली आणण्यासाठी व त्यांची धूप थांबविण्यासाठी असे लहान मोसमी नाले ठिकठिकाणी अडवून लहान लहान जलाशय निर्माण करतात. त्यामुळे नाल्याच्या किनाऱ्याच्या जमिनीची खराबी थांबविता येते तसेच नाल्याच्या प्रवाहाची गती नियंत्रित करता येते आणि साठविलेले पाणी संरक्षित पाणी म्हणून पिकास उपयोगी पडते. नाल्यास योग्य आकारमान व वळण मिळाल्यामुळे त्याच्या काठची पडीत जमीनदेखील शेतीखाली आणण्यास मदत होते.
 8. नद्या, नाले यांच्यामुळे होणाऱ्या काठपाडी धुपीचे नियंत्रण : नद्यानाले यांच्या प्रवाहांमुळे होणारी काठपाडी धूप थांबविण्यासाठी त्यांच्या दोन्ही तीरांवर झाडी, गवत यांची लागवड करतात. त्याचप्रमाणे काठांवर बांबूची लागवड करून त्यांचे संरक्षण केले जाते. तसेच पात्रात काही अडथळे निर्माण करून प्रवाहाची दिशा शक्यतो नियंत्रित केल्यास काठपाडी धुपीपासून संरक्षण करण्यास मदत होते.
 9. समुद्रकाठच्या खार जमिनीचे संधारण : समुद्रकाठच्या अगर खाडी लगतच्या जमिनीत भरतीचे पाणी शिरते व त्यामुळे त्या जमिनी खारवट बनतात व नापीक होतात. अशा जमिनीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या समुद्रकाठच्या भागावर मातीचे मोठेमोठे भराव घालतात. जेथे पाण्याचा मारा जास्त असेल अशा ठिकाणी पक्क्या भिंती बांधल्या जातात.

गवती राने व वनसंवर्धन यांद्वारे मृदा संधारण

वनसंवर्धनाकरिता ज्या जमिनी योग्य आहेत अशा ठिकाणी जमिनीच्या उतारास आडवे १० ते१२ मी. अंतरावर समपातळीत चर काढून त्यांतून निघालेल्या मातीचे चराचा अर्धा भाग भरतात व उरलेल्या मातीचा उताराच्या बाजूने भराव घालतात. नंतर चरामध्ये त्या विभागात चांगली वाढणारी व जास्त उत्पादन देणारी झाडे लावतात. डोंगर उतारावर याचप्रमाणे १० ते १२मी. अंतरावर समपातळीत अंतराअंतराने अर्धगोलाकार खड्डे काढले जातात आणि त्यांतून निघालेल्या मातीने खड्‌ड्यांचा अर्धा भाग भरून त्यांमध्ये त्या विभागात चांगली वाढणारी व उत्पन्न देणारी झाडे लावतात. झाडाच्या दोन पट्‌ट्यांमध्ये चांगल्या प्रकारच्या गवताची लागवड करून लहान लहान पट्टे राखतात. त्यामुळे डोंगर उतारावरील जमिनीचे धुपीपासून संरक्षण करता येते.

चराऊ रानाच्या संवर्धनासाठी व मृदा संधारणासाठी जमिनीत उतारास आडव्या ५ ते ६ मी. अंतरावर सऱ्या पाडून त्यांत सुधारलेल्या जातीच्या गवतोच बी टाकून ते नैसर्गिक रीत्या वाढू दिल्यास नैसर्गिक रीत्या त्यांचा प्रसार होतो. चराऊ रानाचे भाग पाडून दरसाल त्यांतील फक्त एका भागातच जनावरे चरण्यास सोडावीत व इतर भागात गवत वाढू द्यावे. अशा रीतीने चक्री पद्धतीने चराऊ रानाचा उपयोग केल्यास गवती रान चांगल्या स्थितीत राखले जाते आणि जमिनीची धूप अत्यल्प होते व नैसर्गिक धुपीशी जमिनी तयार होण्याच्या क्रियेचा समन्वय साधला जातो.

मृदा संधारणाचा कृषी व्यवसायावर होणारा परिणाम

मृदा संधारणामुळे जमिनीचे फूल जागच्या जागी राहिल्याने आणि जमिनीत पाणी चांगल्या प्रकारे मुरल्यामुळे तिच्या उत्पादनक्षमतेत वाढ होते. निव्वळ मृदा संधारणाचे उपाय योजल्यामुळे पिकाच्या उत्पादनात २५ ते ५०% वाढ होते, असे निदर्शनास आले आहे. जमिनीच्या धुपीमुळे, तसेच नाले-ओघळी पडल्यामुळे लागवडीस निरुपयोगी झालेली जमीन लागवडीस उपयोगी होते. मृदा संधारणामुळे लागवडीखालील क्षेत्रात २ ते ४% वाढ झाल्याचे दिसून आले. बांधबंदिस्तीमुळे जमिनीत जास्त पाणी मुरू लागते,त्यामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढते, पर्यायाने विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते, तसेच मृदा संधारण केलेल्या क्षेत्रात विहिरींची संख्या वाढल्याचे दिसते. त्यामुळे हंगामी बागायती क्षेत्रातही वाढ होऊन प्रचलित पीक पद्धतीत सुयोग्य बदल झाल्याचे दिसून येते, हे आ. ३ वरून सहज दिसून येईल. नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात वनसंवर्धनाची व मृदा संधारणाची कामे घेतल्याने मानवनिर्मित जलाशयांच्या कार्यक्षमतेत वाढ झाली व त्यामध्ये कमी प्रमाणात गाळ येऊ लागल्याने त्यांचे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे. मृदा संधारणाच्या कामामुळे पुरांची व्याप्ती व प्रमाण कमी होण्यासदेखील मदत होते.

ओलीत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील मृदा संधारण

ओलीत प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या जलसंपत्तीचा वापर लवकरात लवकर व्हावयास पाहिजे; पण तसे होत नाही कारण लाभ क्षेत्रातील जमिनी समपातळीत नसतात. शेतचारींची आणि शेतचरांची तरतूद करावी लागते. यासाठी भूसुधार कायदा लावून महाराष्ट्रात शासनामार्फत भूविकास कामे लाभप्रदाय क्षेत्रात घेतली जातात,यालाच ‘आयाकट’ योजना म्हणतात.

या योजनेखाली लाभप्रदाय क्षेत्रातील प्रत्येक शेतात सुलभतेने पाणी मिळावे म्हणून शेतचाऱ्या काढतात. शेतचारीस योग्य आकारमान व उतार दिला जातो. जरूर तेथे जलविभाजन पेट्या बसविल्या जातात. तसेच चारीतील पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी जरूर तेथे धबधबे किंवा घसरगुंड्या बांधल्या जातात. सर्वसाधारणपणे एक हेक्टर क्षेत्रासाठी सु. ७० मी. लांबीची शेतचारी अंदाजित धरली आहे. शेतचारीचा छेद भारी व मध्यम भारी जमिनीत ०·४५ चौ.मी. राखला जातो, तर हलक्या व मध्यम जमिनीसाठी ०·३४ चौ.मी. राखला जातो. चारीच्या बाजूचा उतार जमिनीच्या प्रकारानुसार १·५० : १ अगर १ : १ या प्रमाणात ठेविला जातो. चारीच्या तळाचा ढाळा १% पेक्षा अधिक नसतो. चारीच्या प्रवाहक्षमतेनुसार व जमिनीच्या उतारानुसार शेतचारीचा छेद निश्चित करतात. जमिनी समपातळीत आणण्यासाठी शेताचा चढउतार लक्षात घेऊन उतारास आडवे ढाळाचे बांध घालण्यात येतात. सर्वसाधारणपणे दोन बांधांतील उभा उतार ०·६% पेक्षा कमी राखला जातो व बांधाचा ढाळ ०·२%राखला जातो. त्यामुळे जमिनीस चांगल्या प्रकारे पाणी देता येते व जमिनीची धूप होत नाही. दोन बांधांतील जमिनी जर समपातळीत नसतील, तर त्या समपातळीत आणल्या जातात, परंतु उभा व आडवा नियोजित उतार मात्र राखला जातो.

अनावश्यक पाणी सुरक्षितपणे शेताबाहेर काढण्यासाठी व जमिनीचा निचरा राखण्यासाठी शेतचर काढतात. चरांची आखणी खोलगट भागातून उताराच्या मुख्य दिशेकडे केली जाते. चरांच्या तळास जमिनीच्या ढाळाप्रमाणे उतार दिला जातो. हा ढाळ साधारणपणे १% च्या आत असतो. शेतचराचा छेद सरासरी ०· ८० चौ.मी. ठेवला जातो व खोली जरूरीप्रमाणे ४५ ते ६० सेंमी. ठेवली जाते.

अशा रीतीने ओलीत प्रकल्पाच्या लाभप्रदाय क्षेत्रावर मृदा संधारणाची कामे केल्यामुळे जमिनी बागायतीसाठी विकसित केल्या जातात आणि उपलब्ध जलसंपत्तीचा वापर लवकरात लवकर व योग्य तऱ्हेने करण्यास चालना मिळते.

समुद्राच्या लाटांमुळे झालेली धूप.


हिमतुषार व पाणी यांच्या क्रियेने झालेली धूप व पडलेल्या घळी. हिमतुषार व पाणी यांच्या क्रियेने झालेली धूप व पडलेल्या घळी.
जमिनीची बांधबदिस्ती. जमीन सपाट करणे.
समपातळीवर उतारास आडवी नांगरणी. समपातळीवर उतारास आडवी नांगरणी.

 

संदर्भ : 1. Basu, J. K. and others, Soil Conservation in India, New Delhi, 1960,

2. Bennett, H. H. Elements of Soil Conservation, New York, 1955.

3. Butler, M. D. Conserving Soil, New York, 1955.

4. Cook, R. L. etal, Soil Management for Conservation and Productivity, London, 1967.

5. Gadkary, D. A. Manual of Soil Conservation, Poona, 1966.

6. Kanitkar, N. V.; Sirur, S. S.; Gokhale, D. H. Dry Farming in India, New Delhi, 1960.

7. Ramarao, M. S. V. Soil Conservation in India, New Delhi, 1962.

8. U.S.D.A. A Manual on Conservation of Soil and Water, New York, 1964.

९. गायकवाड, राजाराम भूसंधारणशास्त्र व तंत्र, पुणे, १९६१.

दे. वि. भालकार / य. अ. जोशी / क. वि. जोशी / गो. का. झेंडे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

3.01680672269
viren temble Aug 01, 2017 07:42 PM

नैसर्गिक कोळसा क्षेत्राचा अभ्यास पडफ

pravin Dec 07, 2016 06:49 PM

jmini mude honare rojgar

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/13 19:49:14.900444 GMT+0530

T24 2020/08/13 19:49:14.908397 GMT+0530
Back to top

T12020/08/13 19:49:14.084987 GMT+0530

T612020/08/13 19:49:14.103177 GMT+0530

T622020/08/13 19:49:14.176598 GMT+0530

T632020/08/13 19:49:14.177426 GMT+0530