অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गटशेती नव्या हरित क्रांतीचा मूलमंत्र

गटशेती नव्या हरित क्रांतीचा मूलमंत्र

हाताला हात आणि खांद्याला खांदा लावून सर्वांनी एकत्र येवून गट तयार करणे आणि त्या गटाच्या माध्यमातून एकत्रित पद्धतीने शेती करणे यात पाच ते दहा जण एकत्र येवून आपापल्या विविध क्षेत्रातील अनुभवाचा फायदा एकमेकांना देवू शकतात. "एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ" या उक्तीने शेतीला नफ्याच्या व्यवसायात बदलू शकतात. अर्थात "गटशेती" ही आता काळाची गरज आहे.

सर्वांचे ध्येय्य एक असेल तर सांघिक प्रयत्नातून नुकसान ते नफा हा प्रवास गटशेतीतून सहज शक्य आहे. याच भूमिकेतून होवू घातलेल्या नव्या हरित क्रांतीत गटशेती हा मैलाचा दगड ठरणार आहे. 50 ते 100 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक सरासरी उत्पन्न दिलं तरी नफा यायचा. आता तो काळ केव्हाच मागे पडला आहे. बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. प्रत्येकाला वेगळी मेहनत करायला लागणे यात मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होण्यापर्यंत स्थिती जाते. त्यासोबत प्रत्येकाची आर्थिक कुवत वेगळी असल्याचाही. पेरणी आणि योग्यवेळी काढणी यावर परिणाम होत असतो.

असं म्हणतात चाकाचा नव्याने शोध लावण्याची गरज नाही कारण तो शोध लागलेला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या अल्पशा जमिनीत आपल्या आर्थिक आणि मनुष्यबळाच्या मर्यादेत शेती केल्याने उत्पादन खर्च वाढत आहे. त्यात एखादी आपत्ती आली तर त्याच्या पुढचं संकट अधिक गहिरं होतं. त्यावर रामबाण उपाय हा गटशेतीचाच आहे. शेतकऱ्यांनी दहा-दहाचे गट स्थापन केल्यास संपूर्ण जमिनीसाठी पाण्याचा एक स्त्रोत पुरेसा होतो. यात संयुक्तरित्या शेततळे आणि सिंचन विहिरीपैकी कोणताही एक पर्याय निवडून हमखास सिंचन व्यवस्था उपलब्ध करता येते. गटांना प्राधान्य देण्याचा सकारात्मक निर्णय बँका घेत आहेत. यामुळे वित्त पुरवठा ही अडचण राहू शकत नाही.

गटात प्रत्येक शेतकऱ्याला काम नेमून देणे शक्य आहे. परिणाम त्यातील प्रत्येकाची एरव्ही स्वतंत्रपणे होणारी धावपळ, वेळ, श्रम यात बचत होते. ज्याला ज्या क्षेत्रात गती आहे त्या क्षेत्राची जबाबदारी वाटणे आणि सांघिक पद्धतीने यशस्वी शेती करणे गटाला सहज शक्य आहे. जेथे धानाची लावणी होते तेथे प्रत्येक शेतकरी स्वतंत्ररित्या आपली रोपे तयार करतो याची गती त्यांच्या आर्थिक स्थितीवर मुख्यत्वे अवलंबून असते. मात्र गटात एकत्रितपणे रोपे तयार करुन सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात योग्यवेळी यांत्रिक पद्धतीने रोवणी शक्य आहे. यातून पेरणीची योग्य वेळ व अधिक उत्पादन देणे याचे महत्व जाणून कृषी तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने उत्पादकतेचा नवा अध्याय समोर येईल.

पारंपरिक शेतीत असणारे तोटे बाजूला सारले गेले तर उत्पादकतेच्या खर्चात मोठी बचत शक्य आहे. अर्थशास्त्रीय तत्वानुसार जितकी अधिक बचत तितका अधिक नफा हे गणित आहे. हे जमल्यावर आजकाल तोट्याचा वाटणारा शेतीचा व्यवसाय निश्चितपणे फायद्यात येईल. अधिक उत्पादकता असणाऱ्या बियाणांची निवड तसेच शास्त्रोक्त पद्धतीने लागवड आणि यंत्रांचा वापर याच्या जोडीला गट एकत्रितपणे त्याच्या योग्य दराने विक्री करण्याकडेही लक्ष पुरवू शकतो, यातून शेतकऱ्यांचा निश्चितपणे फायदाच आहे.

सारा महाराष्ट्र जलयुक्त शिवार उपक्रमाने सूक्ष्म आणि संरक्षित सिंचनासाठी तयार आहे. मोठ्या प्रमाणावर जलसाठे राज्यात निर्माण झालेले आहेत. याच्या जोडीला काही प्रकल्पांमधून जमा झालेला गाळ (silt) उपसून शेतात टाकण्यासही शासनाने आता मंजूरी दिली आहे. असा सुपीक गाळ शेतात टाकल्यास खतांवरील खर्च कमी होणार असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदाच आहे. समृद्ध शेतीसाठी जलयुक्तनंतर आता पीकयुक्त शिवाराच्या माध्यमातून शासनाने उन्नत शेती- समृद्ध शेतकरी मोहिमेत शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जाच्या दृष्टचक्रातून सोडविण्यासाठी साद दिली आहे. येणारा काळ हा गटशेतीचा काळ आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी गट स्थापन करुन प्रतिसाद देण्याची गरज आहे. याचा परिणाम शेतकरी आणि शेती समृद्ध होण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. या नव्या हरित क्रांतीचा गटशेती हा मूलमंत्र ठरणार हे निश्चित.

-प्रशांत अनंतराव दैठणकर

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate