অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिकूपासून जॅम, स्क्वॅश

चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात.

पाकविलेल्या चिकूच्या फोडी

चिकूची व्यवस्थित पिकलेली, गोड चवीची फळे निरीक्षणपूर्वक निवडून घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. त्याचे चार तुकडे (लांबीप्रमाणे) करून बी पूर्णपणे काढून टाकावे. मिठाच्या दोन टक्के द्रावणामध्ये फळांचे तुकडे ३ ते ४ मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर फोडी ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सिअस) किंवा सूर्यप्रकाशात पूर्ण एक दिवस वाळवाव्यात. दुसऱ्या दिवशी फळांचे तुकडे ४० अंश ब्रिक्स साखरेच्या पाकात पाच मिनिटे शिजवावेत. फोडी द्रावणातून बाहेर काढून पुन्हा सूर्यप्रकाशात अथवा ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सिअस) तापमानात वाळवाव्यात. त्यापुढील दिवशी अनुक्रमे ५५ व ६५ अंश ब्रिक्स पाकामध्ये शिजवून वाळवाव्यात. नंतर फोडी चांगल्या वाळवाव्यात. कोरड्या फोडी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून सीलबंद कराव्यात.

चिकू स्क्वॅश

चिकूच्या फोडी मिक्सर/ पल्परमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा. लगदा मलमलच्या कापडाने गाळून त्यातला रस काढून घ्यावा. एफपीओ प्रमाणीकरणानुसार (२५ टक्के रस, ४५ ते ५० टक्के एकूण विद्राव्य घटक व ०.७५ ते १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.

घटक पदार्थांचे प्रमाण

चिकू रस - १ किलो पाणी - १ लिटर साखर - १ किलो सायट्रिक आम्ल - ४० ग्रॅम

चिकू रस, साखर, पाणी, सायट्रिक ॲसिड यांचे एकजीव मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गाळून घ्यावे. स्क्वॅश ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावा. पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट ७१० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश किंवा सोडियम बेन्झोएट ६०० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश या प्रमाणात थोड्या स्क्वॅशमध्ये एकजीव करून संपूर्ण स्क्वॅशमध्ये घालावे. गरम स्क्वॅश बाटल्यांमध्ये भरावा. झाकणे बसवावीत. स्क्वॅश थंड व कोरड्या जागेत ठेवावा. स्क्वॅश सहा महिने टिकतो.

चिकू भुकटी

चिकूची पक्व फळे धुऊन, साल व बी काढून घ्यावीत. फळांचे आठ तुकडे (लांबीप्रमाणे) करून सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात (५५ - ६० अंश सेल्सिअस, पाण्याचे प्रमाण ७-८ टक्के कमी होईपर्यंत) वाळवावेत. त्यानंतर यंत्राच्या साह्याने फोडींची भुकटी करावी. भुकटी २५० गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद साठवून ठेवावी.

या भुकटीपासून मिल्कशेक तयार करता येते. मिठाई, आइस्क्रीम तयार करण्यासाठीसुद्धा वापर करता येतो.

चिकू जॅम

चिकूची पिकलेली फळे धुऊन, साल व बी काढावे. फळाचे तुकडे करून मिक्सर/ पल्परच्या साह्याने गर तयार करावा. प्रमाणीकरणानुसार (४५ टक्के गर, ६८ अंश ब्रिक्स घनपदार्थ, १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत.

घटक पदार्थ - प्रमाण

चिकू गर - २ किलो साखर - १.५ किलो पाणी - २५० मि.लि. सायट्रिक आम्ल - १५ ग्रॅम पेक्टीन - १० ग्रॅम

गर, साखर, पाणी एकत्र करावे. मिश्रण शिजवावे. शिजविताना हळूहळू ढवळावे. जॅम आचेवरून उतरविण्यापूर्वी सायट्रिक आम्ल व पेक्टीन (थोड्या पाण्यामध्ये मिसळवून) घालावे. मिश्रणाचे तापमान १०५ अंश सेल्सिअस, विद्राव्य घटक ६८ अंश ब्रिक्स एवढे झाल्यावर जॅम तयार होतो. इतर चाचण्या (फ्लेक चाचणी, साखरेच्या दीडपट वजन) घेऊन जॅम तयार झाल्यावर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरावा. थंड झाल्यावर बाटली सीलबंद करावी.

चिकूच्या हवाबंद फोडी

पिकलेल्या चिकूच्या फोडी बहर साइज कॅनमध्ये (२८० ग्रॅम) किंवा ए-२.५ साइज कॅनमध्ये (५०० ते ५५० ग्रॅम) भराव्यात. उर्वरित जागा साखरेच्या ५५ अंश ब्रिक्स पाकाने भरावी. कॅनच्या तोंडापासून १.२५ सें.मी. अंतर सोडावे. डबे ८० अंश सेल्सिअस तापमानाला निर्वात करून बंद करावेत. बटर साइज कॅन (२० मिनिटे) व ए २.५ कॅन अनुक्रमे २० व २५ मिनिटे उकळत्या पाण्यामध्ये ठेवावेत. नंतर कॅन गार पाण्याने थंड करावेत. कॅन थंड व कोरड्या जागेत ठेवावेत.

चिकू शेक

चिकूपासून चांगल्या प्रतीचा शेक तयार होतो. शेक तयार करण्यासाठी चिकूचा गर अथवा फोडींचे अतिशय बारीक-बारीक तुकडे करावेत.

घटक पदार्थ

चिकूचा गर/तुकडे - १०० ग्रॅम साखर - १३६ ग्रॅम - १५० ग्रॅम दूध - ७५० - ८०० ग्रॅम

स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध गरम करावे. थंड झाल्यावर साय काढावी. दुधामध्ये साखर विरघळवून घ्यावी. नंतर त्यात चिकूचा गर अथवा तुकडे टाकावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून एकजीव करावे. शेक थंड होण्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. आवडीनुसार बर्फाचा चुरा टाकून शेक पिण्यास वापरावा.

डॉ. गीता रावराणे-मोडक - ९४२२३०२८६२

(लेखिका पद्‌मभूषण वसंतदादा पाटील ॲग्रिकल्चर कॉलेज, तळेगाव दाभाडे, आंबी जि. पुणे येथे कार्यरत आहेत)

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate