অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-३

फळांची स्वच्छता व प्रतवारी

काढणीनंतर किडलेली, नासलेली, दबलेली, फुटलेली, खरचटलेली, तडा गेलेली फळे बाजूला करावी. त्यानंतर त्यांचे वजन व आकारमानुसार प्रतवारी करावी. प्रथम दर्जाची, आकर्षक, टवटवीत, मोठ्या आकाराची आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन अशी फळे मोठ्या आणि दूरवरच्या बाजारपेठासाठी पाठवावीत. दुय्यम दर्जाचा माल स्थानिक आणि इतर बाजारपेठांसाठी पाठवावा.

फळाची काढणी करुन ती शेतावर सावलीत जमा केल्यानंतर बागेत किंवा शेतावरील शेडमध्ये साळीचे तनिस पसरुन घ्यावे. त्यावर काढणी केलेली फळे पसरवित व 24 तास तसेच ठेवावीत. यामुळे फळातील गर्मी कमी होऊन फळात चाललेल्या मेटॉबोलीक क्रिया स्थिरावतील. यानंतर फळे क्लोरीनच्या पाण्याने व नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. अशाप्रकारे धुतलेली फळे बुरशी नाशकाच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवून ठेवावीत. या स्वच्छता प्रक्रियामुळे पेनिसिलिय व अस्परजिलस या बुरशीमुळे होणारे रोग किमान 3 ते 4 आठवड्यापर्यंत नियंत्रणात राहतात. तसेच फळे धुतल्याने त्याचा मुळ रंग व चकाकी व ताजेपणा कायम राहण्यास मदत होते.

काढणी पश्चात व्यवस्थापन

फळांची काढणी करणे, करंड्या किंवा टोपलीत ठेवून पॅकिंग शेडमध्ये वाहतूक करणे, डिग्रीनिंगची प्रकिया करणे, फळांना पाण्यात 0.5 ते 1 टक्के साबणाचे द्रावण व 0.1 ते 1 टक्के सोडियम आर्थो फिनेट या द्रावणात 4 ते 5 मिनिटे बुडविणे, फळांवरुन हलकासा ब्रश फिरवून फळे पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत सुकविणे, फळांना 2,4 डी व मेणाच्या द्रावणात बुडविणे, फळांच्या रंगावरुन मशिनद्वारे प्रतवारी करणे, फळांची 12.8 ते 14.4 अंश सेल्सिअस तापमानाला 1 ते 5 महिन्यापर्यंत साठवण करणे, खराब फळे बाजू करणे, पुन्हा साबणाच्या व बुरशीनाशकाच्या द्रावणात फळे धुवून त्यांच्यावरुन हलकासा ब्रश फिरविणे, प्रतवारी करणे आदी प्रक्रिया करता येतात.

अ.क्र.

शिल्लक राहिलेला भाग

प्रक्रिया पद्धत

मिळणारे उपपदार्थ

उपयोग

1

फळांची साल

निसरण

(Didtllatio)

सिट्रल तेल

सुंगधी द्रव्ये, उदबत्ती, अत्तरे

2

फळांची साल

थंड दाब पद्धत

(Cold Press)

इसेन्स

थंड पेयांना सुगंध येण्यासाठी

3

सालीखालील पांढरा भाग व साल

(Juice Resodue)

उच्च तापमानाला दाबणे व रासायनिक प्रक्रिया

पेक्टिन

जॅम, जेली व मार्मलेड तयार करताना घट्टपणा येण्यासाठी

4

फळाची साल

वाळविणे व पावडर करणे

सालीची पावडर

औषध निर्मितीत वापर

5

बिया

निस्सारण

(Distillation)

तेल

औद्योगिक वापर

प्रकिया उद्योगात पॅकिंग आणि ब्रॅडींग

प्रक्रियायुक्त टिकावू पदार्थ तयार केल्यानंतर त्यांची साठवण व विक्री यासाठी पॅकेजिंग करावे लागते. आकर्षक वेष्टणांमुळे ग्राहक वस्तू खरेदीस प्रवृत्त होतात. पदार्थ वेष्टनबंद करण्यासाठी वापरात असलेल्या निरनिराळ्या प्रकारचे पॅकिंग साहित्य आणि त्यावरील डिझाईन व रंगसंगती यामुळे प्रक्रिया पदार्थ ग्राहकांमध्ये लवकर प्रसिद्ध होतात. या व्यवसायात ब्रॅडिंगचे महत्वही खूप आहे. त्यावरील लेबलवर पदार्थाचे नाव, वजन किंवा आकारमान, तयार केल्याची तारीख, पदार्थाची साठवण मर्यादा, विक्रीची किंमत, तयार करणाऱ्या कंपनीचा पत्ता, पदार्थात वापरण्यात आलेला कच्चा माल, इतर घटक तसेच रंग व संरक्षक रसायने, पदार्थांच्या गुणवत्तेबाबत ISI AGMARK FPO किंवा ISO च्या प्रमाणकांचा हॉलमॉर्क या प्रकारचा ग्राहकांचे समाधान व खात्री देणारा असतो. तसेच आरोग्य सुरक्षितता यादृष्टीने महत्वाचा तपशील पुरविणे अशा अनेक गोष्टींचा विचार ब्रॅडिंग ठरवताना करावा लागतो.

प्रक्रियायुक्त पदार्थांचे पॅकिंग आणि ब्रॅडिंगचे महत्व

पॅकिंगमुळे प्रक्रिया उत्पादनाचे परिणाम आणि वजन त्याच्या वितरणापासून ते त्याची विक्री होईपर्यंत तेच राहते. त्यामध्ये कोणताही बदल होत नाही, पॅकिंगमुळे प्रक्रिया उत्पादनाचे नुकसान होत नाही. तसेच त्याची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. ब्रॅडिंगमुळे उत्पादनातील घटक त्यांच्या पॅकिंगचा आणि एक्सपायरीचा दिनांक, वजन, परिणाम, मानांकने, उत्पादन वापरण्याची पद्धत, इ. बाबतची माहिती स्पष्ट होते. ब्रॅडिंगमुळे ग्राहकास पदार्थाची साठवणूक, वापर करण्याची पद्धत समजणे शक्य होते. पदार्थाचे ब्रॅडिंग आणि पॅकिंग विक्री व्यवस्थापनाचा एक महत्वाचा भाग आहे. आकर्षक पॅकिंग आणि ब्रॅडिंग ग्राहकांना उत्पादने खरेदी करण्यास प्रवृत्त करतात.

प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवाने

अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यापूर्वी शासनाच्या संबंधित विभागाचा परवाना घेणे बंधनकारक आहे. कारण तयार होणारे अन्नपदार्थ हे माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक तसेच सुरक्षित असणे महत्वाचे आहे. फळप्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी शासन अन्न व औषध प्रशासन FSSAI कायद्यानुसार परवाना देते. अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी संबंधीत शासकीय विभागात उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित प्रक्रिया उद्योगाचा परवाना घेता येतो.

लेखक - प्रा. तुषार गोरे (अन्नशास्त्र तंत्रज्ञान)
डॉ.हेमंत बाहेती, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद, जळगाव.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate