ताग, धैंचा, मूग, उडीद, चवळी व बरसीम यासारखी द्विदल पिके शेतात वाढवून नंतर ती त्याच शेतात गाडली जातात. साधारणपणे ही पिके 45 ते 50 दिवसापर्यंत आणि पीक 50 टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर त्याची कापणी करून नांगराच्या साह्याने जमिनीत गाडली जातात. ही पिके 45 दिवसाची झाल्यानंतर त्यात सेंद्रिय पदार्थाचे अधिक उत्पादन मिळते, मात्र ह्युमसचा पुरवठा कमी होतो. पण हिरवळीची पिके 60 ते 70 दिवसांची असताना जमिनीत गाडली असता जमिनीस ह्युमसचा पुरवठा होऊन अन्नद्रव्याचा पुरवठासुद्धा वाढतो. ताग व धैंचा पिकामुळे जमिनीत अनुक्रमे 90 व 70 किलो प्रति हेक्टरी नत्र जमिनीत टाकला जातो. शेतात गाडलेल्या हिरवळीच्या पिकाचे विघटन होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर पीक घेता येते.
झाडांच्या पानांचे खत
या हिरवळीची खते वापराच्या पद्धतीमध्ये, निरनिराळ्या बहुवर्षी झुडपे आणि झाडापासून पाने अनेक ठिकाणाहून गोळा केली जातात. शेतात ज्या ठिकाणी पीक घ्यावयाचे आहे अशा ठिकाणी जमा केलेल्या हिरव्या पानाचा वापर हिरवळीचे खत म्हणून करता येतो. उदाहरणार्थ टाकळा, तरवड, गिरीपुष्प, सुबाभूळ, शेवरी, कडुनिंब इत्यादी वनस्पतीची लागवड बांधावर केली जाते. या झाडाझुडपाचा पाला गोळा करून हिरवळीचे खत म्हणून उपयोग करावा. या पद्धतीत पिकांचा एकही हंगाम वाया जात नाही.
हिरवळीच्या पिकाचा समावेश
नेहमीच्या पीक पद्धतीमध्ये मुख्य पिकामध्ये आंतरपीक म्हणून हिरवळीच्या पिकांचा वापर करावा. या आंतरपीक पद्धतीमध्ये द्विदल वर्गीय पिकांच्या मुळ्या, मुळ्यावरील ग्रंथी, पाने व शेंडे यांच्या वापरामुळे जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. तसेच द्विदल वर्गीय पिके वातावरणातील वायुरूप नत्र स्थिर करतात. आणि ती नत्र पिकास मिळवून देतात उदाहरणार्थ भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन व चवळी यासारखी पिके मुख्य पिकात आंतरपीक म्हणून घेतात. कारण सुरवातीच्या काळात मुख्य पिकाची वाढ कमी असल्यामुळे ही पद्धत हिरवळीच्या खतासाठी उपयोगाची आहे.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन