जनावरांच्या व्यवस्थापनात गाभण जनावरांची योग्य निगा आणि देखभाल हे जन्माला येणाऱ्या वासरांच्या दृष्टीने, गाई-म्हशींच्या पुढच्या वेतात दूध उत्पादनाच्या दृष्टीने, तसेच दूध व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. गाभण जनावरांचे शास्त्रोक्त व्यवस्थापनाच्यादृष्टीने काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याकडे पशुपालकांनी लक्ष द्यावे.
गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाने अथवा नैसर्गिक पैदाशीने गाभण करवून घेतलेली तारीख पशुपालकाने नोंद करून ठेवावी. दोन ते अडीच महिन्यांनी तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून ती तपासून गाभण असल्याची खात्री करून घ्यावी. गाभण असल्यास कृत्रिम रेतनाच्या तारखेवरून ती सर्वसाधारणपणे कोणत्या तारखेला विणार हे निश्चित करता येते. जनावरे विण्याची तारीख नोंदवहीत किंवा गोठ्यातच नोंदवावी.
गर्भधारणा झाल्यापासून पहिले सहा महिने वाढ हळूहळू होत असते, तसेच याच काळात गाई-म्हशी दूधही देत असतात, त्यामुळे त्यांना नियमित आहार मिळतो. त्याचा उपयोग गर्भालाही होतो; परंतु गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाचे वजन पहिल्या सहा महिन्यांच्या साधारणपणे दुप्पट वाढते, म्हणून शेवटचे तीन महिने गाभण जनावर आणि गर्भ या दोघांच्याही दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. या काळात जनावरांचे दूध झपाट्याने कमी होते, त्यामुळे याच काळात पशुपालकांकडून गाभण जनावरांकडे दुर्लक्ष होते आणि जनावरांना शरीरात मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि प्रथिने साठवून ठेवणे गरजेचे असते. यांचा उपयोग त्याच्या दैनंदिन शारीरिक वाढीसाठी, गर्भाच्या पोषणासाठी, कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशींच्या पुनरुज्जीवनासाठी. चीक तयार करण्यासाठी, दुभत्या काळात शरीरातून वापरलेल्या घटकांची पूर्तता करण्यासाठी, व्यायल्यानंतर प्रथम दुग्ध काळासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी आणि इतर शारीरिक क्रियांसाठी होतो.
शरीरातील घटकांची पूर्तता न झाल्यास गाभण जनावरे अशक्त होतात. गर्भपात होण्याची शक्यता असते. वासरू कमी वजनाचे जन्माला येते, विताना त्रास होतो, वार वेळेवर पडत नाही, दूध कमी पडते आणि याचा परिणाम आपल्या दुग्ध व्यवसायाच्या अर्थशास्त्रावर पडतो. गाभण जनावरांना आहारातून आवश्यक ती प्रथिने, ऊर्जा, क्षार, जीवनसत्त्वे आणि स्वच्छ पाणी देणे आवश्यक असते. त्यासाठी गाभण जनावरांना नेहमीचा चारा, वैरण आणि शरीर पोषणासाठी आवश्यक असलेला दोन किलो पशुखाद्याशिवाय एक ते दोन किलो अधिक पशुखाद्य त्याबरोबर मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी द्यावे. सातव्या महिन्यापासून पुढे गर्भाच्या वेगाने होणाऱ्या वाढीसाठी, विशेषतः त्यांच्या हाडांच्या वाढीसाठी कॅल्शिअम आणि फॉस्फरस या दोन क्षारांची फार मोठी गरज असते. यासाठी गाभण जनावरांना आहारात आवश्यक ऊर्जा, प्रथिनांबरोबर शिफारशीत प्रमाणात क्षार मिश्रण आवश्यक द्यावे. गाय-म्हैस आटविल्यानंतर शेवटचे दूध काढल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तिच्या चारही सडांमध्ये स्तनदाहविरोधी औषधे सोडावीत, यामुळे गाय विण्यापूर्वी तसेच व्यायल्यानंतर कास निरोगी राहण्यास आणि काससुजी टाळण्यास मदत होते.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गाभण जनावरांना, गर्भपात झालेल्या जनावरांच्या संपर्कातही येणार नाही याची खबरदारी घ्यावी. गर्भपात झालेल्या जनावरांची पशुवैद्यकांकडून तपासणी करून गर्भपात टाळण्यासाठी उपाययोजना करावी. गाभण जनावरांना रोज थोडा चालण्याच्या व्यायामाची अत्यंत जरुरी असते, यामुळे त्यांचे स्नायू, तसेच पचनेंद्रिये उत्तम राहतात. यामुळे प्रसूतीच्या वेळी जनावरांना त्रास होत नाही. गाभण जनावरांना शेवटचे तीन आठवडे रानात, तसेच डोंगर भागात चरण्यासाठी पाठवू नये. तिला स्वतंत्र बांधून गोठ्यातच चारा-पाण्याची व्यवस्था करावी. गोठा मोठा, स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर असावा. गोठ्याला जास्त उतार नसावा. उतार जास्त असल्यास गर्भाच्या वजनामुळे मायांग बाहेर येण्याची शक्यता असते. गोठ्यात गाभण जनावरांना बसण्यासाठी गवताचा गादीप्रमाणे वापर करावा. गाभण जनावरांना रोज खरारा करावा. जनावर विताना पशुपालकाने योग्यरीत्या विशेष काळजी घ्यावी.
स्त्रोत: अग्रोवन