उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांमुळे व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांत उष्माघात होऊ शकतो. उष्णतेमुळे जनावरे थकतात, त्यांची भूक मंदावते, दूध उत्पादनात घट होते. विशेषतः संकरित जनावरांना वाढत्या तापमानाचा धोका अधिक असतो. कोंबड्यांना उष्णतेचा खूप त्रास होतो.
कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस किंवा त्याआसपास गेल्यास थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या जनावरांना त्रास होऊ लागतो. तापमान 35 अंश से.च्या वर गेल्यास व उन्हाच्या संपर्कात आल्यास होलस्टीन फ्रिजीयन गाईंना त्रास होऊ लागतो. तापमानामुळे जनावरांच्या श्वसनाचा वेग थोडा वाढतो. ते प्रति मिनीट 27 ते 30 वेळा श्वासोच्छ्वास घ्यायला लागतात. तापमान 40-41 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास त्यांचा श्वसनाचा वेग आणखी वाढतो. तोंड उघडे ठेवून जनावरे धाप घेऊ लागतात, त्यांचा तोल जाऊ लागतो.
तापमान 36 अंश से.च्या वर गेल्यास संकरित जनावरांत खाण्याचे प्रमाण कमी होते. जनावरांच्या मेंदूत असलेल्या हायपोथॅलॅमस या भागात हीट गेन व हीट लॉस अशी दोन केंद्रे असतात. बाहेरील उष्णता शरीरात घुसते तेव्हा शरीराच्या तापमानापेक्षा बाहेरील तापमान जास्त असेल तर शरीरात उष्णतेचे वहन होते, त्यामुळे घामग्रंथी घाम गाळायला सुरवात करतात. शरीराचे तापमान कमी व्हायला लागते. म्हशींमध्ये गाईंच्या तुलनेत घामग्रंथींची संख्या कमी असते, त्यामुळे त्यांना उन्हाचा त्रास अधिक होतो. मात्र, सूर्यकिरणांद्वारे येणाऱ्या अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरणांचा विचार करता इतर जनावरांच्या तुलनेत म्हशींमध्ये याचा त्रास कमी असतो, कारण म्हशीच्या कातडीत मॅलेनीनचे प्रमाण अधिक असते.
1) जनावरांना मुबलक स्वच्छ व थंड पाणी द्यावे, गोठा थंड ठेवावा, योग्य आहार द्यावा.
2) गोठ्यामध्ये पंखे, कुलर अथवा बाहेरील गरम हवा आत येऊ नये म्हणून खिडक्यांना गोणपाट लावून त्यावर पाणी फवारावे.
3) गोठ्याच्या छतावर गवत, तुराट्या, कडबा, उसाचे पाचट, पालापाचोळा आदींचे आच्छादन टाकावे, त्यामुळे छत गरम होत नाही. पत्रा असल्यास त्याच्या वरील बाजूस चुना लावावा, आतील बाजूस हिरवा रंग लावावा. संकरित गाईंना रोज थंड पाण्याने अंघोळ घालावी.
4) चारा, कुट्टी करून शक्यतो रात्री किंवा सकाळी द्यावा. दुपारच्या वेळी हिरवी वैरण खाण्यास द्यावी. जनावरांना उन्हाच्यावेळी चरायला न सोडता सकाळ- संध्याकाळी चरण्यास सोडावे.
5) जनावरांच्या शरीरवजनानुसार अंदाजे वीस ते पन्नास ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा; तसेच गूळ, मीठ व क्षारमिश्रण इ. दररोज द्यावे.
6) ज्या जनावरांना उष्णतेचा त्रास होत आहे, त्यांवर पाण्याचा शिडकावा करावा किंवा ओले गोणपाट टाकावे.
7) वासरांना शेडमध्येच ठेवावे, त्यांना थेट सूर्यप्रकाशापासून वाचवावे.
संपर्क -डॉ. व्ही. आर. पातोदकर, 9423862985
डॉ. व्ही. डी. लोणकर, 9420243895
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
अपघातात कायमचे अपंगत्व आलेल्या अकोला जिल्ह्यातील प...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...