অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गव्हांकुराचा चारा दुधाळ गाईंना

विंचुर्णी (ता. फलटण, जि. सातारा) येथील अनिल निंबाळकर यांनी दुष्काळी स्थितीतही चारा, पाणी व पशुखाद्य व्यवस्थापनात समतोल साधत दुग्ध व्यवसाय टिकवला आहे. पाण्याअभावी चारा उत्पादनाचे क्षेत्र घटले असताना निंबाळकर यांनी हायड्रोपोनिक्‍स तंत्राने गव्हांकुराच्या चाऱ्याची निर्मिती केली. त्यामुळे दुष्काळी स्थितीतही गाईंना पोषक आहार मिळतो आहे. 

फलटणच्या दक्षिणेस नऊ किलोमीटरवर विंचुर्णी हे गाव आहे. हे गाव पूर्णतः दुष्काळीपट्ट्यात येते. या गावात अनिल केशवराव निंबाळकर यांची 22 एकर शेती आहे. पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर असून पाण्याच्या उपलब्धतेनुसार जिरायती पिके आणि जनावरांसाठी चाऱ्याची लागवड केली जाते. सन 1983 पासून निंबाळकर दुग्ध व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे सहा होल्स्टिन फ्रिजीयन गाई, आठ कालवडी आणि तीन मुऱ्हा म्हशी आहेत. चाऱ्यासाठी त्यांच्याकडे ऊस, नेपिअर गवताच्या डीएचएन-6 जातीची तसेच कडवळाची लागवड असते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. चाऱ्याच्या कमतरतेमध्ये जनावरांना पोषक आहार देण्यासाठी त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून गाईंच्या आहारात ऍझोला तसेच गव्हांकुराचा वापर सुरू केला आहे. या दोन्ही घटकांच्या आहारातील वापरामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे. हा पर्याय त्यांना फायदेशीर ठरला आहे. 

...असे आहे गाईंचे व्यवस्थापन

  • पाच वर्षांपूर्वी निंबाळकरांनी मुक्त संचार पद्धतीने गाईंचे संगोपन सुरू केले. गोठ्यातच एका बाजूला सावलीसाठी शेड असून तेथे गाईंना पाणी व गव्हाणीची सोय केली आहे. सकाळी सहा वाजता यंत्राद्वारे दूध काढणी केली जाते. त्यानंतर प्रत्येक गाईस 15 किलो गव्हांकुराचा चारा आणि सात किलो ओला व वाळलेल्या चाऱ्याची कुट्टी दिली जाते.
  • गोठ्यातील टाकीत पाणी भरलेले असते, त्यामुळे गाई दिवसभर गरजेनुसार पाणी पितात.
  • सायंकाळी चार वाजता प्रत्येक गाईला दहा किलो ओला व वाळलेला चारा कुट्टी तसेच अर्धा किलो सरकी पेंड, दीड किलो गव्हाच्या भुसा, एक किलो ऍझोला, वीस ग्रॅम खनिज मिश्रण एकत्र करून दिले जाते. दररोज 15 ते 20 किलो मूरघास गाईंना दिला जातो. सायंकाळी सहा वाजता यंत्राद्वारे दुधाची काढणी होते.
  • मुक्त संचार पद्धतीमुळे गाईंना चांगला व्यायाम होतो, त्या चांगल्याप्रकारे रवंथ करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहून दुधात सातत्य टिकते. गाईंना अंग घासण्यासाठी गोठ्यात मध्यभागी खांब उभा केला आहे. त्यावर गाईंना गरजेनुसार अंग घासता येते.
  • दर तीन महिन्यांनंतर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार जंतनिर्मूलन आणि शिफारशीनुसार लसीकरण केले जाते.
  • गाई माजावर आल्यावर कृत्रिम रेतन पद्धतीचा वापर करून भरविल्या जातात.
  • तीन म्हशींसाठी स्वतंत्र गोठा बांधला आहे.

हायड्रोपोनिक्‍स तंत्राने गव्हांकुर चारानिर्मिती

 

 

 

 

दुग्ध व्यवसायाच्यादृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईंसाठी सकस चाऱ्याची उपलब्धता. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यावर विचार करत असताना निंबाळकरांना फलटण येथील गोविंद दूध डेअरीच्या माध्यमातून गव्हांकुरापासून चारानिर्मितीचा मार्ग गवसला. त्यांनी कृषी संशोधन केंद्र, मडगाव (गोवा) येथील गव्हांकुर चारानिर्मिती प्रकल्पांना भेट देऊन शास्त्रीय माहिती घेतली. गव्हांकुर निर्मिती करण्याच्या यंत्रणेची किंमत 15 लाख रुपये आहे. निंबाळकरांनी त्यातील तंत्र समजून घेऊन घरालगतच शेडनेटच्या साहाय्याने 15 x 10 फूट आकाराची खोली तयार केली. एका बाजूला दरवाजा बसवला. या खोलीत एकावेळी 75 ट्रे बसतील अशी सोय केली.

गव्हांकुर तयार करताना सुरवातीला वीस लिटर पाण्यात 12 किलो उच्च प्रतीचा गहू 12 तास भिजविला जातो. त्यानंतर पाण्यातून काढून हा गहू पोत्यामध्ये 12 तास दडपून ठेवला जातो. त्यामुळे गव्हाला लवकर कोंब फुटतात. कोंब फुटलेले दीड किलो गहू तीन x दोन फूट आकाराच्या ट्रेमध्ये एकसारखे पसरून ठेवले जातात. हे ट्रे शेडनेटमधील कप्प्यात ठेवले जातात. गव्हांकुरला पाणी देण्यासाठी शेडमध्ये फॉगर्स बसविलेले आहे. त्यास टायमर लावला आहे. दर दोन तासांनंतर या खोलीत पाच मिनिटे पाणी फवारले जाते. शेडसह या तंत्रासाठी त्यांना 30 हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. साधारण आठ दिवसांत हे गव्हांकुर सहा इंचांपर्यंत वाढतात. दीड ते दोन किलो गव्हापासून 14 किलो हिरवा चारा तयार होतो. जमिनीवर एक किलो हिरवा चारा तयार करण्यासाठी 60 ते 80 लिटर पाणी लागते. सदरच्या पद्धतीने चारा तयार करताना दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये एक किलो हिरवा चारा तयार होतो. या तंत्रज्ञानातून दररोज 100 ते 120 किलोपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यासाठीची साखळी त्यांनी व्यवस्थित बसवली आहे. दररोज उत्पादित होणारा चारा जनावरांना खाण्यास दिल्यानंतर कोंब आलेले गहू पुन्हा ट्रेमध्ये पसरून ठेवतात. या ट्रेमध्ये आठ दिवसांत गव्हांकुर तयार होतात. 

...असे झाले फायदे

गव्हांकुराचा चारा अत्यंत पाचक असून त्याचे शरीरात 90 टक्‍क्‍यांपर्यंत पचन होते. यामुळे गाईंना पोषक आहार मिळाल्याने गाईंचे आरोग्य चांगले राहते. गाईंच्या दुधाची प्रत सुधारली आहे. पूर्णतः पांढरट दूध तयार झाल्याने त्यास चांगली चवही मिळते. या पद्धतीने मक्‍यापासूनही चारा तयार करता येतो. गव्हांकुरापासून चारानिर्मिती करण्यासाठी प्रतिकिलो केवळ दोन रुपये खर्च येतो. यासाठी मनुष्यबळ कमी लागते. गव्हांकुराच्या वापरामुळे 35 टक्के चारा व 50 टक्के पशुखाद्याची बचत झाल्याचे निंबाळकर सांगतात. 

'ऍग्रोवन'मधून मिळाले ऍझोला निर्मितीचे तंत्र....

निंबाळकरांना दै. ऍग्रोवनमधून ऍझोला निर्मिती तंत्राची माहिती मिळाली. तसेच शिरवळ (ता. खंडाळा) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील ऍझोला प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यानंतर गोविंद डेअरीतील पशुतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी 18 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 20 सें.मी उंचीचे सिमेंट कॉंक्रिटचे दहा वाफे तयार केले. 
वाफ्यातील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यासाठी तळाला एक पाइप बसवली आहे. वाफ्याच्या खोलीपासून आठ सेंटिमीटर उंचीवर दुसरी पाइप बसविली. याद्वारे दर पंधरा दिवसांनी वाफ्यातून 25 टक्के पाणी काढून घेतले जाते. हे पाणी पिकाला दिले जाते. वाफ्याच्या खोलीपासून 12 सेंटिमीटरवर तिसरी पाइप बसवली आहे. त्याद्वारे शेडवरून पावसाचे पडणारे पाणी वाहून न जाता त्या पाइपमधून सर्व वाफ्यात समांतर पाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. या वाफ्यांच्या निर्मितीसाठी त्यांना 45 हजार रुपये खर्च आला आहे. 
वाफ्यामध्ये एका चौरस मीटरसाठी पाच किलो चाळलेली काळी माती, दोन किलो शेण स्लरी, 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 10 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून पाणी बारा इंचापर्यंत भरले जाते. सुरवातीला प्रत्येक वाफ्यात ऍझोलाचे एक किलो बियाणे सोडले जाते. ऍझोला ही तरंगती व शेवाळवर्गीय वनस्पती आहे. त्यांची वाढ होऊन 10 ते 12 दिवसांमध्ये पूर्ण वाफे भरले जातात. या वाफ्यातून एक चतुर्थांश ऍझोला दररोज काढून घेतला जातो. हा ऍझोला चाऱ्यासोबत जनावरांना पुरविला जातो. ही नत्र स्थिरीकरण करणारी वनस्पती असून जनावरांमध्ये अन्न पचनासाठी ती उपयुक्त ठरते.

ऍझोलाचे फायदे 

सध्या दररोज आठ वाफ्यांमधून 20 किलो ऍझोला मिळतो. ऍझोलामुळे पशुखाद्यामध्ये बचत झाली. यामध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण आहे. गाईंना ऍझोला खायला दिल्यानंतर दूध उत्पादनात फरक जाणवला. ऍझोला देण्याअगोदर 3.8 ते 4.0 पर्यंत दुधास फॅट होती. 28.5 ते 29 पर्यंत डिग्री तसेच 8.2 ते 8.5 पर्यंत एसएनएफ होता. त्याचबरोबर दुधात प्रोटिनचे प्रमाण 2.87 ते 2.92 मिळायचे. ऍझोलाचा वापर सुरू केल्यानंतर 4.1 ते 4.4 पर्यंत फॅट पोचली. डिग्री 31 व 9.1 पर्यंत एसएनएफ पोचला. तर 3.1 ते 3.3 पर्यंत प्रोटिनचे प्रमाण मिळत आहे.ऍझोलाच्या वापरामुळे त्यांना 25 टक्‍क्‍यांपर्यंत पशुखाद्याची बचत करता आली आहे.

उत्पन्नाचे गणित

दिवसाला प्रति गाईपासून सरासरी 12 लिटर दूध मिळते. सध्या सहा गाईंपासून 70 लिटर दूध जमा होते. उत्पादित दुधाची गुणवत्ता चांगली असल्याने डेअरीकडून इतर उत्पादकांपेक्षा सरासरी तीन ते सहा रुपये प्रतिलिटरला दर वाढवून मिळत आहे. दरमहा दुग्ध व्यवसायातून त्यांना 40 ते 45 हजारांचे उत्पन्न मिळते. मुक्त संचार पद्धतीचा गोठा असल्याने मजूर खर्च अजिबात नाही. निंबाळकर स्वतः व त्यांची पत्नी सौ. छाया तसेच मुले ओंकार व प्रथमेश गोठा व्यवस्थापन सांभाळतात. खाद्य व इतर खर्च वगळता प्रतिमहिना वीस हजार निव्वळ नफा मिळतो.
शेतीमध्ये कोणतेही रासायनिक खत न वापरता पूर्णपणे शेणखताचा वापर करतात. कंपोस्ट व गांडूळ खतही ते शेतावरच तयार करतात. पाण्याची उपलब्धता असणाऱ्या जवळच्या शेतकऱ्यांशी करार करून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेतात. वर्षाकाठी गोठ्यातून पाच जातिवंत कालवडी तयार होतात. त्या गाभण राहिल्यानंतर विकतात. यातून दरवर्षी दीड लाखाचे उत्पन्न मिळते. त्यांनी प्रत्येक गाईचा विमाही उतरवला आहे. निंबाळकरांनी गोठ्यालगत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राचीही उभारणी केली आहे. 

संपर्क - अनिल निंबाळकर - 9922576549 
(सर्व छायाचित्रे - अमोल जाधव)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate