অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीसोबतच कोंबडीपालन...

शेतीसोबतच कोंबडीपालन...

रत्नागिरी जिल्ह्यातील दौऱ्यात यशकथा हमखास मिळणार याची खात्री होती. पत्रकार मित्रांसोबत गप्पा करतांना अनेक विषय समजले आणि प्रत्यक्ष भेटून काही माहिती घेतली. कोकणातील प्रत्येक गावाचा स्वतंत्र असा इतिहास तर आहेच परंतु सांस्कृतिक आणि पारंपारिक वारसा देखील आहे. संगमेश्वर तालुक्यातलं देवरुख हे गांव असेच मोठी परंपरा असलेलं गांव. नवरात्र असल्याने सोळजाई देवीचं दर्शन घेता आलं.

‘देवराईʼ संकल्पना रुजविणा-या गावांत या गावाचे नांवच देवरुख झाले कारण वड आणि पिंपळ ही देवाची झाडे म्हणून कोकणात ओळखली जातात. काकासाहेब पंडित, दादासाहेब माळवणकर, विनायकराव केतकर, रावसाहेब कुलकर्णी, दादासाहेब सरदेशपांडे, श्रीमती इंदिराताई हळबे, अशी किती तरी नांवे या गावाशी जोडली गेली आहेत. मार्लेश्वर, टिकलेश्वर, कर्णेयश्वर ही पर्यटन स्थळे प्रसिध्द आहेत.

देवरुख जवळच असणारे माभळे हे लहानसं गांव सध्या चर्चेत आहे ते कुक्कुटपालन व्यवसायासाठी. शेती सोबतच जोडधंदा म्हणून तरुणांनी एकत्र येऊन कुक्कुटपालन सुरु केलं आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. त्याची ही कहाणी.

कोकणात भात शेतीच्या पलीकडे फारसे होत नाही. आंबा, काजूसह आता जोड किंवा पुरक व्यवसाय म्हणून कोंबडी पालन किंवा कुक्कुटपालन व्यवसायाकडे अनेक लोक वळत आहेत. कोंबडी पालनामध्ये सर्वसाधारणपणे दोन प्रकार माहिती असतात. एक म्हणजे गावठी किंवा गावरान आणि दुसरी म्हणजे हायब्रीड किंवा ब्रॅायलर. परंतु कोंबडी पालनासाठी अनेक प्रकार उपलब्ध आहेत. असील, कडकनाथ, वनराजा, कृपीब्रो यासह स्थानिक जाती मध्येही अनेक प्रकार आढळतात. वजन आणि अंडी उत्पादन क्षमता लक्षात घेऊन त्यांचे पालन करण्यात येते. कोंबडी पालनात खाद्याला फार महत्व असते. कोंबड्या ज्या जागेत ठेवल्या जातात तेथील तपमान, हवा आणि प्रकाश याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागते. कोंबडी पालनात खाद्य आणि पाणी याचे देखील उत्तम समन्वय असणे आवश्यक असते. कोंबड्याचे आरोग्य, शेड, लसीकरण यासोबतच बाजारपेठाची माहिती असणे आवश्यक ठरते. कोकणात या सर्व गोष्टी गृहीत धरुन हा व्यवसाय यशस्वी होतो आहे.

माभळे जाधववाडी येथील मनोहर जाधव व लोवले येथील राहूल फटकरणे यांनी शेती करण्याचे निश्चित केले. मात्र शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने दोघांनी कुक्कुटपालन करण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला स्टार प्रशिक्षण स्वयंरोजगार संस्था, रत्नागिरी यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. त्यांना श्री.जमादार व श्री.कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. 10 दिवस घेतलेल्या प्रशिक्षणानंतर त्यांनी लोवले व माभळे येथे कुक्कुटपालन सुरु केले. सुरुवातीला 1 दिवसाची पिल्ले आणून त्यांनी ती वाढवली. गिरीराज, कावेरी, गावठी जातीची पिल्ले त्यांनी निवडली. आता ही पिल्ले 1 महिन्यांची झाली असून त्याचे वजनही चांगले वाढले आहे. त्यांच्याकडे आता 100 पेक्षा अधिक पक्षी असून त्यांची विक्रीही सुरु करण्यात येणार आहे.

एकूणच कोकणात आता शेती पुरक जोडधंदा म्हणून कोंबडीपालन व्यवसायाकडे तरुण वळू लागल्याचे चित्र दिसते आहे. हाच आदर्श इतरांनी घेतला तर स्थानिक पातळीवरच रोजगाराची संधी सहज उपलब्ध करता येईल. त्यांचा आदर्श आता अनेक तरुण घेतांना दिसतात.

लेखक: डॉ.गणेश व.मुळे,

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate