অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आमळीत साकारली शेती औजारांची बँक

आमळीत साकारली शेती औजारांची बँक

आपल्याला आतापर्यंत पैसे, रक्त, आय बँक अशी नावे ऐकलेली होती. मात्र, या बँकेच्या प्रकारात आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. ही बँक पैसे, रक्त किंवा नेत्र बँक नाही, तर ही बँक आहे, शेतीसाठी लागणाऱ्या औजारांची. साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आमळीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी भीमराव बारकू बोरसे यांची ही बँक परिसरातील अनेक गरजू शेतकऱ्यांची गरज भागवत असून समूह शेतीचे हे एक उत्तम मॉडेल म्हणून पुढे येत आहे.

आमळी परिसर म्हणजे धुळे जिल्ह्याचे पश्चिमेकडील शेवटचे टोक होय. या भागात वर्षभरात सरासरी 1 हजार मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. पावसाळ्यात हा परिसर विलोभनीय व रम्य असा असतो. गावापासून जवळच अलालदरी आहे. पावसाळ्यात अलालदरीतून फेसाळत कोसळणारे धबधबे पाहणे हा सुध्दा एक अवर्णनीय आनंद आहे. या भागात मुख्य पीक म्हणजे भात व नागली होय. किंबहुना हा परिसर भात पिकासाठी धुळे जिल्ह्याचे आगरच होय. याशिवाय मका, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, मसूर, वाटाणा आदी पिकेही शेतकरी घेऊ लागले आहेत.

याच भागात काबऱ्याखडक, मालनगावसारखे मध्यम प्रकल्प आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी गहू, ऊस या नगदी पिकांचे उत्पादन काढू लागले आहेत. तसेच वन्य प्राणीही या गावात अधून- मधून हजेरी लावत असतात. आमळी गाव हे कन्हय्यालाल महाराज यांच्या मंदिरासाठी प्रसिध्द आहे. येथे दरवर्षी कार्तिकी एकादशीला भव्य अशी यात्रा भरते. यात्रेनिमित्त पाच ते सहा लाख भाविक दर्शनासाठी येत असतात.

अशा या आमळी गावात भीमराव बोरसे हे शेती करतात. त्यांच्याकडे 2 हेक्टर 82 आर एवढे क्षेत्र आहे. त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झालेले आहे. मात्र, हे कमी झालेले शिक्षण त्यांच्या आधुनिक पद्धतीने शेती करण्यात कुठलाही अडथळा आणू शकले नाही. त्यांनी गावात अन्य शेतकरी व ग्रामस्थांचे सहकार्य घेत श्री कन्हय्यालाल महाराज पाणलोट ग्रामविकास संस्था व कन्हय्यालाल महाराज शेतकरी गटाची स्थापना केली आहे.

शेती औजारे बँकेविषयी ते सांगतात, 2005 मध्ये ‘बायफ’ने 60 रुपये किमतीचे कटर दिले होते. या कटरपासून प्रेरणा घेत एक-एक साहित्य जमवायला सुरूवात केली. आज 48 पेक्षा जास्त अवजारे असून त्यांची किंमत 60 रुपयांपासून सहा लाख रुपयांपर्यंत आहे. यात ट्रॅक्टर, बीबीएफ, सीड ड्रील, पलटी नांगर, सुपडी, कल्टीव्हेटर, फवारणी यंत्रे आदींचा समावेश आहे. सहा लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरसाठी कृषी विभागाने 100 टक्के अनुदान दिले आहे. याशिवाय संजीवनी सीड्स सारख्या स्वयंसेवी संस्था मदत करतात, असे श्री. बोरसे आवर्जून नमूद करतात.

शेती औजारांची बँक तयार केल्यावर या बँकेचा अल्पभूधारक, सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ देण्यास श्री. बोरसे यांनी सुरूवात केली. या औजारांच्या वापराचे दर निश्चित करण्यात आले आहेत. कोळपणी यंत्र असेल, तर 20 रुपये, ट्रॅक्टर असेल, तर 200 रुपये प्रतितास याप्रमाणे दर आकारले जातात. यातून जमा होणारे पैसे संस्थेच्या खात्यात जमा केले जातात. संस्थेच्या खात्यात जमा होणारे पैसे गरजू शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या वेळेस तसेच पावसाळ्याच्या तोंडावर बी- बियाणे, खतांच्या खरेदीसाठी अल्प व्याजदराने दिले जातात. एवढेच नव्हे, तर वैद्यकीय उपचार, मुलांच्या शिक्षणासाठीही या गंगाजळीचा वापर केला जातो. शेतीची आधुनिक औजारे अल्पदरात वापरासाठी उपलब्ध होऊ लागल्याने शेती उत्पादनात वाढ झाली आहे. पूर्वी एकरी 10 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी आता 30 ते 35 क्विंटलपर्यंतचे उत्पादन घेऊ लागले आहेत. या औजारांचा आमळीतील 350 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे शिल्लक राहू लागले आहेत.

कन्हय्यालाल पाणलोट संस्थेसह श्री. बोरसे यांनी महिला व पुरुष बचत गटांची स्थापना केली आहे. या बचत गटांच्या माध्यमातून प्रामुख्याने सेंद्रीय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या तांदळाचे मार्केटिंग केले जाते. त्यामुळे आमळी येथील तांदळाला मागणी वाढली आहे. त्यासाठी व्यापारी आगाऊ नोंदणी करू लागले आहेत. इंद्रायणी, सह्याद्री, खुशबू, बासमती, भोवाडा, कमोद, गावरानी या भाताच्या वाणांना चांगली मागणी असल्याचे श्री. बोरसे आवर्जून नमूद करतात. बचत गटातील महिला सदस्य तांदळाचे ग्रेडिंग करुन पाच- पाच किलोच्या पिशवीत तांदळाचे पॅकिंग करतात. त्यासाठी आवश्यक ती सामग्रीही महिला बचत गटाने खरेदी केली आहे, तर ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत कृषी विभागामार्फत पिशव्यांचा पुरवा केला जातो.

सेंद्रीय शेतीवर भर


श्री. बोरसे यांचा प्रारंभापासूनच आधुनिक शेती करताना सेंद्रीय शेतीवर भर राहिला आहे. रासायनिक खतांचा वापर न करता कमी खर्चात चांगल्या पद्धतीने शेती करता येते, असे श्री. बोरसे यांचे म्हणणे आहे. सेंद्रीय शेतीबाबत श्री. बोरसे यांना वडणे, ता. धुळे येथील कृषी भूषण पुरस्कार प्राप्त दिलीप रामदास पाटील यांच्याबरोबरच ॲड. वसंत बोरसे, नामदेव नागरे यांचेही मार्गदर्शन लाभते. सेंद्रीय शेती करुन तिचा प्रचार व प्रसार करणे, श्री (एक काडी) पद्धतीने भात लागवड करुन उत्पादकता वाढविणे, देशी वाणांचे संवर्धन करणे, नैसर्गिक व सांस्कृतिक ठेवा जोपासणे, उत्पादीत सेंद्रीय भात, नागलीची प्रतिवारी करुन स्वत:चा ब्रॅण्ड तयार करुन स्वतंत्र विक्री व्यवस्था उभी करण्यात येत असल्याचे श्री. बोरसे आवर्जून नमूद करतात.  श्री. बोरसे यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत देशातील 11 राज्यांचा दौरा केला आहे. तसेच श्री. बोरसे यांनी राबविलेले विविध प्रयोग पाहण्यासाठी देशभरातील शेकडो शेतकऱ्यांनी आमळीची वाट धरली आहे.

औजारे बँकेमुळे शेतीला लाभ

माझ्याकडे एकूण 6 एकर शेती आहे. शेती औजारे बँकेतील औजारे अल्पदरात पाहिजे तेव्हा उपलब्ध होतात. त्यामुळे शेतीच्या आधुनिकीकरणास लाभच झाला आहे. या औजारांमुळेच वेळेवर शेतीची मशागत, पेरणी, कापणी आणि मळणी करता येते. यामुळे उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत गहू, हरभराचे बियाणे उपलबध  झाले आहे. आता शेतात उसाची लागवड करावयाची आहे. -वनाजी पुनाजी पवार, शेतकरी, आमळी

तांदळाचे पॅकिंग, मार्केटिंग

महिलांनी एकत्रीत येत लक्ष्मी बचत गटाची स्थापना केली आहे. या बचत गटाच्या सदस्या एकमेकांना सहकार्य करतात. आम्ही नागलीचे वेफर्स तयार करुन त्याची विक्री करतो. तसेच 6 वर्षांपासून तांदळाचे ग्रेडिंग करण्यापासून ते पॅकिंग करण्यापर्यंतची कामे करतो. आमच्या बचतगटांचे कार्य उत्कृष्टरित्या सुरू आहे. नियमितपणे बैठकांचे आयोजन करुन आगामी उपक्रमांचे नियोजन केले जाते.

- नजूबाई बोरसे, अध्यक्षा लताबाई भीमराव बोरसे, सचिव, लक्ष्मी महिला बचतगट

मुलगी चालविते ट्रॅक्टर


श्री. बोरसे यांची मुलगी हीना भीमराव बोरसे ही 18 वर्षीय तरुणी स्वत: ट्रॅक्टर चालविते. पेरणीच्या दिवसांत महिलांना मदतीला घेत हीना पेरणी, लावणी, नांगरणीची कामे आटोपते. अतिशय सफाईदारपणे ती ट्रॅक्टर चालविते. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण विसरवाडी, ता. नवापूर येथे झाले आहे. ट्रॅक्टर चालविताना अजिबात भीती वाटत नाही, असे ती आवर्जून नमूद करते. पाचवी ते सहावीपासून वडिलांनी आपल्याला ट्रॅक्टर चालविण्यास शिकविल्याचे हीना सांगते. बारावीनंतर शिक्षण घेण्याची हीनाची तयारी असून पुढील वर्षी ती पुढच्या वर्गात प्रवेश घेणार आहे. हीनाचा एक भाऊ रायगड येथे, दुसरा पुणे येथे शिक्षण घेत आहे.

 


लेखक - टीम जिमाका, धुळे

स्त्रोत - महान्युज

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate