অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घातखेडचे कृषी विज्ञान केंद्र

घातखेडचे कृषी विज्ञान केंद्र
अमरावती येथील श्रमसाफल्य फाउंडेशनद्वारा संचालित व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिली पुरस्कृत घातखेड कृषि विज्ञान केंद्राची स्थापना १९९५ साली झाली. अमरावती-चांदूर रेल्वे रस्त्यावरील तपोवनेश्वर मंदिराच्या परिसरात हे कृषि विज्ञान केंद्र आहे. जिल्ह्यातील शेतक-यांना शेती व पूरक व्यवसायाबाबत शास्त्रशुद्ध माहिती मिळावी, या हेतूने श्रमसाफल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वसुधाताई देशमुख यांच्या प्रेरणेने या केंद्राची वाटचाल सुरू आहे.

केंद्राचे कार्य

  • जिल्ह्याची क्षेत्रव्याप्ती लक्षात घेता, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, धारणी हे आदिवासिबहुल तालुके व अचलपूर, चांदूर बाजार, तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या सात तालुक्यांत कृषि विज्ञान केंद्राचे कार्य चालते.
  • कृषि विज्ञान केंद्रामध्ये शेतक-यांना शेतीविषयक, बेरोजगार युवक व युवतींना शेतीपूरक व्यवसायाविषयी तसेच कृषि विस्तारकांना कृषिविषयक कृषि विद्यापीठ व केंद्रीय कृषि संशोधन संस्थांद्वारे शिफारस करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देण्यात येते.
  • प्रशिक्षणासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शेतक-यांसाठी निवासस्थान उपलब्ध असून दीर्घ मुदतीच्या प्रशिक्षणाकरिता ४0 शेतक-यांची निवासाची व्यवस्था प्रक्षेत्रावर केली जाते. कृषि विज्ञान केंद्रात विविध शेतीउपयोगी, शेतीपूरक व्यवसाय, रोपवाटिका, महिलांचे सक्षमीकरण, कृषिउपयोगी आधुनिक यंत्रे व अवजारे इत्यादी विषयांवर १ ते ७ दिवसीय प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण आयोजित करुन शेतक-यांना मार्गदर्शन केले जाते.

  • जिल्ह्यातील गाव निवड करुन विविध पिकांच्या नवीन शिफारशित तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रशिक्षण, प्रयोग प्रात्यक्षिक हे नव्याने विकसित तंत्रज्ञानावर घेतले जाते. त्याचप्रमाणे शेती व शेतीशी निगडित अशा विविध विषयांवर प्रथमदर्शीय पीक प्रात्यक्षिकेसुद्धा शेतक-यांच्या शेतावर घेऊन तंत्रज्ञानाविषयीची अनुभूती शेतक-यांसमोर दाखवून देण्यात येतात.
  • याचबरोबर, या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर दौरे, इत्यादी आयोजित करून शेतक-यांना माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे वेळोवेळी शेतीमध्ये होणारे बदल तसेच उद्भवणा-या समस्या यांवर शेतक-यांना लघुसंदेशाद्वारे (शेतकरी माहिती व सल्ला) त्वरिने माहिती दिली जात असून, शेतक-यांना दूरध्वनीवरूनसुद्धा विचारलेल्या प्रश्नांची सोडवणूक करून माहिती दिली जाते.
  • कृषि विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र ५९ एकर एवढ्या विस्तीर्ण आकारमानाचे असून जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची प्रात्यक्षिके त्यावर घेतली जातात. फळपिकांमध्ये संत्रा (रंगपूर व जंबेरी खंटावरील कलमे), आंबा (केशर व दशेहरी), आवळा (कृष्णा, कांचन, एन ६, एन ७, एन १०, आनंद, बनारशी), डाळिंब (भगवा, सुपर भगवा), लिंबू कागदी, सीताफळ, पेरू (सरदार एल ४९) इत्यादींची लागवड केलेली आहे. तसेच, शेतक-यांना या फळपिकांचे खात्रीचे कलम लागवडीकरिता विक्री केले जातात. तेलबियांमध्ये प्रामुख्याने सोयाबीनच्या विविध जाती; जसे जेएस ३३५, जेएस ९३0५, जेएस ९५६०, एनआरसी ३७, कपाशी, तूर (पीकेव्ही तारा), त्याचप्रमाणे चारापीक प्रात्यक्षिकामध्ये यशवंत व जयवंत गवताची लागवड केलेली आहे.
  • विविध हंगामांमध्ये नवीन विकसित झालेल्या विविध पिकांची लागवड करून पुढील वर्षीच्या हंगामामध्ये शेतक-यांना त्याचे बियाणे पुरविले जाते. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर, यशवंत, जयवंत गवताची ठोंबे इत्यादी आहेत. कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर अद्ययावत रोपवाटिका असून त्यामध्ये पॉलीहाउस, हरितगृह, शेडनेट इत्यादी उपक्रम घेण्यात येतात. तसेच त्यामध्ये नियंत्रित वातावरणात भाजीपाला, कलमे, रोपे उत्पादित केली जातात.

मृद् व जलसंधारणाचे महत्व

शेतक-यांना मृदू व जल संधारणाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रक्षेत्रावर ढाळीचे बांध, सलग समतल चर, नाल्यावरील बांध, सामूहिक शेततळे, शेततळे तसेच कमी पाण्यावर पिकांचे नियोजन करण्यासाठी त्यामुळेच कृषि विज्ञान केंद्राचा परिसर आदर्श आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. कृषिक्षेत्रात यांत्रिकीकरणास चालना देणाच्या दृष्टिकोनातून शेतीशी निगडित सर्व महत्वाची कृषि यंत्रे व अवजारे प्रक्षेत्रावर उपलब्ध आहेत.

स्वयंरोजगार निर्मिती स्वयंरोजगार निर्मितीच्या दृष्टीने मिनी डाळमिलचा उपयोग करून डाळ बनविण्याकरिता पुरुष व महिला बचत गटांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीकरिता उद्युक्त करण्यात येत आहे. शेतीपयोगी आधुनिक यंत्रे व अवजारे यांचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने तसेच गावातील शेतकरी गट सक्षम होण्याच्या हेतूने ही अवजारे भाडेतत्त्वावर देण्याची सोय उपलब्ध आहे.

माती व पाणी परीक्षण

शास्त्रोक्त पद्धतीने शेती करून भरघोस उत्पादनाकरिता खताच्या वापराचे फार महत्व आहे. किफायतशीर पीक उत्पादनासाठी माती परीक्षणावर आधारित पिकांना संतुलित रासायनिक खताच्या शिफारशी देणे आवश्यक आहे, या दृष्टीने कृषि विज्ञान केंद्र, घातखेड येथे माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध आहे. याद्वारे मातीच्या नमुन्यांचे पृथक्करण करून मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नघटक इत्यादी मूलद्रव्यांची उपलब्ध मात्रा तपासून जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या मात्रेनुसार खताची मात्रा पीकनिहाय ठरवून शिफारशीप्रमाणे शेतक-यांना काढून दिली जाते. तसेच माती परीक्षणावरुन शेतक-यांना त्यांच्या शेतामध्ये कोणते पीक घेता येईल व कोणते पीक घेऊन चांगले उत्पादन शेतकरी घेऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे पाण्याचे परीक्षण करून शेतक-यांकडे उपलब्ध असलेले पाणी ओलिताकरिता योग्य आहे अथवा नाही, हे ठरवून त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. आदिवासिबहुल धारणी व चिखलदरा येथील शेतक-यांकरिता मुख्यत: फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा, मानव विकास कार्यक्रमांतर्गत सन २०११ पासून कार्यान्वित असून, येथील शेतक-यांच्या शेतातील माती तपासून शेतक-यांना जमिनीतील अन्नघटकांविषयी अवगत केले जात असून, या शेतक-यांना खताच्या वापरासंबंधित व जमिनीच्या आरोग्याविषयी प्रशिक्षित केले जात आहे. उपलब्ध असलेल्या माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेने आत्तापर्यंत अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांतील एकूण २२५ गावांचा सुपीकता निर्देशांक तयार केलेला असून, त्याविषयी गावांतील दर्शनीय भागामध्ये गावाच्या सुपीकता निर्देशांकाचे फलकसुद्धा लावलेले आहेत.

शेतक-यांना प्रशिक्षण

पिकांमध्ये रोग निर्माण करणा-या बुरशीच्या व्यवस्थापनाकरिता ट्रायकोडर्मा बुरशीचे उत्पादन गावपातळीवर स्वतः शेतक-याने करण्याकरिता जैव तंत्रज्ञान विभाग, नवी दिलीअंतर्गत मंजूर प्रकल्पातून शेतक-यांना ट्रायकोडर्माचे उत्पादन करण्याविषयी १o गावांमध्ये १oo शेतक-यांना प्रशिक्षित केले असून, कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर ट्रायकोडर्मा बुरशीचे उत्पादन सुरू करण्यात आलेले असून शेतक-यांना ही बुरशी तयार करण्याचे प्रशिक्षण व विक्रीसाठी बुरशी उपलब्ध आहे.

शेतीपूरक व्यवसायाची माहिती शेतीला पूरक व्यवसाय म्हणून उस्मानाबादी जातीच्या शेळीचे संगोपन करण्यात येत असून शेतक-यांना शेळीव्यवस्थापन, दुग्धव्यवसाय, परसातील कुक्कुटपालनाविषयी कार्यानुभवातून प्रशिक्षण देऊन प्रकल्प उभारणीसाठी व व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षण देऊन प्रशिक्षण पश्चात प्रमाणपत्रसुद्धा दिले जाते.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन


 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate