অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टरबूज उत्पादक - गांव कोकणा

टरबूज उत्पादक - गांव कोकणा

गोंदिया जिल्हा धानाच्या पीकासाठी प्रसिध्द आहे. पण इथले शेतकरीही तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध पीकांची शेती करण्यासाठी उत्सूक आहे.  वांगी, टमाटर, कोबी, चवळी, भेंडी, गवार, दोडके, उस असे उत्पादन घेत  होते. पण आता त्या पेक्षादेखील कमी वेळात जास्त नफा मिळवून देणाऱ्या टरबूजाच्या हंगामी लागवडीकडे  हे शेतकरी वळले आहेत.

गोंदिया जिल्हयातील सडकअर्जुनी तालुक्यातील कोकणा/जमी या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या 210 एकर शेतात टरबूजाची लागवड करुन विक्रमी उत्पादन घेतले आहे. कोकणा/जमी येथील 210 शेतकऱ्यांनी अगस्ता, आयेशा, खुशबू, माधुरी, नैना यू एन, 4001, मधुबाला या वाणांच्या टरबूजांना प्राधान्य दिले. भात शेतीपासून शेतकऱ्यांना परावृत्त करुन नगदी शेतीकडे वळण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रीकापूरे यांनी जिल्हयातील शेतकऱ्यांचे कृषिविषयक प्रबोधन केले.

टरबूजाचे उत्पादन  घेतांना त्यामुळे  येणाऱ्या संकटाचा सामनाही या शेतकऱ्यांनी मोठया हिमतीने केला. नियोजनपूर्वक खत व उत्कृष्ट वाणांची निवड  केली. ढगाळ वातावरणात टरबूजाच्या वेली आपोआप वाळतात. बऱ्याचवेळा किटकनाशकांचा उपयोग करुनही वेलींवरील हा रोग आटोक्यात येत नाही. पण तरीही हे शेतकरी प्रत्येक समस्येवर मात करुन टरबूजाची शेती यशस्वीपणे करीत आहे.

कोकणा/जमी गावातील माती काळी असल्याने इथल्या टरबूजाचा गोडवा व रसाळपणा मधूर आहे. टरबूजाची शेती करतांना एका एकरात पीकाला लागलेला खर्च वजा केल्यास निव्वळ नफा 60 ते 70 हजार रुपये मिळतो आहे. प्रगतीशील शेतकरी व्यंकट रहिले यांच्या शेतात तब्बल 12 किलोचे एकेक टरबूज आहे. याचे श्रेय ते योग्य नियोजनाला देतात. बाजारातील टरबूजाची वाढलेली मागणी बघता कोकणा/जमीचे शेतकरी भरपूर प्रमाणात नफा कमवीत आहेत. या टरबूजाची निर्यात आता जिल्हयाबाहेरही होत आहे. इतर शेतकऱ्यांनीदेखील टरबूजाची शेती करण्याबाबत प्रगतीशील शेतकरी खेमराज भेंडारकर यांनी  सांगितले.

टरबूज म्हणजे उन्हाळयातील लहानमोठयांच्या आवडीचे फळ. रखरखत्या उन्हाळयातील टरबूजाचा रसाळ गोडवा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. म्हणूनच बाजारात टरबूजाची मागणी वाढली आहे. पारंपारीक पध्दतीने शेती करुन आजचा शेतकरी भरपूर प्रमाणात पीकांचे उत्पादन घेवू शकत नाही. गोंदिया जिल्हयातील सडकअर्जुनी तालुक्यातील चिचटोल्यातील शेतकरी टिकाराम गहाणे यांनी अल्पावधीत भरघोस उत्पादनासाठी टरबूजाचे पीक घेण्याचा विचार केला. आणि फक्त विचारच करुन ते थांबले नाहीत तर त्या विचारांना कृतीचीही जोड दिली.

प्रायोगिक तत्वावर केलेल्या टरबूजाच्या शेतीत गहाणेंना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला व यावर्षी त्यांनी 10 एकरात टरबूजाची लागवड केली. दर्जेदार टरबूज उत्पादनासाठी काही तांत्रीक बाबी शिकून त्यांनी शेतीत त्याचा अवलंब केला. त्यांनी एका एकराच्या जमिनीवर 60 हजार टरबूज वेलीची झिकझॅक पध्दतीने लागवड केली. अगस्ता, शुगरकेन व अंदमान अशा प्रजातींच्या टरबूजाची त्यांनी निवड केली.

जानेवारी महिन्यात केलेल्या टरबूजाच्या लागवडीचे उत्पादन तीन ते सव्वा तीन महिन्यात निघते. आता सध्या मार्च-एप्रिल महिन्यात त्यांचे टरबूजाचे उत्पादन घेणे सुरु आहे. आलेल्या अडचणींवर कृषी कार्यालयाच्या मदतीने त्यांनी मात केली.
गहाणे सांगतात की, 25 हजार रुपये लागवडीचा खर्च येतो. पिकाला आवश्यक 50 किलो पोटॅश, 1 ट्रॉली शेणखेत व 25 किलो डी.ए.पी. खताचा वापर करुन टरबूज उत्पादनात 30 लाखांचा शुध्द नफा त्यांना मिळाला. एकरी 2 लाखाचे उत्पन्न त्यांनी अवघ्या तीन महिन्यात मिळवले. पाण्याचे योग्य नियोजन करुन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दर तीन दिवसांनी 12061 या प्रकारचे खत पिकांना पुरवितात.

पारंपारीक शेतीला त्यांनी नविन तंत्रज्ञानाची जोड दिल्याने उत्पादनात कमालीची वाढ झाली. आता एकरी 2 लाखाचे उत्पादन घेण्याच्या वाटेवर ते आहेत. पीकाच्या भरघोस उत्पादनानंतर प्रश्न पडतो तो बाजारपेठेचा. पण यावरही गहाणेंनी उपाय शोधला. भंडाऱ्याच्या व्यापाऱ्यांना ते टरबूजाची विक्री करतात. आणि परदेशातील टरबूजाची मागणी बघता व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दुबई, अमेरिका या देशात टरबूज निर्यात करतात.

चिचटोल्याचे उत्तम दर्जाचे टरबूज आता सातासमुद्रापार पोहोचले आहे. इच्छाशक्तीच्या बळावर प्रत्येक समस्येवर गहाणेंनी मात केली. नागअळी, लष्करीअळीचा प्रादुर्भाव झाल्यावर टरबूजाचे पीक धोक्यात आले असतांना त्यांनी रिजेन्त डी-6 हे खत दिले. आणि किडीचा नायनाट केला. अवघ्या तीन महिन्यात 10 एकराच्या शेतीत 9 लाख 65 हजारांचा शुध्द नफा त्यांनी मिळवला व शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

इतरही शेतकऱ्यांनी आता 'उत्तम शेती' म्हणून आत्मविश्वासपूर्वक टरबूजाची लागवड सुरु केली आहे.

 

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate