অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्रीरामपूरच्‍या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग

श्रीरामपूरच्‍या गाडे परिवाराचा किफायतशीर गुळनिर्मिती उद्योग

अहमदनगर जिल्ह्यात भैरवनाथनगर (ता.श्रीरामपूर) येथील प्रणय बापूसाहेब गाडे यांचा गुळनिर्मिती प्रक्रिया उद्योग नावारूपाला आला आहे. गुळाची गुणवत्‍ता जोपासताना मार्केटिंगची थेट यंत्रणाही त्‍यांनी उभी केली आहे. यावर्षी वीस हजार किलो गुळनिर्मिती करण्‍याचे उद्दिष्‍टपूर्ण करून या उद्योगाने अनेकांना रोजगार दिला आहे. प्रणय यांचा गुळनिर्मिती उद्योग इतर शेतकऱ्‍यांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

श्रीरामपूर तालुका मुख्‍यालयानजीक असलेल्‍या भैरवनाथनगर येथे गाडे परिवाराची पाच एकर शेती आहे. प्रणय यांचे वडील व कृषीभूषण कै.बापुसाहेब गाडे यांचा शेती क्षेत्रातील मोठा अभ्‍यास होता. 15 वर्षांपूर्वी रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक शेती तज्‍ज्ञ सुभाष पाळेकर यांच्‍या मार्गदर्शनाने शेती करण्‍याचा निर्णय बापूसाहेबांनी घेतला. बापुसाहेबांनी स्‍वतःसोबतच इतर शेतकऱ्‍यांनाही किफायतशीर शेतीबाबत मार्गदर्शन केले. मात्र गतवर्षी बापूसाहेबांचे निधन झाले. बापूसाहेबांचा हाच निर्णय बी.कॉम. पर्यंत शिक्षण झालेला त्‍यांचा मुलगा प्रणय व पत्‍नी सविता बापूसाहेब गाडे यांनी पुढे कायम ठेवला.

घरच्या घरी कोणतेही खत न वापरता उसाचे उत्‍पादन घेतले. उत्पादित उसाचा घरीच गुळ तयार करावा या संकल्‍पनेतून त्यांनी गुऱ्‍हाळ उद्योग सुरू केला. 25 बाय 40 आकाराचे शेड उभे करून त्यांनी गुऱ्‍हाळ सुरू केले. स्‍वतःच्‍या शेतीतील उसापासून गुळ आणि मागणीनुसार काकवीचे उत्पादन गाडे यांनी सुरू केले. नैसर्गिक गुळ आणि काकवीने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. कोणत्याही इतर साधनांचा वापर न करता तयार झालेला गुळ व काकवी यामुळे ग्राहकांचा खरेदीचा कल वाढत गेला. काकवीची मागणी वाढतेच आहे. यात कॅल्शीअम, कार्बोहायड्रेडस, प्रोटीन मिळत असल्याने शहरासह ग्राहकांची मागणी वाढली आहे.
>

गुळमिर्मिती प्रक्रिया उद्योगाचे टप्पे

भांडवल


स्वभांडवलावर उद्योग सुरू करताना बांधकामासाठी 70 ते 80 हजार रूपये, पाक तयार करण्यासाठी कढई, इंजिन, क्रेशर, पॅकिंग मशिन व साचे यासाठी तीन लाख रुपये, असे एकूण तीन लाख 80 हजार रुपये तर शेड बांधकामासाठी एक लाख रुपये अशा चार लाख 80 हजार रुपयांची भांडवली गुंतवणूक केली.

गुळ निर्मिती



गुळ निर्मितीत ठराविक कालावधीच्या विविध टप्प्यांत क्रेशर मधून रस काढणे, स्थिरीकरणासाठी रस टाकीमध्‍ये ठेवण्‍यात येतो, प्रक्रियेसाठी रस कढईत घेत त्‍यात भेंडीचे पाणी व निवळी टाकून मळी काढण्‍यात येते. दोन ते अडीच तास रस उकळून घेतला जातो, त्‍यानंतर काकवी तयार होते. गुळ तयार झाल्‍यानंतर घोटणी करून साच्‍यामध्‍ये वजनाप्रमाणे तात्काळ आकर्षक पॅकिंग केली जाते व मार्केटमध्ये पाठविली जाते अशा विविध कृती कराव्या लागतात. गुळ निर्मिती करताना शंभर टक्‍के स्वच्छतेवर भर असतो.

प्रक्रिया कालावधी



दरवर्षी नोव्‍हेंबर ते एप्रिल या कालावधीत गुळनिर्मिती उद्योग सुरू असतो. दररोज सुमारे दोनशे किलोच्‍या जवळपास गुळ तयार केला जातो.

काकवीची विक्री



काकवी बनविताना प्रक्रिया केलेला पाक थंड करून स्‍टीलच्‍या भांड्यात साठवला जातो, बाजारपेठेतील मागणीनुसार 250 मिली किंवा 500 मिलीच्‍या बाटलीत पॅकींग करून विक्री केले जाते. 25 मिलीला 35 रूपये व 500 मिलीची 70 रुपये दराने विक्री केली जाते. महिन्‍याला 200 लीटरपर्यंत काकवीची विक्री होते, यातून 28 हजार रूपये मिळतात.

गुळनिर्मिती उद्योगातून रोजगार



प्रणय गाडे यांना आई सविता बापुसाहेब गाडे, भाऊ अजय गाडे यांचे सहकार्य आहे. गुळ निर्मिती प्रक्रियेच्या सहा महिन्यांच्या काळात सात लोकांच्या हातांना काम मिळाले आहे. यात महिलांचाही सहभाग आहे. शेती व उद्योगनिर्मितीत पाच लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.

थेट मार्केटिंग



गुळ किरकोळ वितरकाला दिल्यास पैसे कमी मिळायचे. प्रणय यांनी या पद्धतीत बदल करताना गुळाचे थेट मार्केटिंग केले. गुणवत्ता चांगली जोपासल्याने गुळाला चांगली मागणी आहे. 500 व 1000 ग्रॅम पॅकिंगमधून गुळाला बाजारपेठेत चांगला उठाव मिळतो. पुणे, मुंबई, नाशिक व औरंगाबाद शहरात गुळ थेट विक्रीला दिला जातो. महिन्याला पाच टन उत्पादन केले व सुमारे 50 दुकानांमधून गुळ विक्री केली. त्याची किंमत (एमआरपी) 100 रुपये असली तरी वितरकांना ती 75 रुपयांना विकायची. म्हणजे प्रत्येक दुकानदाराला किलोमागे 25 रुपये फायदा होऊ शकतो व तो अधिक गुळ विकू शकतो. ही विक्री पद्धती फायदेशीर ठरल्‍याचे प्रणय सांगतात.

गाडे यांच्या उद्योगाचे अर्थकारण



  1. एक हजार किलो गुळनिर्मिती खर्च - ऊस - 30 हजार, मजूर - 6 हजार, पॅकिंग - 5 हजार, मशिनरीचा घसारा चार हजार, इतर एक हजार असा मिळून 46 हजार रुपये
  2. 75 रुपये प्रति किलोप्रमाणे एक हजार किलो विक्रीतून 75 हजार रुपये मिळतात.
  3. यावर्षी वीस हजार किलो गुळ विक्रीतून 15 लाख रुपयांची उलाढाल झाली.
  4. सध्या आपल्याच शेतातील ऊस वापरला जातो; मात्र गरजेनुसार तो बाहेरूनही घ्यावा लागतो.

उद्योग विस्तारला



साई अमृत नॅचरल असे प्रणय यांच्या उद्योगाचे नाव आहे, त्यांच्याकडे सुमारे 4 एकरांवर ऊस आहे. भैरवनाथ सेंद्रिय शेती गटाची स्‍थापना करण्‍यात आली असून शासनाच्‍या कृषी विभागांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेच्‍या माध्‍यमातून आत्‍मा अंतर्गत भैरवनाथ सेंद्रिय शेती गट आहे. यामध्‍ये तीस शेतकऱ्‍यांचा सहभाग आहे. या माध्‍यमातून ऊस, कडधान्‍यासह भाजीपाल्‍याचे सेंद्रिय उत्‍पादन सुरू केले आहे. यात आत्‍माचे प्रकल्‍प संचालक भाऊसाहेब बऱ्‍हाटे, तालुका कृषी अधिकारी सतिष शिरसाठ, तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक मिनाक्षी बडे, सहायक तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक अभिषेक मानकर यांच्‍यासह पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

प्रणय गाडे यांच्‍या उद्योगातील महत्‍वाच्‍या टिप्‍स



  1. शेतीपूरक प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कर्ज उभारणी, गुंतवणूक व बाजारपेठेचा अभ्‍यास, प्रकल्पाचा आराखडा, लागणारा खर्च, तांत्रिक बाबी, मार्केट व विक्री व्यवस्था महत्त्वाची आहे.
  2. सेंद्रिय शेती उत्‍पादनाबाबत विश्‍वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे.
  3. उलाढाल, नफा यासंदर्भात नोंदी आवश्‍यक आहेत. नफा-तोट्याचे गणित त्यावरून समजते.
  4. उद्योग सुरू करताना थेट वि‍क्री व्‍यवस्‍था उभी करता आली तर त्‍यादृष्‍टीने नियोजन करावे, जेणेकरून ग्राहकांनाही थेट माल देणे शक्‍य होईल, शिवाय नफ्यातही वाढ होईल.
  5. (संपर्क- प्रणय गाडे- 9326225222, 7738100188)

लेखक - गणेश फुंदे,
माहिती सहाय्यक,
उप माहिती कार्यालय, शिर्डी

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 3/8/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate