सुरक्षित व सकस अन्नासाठी जगभरात सेंद्रिय शेतीचा अवलंब केला जात आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची गरज पाहता उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो. परंतु रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापराने शेती व पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. रासायनिक खते ही महाग आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. रासायनिक खते देशाबाहेरुन आयात केल्याने मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी वापरावी लागते. तसेच शासनास त्यावर मोठ्या प्रमाणात अनुदान देऊन रासायनिक खतांच्या किमती शेतक-यांना परवडणा-या स्तरावर आणाव्या लागतात. रासायनिक खतांच्या वापराने सेंद्रिय व जैविक खतांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण घटले आहे. जमिनीत टाकलेली अन्नद्रव्ये व पिकांनी जमिनीतून घेतलेली अन्नद्रव्ये यामध्ये मोठी तफावत आहे.
परिणामत: रासायनिक खते वापरूनही उत्पादनात घट दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. शाश्वत किफायतशीर शेतीसाठी उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादनात वाढ करणे आवश्यक आहे. शेतीतील उत्पादन खर्चाचा प्रमुख भाग बियाणे, खते व कीटकनाशके हा आहे. यावरील खर्च कमी केल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. वापर करणे व शाश्वत किफायतशीर शेतीचे ध्येय साध्य करण्यासाठी कृषि विभागाने जैविक कोड नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये द्रवरुप जैविक खते उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात कृषि विभागाच्या दहा धुळे, जळगाव, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ व वर्धा येथे आहेत.
पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणा-या, मिश्रणास जैविक खत असे म्हणतात. जैविक खते ही जमिनीत नैसर्गिकरीत्या आढळणा-या जिवाणूंपासून तयार केली जातात. म्हणून जैविक खताचे जमीन व पिकावर कसलेही दुष्परिणाम होत नाहीत. जैविक खते हा शाश्वत शेतीचा मूलभूत घटक आहे.
१) नत्र स्थिर करणारी जैविक खते
अ) सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते
● रायझोबियमः रायझोबियम जिवाणू द्विदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतो. या गाठींमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. सर्वसाधारणपणे रायझोबियम जिवाणू प्रति हेक्टरी ५0 ते १५0 किलो नत्र स्थिर करतात. रायझोबियम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १९ ते ६२ टक्के वाढ आढळून आली आहे. रायझोबियम जिवाणूंचे पीकनिहाय गट आहेत. एका गटातील पिकासाठी उपयुक्त जिवाणू दुस-या गटातील पिकासाठी फायदेशीर ठरत नाहीत. रायझोबियम जिवाणूंचा वापर करण्यापूर्वी ते कोणत्या पिकास शिफारस केले आहेत हे पाहणे आवश्यक आहे. रायझोबियम जैविक खत तूर, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग इ. द्विदल पिकांसाठी वापरले जाते. त्याचा तपशील पुढील तक्त्यात दिला आहे.
ब) असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारी जैविक खते : अझेटोबॅक्टर, अझोस्पीरीलम, असिटोबॅक्टर.
● अझेटोबॅक्टर : अझेटोबॅक्टर जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरुपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे ज्वारी, बाजरी, गहू, मका, कापूस, फळे व भाजीपाला पिकांसाठी अझेटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते. अझेटोबॅक्टर जिवाणू सेंद्रिय पदार्थाच्या विकरणातून तयार होणा-या ऊर्जेवर जगत असल्यामुळे या जिवाणूच्या योग्य वाढीसाठी जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असावे लागते. सर्वसाधारणपणे अझेटोबॅक्टर जिवाणू प्रती हेक्टरी १५ ते २० किलो १४ ते ३३ टक्के वाढ आढळून आली आहे.
● अझोस्पीरीलम : अझोस्पीरीलम जिवाणू जमिनीत स्वतंत्रपणे वाढतात. हे जिवाणू हवेतील नत्र घेऊन तो जमिनीत पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. एकदल तृणधान्य जसे मका, बाजरी, गहू, भात, ज्वारी, फळे व भाजीपाला पिकांसाठी अझोस्पीरीलम जिवाणूंची शिफारस केली जाते. सर्वसाधारणपणे अझोस्पीरीलम जिवाणू प्रति हेक्टरी २0 ते ४0 किलो नत्र स्थिर करतात. अझोस्पीरीलम जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ आढळून आली आहे.
● असिटोबॅक्टर : हे आंतरप्रवाही जिवाणू आहेत. असिटोबॅक्टर जिवाणू शर्करायुक्त पिकांच्या मुळामध्ये व पिकामध्येही वाढतात. पिकामध्ये राहून ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर करतात. शर्करायुक्त पिकामध्ये असिटोबॅक्टर जिवाणू प्रति हेक्टरी ३0 ते ३00 किलो नत्र स्थिर करतात. असिटोबॅक्टर जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २० टक्के वाढ आढळून आली आहे. शर्करायुक्त पिके जसे की ऊस, रताळी, बटाटा, इ. मध्ये वापरासाठी असिटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते.
२) स्फुरद विरघळविणारी जैविक खते
स्फुरद हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते. परंतु, त्यापैकी फक्त २० ते २५ टक्के स्फुरदपिकांना उपलब्ध होते. उर्वरित ८० ते ७५ टक्के स्फुरद जमिनीत स्थिर होते जे पिके घेऊ शकत नाहीत. यामुळे रासायनिक खतांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर वाया जातो. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळविण्याचे काम बॅसिलस मेगाटेरीएम सारखे स्फुरद विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध होते. जिवाणू प्रती हेक्टरी १५ ते २० किलो स्फुरद विरघळवतात. स्फुरद विरघळविणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.
३) पालाश उपलब्ध करणारी जैविक खते
पालाश हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे. परंतु त्यापैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश उपलब्ध
करण्याचे काम बॅसिलस म्युसिलाजिनस सारखे पालाश उपलब्ध करणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर पालाश पिकांना उपलब्ध होते. पालाश उपलब्ध करणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १o ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.
४) झिंक विरघळविणारी जैविक खते
झिंक हे पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात घट दिसून येत आहे. जमिनीत स्थिर झालेले झिंक विरघळविण्याचे काम बॅसिलस स्ट्रिआटा सारखे झिंक विरघळविणारे जिवाणू करतात. त्यामुळे हे स्थिर झिंक विरघळून पिकांना उपलब्ध होते. झिंक विरघळविणा-या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात १० ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.
५) मायकोरायझा
मायकोरायझा ही एक उपयुक्त बुरशी आहे. मायकोरायझा पिकाच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढते. ती झाडांच्या विस्तारीत पांढ-या मुळांसारखे काम करते. त्यामुळे पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त व तांबे यांसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात. फळझाडे व भाजीपाला पिकांना मायकोरायझा उपयुक्त आहे. मायकोरायझा जैविक खतांच्या वापराने उत्पादनात २२ ते २५ टक्के वाढ आढळून आली आहे.
६) जिवाणू संघ
अ) घनरूप जिवाणू संघ : (नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू)
ब) द्रवरूप जिवाणू संघ : (नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू)
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणा-या जिवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जिवाणू संघात उपरोक्त नत्र स्थिर करणारे जिवाणू, स्फुरद विरघळवणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करणा-या जिवाणूंचा समावेश असतो. या जिवाणूंचे निर्जतुक वाहकामध्ये मिश्रण करून जिवाणू संघ तयार केला जातो. जिवाणू संघ हा पीकनिहाय तयार करता येतो व त्यामुळे शेतक-यांना वापरण्यासाठी जैविक संघ अतिशय उपयुक्त आहे.
१) बीजप्रक्रिया
जैविक खते प्रामुख्याने बीजप्रक्रियेद्वारे वापरली जातात. ही सोपी व फायदेशीर पद्धत आहे. प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये १० किलो बियाणे घेऊन त्यावर १00 मि.लि. जैविक खत टाकावे व हलक्या हाताने सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात लावावे. बियाण्याचा पृष्ठभाग खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर बियाणे काढून थोडा वेळ सावलीत सुकवावे. याप्रकारे एक किंवा एकापेक्षा जास्त जैविक खताची बीजप्रक्रिया करता येते. सोयाबीन व भुईमूग या पिकांचा पृष्ठभाग नाजूक असल्याने या पिकांच्या १o किलो बियाण्यासाठी ५0 मि.लेि. जैविक खत वापरावे.
२) इतर पद्धती
अ) रोपांची मुळे बुडविणे ज्या पिकांमध्ये रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड केली जाते, त्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. एक लिटर जैविक खत १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे अर्धा तास कालावधीसाठी या द्रावणात बुडवून ठेवावीत व त्यानंतर लागवड करावी.
ब) माती किंवा शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळणे माती किंवा शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून जैविक खत दिले जाऊ शकते. ४00 ते ६00 किलो ओलसर मातीत किंवा शेणखतात किंवा गांडूळ खतात १ लिटर जैविक खत मिसळून रात्रभर ठेवावे. पेरणीपूर्वी किंवा जमिनीस पाणी देण्यापूर्वी हे मिश्रण सरीमध्ये टाकावे.
क) पिकांच्या मुळांभोवती देणे उभ्या पिकास जैविक खत स्प्रे पंपाच्या सहाय्याने देता येते. २०० लिटर पाण्यात १ लिटर जैविक खत मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण सकाळी किंवा सायंकाळी पिकांच्या मुळांजवळ नोझल काढलेल्या पंपाच्या सहाय्याने फवारावे.
ड) ठिबक सिंचनाद्वारे देणे ठिबक सिंचनाद्वारे जैविक खत पिकांना देता येते. एक एकर क्षेत्रासाठी १ लिटर जैविक खत ठिबक सिंचनाच्या यंत्रणेतून द्यावे. फळपिके, ऊस, कापूस इ. पिकांना ही पद्धत उपयुक्त आहे.
ई) बेणे प्रक्रिया ऊस, बटाटा, हळद, अद्रक, इत्यादि पिकांच्या बेण्यास जैविक खताची प्रक्रिया केली जाऊ शकते. ५oo लिटर पाण्यात १ लिटर जैविक खत मिसळावे व द्रावण तयार करावे. या द्रावणात पिकाचे बेणे अर्धा तास बुडवून ठेवावे व त्यानंतर लागवड करावी.
कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांची द्रवरूप जैविक खते
जैविक खतांचे उत्पादन द्रवरुप स्वरूपात कृषि विभागाच्या जैविक कोड नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये करण्यात येत असून ही जैविक खते ही महा या ब्रेडनेमखाली तयार केली जात आहेत.
जैविक खते कृषि विभागाच्या जैविक कोड नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध असून ती विविध शासकीय योजनांमधून व थेट विक्रीद्वारे ती शेतक-यांना उपलब्ध करून दिली जात आहेत.
अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे नजीकच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेत अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा .
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सूर्यफूल पिकावर सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम ...
बीजप्रक्रियेसाठी वापरल्या जात असलेल्या नियोनिकोटीन...
या माहितीपटात हरभऱ्याच्या बियाण्यावर बीजप्रक्रिया ...