অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्वारी पिकावरील कीड नियंत्रण

ज्वारी पिकावरील कीड नियंत्रण

प्रस्तावना

ज्वारी पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान पोषक असल्यामुळे खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक असल्यामुळे जनावरांवर अवलंबून असणारी ज्यांची शेती आहे तेथे ज्वारीचा पेरा अधिक केला जातो. रब्बी ज्वारी हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधील १० लाख हेक्टर क्षेत्रावरील दख्खन पठारात कोरड्या जमिनिवरील घेतले जाणारे एक महत्वपूर्ण पीक आहे. या पिकावर होणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते.

बदलत्या पीक परिस्थिती आणि हवामानामुळे वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव पिकावर होत आहे. त्या अनुषंगाने रब्बी हंगामात या पिकावर येणाऱ्या किडींची योग्य माहिती करून त्यांचे व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. ज्वारीत मुख्यतः अमेरिकन लष्करी अळी, खोडमाशी, खोडकिडा, मावा, मिजमाशी या किडींचा व खडखड्या, काणी या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

कीड व्यवस्थापन

अमेरिकन लष्करी अळी:

या अळीची एक पिढी ३२ ते ४६ दिवसात पूर्ण होते. या किडीचा मादी पतंग १००० ते २००० च्या समूहाने अंडी घालतो. अंड्यांमधून नुकत्याच बाहेर पडलेल्या अळ्या पानांचा हिरवा पापुद्रा खातात, सदर पानांवर पांढऱ्यारंगाचे लांबट चट्टे आढळून येतात. अळीच्या डोक्यावर उलट्या इंग्रजी Y आकाराचे चिन्ह दिसून येते तसेच शरीराच्या आठव्या बॉडी सेगमेंट वर चौकोनी आकारात चार ठिपके, त्यात केसही आढळतात. अळी अवस्था १४ ते १९ दिवस असते पूर्ण वाढ झालेली अळी २ ते ८ से. मी. जमिनीत जाऊन मातीचे वेष्टन करून कोषावस्थेत जाते  ही कोषावस्था ९ ते १२ दिवसांची असते. त्यानंतर कोशातून नर किंवा मादी पतंग बाहेर पडतात व जवळपास ४-६ दिवस जगतात.

उपाययोजना:

पानांवर दिसणारे अंडीपुंज व सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.

किडीच्या सर्वेक्षणासाठी पिक उगवून येण्यापूर्वी एकरी पाच कामगंध सापळे लावावेत.

नर पतंग पकडण्यासाठी हेक्टरी १५ कामगंध सापळे लावावेत.

५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी ५ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. अथवा अझाडीरॅक्टीन (१,५०० पीपीएम) ५ मि.ली. प्रति लीटर पाणी प्रमाणे फवारणी करावी व नोमुरीया रिले या जैविक औषधाची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

खोड माशी:

या किडीची प्रौढ माशी घरातील माशीप्रमाणेच परंतु थोडी लहान असते. अधूनमधून पाऊस पडत असल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. या किडीचा प्रादुर्भावामुळे ज्वारीच्या धान्याचे ४० ते ५० टक्के आणि कडब्याचे ३० ते ३५ टक्के नुकसान होते. सुरुवातीला अळी पांढुरक्या रंगाची व नंतर पिवळसर असते तिला पाय नसतात. या किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस मध्यशिरेजवळ पांढरे, लांबट, असे एक एक अंडी घालते. अंड्यातून निघालेली अळी खोडात शिरून आतील वाढणारा भाग खाते. त्यामुळे वाढणारा पोंगा मरतो त्याला पोंगेमर असे म्हणतात. असे पोंगे सहजपणे काढता येतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुटवे येतात व त्यावरही या किडीचा प्रादुर्भाव होतो. पेरणी उशीरा केल्यास या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो. अशा परिस्थितीत पिकाची फेरपेरणी करावी लागते. पावसानंतरच्या सप्टेंबर-ऑक्टोबरमधील लागवडीखालील खोड माशीचा प्रादुर्भाव साधारणता जास्त असतो.

उपाययोजना:

थायामिथाक्झाॅम ७०टक्के ३ ग्रॅम प्रति किलो किंवा इमिडाकलोप्रीड ४८ टक्के एफ एस ची १४ मि.ली. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया केल्यास खोडमाशीमुळे होणारी पोंगे मर कमी होऊन आर्थिकदृष्ट्या अधिक फायदा होतो. तसेच झाडाचा जोम वाढण्यासही मदत होते.

जर खोडमाशीचा प्रादुर्भाव १० % पोंगेमरच्या वर गेल्यास क्विनॉलफॉस ३५ टक्के प्रवाही ३५० मि. ली. २५० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी ७ ते ८ दिवसांनी फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी त्यासाठी ३५ ई.सी. क्विनॉलफॉस ७०० मि. ली. ५०० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारावे.

अथवा सायपरमेथ्रीन (१० % प्रवाही) २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन (२.८ % प्रवाही) १२.५ मिली किंवा क्लोरोपायरिफॉस (२० % प्रवाही) २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

खोडकिडा:

या किडीचा पतंग मध्यम आकाराचा असून राखाडी किंवा गवती रंगाचा असतो. पूर्ण वाढ झालेल्या अळीच्या शरीरावर अनेक मळकट ठिपके असतात व अळीचे डोके तांबड्या रंगाचे असते. या किडीची मादी पानाच्या मागच्या बाजूस पुंजक्यात अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या प्रथम पानाचा पृष्ठभाग कुरतडतात व नंतर पानांवर एका सरळ रेषेत बारीक गोल छिद्रे पाडतात. अळी खोडात शिरून आतील गाभा खाते. वाढणाऱ्या शेंड्याला इजा होऊन विशिष्ट प्रकारची पोंगेमर होते.

किडीचा प्रादुर्भाव साधारण: पीक एक महिन्याचे झाल्यापासून कणसात दाणे भरेपर्यंत होऊ शकतो. अळी ताटात शिरल्यानंतर आतील गाभा खाते, त्यामुळे ताट आणि कणीस वाळते.

उपाययोजना:

जमिनीची खोल नांगरट करावी

तूर, चवळी ही पिके आंतरपीक म्हणून घ्यावीत.

५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.

सीएसएच-१६, सीएसएच-१८, सीएसव्ही-१०, सीएसव्ही-१५, सीएसव्ही-१७ या खोडकिडीला प्रतिकार करणाऱ्या वाणाची पेरणी करावी.

नत्राचा आणि स्फुरदाचा नियंत्रीत हप्ता दयावा.

किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

शेतामध्ये एकरी ट्रायकोग्राम चीलोनीस या परोपजीवी किटकाचा ५०,००० अंडीपुंज म्हणजेच ४ ट्रायको कार्डचा वापर करावा. शेतामध्ये १० टक्के झाडाच्या पानांवर छिद्रे किंवा ५ % पोंगेमर झालेली झाडे आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही २०-२५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस ३५ ई.सी. १,०७५ मिली ७५० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारावे. पहिली फवारणी उगवणी नंतर ३० दिवसांनी करावी.

मावा:

मावा ही कीड पीक वाढीच्या अवस्थेत असतात दिसून येते. या किडीची पिल्ले व प्रौढ पानातील अन्नरस शोषण करतात तसेच आपल्या शरीरातून मधासारखा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे अन्न तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाने आकसतात झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होते.

उपाययोजना:

पिवळ्या रंगाचे चिकट सापळे एकरी ४ लावावेत.

५ टक्के निंबोळी अकांची फवारणी ५ मि.ली. प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

किडीचा प्रादुर्भाव दिसताच थायामिथाक्झाम २५ टक्के दाणेदार १५० ग्रॅम ५०० लिटर पाणी किंवा इमिडाकलोप्रीड १७.८ टक्के प्रवाही १४० ग्रॅम ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मिजमाशी:

या किडीचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यावर असताना आढळून येतो. मिजमाशी दिसायला डासासारखी असून पंख पारदर्शक असून पोट नारंगी रंगाचे असते. अळी सूक्ष्म व पांढऱ्या रंगाची असते. मादी माशी फुलोऱ्यात अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी बिजांडकोषावर उपजीविका करते. त्यामुळे कणसात दाणे भरत नाहीत. परिणामी उत्पादनात जवळपास ६० टक्के घट येते.

उपाययोजना:

मिजमाशीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी मिजमाशी उपद्रवग्रस्त शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी शक्यतो एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणांची निवड करून साधारणपणे एकाच वेळी आठवड्याच्या आत पेरणी साधल्यास मिजमाशीपासून संरक्षण होत.

पिकांची फेरपालट करावी उदा: कापूस, भूईमुग किंवा सूर्यफूल किडग्रस्त झाडे नष्ट करावीत.

मेलेथीऑन ५% भुकटी क्विनोलफॉस १५% भुकटी ८ किलो/एकर या प्रमाणात कणसांवर धुरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी धुरळणी/फवारणी पहिल्या धुरळणी/फवारणी नंतर ५-१० दिवसांनी करावी.

मेलेथीऑन ५०% प्रवाही २५-३० मिली/एकर या प्रमाणात फवारणी करावी.

स्रोत - कृषी जागरण

 

 

अंतिम सुधारित : 4/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate