तोंडले ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॉक्सिनिया ग्रँडीस आहे. भोपळा व कलिंगड या वनस्पती याच कुलातील आहेत. ही वनस्पती मूळची भारतातील असून तिचा प्रसार आशिया आणि आफ्रिका खंडांतील अनेक देशांत झालेला आहे. त्यामुळे तिला कॉक्सिनिया इंडिका असेही शास्त्रीय नाव आहे. भारतात ही वनस्पती महाराष्ट्र व गुजरात राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळते. अनेक ठिकाणी ती रानटी अवस्थेत वाढते. मात्र काही ठिकाणी फळांसाठी या वनस्पतीची लागवड करतात. तोंडले ही जोमाने वाढणारी बहुवर्षायू वेल असून ती वृक्ष, झुडूप, कुंपणे आणि इतर आधारांवर वाढते. खोड पंचकोनी असून टोकाला प्रताने असतात. प्रताने लांब व लवचिक असून त्यांचे स्प्रिंगांप्रमाणे वेटोळ्यात रूपांतर झालेले असते. या प्रतानांद्वारे तोंडल्याची वेल आधाराला पकडून चढते.
पाने साधी, एकाआड एक, रुंद, अंडाकृती, खंडित व केशहीन असतात. फुले पांढरी, घंटेसारखी व एकलिंगी असून ती टोकाला येतात. फळे लांबट गोल व हिरवी असून त्यांवर पांढरे पट्टे असतात. ती पिकल्यावर लाल होतात. फळांमध्ये अनेक, फिकट, चपट्या व किंचित लांबट बिया असतात. या वनस्पतीचे कडू व गोड असे दोन प्रकार आहेत.
तोंडलीची फळे बीटा-कॅरोटिनाचे उत्तम स्रोत आहेत. याखेरीज त्यांत अ आणि क जीवनसत्त्वे असतात. कडू तोंडले आयुर्वेदात कफ, पित्तदोषावर उपचारांसाठी वापरले जाते. गोड तोंडले भाजीसाठी लागवडीत आणतात. पानांचा वापर त्वचेचे विकार व श्वास विकार यांवर केला जातो. फळे काविळीवर, कुष्ठरोगावर व पांडुरोगावर गुणकारी आहेत.
लेखक: प्रिती साळुंके
स्त्रोत: कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
वाळलेल्या बिया भाजून खातात.
या वर्षायू सरपटणाऱ्या वेलीच्या पंचकोनी खोडावर के...
या कुलात अनेक उपयुक्त वनस्पतींचा समावेश आहे. फळे ब...