शेती संपन्नतेसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी होय. राज्यातील शेतीला अधिकाधिक सिंचीत करण्याचे राज्य शासनाचे धोरण राहिले आहे. शेती लाभ क्षेत्रातील असो, किंवा लाभ क्षेत्राबाहेरची; झालेल्या पर्जन्यमानाची नेमकी आकडेवारीच शेती व्यवस्थापनाला उत्तम दिशा देऊ शकते. गावांच्या आणि तालुक्यांच्या, महानगरांच्या मानवनिर्मीत सीमांपेक्षा निसर्गाने तयार केलेल्या उपखोरेनिहाय-खोरेनिहाय क्षेत्राचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाच्या थेंब अन् थेंब पाण्याचा हिशेब करणे व पुढील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाण्यातून पिण्यासाठी, शेतीसाठी आणि मनोरंजन-पर्यटनासह सर्व उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन पाण्याचा काटेकोर विनियोग करणे, यालाच आपण जललेखा म्हणतो. पावसाच्या लहरीपणामुळे जललेख्याचे महत्त्वही आता अतोनात वाढले आहे..
जललेखा बनविताना जलहवामान विषयक माहिती अत्यंत महत्वाची असते. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचे, नाशिक येथे मुख्य अभियंता, नियोजन व जलविज्ञान, नाशिक हे स्वतंत्र कार्यालय कार्यरत असून त्यांच्यामार्फत जलहवामान माहिती बाबत सर्व कामे केली जातात.
अंतर्गत, कृष्णा व भीमा खोऱ्यासाठी एककालिक निर्णय पूरक यंत्रणा (Real Time Decision Support System: RTDSS) उभारण्यात आली आहे. सन 2013 मध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करणेत आली असून तिचा वापर जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत आहे. या यंत्रणेचे प्रामुख्याने दोन भाग पडतात - जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा (Real Time Data Acquisition System: RTDAS) व त्या माहितीच्या अनुषंगाने पूरांचे अंदाज व धरणातील पाण्याचे नियोजन (Real Time Streamflow Forecasting & Reservoir Operation System : RTSF & ROS), पहिला भाग माहिती संकलनाचा आहे, तर दुसरा आहे त्या आधारे पूरासंबंधीचा अंदाज बांधून तो प्रसारीत करणे.
या यंत्रणामुळे क्षेत्रिय स्तरावरील माहिती विनाविलंब प्राप्त होते. त्यामुळे वेळेची बचत होऊन आपत्कालिन किंवा पूरपरिस्थितीमध्ये धरणांवरून सोडल्या जाणाऱ्या विसर्गाबाबत अचूक निर्णय घेणेसाठी अधिकाऱ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे ही माहिती ऑटोमॅटिकली संकलीत होत असलेने मानवी त्रुटींचाही प्रश्न उद्भवत नाही. ही संकलीत माहिती अत्यंत विश्वासार्ह असून जलशास्त्र विषयक विविध अभ्यासांसाठीही उपयुक्त ठरत आहे. ही केंद्रे मागील 3 वर्षापासून उत्तम रितीने कार्यरत असून वेळोवेळी विभागामार्फत त्यांची तपासणीही केली जाते.
या यंत्रणेद्वारे पावसाळी हंगामात पूरांचे अंदाज दिले जातात किंवा पूर पूर्वानुमान केले जाते. त्यासाठी कृष्णा भीमा खोऱ्याची संगणकीय प्रतिकृती (Model) डेटा सेंटर येथे विकसीत करण्यात आली आहे. डेटा सेंटर मधील Operational Control Room मध्ये पावसाळी हंगामामध्ये दिवसातून दोन वेळा Model रन करून पूर पुर्वानुमान प्राप्त केले जाते. यासाठी RTDAS द्वारे प्राप्त झालेली रियल टाईम माहिती व IMD मार्फत दररोज पुढील तीन दिवसात प्राप्त होणारे पावसाचे अंदाज यांचा वापर करून पुढील 72 तासांचे अंदाज वर्तविले जातात
. यामध्ये संभाव्य पर्जन्यमान, जलाशय येवा, पातळी व विसर्ग तसेच नद्यांवरील महत्त्वाच्या ठिकाणांची पातळी व विसर्ग इ. बाबत अंदाज प्राप्त होतात. हे अंदाज वर नमूद केलेल्या संकेतस्थळाच्या होमपेज वरील ‘Real Time Forecast’ या लिंकवर प्रसारित केले जातात. नद्यांवरील इशारा व धोकापातळी यावर लक्ष ठेवण्यासाठी या अंदाजांचा उपयोग जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांप्रमाणेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अभ्यासक व प्रसार माध्यमांमार्फतही केला जातो. अपेक्षीत पाऊस, धरणातील साठा व धरणातून सोडण्यात येणारे पाणी यांचा 72 तास आधी अंदाज आल्याने प्रशासनाला तसेच सामान्य नागरिकांना पूराच्या पूर्वतयारीसाठी पुरेशा वेळ उपलब्ध होतो. त्यामुळे अचानक आलेल्या पूरामुळे होणारे नुकसान बऱ्याच अंशी कमी करणी शक्य होते.
RTDSS यंत्रणाद्वारे कृष्णा भीमा खोऱ्यातील उपलब्ध जलस्त्रोतांबाबत अद्ययावत माहिती जलसंपदा विभागासोबतच सर्व नागरिकांना उपलब्ध होत असलेने पाण्याचे नेमके नियोजन करणे शक्य होते आहे. तसेच सर्वसामान्य नागरकिांमध्ये सदर माहितीमुळे पूर परिस्थितीमध्ये योग्य ती सावधगिरी बाळगणे व एरवी पाण्याचा काटकसरीने वापर करणे याबाबत जागृती होते आहे. पावसाळी हंगामा व्यतिरिक्त इतर हंगामांमध्ये जलाशयांचे योग्य व्यवस्थापन करता येण्यासाठीची सुविधा देखील या यंत्रणामध्ये विकसीत करण्यात आली आहे. माहिती संकलन, पृथ:करण आणि प्रसार याकरिता जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
कृष्णा व भीमा खोऱ्यामध्ये प्रायोगिक तत्वावर विकसीत करण्यात आलेल्या या यंत्रणेच्या यशस्वीतेमुळे जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत प्रस्तावित राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशभरात ही यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये गोदावरी, तापी व कोकण विभागासाठी RTDAS ही यंत्रणा प्रस्तावित करण्यात आली आहे.
लेखक - जयंत कर्पे
माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय,पुणे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/9/2020
राज्यात राज्य आयोगाची स्थापना दि.३१ ऑक्टोबर, १९८९ ...
कूपनलिका पुनर्भरण सयंत्र दोन भागात विभागले आहे. प्...