काळाची गरज ओळखून पावले टाकली तर प्रगती होते. क्षणाक्षणाला बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात जगाशी स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक आणि वेगवान गती हवी. इस्लामपूर शहराने ही गरज ओळखली आहे. म्हणूनच ही नगरी आता वाय फाय बनली आहे. 4 जी वाय-फाय सेवेने जोडले गेलेले देशातील पहिले शहर ठरण्याचा मान इस्लामपूरला मिळाला आहे. शहरात 4 जी वाय-फाय सेवा उपलब्ध झाल्यामुळे डिजीटल इंडियाची सांगली जिल्ह्यात चांगली सुरुवात झाली आहे. या सेवेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आज मूलभूत गरज बनली आहे. या माध्यमातून संवादाची नवनवी साधने उपलब्ध होऊन जगाशी संपर्क साधता येत आहे. संवादाच्या या बदलत्या रुपाने जग हे एक खेडे बनले आहे. कित्येक मैल अंतरावर असणारी माणसं क्षणार्धात एकमेकांशी जोडली जात आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल या अग्रगण्य कंपन्यांचे नेतृत्व भारतीय करतात. एकविसाव्या शतकातील भारत या संकल्पनेअंतर्गत दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी इस्लामपूर शहर वाय-फाय करण्याची संकल्पना मांडली होती. एखादे शहर स्मार्ट होण्यासाठी इंटरनेट आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी आवश्यक असते. यातून इस्लामपूर वाय-फाय करण्याची संकल्पना पुढे आली. आमदार जयंत पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि तत्कालीन मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्या प्रयत्नातून ही संकल्पना साकार झाली आहे.
वह्या पुस्तकांची जागा लॅपटॉप-टॅबने घेतली आहे. या टेक्नॉसॅव्ही युगाची 4 जी ही भाषा आहे. त्यामुळे ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी खुले होत आहे. कुठल्याही शंकेचे निरसन एका क्लिकवर होत आहे. ही 4 जी ची भाषा आता इस्लामपूरवासीय बोलू शकणार आहेत. ही वैचारिक आणि वैज्ञानिक गती वाय-फाय मुळे मिळाली आहे. भविष्याकडे पाहता या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून इथले युवक जगाशी स्पर्धा करणार आहेत. जगातील सगळी माहिती उपलब्ध झाल्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या घडामोडींची जाण व भान इस्लामपूरकरांना होणार आहे.
एकूणच डिजीटल इंडिया आणि सांगली जिल्ह्याचे ब्रँडिंग या दोन्हींसाठी इस्लामपूर शहर वाय-फाय होणे एक महत्वाचा टप्पा आहे. 4 जी सेवा उपलब्ध करुन देणारी इस्लामपूर ही देशातील पहिली नगरपरिषद ठरली असली तरी हळूहळू जिल्ह्यातील इतर नगरपालिका वाय-फाय करण्यावरही जिल्हा प्रशासनाचा भर आहे.
इस्लामपूर शहरात ही सेवा नगरपरिषद, केंद्रीय प्रशासन इमारती, राजारामबापू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, गांधी चौक, आझाद चौक, यल्लमा चौक, जयंत पाटील चौक, बालाजी हॉटेल, बस थांब्याजवळ, कुसूमगंध उद्यान या ठिकाणी उपलब्ध असेल.
-जिल्हा माहिती कार्यालय, सांगली
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 9/5/2019