सत्पात्री दान….पारदर्शक व्यवहार
दिलेले दान हे सत्पात्री असावे, हा पुराणातला संकेत आहे. आपण देत असलेले दान हे सत्पात्री तर असावेच पण ते व्यवहाराच्या दृष्टीने पारदर्शकही असावे, असे विज्ञान युगाचे संकेत आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने यासाठी पुढाकार घेत, जिल्ह्यातील पाली- बल्लाळेश्वर, महडचा वरदविनायक आणि श्रीवर्धनचे हरिहरेश्वर या तीन प्रमुख देवस्थानात भाविकांना दानधर्मासाठी ई- दान पेटीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. यामुळे भाविकांचे दान हे सत्पात्री जातानाच ताे पारदर्शक व्यवहारही ठरणार आहे.
भारत सरकारच्या भिम (BHIM- Bharat Interface For Money) ॲप ही युपीआय (Uniform Payment Interface) बेस अदाता प्रणाली आहे. कोणत्याही ॲण्ड्रॉईड मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करुन त्याद्वारे आपण इच्छित बॅंक खात्यात आपल्या बॅंक खात्यातून रक्कम अदा करु शकतो.
याच प्रणालीचा वापर करुन मंदिर-देवस्थानात भाविक दानधर्म करीत असतात. अशा ठिकाणी पारदर्शक व्यवहाराद्वारे दानधर्म व्हावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुढाकार घेत, सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिनकर पाटील यांच्यासह संबंधित मंदिर ट्रस्टींची बैठक बोलावून त्यांना ही संकल्पना समजावून सांगितली. त्यानंतर मंदिर ट्रस्टींपैकी जे मंदिराचे बँक खाते चालवतात त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी जोडले गेलेले खाते नंतर क्यू आर कोड तयार करुन ते भाविकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ही सगळी संकल्पना आणि तांत्रिक कामगिरी जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, अपर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी कुणाल भामरे आणि त्यांच्या टीमने केली.
आता आपण भाविक म्हणून पाली, महड वा श्रीवर्धन हरिहरेश्वर या कोणत्याही देवस्थानात गेलात तर तेथील आवारात क्यू आर कोडचे लॅमिनेटेड पोस्टर्स दिसतील. ते कोड आपल्या मोबाईल मध्ये स्कॅन करुन आपल्या भिम ॲपद्वारे आपण इच्छित देणगी मंदिरास देऊ शकता. या देणगीची ऑनलाईन पावतीही लगेच उपलब्ध होते. त्याचवेळी मंदिर देवस्थानाच्या खात्यात पैसे जमा झाल्याची नोंद होतेच शिवाय ज्या मोबाईल नंबरशी हे खाते जोडलेले आहे त्या मोबाईलवरही नोंद येते. नंतर आपण आपल्याकडे प्राप्त ट्रान्झॅक्शन कोड मंदिर व्यवस्थापनाकडे देऊन त्याद्वारे प्रत्यक्ष पावती प्राप्त करु शकता.
ई-दान करण्याची पद्धती- आपल्या ॲण्ड्रॉईड मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर मधून भिम ॲप डाऊनलोड करा. भिम ॲपद्वारे देणगी देण्याच्या चार पद्धती आहेत.
पद्धत क्रमांक १- भिम ॲपद्वारे देवस्थानच्या दिलेल्या बँक खाते क्रमांकाशी लिंक करुन आयएफएससी कोड टाकून आपल्या खात्यातून रक्कम वर्ग करा.
पद्धत क्रमांक २- भिम ॲपद्वारे मंदिर देवस्थानचा बॅंक खात्याशी संलग्न मोबाईल नंबर लिंक करुन दान करा.
पद्धत क्रमांक ३- मंदिर देवस्थानचा यूपीआय कोड टाकून रक्कम दान करा.
पद्धत क्रमांक ४- मंदिर देवस्थानच्या आवारात असलेला क्यू आर कोड स्कॅन करुन रक्कम अदा करा.
लक्षात ठेवा मंदिर देवस्थानाच्या आवारात व अधिकृत जागी लावलेले क्यू आर कोडच स्कॅन करा.
क्यू आर कोड स्कॅन करुन असे कराल दान : तुमच्या मोबाईल ॲपवरील भिम ॲप सुरु करा. तुमचा लॉगीन पासवर्ड टाका. स्कॅन आणि पे चा पर्याय निवडा. क्यू आर कोड स्कॅन करा. दान करावयाची रक्कम व रिमार्क भरा आणि पे बटनावर क्लिक करा. तुमचा यूपीआय पिन टाकून दान करा.
राज्यात मंदिराच्या दानपेटीत द्यावयाच्या दानासाठी बहुदा प्रथमच ई- दानपेटीचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे भाविकांना सुविधा होतानाच व्यवहार पारदर्शक होऊन दान हे खऱ्या अर्थी सत्पात्री होणार आहे, हे विशेष.
- डॉ.मिलिंद दुसाने
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/28/2020