बिहार राज्यातील प्राचीन पारंपरिक विद्याध्ययनास आधुनिक दृष्टीने चालना देणारे प्रसिद्ध विद्यापीठ. दरभंगा येथे १९६१ मध्ये त्याची स्थापना झाली. प्राचीन नि पारंपरिक संस्कृत अध्ययनाला आधुनिक शास्त्रीय संशोधनाद्वारे परिपूर्णता आणणे हे ह्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. येथे संस्कृत भाषेचे शिक्षण विनामूल्य देण्यात येते. विद्यापीठाचे स्वरुप अध्यापनात्मक आणि संलग्नक असे असून बिहार राज्यातील चार संस्कृत महाविद्यालये, दोन संशोधन संस्था व इतर राज्यातील तीस संस्कृत महाविद्यालये त्याच्या कक्षेत समाविष्ट होतात. अधिसभा ही येथील सर्वोच्च शासकीय समिती आहे, मात्र कार्यकारिणीच अधिकृत कार्यकारी मंडळ आहे.अध्यापनाच्या बाबतीत विद्वत्परिषद आणि विद्याविभाग (निकाय) हीच मंडळे सर्व व्यवस्था पाहतात. कुलगुरू हा पूर्णवेळ काम करणारा सवेतन अधिकारी असतो. त्याची मुदत तीन वर्षे असते. विद्यापीठात वेदवाङ्मय, षड्दर्शने, धर्मशास्त्र, पुराणे, ज्योतिष, व्याकरण, आयुर्वेद, अर्थशास्त्र अशा प्रमुख विषयांच्या शाखोपशाखा असून त्यांत अनेक मानव्यविद्या अंतर्भूत होतात.
त्यांतून शास्त्री, आचार्य, महोपाध्याय आणि महामहोपाध्याय तसेच विद्यावरधी व वाचस्पती या पीएच्.डी.व डी. लिट्. सदृश पदव्या व मध्यमा, प्रवेशिका ह्या पदविका दिल्या जातात.संस्कृत, इंग्रजी, हिंदी, मैथिली आणि बंगाली अशा पाच भाषांतून शिक्षण दिले जात असले, तरी मुख्यतः संस्कृत भाषेलाच प्राधान्य दिले जाते. चार घटक व वीस संलग्न महाविद्यालयांतून आचार्य पदवीपर्यंत शिक्षण दिले जाते. येथील ग्रंथालयात ७,८९८ ग्रंथ व काही हस्तलिखिते होती (१९७२). त्यांपैकी काही ताडपत्रलिखित आहेत. हे ग्रंथालय जुन्या दुर्मिळ ग्रंथांसाठी व प्राचीन हस्तलिखितांकरिता प्रसिद्ध आहे. विद्यापिठाचे उत्पन्न २२,५७,३८९ रु. व खर्च ११,३८,००० होता आणि सु.१८,००० विद्यार्थी १९७१ – ७२ मध्ये सर्व महाविद्यालयांतून शिकत होते.
लेखक: मु.मा. घाणेकर
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/27/2019
मध्य प्रदेशातील एक विद्यापीठ.
उत्तर प्रदेश राज्यातील एक प्रसिद्ध निवासी विद्यापी...
पश्चिम बंगालमधील कृषी विद्यापीठ.
मध्य प्रदेश राज्यातील एक कृषी विद्यापीठ.