भारतात विज्ञानाची अभिवृद्धी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असलेली व्यापक पायावर उभारलेली भारतीय वैज्ञानिक संस्था.
राष्ट्रीय जीवनातील विज्ञानाची महत्वाची भूमिका जनता व सरकार यांना पटवून देण्यासाठी अशा संस्थेची स्थापना करण्याची कल्पना कलकत्ता येथील रॉयल एशियाटिक सोसोयटी ऑफ बेंगॉल (आता एशियाटिक सोसोयटी) या संस्थेच्या जागेत १९१२ व १९१३ मध्ये झालेल्या दोन बैठकांतून विकसित झाली. अशा प्रकारे भारतीय विज्ञान परिषद संस्था अस्तित्वात येऊन तिने आपले पहिले अधिवेशन जानेवारी १९१४ मध्ये एशियाटिक सोसायटीच्या जागेत भरविले. त्यानंतर सातत्याने प्रतिवर्षी भारतातील निरनिराळ्या ठिकाणी संस्थेची अधिवेशने भरविण्यात आलेली आहेत. १९३८ मध्ये संस्थेचे रौप्य महोत्सवी अधिवेशन साजरे होईपर्यंत संस्थेचा सर्व कारभार एशियाटिक सोसयटीकडे होता. त्यानंतर संस्थेचे मुख्यालय कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले आणि १९५७ मध्ये १४, डॉ. बिरेश गुहा मार्ग, कलकत्ता येथे संस्थेची स्वतःची इमारत उभारली गेली. १९४७ पासून जगातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या देशांतील राष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांचे प्रतिनिधी या संस्थेच्या वार्षिक अधिवेशनांना उपस्थित राहू लागल्याने या अधिवेशनांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. या अधिवेशनांत विविध विषयांत वैज्ञानिक त्याचप्रमाणे शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्टया विज्ञानाची अभिवृद्धी होण्यात स्वारस्य आहे, अशा तज्ञ व्यक्ती भाग घेऊन चर्चा करतात.
विज्ञानाच्या प्रगतीबद्दल आस्था असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या संस्थेचा सदस्य होता येते. संस्थात्मक सदस्य, हितकर्ता सदस्य, आजीव सदस्य व अधिवेशन सदस्य अशा विविध वर्गांतील एकूण सदस्यांची संख्या १९१४ मध्ये १०५ होती, ती १९७८-७९ मध्ये ७,६९९ इतकी वाढली. विद्यार्थ्यांनाही काही अटींवर अधिवेशनांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते.
आपले उद्दिष्ट साधण्यासाठी संस्थेतर्फे वार्षिक अधिवेशनाखेरीज वर्षभर निरनिराळ्या ठिकाणी वैज्ञानिक विषयांवर सुबोध व्याख्याने आयोजित करणे, विज्ञानाच्या विविध शाखांतील प्रगतीची माहिती संकलित करून तिचा आढावा वेळोवेळी प्रकाशित करणे यांसारखे कार्यक्रम आखले जातात. सामान्यजनांसाठी वैज्ञानिक विषयांवरील सुबोध लेखही एव्हरीमन्स सायन्स या द्वैमासिकाद्वारे प्रसिद्ध केले जातात. संस्थेतर्फे कोणताही संशोधन प्रकल्प हाती घेतला जात नाही; परंतु विज्ञानाने समाजाकरिता काय केलेले आहे व काय करीत आहे याची जनतेत अधिक चांगल्या प्रकारे जाणीव निर्माण व्हावी आणि अधिकाधिक तरुणांनी विज्ञान व तंत्रविद्या यांच्याशी निगडित असे व्यावसाय निवडावेत या दृष्टीने संस्था सतत प्रयत्नशील आहे. विशेषतः नियोजनबद्ध विकासाच्या संदर्भात वैज्ञानिक संशोधनाचे महत्व आणि देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता सर्वांना पटवून देण्यावर संस्थेच्या कार्यामध्ये अधिक भर देण्यात येत आहे.
एव्हरीमन्स सायन्स या द्वैमासिकाखेरीज संस्थेतर्फे प्रोसिडिंग्ज ऑफ द अॅन्युअल सायन्स काँग्रेस सेशन हे वार्षिक अधिवेशनाचा वृत्तांत देणारे नियतकालिक चार भागांत प्रसिद्ध केले जाते. भारतातील विज्ञानाच्या प्रगतीसंबंधी माहिती देणारी फिफ्टी इयर्स ऑफ सायन्स इन इंडिया (१९६२) आणि ए डिकेड (१९६३-७२) ऑफ सायन्स इन इंडिया (१९७३) हे ग्रंथ, तसेच संस्थेच्या अधिवेशनांच्या इतिहासासंबंधी (अधिवेशनांच्या अध्यक्षांच्या चरित्रांसह) ए शॉर्ट हिस्टरी ऑफ द इंडियन सायन्स काँग्रेस (१९६३) आणि ए डिकेड (१९६३-१९७२) ऑफ द इंडियन सायन्स काँग्रेस (१९७३) हे ग्रंथ संस्थेने प्रसिद्ध केले आहेत. यांशिवाय विज्ञान व सकल ग्रामीण विकासासंबंधीच्या आणि नैसर्गीक साधनसंपत्तीची पाहणी, संरक्षण व उपयोग यांसंबंधीच्या निवडक लेखांचे संग्रह संस्थेने अनुक्रमे १९७६ व १९७७ मध्ये प्रसिद्ध केले आहेत.
लेखक : गो. रा. केळकर
माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/3/2019