অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी विज्ञान परिषद

मराठी विज्ञान परिषद

मराठी भाषिक जनतेत विज्ञानाचा प्रसार करून समाजास विज्ञानाभिमुख बनवावे व वैज्ञानिकांना समाजाभिमुख करून समाजाचे वैज्ञानिक प्रबोधन साधावे, यांसाठी प्रयत्न करण्याकरिता स्थापण्यात आलेली विज्ञानप्रेमी नागरिकांची संघटना. सामान्य माणसाच्या ऐहिक समृद्धिचे सर्व प्रश्न विज्ञानाद्वारेच सोडविणे शक्य असल्याने विज्ञान व तंत्रविद्या यांवरील जनसामान्यांचा विश्वास वाढविणे हाही ही संघटना स्थापन करण्यामागील उद्देश आहे. समाजाच्या सर्व थरांत वैज्ञानिक ज्ञान पोहोचविण्यासाठी मातृभाषा हेच माध्यम नैसर्गिक आहे म्हणून संस्थेच्या नावात ‘मराठी’ या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे.

पूर्वपीठिका व स्थापना: आपला समाज विज्ञानासंबंधी उदासीन आहे व त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानाची फार उपेक्षा होत आहे, याची जाणीव स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे भारतीयांना झाली होती. विज्ञानाची ही उपेक्षा थांबविण्यासाठी, महाराष्ट्रात मराठी भाषेतून विज्ञान-प्रसार करण्याकरिता झालेल्या प्रयत्नांत एक महत्वाचा प्रयत्न म्हणजे १९२८ साली गो.रा. परांजपे यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने सुरू केलेले सृष्टिज्ञान हे लौकिक शास्त्रीय मासिक होय.

मराठी साहित्य परिषदेच्या एकोणिसाव्या वार्षिक संमेलनाच्या वेळी डिसेंबर १९३४ मध्ये बडोदे येथे व बेचाळीसाव्या अधिवेशनाच्या वेळी मे १९३० मध्ये ठाणे येथे विज्ञान-उपसंमेलने भरविण्यात आली. त्यांमध्ये विज्ञान-प्रसारासंबंधी विचार मांडण्यात आले. असाच आणखी एक प्रयत्न मुंबईत मुंबई मराठी साहित्य संघाच्या अठराव्या प्रादेशिक संमेलनाच्या वेळी जून १९६५ मध्ये करण्यात आला. तथापि हे प्रयत्न नैमित्तिक असून अपुरे पडतात, असे दिसून आले. विज्ञानप्रसाराचे कार्य व्यवस्थित, सुसंघटितपणे व सतत चालावे यासाठी एखाद्या प्रातिनिधिक संघटनेची आवश्यकता आहे हे स्पष्ट झाले व म्हणून १९६६ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर व इतर ठिकाणच्या काही विचारवंतांनी आपापसात चर्चा करून अशी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याला अनुसरून २४ एप्रिल १९६६ रोजी मुंबई येथे मराठी विज्ञान परिषदेची स्थापना झाली. परिषदेच्या स्थापनेच्या कार्यात मधुकर ना. गोगटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

विस्तार: मुंबईच्या मागोमाग पुणे येथे (१९६७) व त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख ठिकामी आणि महाराष्ट्राबाहेर हैदराबाद व बडोदे येथे परिषदेचे विभाग स्थापण्यात आले.काही मोठ्या शहरांत परिषदेचे अनेक विभागही आहेत. १९७१ च्या मराठी विज्ञान संमेलनातील ठरावानुसार गावोगावच्या शाखांचे स्वायत्त विभागांत रूपांतर करण्यात आले आहे. स्वायत्त विभागांच्या कार्यात सुसूत्रता रहावी, समन्वय साधावा आणि अवश्य तेथे त्यांनी मदत करता यावी या हेतूने मध्यवर्ती प्रातिनिधिक संघटना म्हणून १९७७ मध्ये मराठी विज्ञान महासंघ स्थापन करण्यात आला आहे. तथापि एखाद्या विभागाने महासंघाशी संलग्न होणे न होणे ही त्या विभागाची ऐच्छिक बाब मानली जाते.

कार्यपद्धती: वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी विविध शास्त्रीय विषयांवर सुबोध व्याख्याने, प्रात्यक्षिके, परिसंवाद, चर्चा, प्रश्नमंजूषा, शास्त्रीय प्रदर्शने, शिबिरे व सहली निरनिराळ्या विभागांतर्फे आयोजित केल्या जातात. शाळा व महाविद्यालये यांमध्ये चालणार्या शास्त्राभ्यास मंडळादि उपक्रमांना या विभागांचे सहकार्य व मार्गदर्शनही मिळते. कामगारांच्या संघटना, महिला मंडळे यांसारख्या सामाजिक संस्थांमध्येही विज्ञान-प्रसारात्मक कार्यक्रम योजिले जातात.

विज्ञान-प्रबोधन करण्यासाठी ग्रामीण परिसर हेच खरेखुरे क्षेत्र आहे म्हणून परिषदेच्या विभागांनी एक खेडे निवडून तेथे विज्ञान-प्रसाराचे कार्य चालवावे, असे आवाहन १९७५ च्या हैदराबाद येथील विज्ञान संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ग.स.महाजनी यांनी केले. त्यास अनुसरून पुण्याच्या मराठी विज्ञान परिषदेने किरकटवाडी येथे कार्यास आरंभ केला आहे. तेथे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, वृक्षसंवर्धन, विज्ञानप्रश्नमंजुषा, वैज्ञानिक चित्रपट प्रदर्शन इ. कार्यक्रम घडवून आणले जातात. नागपूर विभाग कलमेश्वर येथे असेच उल्लेखनीय कार्य करीत आहे.

मराठी विज्ञान महासंघ व स्थानिक स्वायत्त विभाग एकत्र किंवा स्वतंत्रपणे वार्षिक संमेलने भरवितात. ग्रामीण जनतेला त्यांचा फायदा मिळावा यासाठी कित्येकदा ती तळेगाव दाभाडे, चिंचणी-नागपूर, किरकटवाडी अशा ग्रामीण भागांत भरविण्यात आली आहेत. वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने त्या त्या विभागाच्या अथवा जनसामान्यांच्या दृष्टीने मूलभूत महत्वाच्या समस्यांविषयी परिसंवाद वा चर्चासत्रे आयोजित केले जातात. उदा., उदगीर येथे भूमिजलाचा प्रश्न; कोल्हापूर येथे खार्या जमिनीचा प्रश्न; मुंबईला कुपोषण, स्त्रियांचा विज्ञानात सहभाग; नागपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक वृत्ती वगैरे. वार्षिक संमेलनाच्या अनुषंगाने स्मरणिकाही प्रसिद्ध केल्या जातात. त्यांत विशिष्ट स्थलकालानुरूप लिहिलेल्या लेखांचे संकलन केलेले असते. ‘सह्याद्री’, ‘भारतीय अन्नसमस्या’, ‘दारूचे दुष्परिणाम’ हे त्यांपैकी काहींचे विषय होत. मराठी विज्ञान महासंघ आणि काही स्वायत्त विभाग स्वतःची मासिक मुखपत्रे प्रसिद्ध करतात. मराठी विज्ञान परिषद पत्रिका हे मराठी विज्ञान परिषद, मुंबई या संघटनेचे आणि मराठी महासंघ विज्ञान हे मराठी विज्ञान महासंघाचे मुखपत्र आहे. परिषदेचा अंबरनाथ विभागही स्वतःचे एक मुखपत्र चालवितो. शास्त्रीय माहिती देणारे या मुखपत्रांचे काही विशेषांकही प्रसिद्ध केले जातात. उदा., मुंबईच्या मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचा मे १९७८ चा प्लॅस्टिक विशेषांक.

मराठी विज्ञान परिषद, मुंबई; मराठी विज्ञान परिषद, पुणे व मराठी विज्ञान महासंघ या संघटनांना शासकीय मान्यता मिळालेली आहे.

लेखक : श्री. ह.गोडबोले

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/4/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate