অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र ॲसोसिएशनफॉरदकल्टिव्हेशनऑफसायन्स

महाराष्ट्र ॲसोसिएशनफॉरदकल्टिव्हेशनऑफसायन्स

(विज्ञानवर्धिनी, महाराष्ट्र). विज्ञानाच्या विविध शास्त्रांतर्गत संशोधन चालविणारी स्वायत्त व बिनसरकारी संस्था. पुणे येथे १ सप्टेंबर १९४६ रोजी या संस्थेची स्थापना झाली.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात शास्त्रीय संशोधन फार उपेक्षित होते. चंद्रशेखर व्यंकट रामन यांसारखे संशोधक आणि काही थोड्या अपवादात्मक संशोधन संस्था यांनी चालविलेले संशोधन वगळले, तर इतरत्र संशोधनाकडे दुर्लक्षच होते. विद्यापीठामध्ये शास्त्रीय संशोधनाच्या सोयी उपलब्ध होत्या; तरी बहुतेक सर्व भर परीक्षांसाठी आवश्यक अशा अभ्यासक्रमावरच होता. ही स्थिती पालटावी आणि शास्त्रीय संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने मु. रा. जयकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विद्यापीठ समिती नेमली गेली. तिने आपल्या अहवालात विद्यापीठातील शिक्षणात संशोधनाचे महत्त्व प्रतिपादन केले होते. तथापि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाही होण्यास काही अवधी लागणार, हे उघड होते. म्हणून संशोधनकार्य ताबडतोब सुरू करावे या उद्देशाने ७ ऑक्टोबर १९४४ रोजी पुण्यास एक विद्वत्सभा बोलावण्यात आली आणि तीमध्ये मु. रा. जयकर (अध्यक्ष), शं. पु. आधारकर, पी. आर्. आवटी आणि ह. पु. परांजपे हे सभासद असलेली एक समिती नेमण्यात आली. या समितीने एक संशोधन संस्था स्थापन करण्याचे ठरविले व तिच्या कार्यक्षेत्राचा आणि घटनेचा आराखडा तयार केला. त्याला अनुसरुन ‘द महाराष्ट्र ॲसोसिएशनफॉरदकल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ (M. A. C. S.) ही संस्था स्थापन करण्यात आली. तीच ‘विज्ञान वर्धिनी, महाराष्ट्र’ या सुटसुटीत मराठी नावाने आज ओळखिली जाते.

संस्थेची वास्तू : प्रारंभी इंडियन लॉ सोसायटीने आपल्या इमारतीतील दोन दालने संस्थेस विनामूल्य वापरण्यास दिली होती. त्यानंतर १९६१ मध्ये भारत सेवक समाजाच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेने आपली जागी, संस्थेची स्वतःची वास्तू तयार होईपर्यंत, विनामूल्य वापरू दिली. संस्थेची वास्तू १९६६ मध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या २ हेक्टर जागेत केंद्रीय सरकारच्या ५ लक्ष रूपयांच्या अनुदानाने बांधण्यात आली आहे.

प्रारंभीची साधनसामग्री : शं. पु. आधारकर यांनी सूक्ष्मदर्शक कॅमेरा व अनेक प्रयोगोपयोगी उपकरणे आणि वनस्पतिविज्ञानावरील सु. ३,००० ग्रंथ संस्थेस विनामूल्य दिले. त्याचप्रमाणे त्यांनी १९४८ ते १९६० या अवधीत संस्थेचे मानद संचालक या नात्याने नेतृत्व केले. त्यांनी अनेक शास्त्रज्ञांना एकत्र आणले, पदव्युत्तर शिक्षणक्रमात मार्गदर्शन केले आणि काही संशोधन-प्रकल्पांत भागही घेतला.

संशोधन-शाखा व साधनसामग्री : जीवसांख्यिकी (जीवंत प्राणिमात्रांसंबंधी संशोधन करण्यासाठी जीवविज्ञान आणि गणितीय संख्याशास्त्र यांचा उपयोग करणारी विज्ञान शाखा), वनस्पतिविज्ञान, रसायनशास्त्र, आनुवंशिकी व वनस्पतिप्रजनन, भूविज्ञान व पुराजीवविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, कवकविज्ञान (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा अभ्यास करणारे विज्ञान) व वनस्पतिरोगविज्ञान, प्राणिविज्ञान व कृषि-कीटकविज्ञान या शाखांतर्गत विषयांचे संशोधन करण्याची साधनसामग्री संस्थेजवळ आहे. संस्थेत एक उपकरण विभागही आहे. संस्थेचे ग्रंथालय संपन्न असून त्यात सु. ११,००० ग्रंथ आहेत व सु. २०० संशोधनात्मक नियतकालिके तेथे घेतली जातात.

प्रचलित ज्ञानात भर घालील असे मूलभूत संशोधन, तसेच ग्रामीण भागात व शेतीसाठी उपयोगी पडेल असे अनुप्रयुक्त संशोधन संस्थेत केले जाते.

प्रथितयश संशोधकांना सेवानिवृत्तिनंतरही, वयाची आडकाठी न येता, संस्थेत संशोधनकार्य करता येते हे या संस्थेचे एक वैशिष्ट्य आहे. या योजनेमुळे त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ तरुण संशोधकांस मिळू शकतो.

पुणे विद्यापीठाने १९४८ मध्ये व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने १९६९ मध्ये या संस्थेस पदव्युत्तर संशोधनाचे केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे संस्थेत संशोधन करून ते या विद्यापीठांच्या एम्. एस्सी. व पीएच्. डी. पदव्यांकरिता सादर करता येते. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरलरिसर्च, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, अणुऊर्जा आयोग व विद्यापीठ अनुदान मंडळ यांकडूनही संस्थेस अनेक संशोधन-प्रकल्प मिळाले आहेत. संस्थेच्या आनुवंशिकी, वनस्पतिविज्ञान व रसायनशास्त्र या विभागांनी सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूट, ग्रामोद्योग आयोगाची रेशीम संशोधन प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र शासनाचे ग्रामोद्योग मंडळ या संस्थांच्या सहकार्यानेही काही कार्य चालविले आहे. वनस्पतिविज्ञान विभागात सह्याद्रीवरील आणि भारताच्या ईशान्य सरहद्दीवरील प्रदेशांत आढळणाऱ्या सिसालपिनिएसी कुलातील वनस्पतींचा अभ्यास झाला आहे. प्राणिविज्ञान विभागात बाजारातील तयार खाद्यांत वापरले जाणारे रंग आणि इतर घटक, तसेच कीटकनाशके यांचे मानवी शरीरावर होणारे संभाव्य दुष्परिणाम मानवी रक्तातील श्वेत पेशींच्या साहाय्याने अभ्यासिले जात आहेत. अखाद्य तेलपेंडीपासून खतांची निर्मिती, वनस्पतींचे रासायनिक घटक आणि त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास रसायनशास्त्र विभागात आणि जैव कीटकनाश, अळिंबे (भूछत्रे) व दगडफूल (शैवाक) इत्यादींचा अभ्यास कवकविज्ञान विभागात केला जात आहे. सूक्ष्मजीवविज्ञान विभागात जलशुद्धीकरण, गोबर वायू, नायट्रोजनदायी सूक्ष्मजीव यासंबंधी, तर आनुवंशिकी व वनस्पति-प्रजनन विभागात कोरडवाहू, हळव्या, रोगप्रतिकारक्षम व अधिक उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या जातींची, तसेच अधिक उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन व द्राक्षे यांच्या जातींची निर्मिती करण्याचे प्रयोग केले जात आहेत. आफ्रिकी तेल माडाची भारतात लागवड करण्याच्या दृष्टीनेही अभ्यास चालू आहे. सांख्यिकी विभागातर्फे मानवी आहारातील प्रथिनांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचा (कॅलरींचा) समतोल आणि त्या दृष्टीने शालेय विद्यार्थी आणि ग्रामीण जनता यांच्या आहारांचे सर्वेक्षण केले जाते. भूविज्ञान व पुराजीवविज्ञान विभागात उत्तर गुजरात, तमिळनाडू व आंध्र प्रदेशातील किनारपट्टी येथे सु. आठ कोटी वर्षांपूर्वीच्या क्रिटेशस कालखंडात तयार झालेल्या जीवाश्मांचा (शिळारूप झालेल्या जीवांच्या अवशेषांचा) अभ्यास केला जात आहे.

संस्थेतील संशोधनावर आधारित शास्त्रीय लेख विविध परदेशी व स्थानिक संशोधनविषयक नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध केले जातात. बायोविज्ञानम् हे संस्थेचे षण्मासिक संस्थेतील तसेच अन्य संशोधन संस्थांतील संशोधन १९७५ पासून प्रसिद्ध करीत आहे.

याशिवाय संस्थेने पुढील ग्रंथ प्रकाशित केले आहेत : पिकांचे रोग व त्यावरील उपाय (मा. ना. कामत, १९६४), एन्युमरेशन ऑफ प्लँट्स फ्रॉम गोमंतक (वा. द. वर्तक, १९६६), फंजाय ऑफ महाराष्ट्र (प. ग. पटवर्धन; व. गु. राव; अ. वि. साठे, १९७१), मोनोग्राफिक स्टडीज ऑफ इंडियन स्पिशीज ऑफ फायलॅकोरा (मा. ना. कामत; व्ही. एस्. शेषाद्री; अलका पांडे, १९७९), अगॅरिकेलीझ (मशरुम्स) ऑफ साउथ-वेस्ट इंडिया (अ. वि. साठे; श्री. मु. कुलकर्णी; जे. डॅनिअल, १९८०); न्युअर कन्सेप्टस इन न्युट्रिशन अँड देअर इंप्लिकेशन फॉर पॉलिसी (पां. वा. सुखात्मे, १९८२) आणि पाम्स ऑफ इंडिया (त्र्यं. शं. महाबळे, १९८२).

शं. पु. आघारकर यांनी आपली पुणे व मुंबई येथील स्थावर मालमत्ता संस्थेच्या नावावर करून दिली आहे.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविज्ञा विभागातर्फे मिळणाऱ्या प्रतिवार्षिक अनुदानावर संस्थेचा खर्च चालतो.

लेखक : श्री. ह.गोडबोले

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/25/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate