অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हाफकिन इन्स्टिट्यूट

हाफकिन इन्स्टिट्यूट

विविध रोगांवर लशी निर्माण करणारी व प्रशिक्षण देणारी भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था. तिला महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त होते. ही संस्था कौन्सिलद्वारा काम पाहते. तसेच तिला संशोधन सल्लागार समिती आणि शैक्षणिक सल्लागार समिती यांद्वारा मार्गदर्शन मिळते.

हाफकिन इन्स्टिट्यूटहाफकिन इन्स्टिट्यूटलूई (ल्वी) पाश्चर यांचे विद्यार्थी ⇨ वॉल्डेमार मॉर्डीकाय वुल्फ हाफकिन या रशियन शास्त्रज्ञांनी १८ जुलै १८९२ रोजी ⇨ पटकी (कॉलरा) या रोगाची प्रतिबंधक लस तयार केली. या लशीची परिणामकारकता तपासण्यासाठी ते रशियाहून मार्च १८९३ मध्ये पटकीची साथ सुरू असलेल्या कोलकाता येथे आले. त्यांच्या लशीचा उपयोग जवळपास ४०,००० रुग्णांना झाला. त्यांच्या या कामगिरीमुळे १८९६ मध्ये मुंबईत उद्भवलेल्या प्लेगच्या साथीवर लस शोधण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना बोलाविले. सुरुवातीला त्यांनी आपले संशोधन ग्रँट मेडिकल कॉलेजमधील एक खोली असलेल्या लहान प्रयोगशाळेत सुरू केले. अल्पावधीतच (तीन महिन्यांत) त्यांना लस शोधून काढण्यात यश मिळाले. नंतर त्यांना कामासाठी प्रयोगशाळा अपुरी पडू लागली, त्यामुळे विविध जागेत स्थलांतर करीत शेवटी १० ऑगस्ट १८९९ मध्ये ‘गव्हर्न्मेंट हाउस’ या इमारतीत हाफकिन यांची ‘प्लेग रिसर्च लॅबोरेटरी’ स्थिरावली. १९०६ मध्ये या प्रयोगशाळेचे नाव बदलून ‘बाँबे बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबोरेटरी’ असे ठेवण्यात आले. हाफकिन यांच्या सेवानिवृत्तीनंतर १० वर्षांनी म्हणजे १९२५ मध्ये त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ या प्रयोगशाळेचे नाव ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ असे करण्यात आले. १९७५ मध्ये या संस्थेचे विभाजन पुढीलप्रमाणे करण्यात आले : (१) लशी व इतर उत्पादने यांची निर्मिती करणारा ‘हाफकिन जीव-औषधी निर्माण महामंडळ’ हा स्वतंत्र व स्वायत्त विभाग आणि (२) ‘हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था’ हा संशोधन विभाग.

हाफकिन इन्स्टिट्यूटच्या सध्याच्या इमारतीचे बांधकाम १६७३ मध्ये पोर्तुगीजांनी फ्रान्सिस्कन मठासाठी केले होते. १७१९ मध्ये गव्हर्नर कून यांनी ती वास्तू ताब्यात घेतली. १७५० पासून तिचा वापर गव्हर्नरचे ग्रीष्मकालीन निवासस्थान म्हणून केला जाई. १८९९ मध्ये ती वास्तू हाफकिन यांच्या ताब्यात देण्यात आली.

हाफकिन इन्स्टिट्यूटची वाटचाल : ही संस्था भारतातील सर्वांत जुन्या संशोधन संस्थांपैकी एक आहे. संस्थेची प्रमुख उद्दिष्टेपुढीलप्रमाणे आहेत : (अ) साथीच्या रोगाचा सर्वांगीण अभ्यास करणे,( आ) त्यांवर प्रतिबंधात्मक उपाय शोधणे, (इ) त्यांविरुद्ध प्रतिबंधक लस निर्माण करण्याच्या शक्यता तपासणे. १८९९–१९०४ या कालखंडात संस्थेमध्ये प्रामुख्याने प्लेगच्या लशीचे उत्पादन केले गेले आणि ही लस संपूर्ण देशभर पुरविण्यात आली. यानंतर संस्थेने प्लेगच्या रोगप्रसाराचा सर्वांगीण अभ्यास व संशोधन हे काम हाती घेतले. एकोणिसाव्या शतकात संस्थेने मुंबईत झालेल्या जैव-वैद्यकीय संशोधनात मोठा हातभार लावला आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात संस्थेने आपले क्षेत्र विस्तारित करत सामान्यपणे होणाऱ्या पटकी, विषमज्वर [→ आंत्रज्वर] ⇨ क्षयरोग, ⇨ धनुर्वात, ⇨ घटसर्प, ⇨ अलर्क रोग (रेबीझ) आदी संसर्गजन्य रोगांवर लक्ष केंद्रित केले. नंतर संस्थेने अलर्क रोगाविरोधी आणि सर्पदंश (विष) विरोधी लस तयार केली. ही संस्था या लशींची भारतातील सर्वांत मोठी उत्पादक बनली. त्याप्रमाणेच संस्थेने तेथे तोंडातून देता येणारी पोलिओ लसनिर्मिती देखील सुरू केली आणि नवजात अर्भकांचे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यांपासून संरक्षण करण्यासाठी त्रिगुणी लशीचे उत्पादनही सुरू केले. तेव्हापासून ही संस्था विविध क्षेत्रांतील पूर्ण वेळ जीववैज्ञानिक संशोधन करणारी संस्था म्हणून उदयास आली. सूक्ष्म-जंतुविज्ञान, जैव उपयुक्तता, जीवरसायनशास्त्र, रसायनचिकित्सा, निदानीय विकारविज्ञान, मानवी औषधिशास्त्र, प्रतिरक्षाविज्ञान, परजीवीविज्ञान, विषाणुविज्ञान व कीटकविज्ञान अशा विविध रोगांशी निगडित असणाऱ्या क्षेत्रांत संस्था कार्यरत आहे. पुनःपुन्हा उद्भवणाऱ्या रोगांसाठी संस्थेने नोडल लॅबोरेटरीची उभारणी केली आहे.

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये २०१४ सालापासून एड्समुळे रुग्णात होणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर संशोधन सुरू आहे. त्यासोबत ही संस्था ब्रूसिलोसिस या रोगाचे संनिरीक्षण आणि सूक्ष्मजीववैज्ञानिक विश्लेषण, लेप्टोस्पायरा सूक्ष्मजीवांत सर्वत्र आढळणारा औषधांप्रती प्रतिरोध आणि सूक्ष्मजीव व पशूंत होणाऱ्या संसर्गांना कारणीभूत असलेले सूक्ष्मजीव (झूनॉटिक) यांच्याशी लढणाऱ्या नवीन रासायनिक चिकित्सा तसेच वैज्ञानिक घटकांचा सातत्याने विकास करणे ही कामे करीत आहे. एचआयव्ही विरोधात कार्य करू शकणाऱ्या काही जैवकणांवर देखील ही संस्था संशोधन करीत आहे. हे जैवकण जंतुनाशक प्रक्षालकापासून विशेषीकृत, शुद्धिकरण केलेले अर्क व वनस्पतिजन्य ओषधी यांपासून ते उत्पादनांपर्यंत आहेत. या जैवकणांचा उपयोग इन्फ्ल्यूएंझाच्या प्रकारांची ओळख करण्यासाठी देखील होतो.

हाफकिन इन्स्टिट्यूटची अधःसंरचना अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज अशी आहे. लशींच्या औषधांच्या चाचण्यांसाठी प्राण्यांची जरूरी असल्याने संस्थेत प्राण्यांसाठी मोठी प्रयोगशाळा आहे. त्यात ससे, उंदीर, गिनीपिग इ. प्राणी असून त्यांच्यासाठी प्रजनन सुविधा देखील आहे. सर्पविषाची निकड भागावी म्हणून संस्थेने सर्पगृह बांधून त्यात भारतातील सर्व जातींचे विषारी साप पाळले आहेत. तसेच प्रतिरक्तद्रवाच्या उत्पादनासाठी घोड्यांचा उपयोग होत असल्याने घोडेही पाळले आहेत.

हाफकिन इन्स्टिट्यूटला पुढील विविध संस्थांकडून मान्यता प्राप्त झाली आहे : आयएसओ ९००१ : २००८; भारत सरकारद्वारा शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन संस्था (SIRO) आणि विज्ञान व तंत्रविद्या विभाग (DST) याचे संशोधन आणि विकास केंद्र; जागतिक आरोग्य संघटना (WHO), भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) आणि समाकलित रोग निरीक्षण कार्यक्रम (IDSP) यांच्याकडून मानव आणि पक्षी यांतील इन्फ्ल्यूएंझा संनिरीक्षक म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच स्वाइन फ्ल्यूसाठी भारत शासनाची अधिकृत प्रयोगशाळा, जागतिक आरोग्य संघटनेचे अलर्क रोगासंबंधी संदर्भ केंद्र, राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राचे (NCDC) प्लेग निरीक्षण केंद्र, अन्न व औषधी प्रशासनाचे (FDA) औषध चाचणी केंद्र यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या ही संस्था पार पाडते.

लेखक : नितिन भरत वाघ ;  श्री. म. सापटणेकर

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate