অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चर्मकलाकाम

चर्मकलाकाम

प्राण्यांच्या कातड्यापासून विविध प्रकारच्या वस्तू बनविण्याची कला. ही फार प्राचीन असून सार्वत्रिक आहे. प्राचीन काळी कपडे, भांडी, वाद्य, तंबू यांसारख्या जीवनावश्यक वस्तू कातड्याच्याच बनविण्यात येते.

पादत्राणे बनविणे हा कातड्याचा सर्वसामान्य उपयोग आहे. भक्कम कातडे ताण व मार पुष्कळच सहन करू शकते, म्हणून त्याचा उपयोग यंत्रातील एका चाकाची गती दुसऱ्या चाकास देण्यासाठी लागणाऱ्या पट्ट्याकरिता चांगला होतो. फार वापरात असलेल्या वस्तू उदा., ट्रान्झिस्टर, कॅमेरे, चष्मे अशा नाजुक वस्तूंची आवरणे व पैशाची पाकिटे इ. मऊ आणि शिलाईदार कातड्याची बनवितात. याशिवाय नेहमी वापरण्यास लागणाऱ्या पिशव्या, पाकिटे, दप्तरे, प्रवासी पेट्या वगैरे कातड्याच्या वस्तू दीर्घकाळ टिकतात. शोभेच्या वस्तूही पुष्कळ वेळा कातड्याच्या बनवितात, जसे – जडजवाहिऱ्यांच्या पेट्या, कलमदान, आरशाच्या कलापूर्ण चौकटी, भिंतीवरील पडदे, विभाजक पडदे, गालिचे वगैरे. ध्रुवप्रदेशासारख्या अतिथंड प्रदेशातील रहिवासी कातड्याचे कपडे, बूट व हातमोजे वापरतात. प्राचीन काळी हिंदुस्थानात बाहुल्या तयार करण्यासाठी कातड्याचा उपयोग करीत. कातड्याच्या पखाली वेदकालीही उपयोगात होत्या. तसेच डुक्कर, वाघ व हरिण इत्यादिकांच्या कातड्याची पादत्राणे बनवीत, असे निर्देश वेदवाङ्‌मयात आढळतात. पादत्राणे बनविताना हरणाच्या कातड्याची केसाळ बाजू वर ठेवीत. या पादत्राणांचा वापर यज्ञात विविध प्रसंगी करण्यात येई. कातड्याची नाणीही एकेकाळी वापरात होती. शिवाय नगारा, मृदंग, तबला यांसारखी चर्मवाद्ये तर प्रसिद्धच आहेत.                                                              

निरनिराळ्या प्राण्यांची कातडी काढून घेतल्यावर ती टिकाऊ बनविण्यासाठी रापवितात. काही झाडांची साल वाळवून, कुटून तिचे पाणी (द्रावण) तयार करतात. त्यात कच्ची कातडी कित्येक दिवस भिजत ठेवतात. नंतर ती वाळवून, ठोकून साफ करतात, या क्रियेस कातडे रापविणे म्हणतात. हल्ली रासायनिक पद्धतीने कातडी रापविण्याचे काम जलद व चांगले होते.

कातडी वस्तू शोभिवंत दिसाव्या यासाठी पुढील पद्धती वापरतात : (१) उठावरेखन करून त्यात निरनिराळे रंग भरणे, (२) उत्कीर्णन करणे, (३) कोरीव काम करणे, (४) साचेकाम करणे, (५) जाळकाम करणे म्हणजे नको असलेला भाग जाळून कोरीव काम करणे व (६) भिन्न भिन्न रंगांचे आणि आकारांचे चामड्यांचे तुकडे चर्मवस्तूवर जोडून जडावाचे काम करणे.

र्मकलेतील सर्वांत महत्त्वाचे हत्यार म्हणजे कातडे कापण्याची सुरी. या सुऱ्या दोन प्रकारच्या असतात : (१) गोल धारेची सुरी व (२) सरळ पाते असलेली सुरी. कातडे कापताना कातड्याखाली धरण्यासाठी मऊ लाकडाचा पाट आवश्यक असतो. कोरीवकाम करण्यासाठी निरनिराळ्या आकारांची पटाशीसारखी धारदार हत्यारे व काम करताना ठोकण्यासाठी लाकडी हातोडा आणि नक्षीकामासाठी ठसे असलेली विविध हत्यारे वापरतात. शिवाय रेघ ओढण्यासाठी टोकदार टोच्या, छिद्र पाडण्यासाठी एका पात्यास खाच व दुसऱ्यास टोक असलेली पकड किंवा चिमटा यांचा उपयोग करतात. निरनिराळे ठसे असलेले चक्र टोकास बसविलेल्या एका हत्याराने कातड्यावर किनारीची नक्षी उठविता येते. जोडकाम करताना शिवण्यासाठी दोरा अगर वादी व सुईप्रमाणे टोच्या लागतो. सिमेंट किंवा कृत्रिम सरसाच्या द्रवाने चिटकवूनही जोडकाम करता येते. बटणे, बकले जोडण्यासाठी दोन टोकांचे खिळे (रिबीट) वापरतात. काम करताना कातडे योग्य प्रमाणात मऊ राहण्यासाठी भिजवून दमट ठेवावे लागते.

पूर्वी दिल्लीचे जोडे सर्वत्र प्रसिद्ध होते. या जोड्यांचे अनेक प्रकार असत. गणिकांकरिता तयार करण्यात येणाऱ्या सपाता फारच आकर्षक रीतीने तयार केलेल्या असत. त्यांवरील मोती, सोनेरी, जरतार, रुपेरी व सोनेरी टिकल्या, वर्ख इ. तांबड्या, काळ्या आणि पिरोजी रंगाच्या चामड्यावर फारच शोभून दिसत. कधीकधी मूळ कातड्यावरच वर्ख चढवून तर कधी रंगीबेरंगी कापडाचे तुकडे लावून व त्यावर कशिदा काढून त्या सपातांना आकर्षक बनवीत. १८६४ मध्ये चार लाख पादत्राणांची निर्यात करण्यात आली होती, असा उल्लेख सापडतो. तसेच काही वर्षापूर्वी सोनेरी जरीकाम केलेली पादत्राणे करण्याचा धंदा लखनौला प्रसिद्ध व भरभराटीत होता. तेथे अतिशय सुबक भरतकाम केलेली कृत्रिम फुले, दागिन्यांच्या पेट्या आणि शृंगार पेट्याही बनवीत. राजस्थानात भरतकाम केलेल्या सपाता, तलवारींच्या म्याना, ढाली इ. बनवीत असत. बिकानेर आणि जैसलमीर भागात घोड्याची व उंटाची खोगीरे बनवीत. त्यांवर भरतकाम केलेले असे. उंटाच्या पोटाच्या कातड्यापासून पाण्याच्या आणि अत्तराच्या बुधल्या बनविण्याचे काम बिकानेरला होत असे. या बुधल्यांवरही नक्षीकाम व रंगकाम चांगले केले जाई. मध्य प्रदेश व म्हैसूर राज्यांतील पादत्राणेही एके काळी बरीच प्रसिद्ध होती.

गुजरातेत कशिदाकाम केलेल्या कातडी चटया तयार होत असत. अहमदाबादला पूर्वी कातड्याच्या ढालीही करीत. ही कला मुसलमानी राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीतच भरभराटीत होती. अयोध्येच्या नबाबाच्या काळी लखनौमधील भरतकाम केलेल्या पादत्राणांचे उत्पादन व खप चांगला होता. तरीही हल्ली पाटणा, कटक, झांशी, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, मद्रास, म्हैसूर, त्रिचनापल्ली, रायचूर व सेलम येथे जरीकाम व कशिदाकाम केलेली पादत्राणे बनविली जातात. पुण्याच्या पुणेरी जोडा व वाईचा शिरोळी जोडा एके काळी प्रसिद्ध होता, तर आज कोल्हापूरच्या कोल्हापुरी चपला प्रसिद्ध आहेत. शेख सादीच्या गुलिस्तान नावाच्या ग्रंथाची कातडी बांधणी सुरेख व सुबक करण्यासाठी अलवारच्या महाराज बनीसिंगाने दिल्लीच्या करीम अहमद नावाच्या कारागिराला १८२० च्या सुमारास मुद्दाम बोलाविले आणि ते काम त्याने फारच कलापूर्ण व प्रेक्षणीय केले, असे वर्णन आढळते. तेव्हापासून ही पुस्तकबांधणीची कला राजाश्रयाने अलवारमध्ये भरभराटीस आली होती. मद्रासमध्ये मेजावर टाकण्यासाठी ज्या रंगीत कातड्यांचा उपयोग करीत त्यांवर धार्मिक तसेच काल्पनिक आकृत्या असत. रायचूरला पातळ कातड्याच्या गोलवट अंथरण्या तयार करून त्यांवर स्त्री-पुरुषांच्या आकृत्या काढून त्यांना हत्ती किंवा उंट यांची तोंडे लावीत असत. याशिवाय माशांच्या खवल्यांच्या व कातड्यांच्या गंजिफा मद्रास व जयपूरकडे तयार

छिद्रयुक्त कातडी पादत्राण, रोम, सु. २ रे शतक.

होत असत. हस्तोद्योगाच्या दृष्टीने भारतीय चर्मकला श्रेष्ठ दर्जाचे आहे, कारण आजही हातबांधणीची पादत्राणे – विशेषतः कलाकुसर केलेल्या चपला कोल्हापूरला बनत असल्यामुळे कोल्हापूरवरून व अन्य काही ठिकाणांहून त्यांची परदेशी निर्यात केली जाते.

ज तर कानपूरला कातडीकामाच्या व्यवसायाचे केंद्रस्थान म्हणून फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तेथे पाश्चात्त्य पद्धतीची पादत्राणे, ट्रंका, घोड्याचे खोगीर, लगाम, सूटकेस यांसारख्या वस्तूंची निर्मिती यंत्राच्या साह्याने कारखान्यात मोठ्या प्रमाणावर होत असते. निर्यात होणाऱ्या या वस्तूंमध्ये आग्रा व कोईमतूर येथील सू-अपर्स, कोल्हापुरी चपला, कलकत्त्याच्या मेंढीच्या कातड्याच्या चपला आणि कानपूरच्या खेळण्याच्या वस्तू लोकप्रिय ठरल्या आहेत. भारतात जनावरांच्या कातड्याची पैदास फार मोठी आहे. तथापि त्यामानाने त्यापासून तयार होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन मात्र कमी आहे. त्यामुळे देशातून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालात कातड्याची निर्यात बरीच असून पश्चिमेकडील देश भारतीय कच्च्या कातड्याचे गिऱ्हाईक आहे. भारताचे हवामान उष्ण व पश्चिमेकडील देशांचे थंड हे याचे कारण आहे. कातडी वस्तू, कपडे व पादत्राणे यांचा उपयोग थंड देशात अधिक व आपल्याकडे कमी आहे.

छंद म्हणून चर्मकलाकामामध्ये आत्माविष्काराला खूपच वाव असतो. त्यामध्ये आपल्या कल्पना, विचार इत्यादींचा अविष्कार साधता येतो. पाश्चात्य देशांत छंद म्हणून या कलेचा प्रसार चांगलाच झाला आहे, आपल्या देशातही अलीकडे छंद म्हणून चामड्याच्या आकर्षक कलाकृतींची निर्मिती होऊ लागली आहे. अशा वस्तूंचे प्रदर्शनही भरविले जाते.

पहा : चर्मपूरण; चर्मोद्योग

कानडे, गो. चिं.; जोशी, चंद्रहास

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate