(लॅटिस वर्क). वास्तूमध्ये जाळीकाम हे प्रायः उष्ण वाऱ्याच्या झोतापासून अथवा प्रवाहापासून निर्माण होणाऱ्या उष्म्याचे प्रमाण कमी करणे, तसेच वाऱ्याच्या झोताचे वेग सुसह्य करणे, धुळीचा त्रास कमी करणे यांसाठी योजले जाते. त्याचप्रमाणे एकांत साधणे व उजेडाचे प्रमाण सुखावह राखणे, हेही जाळीकामाचे उद्देश आहेत. दगडी फरश्यांमध्ये किंवा मातीच्या मोठ्या मुलायम चिपांमध्ये भोके पाडून त्यामध्ये लाकडाच्या उभ्याआडव्या पट्ट्या मारून तयार केलेल्या जाळ्यांचा वापर उष्ण कटिबंधात विशेषेकरून करण्यात आला. इस्लामी वास्तूंमध्ये, गॉथिक चर्चमध्ये तसेच चीन-जपान आदी देशांच्या वास्तुनिर्मितीमध्ये जाळ्यांचे विविध व वैशिष्ट्यपूर्ण नमुने आढळून येतात.
आकारभेदांनुसार जाळीकामाचे सर्वसाधारण प्रकार पुढीलप्रमाणे होत : (१) अर्धनळाकृती कौले भिंतीच्या बांधकामात योजून वर्तुळाकृती जाळी सांधणे. प्राचीन भारतीय गृहरचनेतील स्वयंपाकघरामध्ये व स्नानगृहात धूर जाण्यासाठी जे झरोके असत, त्यांच्या तोंडावर ही जाळी बसविलेली असे. (२) विटांच्या बांधकामात त्या तिरप्या एकमेकांशी टेकून वापरणे; अथवा त्या सोंगटीच्या पटाप्रमाणे योजून जाळीकाम करणे. (३) पक्वमृदेच्या ओतीव प्रकारच्या जाळ्या. यांत पानफुलांची तसेच विविध भौमितिक आकारांची नक्षीदार गुंफण आढळते. भारतात गुप्तकालीन कालखंडात या जाळ्यांचा वापर होत असे. (४) संगमरवर, दगडी फरशी, लाकूड यांच्या जाळ्या कठडे, झरोके, खिडक्या, आडोशीपट यांसाठी प्राचीन काळापासून वापरात आहेत. तसेच कबरीभोवतीची जागा पवित्र राखण्यासाठी जाळीचे आडोशीपट योजण्याची प्रथाही आढळून येते. फतेपुर सीक्री, अहमदाबाद येथील कबरी तसेच आग्रा येथील ताजमहाल व इतमाद उद्दौलाजी कबर अशा जाळीकामासाठी उल्लेखनीय आहेत. सलीम चिश्तीच्या कबरीवरील आणि अहमदाबादच्या सिद्दी सय्यद मशिदीतील जाळ्या प्रमाणबद्ध व नाजुक सौंदर्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत.
आधुनिक वास्तुनिर्मितीत ब्राझील येथील प्रसिद्ध लुईझ कॉस्टा या वास्तुविशारदाने काँक्रीटच्या जाळ्या इमारतीच्या बाह्यांगी योजिल्या आहेत. ही जाळीरचना एखाद्या वीणकामासारखी दिसते. आधुनिक गृहनिर्मितीत अशा काँक्रीटच्या जाळ्या शोभा व उपयुक्तता या दोन्ही हेतूंनी वापरल्या जातात.
गटणे, कृ. ब.; कान्हेरे, गो. कृ.
अंतिम सुधारित : 5/20/2020
जाळीकाम विषयी माहिती