कलेमध्ये मेणाचा उपयोग अप्रत्यक्षरित्या व प्रत्यक्षरित्या असा दोन प्रकारे मुख्यतः होतो. पहिल्या प्रकारात मेणात रंगद्रव्ये व इतर बंधके मिसळून त्याद्वारे चित्रलेखन करण्यात येते शिवाय मेणाची शिल्पे बनवून त्यांचा इतर धातूंत छाप उमटवितात. त्याचप्रमाणे प्रथम मेणामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या विविध कलाकृतींचे नानाविध प्रयोग करून त्याद्वारे मोठे शिल्प घडविण्यात येते. उदा., गणेशमूर्ती हा एक विशिष्ट प्रकार घेतला तर त्या शिल्पप्रकारांच्या विविध प्रकारच्या शैलीचे प्रयोग करून त्यांतून जो इष्ट वाटेल त्याची निवड करणे व शेवटी त्या प्रकारचे शिल्प घडविणे. दुसऱ्या प्रकारात मेणाचा माध्यम म्हणून उपयोग करून त्याद्वारे हव्या त्या कलाकृतींची निर्मिती करतात. उदा., विविध खेळणी, बाहुल्या, व्यक्तिप्रतिमा वा तत्सम वस्तू.
ऐतिहासिक पार्श्वभूमी मेणकामाची ही कला फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ईजिप्तमध्ये पुरातन काळी (इ. स. पू. २४००) अंतक्रियाकर्माकरिता मेणात देवतांच्या मूर्ती कोरीत व नंतर त्या मृताच्या थडग्यात ठेवीत. अशा बऱ्याच मूर्ती निरनिराळ्या संग्रहालयात उपलब्ध आहेत. ग्रीसमध्येही अभिजात काळात लहान मुलांची मेणाची खेळणी फार लोकप्रिय होती. तसेच तेथे धार्मिक नवस फेडण्यासाठी देवदेवतांच्या लहान लहान मूर्ती करीत असल्याचे उल्लेख आढळतात. गूढ शक्तीचे प्रतीक म्हणून निरनिराळ्या दुष्ट प्रवृत्तींच्या आकृती करून त्यांचा भेद करीत. प्राचीन काळी रोममध्येही मेणकामाला अधिक महत्त्व आले होते. मेणातील पूर्वजांचे पुतळे येथे जतन केले जात व विशेष प्रसंगी ते वापरीत. तेथील शनीदेवाच्या उत्सवप्रसंगी मेणाचे पुतळे व फळे भेट देण्याची तसेच मेणाचे मुखवटे तयार करण्याची प्रथा असल्याचे आढळून येते. अनुर्झिया या गिरजाघरात असे बरेच मुखवटे आहेत. लोरेन्सो द मॅग्निफिसेन्ट हा येथील मुख्य मुखवटाकार होता. एलिझाबेथ राणी पहिली हिचा व अन्य प्रमुख व्यक्तींचे मेणातील पुतळे वेस्टमिन्स्टर अबेमध्ये पहावयास सापडतात.
प्रबोधन काळात इटलीमध्ये मेणाच्या प्रतिकृती निर्माण करण्याला फारच महत्त्व प्राप्त झाले होते व त्याचा वापरही त्या काळातील अग्रगण्य शिल्पकारांनी केला होता. मायकेलअँजेलो व जोव्हान्नी ह्यांच्यासारखे प्रसिद्ध शिल्पकार आपल्या शिल्पाचे लहान नमुने मेणातच करीत असत. या काळातील ब्राँझ पदकांना त्यांच्या मूळच्या मेणातील नमुन्याच्या सुबकपणामुळेच नैपुण्य प्राप्त झाले होते.
सोळाव्या शतकात मेणातील पदकावरील व्यक्तिचित्रे फारच लोकप्रिय ठरली. ॲटोनिओ ॲबोन्डिओ हा व्हिएन्ना व प्राग येथील दरबारात त्यासाठीच प्रसिद्ध होता.
स्पेन व इटलीमध्ये अशी मेणांतील बहुंरगी उत्थित शिल्पे सतराव्या शतकाच्या सुमारास विशेष उर्जितावस्थेला आलेली होती व मेणकामात गाएतानो जूल्यो झंबो याची विशेष प्रसिद्धी होती. कॉझिमो तिसरा, तस्कनी याच्या दरबारातील प्रतिकात्मक रंग व धार्मिक भावनांनी युक्त अशी मानवाच्या शरीराची दुर्दशा व प्लेग विषयावर आधारित उत्थित मेणशिल्पे प्रसिद्ध आहेत. त्याने शरीरशास्त्रात उपयोगी पडणारे नमुने जिनीव्हा येथे फ्रेंच डॉक्टर डेसन्युईस याच्या साह्याने प्रथमच केले होते.
पुढे अठराव्या शतकातही पदकावरील मेणातील व्यक्तिचित्रांना बरीच लोकप्रियता लाभली. ईसाक गॉसेट (१७१३–९९) हा इंग्लिश कलाकार यात प्रमुख होता. तसेच जोसाया वेजवुड यानेही मेणातील बरीच व्यक्तिचित्रे व उत्थित शिल्पे केली आणि त्यांचे मृत्पात्रीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. या काळात मेणकामाची प्रदर्शनेही लोकप्रिय ठरली होती. त्याच काळात‘टॅटलर’ नामक कृत्रिम हालचालींनी युक्त अशा मेणाकृतींची प्रदर्शने भरविण्यात आली होती. मेणकामाचे सर्वांत महत्त्वाचे व दीर्घकाळ टिकणारे प्रदर्शन म्हणजे मॅडम मारी तुसो (१७६१–१८५०). हिच्या फ्रेंच क्रांतीवर आधारित दृश्ये प्रदर्शित करणारे लंडनमधील प्रदर्शन विख्यात आहे. या प्रदर्शनात फ्रेंच क्रांतीनंतर तिच्याकडून मुद्दाम करवून घेण्यात आलेले, राजकारणातील प्रमुख मृत व्यक्तींच्या चेहऱ्यांचे मेणात छाप काढून तयार केलेले, अप्रतिम मुखवटे आहेत. तसेच लूई सोळावा व मारी आंत्वानेत आणि क्रांतिकारी मारा यांचेदेखील तेथे पुतळे आहेत. पुढे फोटोग्राफी व अन्य शोधांमुळे मेणकाम अवनतीस आले; तथापि अलीकडेच मार्टिना नवरातिलोवा या जगविख्यात टेनिसपटूचा मेणातील पुतळा ज्यूडी क्रीग या स्त्री कलाकाराने केल्याचे उदाहरण घडले आहे.
मेणकामातील विविध पद्धती मेणापासून कलाकृती निर्माण करण्याच्या किंवा मेणाचा उपयोग करून अन्य धातूंत कलाकृती बनविण्याच्या पुढीलप्रमाणे विविध पद्धती आहेत (अ) ह्या पद्धतीत प्रथम मेणाच्या गोळ्याला, जी कलाकृती निर्माण करावयाची आहे तिचा, स्थूल आकार देतात व नंतर त्या आकारावर खोदकाम तसेच कोरीवकाम करून ती कलाकृती पूर्ण करण्यात येते. हे तंत्र वापरण्याकरिता प्रथम ज्या आकाराची कलावस्तू निर्माण करावयाची आहे, त्या आकारापेक्षा साधारण लहान आकार प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये तयार करून घेतात. आवश्यकता वाटल्यास त्या आकाराला बळकटी देण्याकरिता त्याच्यावर तार गुंडाळतात किंवा नळ्या लावतात. नंतर त्या आकारावर वितळलेले मेण कुंचल्याद्वारा नियोजित जाडी मिळेपर्यंत लावतात व त्यावर मग कोरीवकाम करतात.
(आ) एखाद्या कलाकृतीचा साचा ढाळ्याकरिता मेणाचा उपयोग फारच सुलभ रीतीने करता येतो. त्यासाठी प्रथम कलाकृतीच्या बाह्य आकारावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा पातळ थर देतात. या थराला चांगल्या रीतीने जमू दिले जाते; त्यामुळे तो कडक होतो. नंतर हा साचा कलावस्तूपासून विलग करण्यात येतो व त्यास साबणाच्या उष्ण पाण्यात बुडवून नीट भिजू देण्यात येते; त्यानंतर तो साचा पाण्यातून बाहेर काढून त्यात पातळ मेण ओततात. थंड झाल्यावर हे मेण नीट जमते व घनरूप बनते. त्यानंतर प्लॅस्टरचा साचा त्यापासून विलग करण्यात येतो. साबणयुक्त पाण्यामुळे मेण प्लॅस्टरच्या साच्याला चिकटत नाही व तो मेणापासून सुलभतेने विलग होतो. कलाकृती जर अवघड असेल, तर तिच्या निरनिराळ्या भागांचे वेगवेगळे साचे करण्यात येतात; त्यामुळे मेणातील छाप सहजपणे काढता येतो.
मेणातील पोकळ छाप घ्यावयाचे असल्यास कलाकृतीच्या निरनिराळ्या छापांमध्ये थोडेसे पातळ मेण घालून त्या छापांना अशाप्रकारे हलविण्यात येते, की त्यामुळे पातळ मेणाचा थर छाप्याच्या सर्व अंतर भागांत नीट बसावा. ते मेण नीट जमल्यावर त्यास त्या छापापासून अलग करण्यात येते.
मेणामध्ये मांसलपणाचा भास निर्माण करण्याचा विशिष्ट गुण आहे. या गुणामुळेच मनुष्याकृती निर्माण करण्याकरिता त्याचा उपयोग करतात. फ्लॉरेन्सचा आन्द्रेआ देल व्हेररॉक्क्यो (१४३५–८८) हा मेणातील पूर्णाकृती पुतळे करणारा पहिलाच कलावंत होता. तो आपल्या मेणातील पुतळ्यांना पोशाख, चष्मा, डोळे, केस वगैरे लावून ते पूर्ण करीत असे, चेन्नीनी चेन्नीनो याच्या चौदाव्या शतकातील लिब्रो डे आर्ट्स या पॅड्युआ गावच्या हस्तलिखित माणसाचे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये छाप कसे घ्यावयाचे व त्यांवरून मेणात छाप कसा काढायचा यासंबंधीचे संपूर्ण तंत्र व पद्धती दिली आहे. रोमन काळापासून या पद्धतीचा उपयोग झालेला दिसून येतो. लंडनमधील मॅडम मारी तुसो हिच्या सुप्रसिद्ध प्रदर्शनांतील पुतळे ह्याच पद्धतीने केलेले आहेत.
विशिष्ट तंत्रांचा वापर करून मेणातील कलाकृतींचे धातूतील माध्यमात रूपांतर करण्यासाठी मेणक्षय पद्धतीचाही (लॉस्ट वॅक्स प्रोसेस) शिल्पकलेत प्रामुख्याने उपयोग करण्यात येतो.
जी कलाकृती धातूत किंवा इतर माध्यमात करावयाची असते, तिची प्रतिकृती प्रथम मेणात काढतात व नंतर त्या छापावरून ती अन्य माध्यमांत ढाळतात. यासाठी मेणातील ती कलाकृती काहीशा पातळ मातीत बुडविली जाते, त्यामुळे तिच्यावर मातीचा पातळ थर चढतो. हा थर वाळल्यावर त्याच्यावर मजबुती येण्याकरिता मातीचा जाड थर देतात व तो वाळल्यावर त्यास गरम करण्यात येते. या प्रक्रियेमुळे आतील मेण आधीच करून ठेवलेल्या मार्गातून बाहेर निघून जाते. ते पूर्णपणे काढून टाकल्यावर आत निर्माण झालेल्या पोकळीत ज्या धातूत ती कलाकृती ढाळावयाची असते तो धातू पातळ करून त्या साच्यात ओततात. धातू थंड झाल्यावर तो पोकळीतील आकारनुरूप घट्ट होतो व जमून बसतो. त्यानंतर मातीचे बाहेरील आवरण काढून टाकून धातूतील कलाकृती प्रदर्शित करतात. ह्या पद्धतीत मेणातील कलाकृती व मातीतील छाप ही दोन्ही नष्ट होत असल्याने तिला‘मेणक्षय पद्धती’ असे म्हणतात.
मेणातील काही विशिष्ट गुणांमुळे प्राचीन काळापासून चित्रकलेतही रंग व पृष्ठभाग तयार करण्याचे एक प्रमुख माध्यम म्हणून मेणाचाच प्रामुख्याने वापर केलेला आढळतो. अभिजात यूरोपीय ग्रीक व रोमन काळापासून विविध कालखंडांत त्याचा उपयोग झालेला आहे. मेणामध्ये रंगद्रव्ये व इतर बंधके मिसळून तयार केलेल्या रंगांनी, चित्रफलकावर किंवा मेणाचा थर दिलेल्या भिंतीवर चित्रे काढतात भित्तिचित्रण]. अशा पद्धतीने काढलेली चित्रे अत्यंत टिकावू असतात. त्यांतील रंगांचा तजेलदारपणा, टिकावूपणा, पोताची विविधता व चकाकीविरहितता हे गुण विशेष उल्लेखनीय आहेत.
मेणरंग वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे ज्वलन-क्रिया पद्धती. ह्या पद्धतीत रंगद्रव्ये वितळलेल्या मेणात मिसळतात. ते रंग धातूच्या रंगधानीत (पॅलेट) ठेवून आणि ती रंगधानी पेटलेल्या कोळशाच्या शेगडीवर किंवा नळकांडीवर ठेवून त्यातील रंग कुंचल्याने किंवा बोथट हत्याराने चित्रफलकावर लावतात. कुंचला हाताळणे सुलभ जावे म्हणून आवश्यकतेप्रमाणे चित्रफलक तापवून गरम करतात व चित्र पूर्ण झाल्यावर गरम अवजार चित्राच्या सर्व भागांवर समान अंतर ठेवून फिरवितात. ह्या क्रियेस ज्वलन क्रिया असे म्हणतात. या क्रियेमुळे चित्र एकजीव व भक्कम होते; त्यानंतर त्या चित्रांना तलम कापडाने पुसण्यात येते. अशी चित्रे अतिशय तजलेदार रंगांची, विविध पोतांच्या परिणामांनी युक्त व अत्यंत टिकावू असतात.
मेणमाध्यमातून तयार केलेल्या रंगातील चित्र पद्धतीतंत्र जरी बरेच क्लिष्ट असले, तरी त्यातील वरील गुण वैशिष्ट्यांमुळे काही आधुनिक चित्रकारांचे लक्ष परत ह्या पद्धतीकडे वळले आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020